कोरोना आणि एकांत
मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजारामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले असून लाखोंना याची लागण झालेली आहे. या विषाणूवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध सापडले नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला बाहेरच्या सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क तोडून, सर्व कामधंदे सोडून घरात बसणे भाग आहे. अशा पद्धतीने रिकामे घरात बसणे अनेकांना असह्य होत असल्याने बरेच जण बाहेर पडणे चुकीचे आहे, हे माहित असताना देखील एखादा फेरफटका मारून येत आहेत. आज मात्र आपल्याला सक्तीचे घरात बसून राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर पुढे कदाचित अनेक दिवस आपल्याला घरात बसून काढावे लागतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
मित्रांनो, आपण सर्वच जण (आजच्या घडीला जगभरातील ४०० कोटींपेक्षा जास्त लोकं) या सक्तीच्या एकांताला
वैतागलेले आहोत. परंतु, असे एकांतात किंवा भूमिगत होऊन यापूर्वीही अनेक व्यक्तींना किंवा समूहांना दिवस काढावे लागले आहेत, हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये हिटलरने ज्यू लोकांची कत्तल करायला सुरुवात केली होती. अशा वेळी अनेक जर्मन कुटुंब गोदामे, कारखाने, मोठी घरे इत्यादी त्यांना शक्य होईल अशा ठिकाणी लपून बसले होते. काहीजण तर दोन-दोन तीन-तीन वर्षे एकाच ठिकाणी स्वतःचा जीव वाचवून कसाबसा दिवस काढत होते. त्यापैकी जे सापडले त्यांना छळछावण्यांमध्ये पाठवून त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेतले जाई व त्यांची काम करण्याची क्षमता संपली की त्यांना गोळ्या झाडून किंवा गॅस चेंबरमध्ये डांबून मारून टाकले जाई. यामुळे आपण कुणाला सापडणार नाहीत, आपले वास्तव्य कुणाच्या लक्षात येणार नाही, याची ते अतिशय काळजी घेत. Anne Frank हिच्या ‘The diary of a young girl’ या पुस्तकात व ‘Schindler’s list’ या चित्रपटात आपल्याला याचे चित्रण बघायला मिळते. या एकांताच्या काळात यापैकी अनेक लोकांनी साहित्य लिहिले. (वरील पुस्तक त्यापैकीच एक आहे. विशेष म्हणजे ते तेरा-चौदा वर्षाच्या मुलीने लिहिलेले आहे). विविध कला आत्मसात केल्या, भाषा शिकले. आपण कधीतरी यातून बाहेर पडू, तेव्हा आपल्याला हे कामात येईल व आता उपलब्ध असलेल्या वेळेचा उपयोग करता येईल, हा उद्देश त्यामागे होता.
आपला देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना आपले असंख्य क्रांतिकारक व नेते यांनी हिंसक व अहिंसक मार्गांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. तेव्हा त्यांना पकडून तुरुंगात टाकले जाई किंवा अनेक जण पकडले जाऊ नयेत म्हणून भूमिगत होत. तुरुंगांमध्ये एकांतवासात या लोकांनी दिवस काढले. काहींना तर अंधार कोठडीत डांबण्यात आले होते. पण यापैकी अनेकांनी या एकांताचा फायदा करून घेतला व जगाला अजरामर असे साहित्याचे लेणे दिले. टिळकांनी ‘गीतारहस्य’, नेहरूंनी ‘Discovery of India’, ‘The Glimpse of World History’ ही पुस्तके, इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे (जी पुस्तकरूपात प्रसिद्ध आहेत), साने गुरूजी यांनी ‘श्यामची आई’, भगतसिंग यांनी ‘मी नास्तिक का आहे?’ हा निबंध, सावरकरांनी कविता इ. अशी असंख्य उदाहरणे देण्यासारखी आहेत.
त्याच्याही मागे गेलो तर अशी अजून असंख्य उदाहरणे आपल्याला सापडतील. राम १४ वर्षे वनवासात होता. चक्रधरस्वामी कित्येक वर्षे एकांतात होते व नंतर लोकांतात आले. संत तुकाराम हे डोंगरावर जाऊन बसत. ‘घातकचि आहे लोकांचा तो संग। म्हणुनि निःसंग तुका राही।।’ असे त्यांनीच लिहून ठेवलेले आहे. थोडक्यात, एकांत हा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. मात्र मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया ही आजच्या काळातील माध्यमे यात अडथळे ठरू शकतात. जुन्या काळात या लोकांनी एकांताचा फायदा घेत साहित्य व कलानिर्मिती केली, वाचन केले. त्या काळात त्यांना वरील अडथळे नव्हते. किंबहुना वरील साधने त्या काळात नसल्याने त्यांना कुणाशीही संपर्क साधता येणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेर काय चाललंय, जगात कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत, हे आज ज्याप्रमाणे आपल्याला सहज माहिती होते. त्या काळातील लोकांना ही सुविधा नव्हती. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जगाशी तुटलेले असायचे व एकांतात दिवस काढायचे.
मात्र मोबाईलचा वापरही आपण आपले ज्ञान वाढविण्यासाठी, माहितीत भर घालण्यासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी करू शकतो. त्यासाठी युट्यूबवर खूप चांगले चित्रपट, नाटकं, व्याख्याने (प्राचार्य शिवाजीराव भोसले, गिरीश कुबेर, हरी नरके, डॉ. संग्राम पाटील इ. व इतर भाषांमधील अजून असंख्य) उपलब्ध आहेत. तुमच्याकडे आता भरपूर वेळही आहे.
कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी एकमेकांचा संपर्क टाळणे, घरात राहणे आवश्यक आहे. तेव्हा एकमेकांवर, परिस्थितीवर, नशीबावर वैतागण्यापेक्षा, भविष्याची चिंता करण्यापेक्षा काहीतरी निर्मिती करूया किंवा वाचून, उत्कृष्ट चित्रपट, नाटके पाहून स्वतःला समृद्ध करू या!
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
छान सर
उत्तम लेख
अभ्यासपूर्ण लेख सर…👍👍