ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा
१९६० नंतर मराठी साहित्यात जे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या अतिशय मोलाची भर घातलेली आहे. एक नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र मराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले. या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्याने केले आहे.
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध फेलोशिप इ. विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw
- ‘ग्रामीण साहित्य’ संकल्पना-
‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना समजून घेत असताना आधी ‘ग्रामीण’ ही संकल्पना समजून घ्यावी लागते. ‘ग्रामीण’ या शब्दातून ग्राम-गाव-खेडे इत्यादी गोष्टी लक्षात येतात. ग्राम-गाव किंवा खेडे याची रचना, त्याचे स्वरूप-वैशिष्ट्ये समजून घेतल्यास ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट होऊ शकते.
अलीकडे ग्रामीण जीवनात अनेक परिवर्तने घडून आलेली आहेत. त्याआधी गाव हे गावगाड्यावर आधारलेले होते. या गावगाड्यात शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, दलित, फिरस्ते इत्यादींचा समावेश होता. हे सर्व घटक गावपातळीवर एकमेकांशी निगडित व परस्परांवर अवलंबून होते. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय, उत्पन्नाचे मुख्य साधन. शेती करणारा शेतकरी. त्याला शेती व गृहोपयोगी वस्तू व अवजारे करून देणारे सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, सोनार इ. जाती किंवा व्यावसायिक; सेवा पुरवणारे न्हावी, रामोशी, धोबी, कोळी; ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगळा इत्यादी जाती. या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेतकर्याकडे शेतीतून उत्पन्न आल्यावर तो त्यातून विशिष्ट हिस्सा किंवा वाटा या सर्व घटकांना द्यायचा, त्याला ‘बलुते’ असे म्हणायचे. ते त्यांच्या कामाचा व श्रमाचा मोबदला म्हणून दिले जायचे. या बलुत्यावर या जाती-व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालायचा. याचा अर्थ शेती ही केंद्रस्थानी होती व इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना परिवर्तनपूर्व काळात अस्तित्वात होती.
(प्रस्तुत लेख माझ्या आवाजात व्हिडिओस्वरुपात बघण्यासाठी व अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी कृपया खालील यूट्यूब लिंकवर क्लिक करा. https://youtu.be/mJgbqIN6BZ8 )
अशा प्रकारे ग्रामीण म्हणजे गावातील, ग्रामातील हे सर्व घटक. ग्रामीण जीवन म्हणजे या लोकांचे जीवन. ग्रामीण भागातील या लोकांच्या जगण्याची/जीवनाची निसर्गसान्निध्यता, रूढी-परंपरा, लोकश्रद्धा, आदिमता, शेती व निसर्गातील घटकांविषयी प्रचंड श्रद्धा, शेतीला ‘काळी आई’ मानणे, यातूनच सण-उत्सव, जत्रा, नवस-सायास, लग्नसमारंभ इत्यादींचे वर्षभराचे नियोजन, समूहभावना, समूहांची जातींमध्ये विभागणी, स्पृश्य-अस्पृश्यता पाळणे, तरीही परस्परावलंबित्व इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. ‘ग्रामीण’ या संकल्पनेमध्ये शेती, विहिरी, नद्या-नाले, झाडेझुडपे, विविध पिके या सर्व घटकांना महत्त्व आहेच. परंतु याव्यतिरिक्त येथील माणूस, माणसासोबतच गुरंढोरं, बकर्या, कोंबड्या, गाढवं, कुत्रे, किडे-मुंग्या, पक्षी, साप, गांडूळ या सर्वांना येथे महत्त्व आहे. या सगळ्यातून येथील माणसाची जगण्याची, विचार करण्याची एक रीत, त्याचे मन, जगण्याविषयीचे विशिष्ट तत्त्वज्ञान, जीवनदृष्टी तयार होत जाते.
अशा या ग्रामीण जीवनात बदलत्या काळानुसार विविध परिवर्तने घडून आली. स्वातंत्रोत्तर काळात बलुतेदारी व्यवस्था मागे पडली. लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार, शिक्षणाचा प्रचार प्रसार, यंत्रयुगाचे आगमन झाले. यंत्रयुग व औद्योगिकीकरण यामुळे ग्रामपातळीवरील व्यावसायिक, बलुतेदारांचे धंदे डबघाईला आले. बेरोजगारी वाढली. दुष्काळामुळे शेतीत पिकेनासे झाले. दारिद्र्य, कर्जबाजारीपण वाढले. खेड्यातून शहरांकडे स्थलांतर होऊ लागले. पुढे जागतिकीकरणानंतर या दुःस्थितीला अधिक गती मिळाली. शेतकर्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या, त्या वाढल्या. खेड्यातील लोकांना आपले शोषण होत आहे हे लक्षात आले. याला जबाबदार असणार्या घटकांचा, वास्तवामागील वास्तवाचा ते शोध घेऊ लागले, त्यांच्या मनातही संघर्षाची, विद्रोहाची भावना निर्माण होऊ लागली. यातूनच शेतकरी संघटना, त्यांचे लढे, अलीकडे शहरांचा धान्य-दूध-भाजीपाला इ.चा पुरवठा बंद करणे इथपर्यंत हा संघर्ष येऊन पोहोचलेला आहे.
- व्याख्या-
१) “ग्रामीण साहित्य हे व्यक्तिकेंद्रित तर असतेच, पण त्या व्यक्तिमनाच्या जडणघडणीस कृषिकेंद्रित संस्कृती, या संस्कृतीने निर्माण केलेले लोकमानस या संस्कृतीसाठी निर्माण झालेला गावगाडा किंवा तत्सम कृषिउपयोगी समाजरचना इत्यादी घटक जबाबदार असल्याने या व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून लिहीत असताना उपरोक्त घटक सहजपणे ध्वनित होत जातात आणि त्यातूनच ग्रामीण साहित्य आकार घेत जाते.” (नागनाथ कोत्तापल्ले)
२) “संकुचित … अर्थाने ‘ग्रामीण साहित्य’ या शब्दप्रयोगातील ‘ग्रामीण’ हा शब्द वापरलेला नाही. ते ग्रामीण समाजव्यवस्थेशी, एकूणच भारतीयांच्या ‘ग्रामीण जीवनाशी’ निगडित आहे. या समाजव्यवस्थेत ब्राह्मणांपासून तो अस्पृश्य आदिवासीपर्यंतची सर्व जाती – जमातींची समाजरचना अभिप्रेत आहे … ‘ग्राम’ व ग्रामाच्या लगत बाहेर राहणारे पूर्वास्पृश्य, तसेच रानावनांत राहणारे आदिवासी, भारतीय आणि त्यांचे जीवन हेही ‘ ग्रामीण ‘ या विशेषणाला अभिप्रेत आहे. या सर्वाची संवेदना ज्यात व्यक्त होते, ते ‘ ग्रामीण साहित्य’ असा ‘ग्रामीण साहित्य’ या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे.” (आनंद यादव)
३) “ज्यात आजचे वा कालचे ग्राम – जीवन, त्याचे मनोव्यापार, सांस्कृतिक संवेदन सखोलपणे आणि सर्वांगीण स्वरूपात व्यक्त होते असे म्हणता येईल … ग्रामीण साहित्य विचारात प्रादेशिकतेचे घटक येणे अपरिहार्य … आवश्यकही ठरते. त्याखेरीज त्या – त्या प्रदेशाचे व्यक्तिमत्त्व साकार होणार नाही.” (गो. म. कुलकर्णी)
४) “ग्रामीण साहित्याचे केंद्र ग्रामव्यवस्था आहे आणि ग्रामव्यवस्थेचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. खेड्यातील इतर आलुतेदार – बलुतेदार हे या केंद्राच्या परिघात येतात असे मानले तर ग्रामीण साहित्य एका अर्थी शेतकरी साहित्यच ठरते. (प्रमोद मुनघाटे)
५) “ग्रामानामांतून – खेड्यापाड्यांतून विखुरलेल्या सर्वसामान्य जनतेचे असलेले व त्यांच्यासाठी लिहिलेले वाङ्मय हे ग्रामीण वाङ्मय होय. या वाङ्मयात या सामान्य लोकांचे जीवन प्रतिबिंबित झालेले असते. त्यांच्या भावना व आकांक्षा त्यांत चित्रित झालेल्या असतात. एवढेच नाही तर ही माणसे आपल्या भोवतालच्या निसर्गासह या ठिकाणी आपल्याच ढंगात बोलकी झालेली असतात.” (सरोजिनी बाबर )
६) “ग्रामीण वास्तव, ग्रामीण संस्कृती व ग्रामीण बोली यांचा वापर करणारे साहित्य.” (वाङमयीन संज्ञा-संकल्पना कोश)
७) “ग्रामीण जीवनातील सुख-दुःखे, चढउतार, स्थितिगती यांचा आविष्कार करणार्या साहित्याला ग्रामीण साहित्य असे म्हटले जाते.” (मधु कुलकर्णी)
८) “ज्या साहित्यात ग्रामीण संवेदना अविष्कृत झालेली असेल आणि शहरी संवेदनेचा अभाव असेल तर ते ग्रामीण साहित्य” (प्रभाकर बागले )
९) “ग्रामीण जीवनाचे, मनाचे चित्रण करणारे साहित्य ते ग्रामीण साहित्य म्हणता येते…ग्रामीण संवेदनशीलता ज्या लेखनातून प्रत्ययाला येत असेल ते अस्सल ग्रामीण साहित्य होय.” (गो.मा. पवार)
१०)”ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीणांनी ग्रामीणांचे अस्सल जीवनदर्शन घडवणारे देशी वळणाचे साहित्य.” (श्रीराम गुंदेकर)
११) ग्रामीण जीवनाचे, परिवर्तनाचे, संघर्षाचे चित्रण ज्या साहित्यातून घडते ते ग्रामीण साहित्य होय.
१२) खेड्यात राहणार्या माणसाच्या जीवनानुभवाचे, जाणिवांचे दर्शन ज्या साहित्यातून घडते ते ग्रामीण साहित्य.
माझे ग्रामीण साहित्याविषयीचे काही अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
१) १९२० च्या पूर्वीची ग्रामीण कादंबरी – https://youtu.be/OCl-6otDSgs
२) १९२० ते ५० या कालखंडातील ग्रामीण कादंबरी – https://youtu.be/YKkoHkyFfyM
३) १९५० ते ६० या कालखंडातील ग्रामीण कादंबरी – https://youtu.be/2ty7EfwK660
४) १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबरी – https://youtu.be/NWsw1UZrkEM
५) १९७५ नंतरच्या कालखंडातील ग्रामीण कादंबरी – https://youtu.be/C0EJjydTWUo
६) ग्रामीण साहित्य : संकल्पना, स्वरूप, प्रेरणा व मराठीतील परंपरा (वस्तुनिष्ठ प्रश्न व त्यांची उत्तरे व माझे विवेचन) – https://youtu.be/0Z0AT9w2az0
७) मराठीतील ग्रामीण साहित्य : स्वरूप – https://youtu.be/RnAI6ervwt8
८) ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा – https://youtu.be/tu5BwWwKwyo
९) बारोमास – सदानंद देशमुख (ग्रामीण जीवनाचा वेध घेणारी कादंबरी, आशयसूत्रे व कथानक) – https://youtu.be/DSj8eVKgdgw
१०) बारोमास कादंबरीतील व्यक्तिरेखा – https://youtu.be/DkHdtIRNFJQ
११) ग्रामीण साहित्यावरील समीक्षा ग्रंथ https://youtu.be/oWWWPNjtqAA
-
मराठीतील ग्रामीण साहित्याची परंपरा-
मराठी साहित्यात ग्रामीण साहित्याचा सलग प्रवाह १९२० नंतर आणि ग्रामीण साहित्याची चळवळ १९७५ नंतर निर्माण झालेली असली तरी मध्ययुगीन कालखंडातील महानुभावीय साहित्य, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या संतांचे साहित्य तसेच शाहिरी वाड्मयामधूनही ग्रामीण जीवनाच्या अनेक छटा दिसून येतात. तसेच म. फुले यांच्यापासून कसदार असे ग्रामीण जीवनातील समस्या मांडणारे साहित्य लिहिले जात आहे. तेव्हा ग्रामीण साहित्याचे १९२० च्या आधीचा कालखंड, १९२० ते १९७५ या दरम्यानचा कालखंड, १९७५ ते १९९० हा कालखंड, १९९० नंतरचा म्हणजे जागतिकीकरण सुरू झाल्यानंतरचा कालखंड असे स्थूलमानाने टप्पे सांगता येतील.
- १९२० पूर्व कालखंडातील मराठी ग्रामीण साहित्य –
ग्रामीण जीवन आपल्या साहित्यातून मांडणारे पहिले लेखक म्हणून महात्मा फुले यांचा उल्लेख केला जातो. महात्मा फुले यांनी ‘शेतकर्यांचा आसूड’, ‘गुलामगिरी’, ‘तृतीय रत्न’ हे नाटक आणि ‘अखंडां’मधून ग्रामीण भागातील लोकांचे जीवन, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न मांडलेले दिसून येतात. ग्रामीण भागातील लोकांचे धर्माच्या आधारे होणारे आर्थिक-सामाजिक शोषण, दारिद्र्य व दुष्काळामुळे होणारे त्यांचे हाल याचे अतिशय प्रत्ययकारी व परिणामकारक चित्रण महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यामधून केलेले दिसून येते. म्हणूनच नागनाथ कोतापल्ले यांनी “महात्मा फुले यांचे लेखन म्हणजे ग्रामीण साहित्याचा पहिला-वहिला परंतु सशक्त आविष्कार होय” (ग्रामीण, दलित व स्त्रीवादी साहित्य, नागनाथ कोतापल्ले व इतर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), असे म्हटलेले आहे. त्यांनी ‘तृतीय रत्न’ या नाटकातून तसेच ‘अखंडां’मधून शिक्षणाच्या अभावी ग्रामीण भागातील होणार्या लोकांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण केलेले आहे. ‘त्यांच्या ‘कुळंबीण’ या शीर्षकाच्या कवितांमधून ग्रामीण स्त्रीचे कष्ट, तिचे दारिद्र्य, तरीही तिची होणारी अवहेलना याचे चित्र रेखाटलेले आहे. ‘शेतकर्यांचा आसूड’ हा त्यांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ होय. या ग्रंथातून त्यांनी शेतकर्यांची गरिबी, त्यांची वाईट अवस्था, अनेक बाजूंनी त्यांचे होणारे शोषण याचे चित्रण तर केलेले आहेच, परंतु शेतीच्या विकासासाठी काय करता येईल याचे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत.
महात्मा फुले यांच्यानंतरचे महत्त्वाचे लेखक म्हणजे कृष्णराव भालेकर. त्यांनी म. फुल्यांपासून प्रेरणा घेऊन कादंबरी व काव्यलेखन केलेले आहे. त्यांची ‘बळीबा पाटील’ ही कादंबरी १८७७ मध्ये ‘दीनबंधू’ या नियतकालिकामधून प्रकाशित झाली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कादंबरी चर्चात्मक स्वरूपाची आहे. गावातील पाटील हा महार, मारवाडी, मुसलमान, ब्राम्हण या व इतर सर्व जातींच्या लोकांची बैठक बोलावतो. या बैठकीत शेतकर्यांचे धर्माच्या आधारे होणारे शोषण, कुलकर्ण्यांकडून होणारी आर्थिक लुबाडणूक, कष्ट करूनही उपासमार, जातीव्यवस्था यासारख्या विषयांवर चर्चा होते, त्याचे चित्रण या कादंबरीत केलेले आहे. तंत्राच्या बाबतीत ही फसलेली मात्र ग्रामीण कादंबरी लेखनाचा प्रथम प्रयत्न म्हणून उल्लेखनीय अशी कादंबरी आहे. याशिवाय कृष्णराव भालेकर यांनी ‘शेतकर्याचे मधुर गायन’, ‘रघु गाडीवानाचा पोवाडा’ यासारख्या कवितांमधून ग्रामीणांच्या दुःखाला वाचा फोडलेली आहे.
रा. वि. टिकेकर उर्फ धनुर्धारी यांची ‘पिराजी पाटील’ ही तंत्रदृष्ट्या यशस्वी मानली गेलेली ग्रामीण कादंबरी १९०२ साली प्रकाशित झाली. पिराजी पाटील हा या कादंबरीचा नायक असून दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावाची दुःस्थिती, शेतकरी व शेतकर्यांच्या झालेल्या वाताहतीची हकीकत तो सांगतो, असे वर्णन या कादंबरीत आहे. दुष्काळात रोगराई, चोरीमारी, प्लेग यामुळे त्रासलेले शेतकरी ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. सरकारी अधिकारी लुबाडणूक करतात. शेतकरी शेतमजूर कष्टकरी उपाशी राहतात तर ब्राह्मण मात्र देवाधर्माच्या नावाने फसवणूक करून पोटभर खातात, या सर्व गोष्टींविषयीची चीड या कादंबरीत व्यक्त झालेली आहे. ‘बळीबा पाटील’ व ‘पिराजी पाटील’ या कादंबर्या ग्रामीण साहित्याच्या पहिल्या कालखंडातील असून या कादंबर्यांच्या आशयाचा अभ्यास केला असता त्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो, या लेखनामागे फुले यांची प्रेरणा असलेली दिसून येते.
यानंतर मुकुंदराव पाटील यांनी आपल्या ‘दीनमित्र’ या नियतकालिकातून कित्येक वर्ष विविध प्रकारचे लेखन करून ग्रामीण जीवनातील प्रश्नांना मुखर केले. त्यांच्या ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ आणि ‘होळीची पोळी’ या कादंबर्या, ‘कुलकर्णी लीलामृत’ हा विडंबनपर काव्यग्रंथ, ‘शेतकर्यांची निकृष्ट स्थिती आणि ते सुधारण्याचे उपाय’ यासारखे वैचारिक निबंध यातून ग्रामीणांची वाईट स्थिती व शोषण इ. आलेले आहे.
विठ्ठल रामजी शिंदे १९२० च्या आधीच्या कालखंडातील महत्त्वाचे लेखक. त्यांनी आपल्या वैचारिक स्वरूपाच्या लेखनातून शेती व शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी महात्मा फुले यांच्यानंतर अतिशय मूलगामी अशी मांडणी केली. शेतीमालाला योग्य भाव, शेती करणे फायद्याचे ठरत नाही व कारखान्यातील कामगारांप्रमाणे संपही करता येत नाही. कारण शेतकरी हा संपूर्ण भारतभर विखुरलेला असून संप कुणाविरुद्ध करायचा, अशी त्याची झालेली कोंडी यासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लेखन केलेले आहे.
याच कालखंडात हरिभाऊ आपटे यांची ‘काळ तर मोठा कठीण आला’ ही १८९८ साली लिहिलेली कथा आहे. ही कथा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली असून उपासमार सहन करूनही शेतकरी आपल्या गुराढोरांवर प्रेम करतो. गुरं विकण्याची पाळी आली तरी ती कसायाला विकली जाऊ नयेत, यासाठी तो कसा प्रयत्न करतो आणि चुकून आपल्याकडून ती कसायाला विकली गेली हे माहिती झाल्यावर तो किती दुःखी होतो, याचे चित्रण या कथेमध्ये आलेले आहे. हरिभाऊंच्या या कथेने ग्रामीण कथा वाड्मयाला सुरुवात झाली, असे म्हणता येते.
या कालखंडाविषयी नागनाथ कोतापल्ले यांनी “या कालखंडात काही थोडे ललित लेखन आणि खूपसे वैचारिक स्वरूपाचे लेखन झालेले आहे. एका अर्थाने ग्रामीण समाजाला, बहुजन समाजाला जागृत करण्याचा, स्वतःची अस्मिता शोधण्याचा आणि शोषणाची बहुविध रूपे शोधण्याचा हा कालखंड आहे. किंबहुना नवशिक्षित पांढरपेशा वर्गाचे आणि आपले मार्ग भिन्न आहेत, याची स्पष्ट जाणीव या कालखंडात झालेली होती. म्हणूनच हा कालखंड ग्रामीण साहित्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. या कालखंडाचे विस्मरण झाल्यामुळेच पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले”, असे निरीक्षण नोंदविलेले आहे, जे या कालखंडातील एकूणच ग्रामीण साहित्यावर प्रकाश टाकते.
- १९२० ते १९७५ या कालखंडातील मराठी ग्रामीण साहित्य –
१९२० च्या आधीचे ग्रामीण साहित्य व त्यानंतरचे ग्रामीण साहित्य यात खूप मोठे अंतर आहे. आधीच्या ग्रामीण साहित्यातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांची, त्यांच्या वास्तव जीवनाची अत्यंत तळमळीने मांडणी केलेली दिसून येते. १९२० नंतर कथा, कविता, कादंबरी या वाड्मय प्रकारांमधून विपुल प्रमाणात ग्रामीण जीवनाचे चित्रण आलेले आहे. मात्र ते निव्वळ स्वप्नरंजन स्वरूपाचे असून त्याचा वास्तवाशी कुठलाही संबंध दिसून येत नाही. महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘खेड्याकडे चला’ या घोषणेला प्रतिसाद देऊन अनेक लेखक ग्रामीण जीवनाविषयी लिहिते झाले. त्यात रविकिरण मंडळातील यशवंत, गिरीश हे कवी, चंद्रशेखर (‘काय हो चमत्कार’ ही कविता) हे जुन्या पिढीतील कवी तसेच ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊन आलेले ग. ल. ठोकळ, के. नारखेडे, सोपानदेव चौधरी अशा कवींच्या कवितांमधून ग्रामीण जीवनचित्रण झालेले आहे.
याच काळात वि. स. सुखठणकर यांचा ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ (१९३१) लक्ष्मणराव सरदेसाई यांचे ‘कल्पवृक्षाच्या छायेत’ (१९३४), ‘सागराच्या लाटा’ (१९३५), ‘वादळातील नौका’ (१९३६) ‘ढासळलेले पुरुष’ (१९४०) या कथासंग्रहांपासून ग्रामीण आशयाच्या कथा लेखनाला सुरुवात झालेली आहे. यांच्या कथांमधून कोकणातील जीवन, तेथील रूढी-परंपरा, निसर्ग इत्यादीचे चित्रण आलेले आहे. यांच्यासोबत ग. ल. ठोकळ, द. रा.कवठेकर, म. भा. भोसले, वामन चोरघडे, बी. रघुनाथ, चि. यं. मराठे इ. कथाकारांनी कथा लिहिलेल्या आहेत. यांच्या कथा अतिरंजित, काल्पनिक व मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेल्या असल्याने ग्रामीण वास्तवापासून त्या दूर गेलेल्या दिसून येतात.
श्री. म. माटे यांच्या कथा मात्र इतर सर्व कथाकारांपेक्षा अधिक वास्तवदर्शी आहेत. त्यांच्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ (१९४१) या कथासंग्रहातून गाव व गावकुसाबाहेरील लोकांचे जगणे, त्यांचे दुःख याचे दर्शन मराठी वाचकाला प्रथमच कथेतून घडले. ‘माणुसकीचा गहिवर’ (१९४९), ‘भावकथा’ (१९५७) या कथासंग्रहांमधूनही ग्रामीण जीवनाचे चित्रण आलेले दिसून येते.
या कालखंडात ग. त्र्यं. माडखोलकर (चंदनवाडी), र. वा. दिघे (सराई, पाणकळा), वि. द. चिंदरकर (महापूर), ग. ल. ठोकळ (गावगुंड), रामतनय (मोहित्यांची मंजुळा, साखरगोष्टी, प्रमिलाबेन) वि. वा. हडप (गोदाराणी, अन्नदाता उपाशी) हे महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. यापैकी माडखोलकर, हडप यांच्यावर मार्क्सवाद, समाजवाद, साम्यवाद यांचा तर रामतनय यांच्यावर गांधीवादाचा प्रभाव दिसून येतो. दिघे हे प्रादेशिक कादंबरीकार मानले जातात. तर ‘गावगुंड’ ही स्वातंत्र्य आंदोलनावर आधारलेली असून संघर्ष, योगायोग, प्रेम इत्यादी विषय असलेली रोमँटिक स्वरूपाची कादंबरी आहे.
१९४५ नंतरच्या नवसाहित्याचा प्रभाव ग्रामीण साहित्यावरही पडला. नवसाहित्यातील प्रयोगशीलता, मनोविश्लेषण ग्रामीण कथा व कादंबर्यांमधूनही काही प्रमाणात दिसून येते. व्यंकटेश माडगूळकर यांचे ‘माणदेशी माणसे’ (१९४९), ‘गावाकडच्या गोष्टी’ (१९५१), ‘हस्ताचा पाऊस’ (१९५३), ‘सीताराम एकनाथ’ (१९५१), ‘काळी आई’ (१९५४), ‘जांभळीचे दिवस’ (१९५७) यांसारखे कथासंग्रह याच काळात प्रकाशित झाले. त्यांनी ग्रामीण माणसाचे अस्सल व जिवंत दर्शन घडविले. त्यांची कथा वास्तवाच्या अधिक जवळ गेली. किंबहुना त्यांच्यापासून ग्रामीण साहित्यात वास्तववादी साहित्यकृतींच्या लेखनाला प्रारंभ झालेला दिसून येतो. शंकर पाटील यांच्या ‘वळीव’, ‘भेटीगाठी’, ‘आभाळ’, ‘धिंड’ या कथासंग्रहांमधून ग्रामीण कुटुंब, दुःख सोशिक व निमूटपणे सहन करणार्या व्यक्ती उभ्या केल्या आहेत. त्यांचे ‘खेळखंडोबा’, ‘ताजमहालमध्ये सरपंच’ हे विनोदी कथासंग्रह आहेत. सखा कलाल, बाजीराव पाटील, बाबा पाटील हे या कालखंडातील इतर कथाकार आहेत. याच काळात शंकर पाटील, द. मा. मिरासदार, रणजित देसाई यांच्या कथांमधून ग्रामीण मन विनोदी, मनोविश्लेषणात्मक व गंभीर स्वरूपात व्यक्त झाले.
कादंबर्यांमध्ये बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘पाणी’, ‘तांबडी माती’ या कादंबर्यांमधून धरणामुळे उद्ध्वस्त झालेली गावे आलेली आहेत. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘एल्गार’ (१९४९), ‘हद्दपार’ (१९५०), ‘गारंबीचा बापू’ (१९५२), गो. नी. दांडेकर यांच्या ‘पडघवली’ (१९५५), ‘पवनाकाठचा धोंडी’ (१९५७), ‘माचीवरचा बुधा’ (१९५८) या कादंबर्यांमधून कोकणातील जीवन साकार झालेले आहे. या कादंबर्या प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत. विभावरी शिरुरकर यांची ‘बळी’ (१९५०) ही ग्रामीण भागातील मांग-गारुडी या गुन्हेगार समजल्या जाणार्या जमातीच्या उपेक्षित व दरिद्री जगण्याचे चित्रण करणारी अतिशय महत्त्वाची वास्तववादी स्वरूपाची कादंबरी आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ (१९५५), ‘वावटळ’ (१९६४) या अतिशय महत्त्वाच्या कादंबर्या आहेत. ‘बनगरवाडी’मधून एका खेड्यातील धनगर समाजाचे शांत, संथ असे जगणे, त्यांच्या रूढी-परंपरा, विविध स्वभाव, गावरीत, संस्कृती, सण-उत्सव इ. चे दर्शन घडते. कादंबरीच्या शेवटी दुष्काळामुळे गावकर्यांना स्थलांतर करावे लागते. ‘वावटळ’ ही कादंबरी गांधीहत्येनंतर ग्रामीण भागात उसळलेल्या ब्राह्मणविरोधी प्रतिक्रियेचे चित्रण करणारी मराठीतील एकमेव अशी कादंबरी आहे.
वास्तववादी कादंबरीलेखनाला १९६० नंतर खर्या अर्थाने बहर आला. या कालखंडात ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्यांची पहिली पिढी तयार झाली. विविध स्तरातील या लेखकांनी खेड्यातील जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असल्याने त्यांच्या कथा-कादंबर्यांमधून संपूर्ण ग्रामीण जीवन, शेतकरी, शेतमजूर, बलुतेदार, दलित, भटके इत्यादी वर्ग, त्यांचे दारिद्रय, दुःख यासह साकार झालेले दिसून येते. उद्धव शेळके यांची ‘धग’ (१९६०), शंकर पाटील यांची ‘टारफुला’, अण्णाभाऊ साठे यांची ‘फकीरा’, हमीद दलवाई यांची ‘इंधन’ (१९६८), माडगूळकर यांची ‘वावटळ’ (१९६४), ना. धों. महानोर यांची ‘गांधारी’ (१९७३), आनंद यादव यांची ‘गोतावळा’ व रा. रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ (१९७१), मनोहर तल्हार यांची ‘माणूस’ या वास्तववादी स्वरूपाच्या कादंबर्या आहेत.
याच काळात १९५२च्या आसपास बहिणाबाई चौधरी यांचा ‘बहिणाईची गाणी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या कवितांमधून ग्रामीण स्त्रीचे जगणे, तिचे भावविश्व, कृषिसंस्कृतीतील असंख्य तपशील ओवी अष्टाक्षरी छंदातून मराठी वाचकांसमोर आले. अस्सल व कृत्रिम ग्रामीण जीवन दर्शन हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य. पुढे ना. धों. महानोर यांचा ‘रानातल्या कविता’, आनंद यादव यांचा ‘हिरवे जग’ या कवितांसंग्रहांमधूनही ग्रामीण जीवन कलात्मकरित्या साकार झालेली दिसून येते.
- १९७५ ते १९९० या कालखंडातील मराठी ग्रामीण साहित्य –
१९७५ साली आनंद यादव, रा रं बोराडे यांनी ग्रामीण साहित्याची चळवळ सुरू केली. प्रत्येक चळवळीमागे कुणाची तरी प्रेरणा, विचारधारा असते. यादव व बोराडे यांनी महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर, म. गांधी यांचे शेतकर्यांविषयीचे कार्य व साहित्य यापासून प्रेरणा घेतली. ग्रामीण लेखकांसाठी त्यांनी कार्यशाळा, शिबिरे, काव्यसंमेलने, परिषदा, चर्चासत्रे घ्यायला सुरुवात केली. ‘काय लिहायचे’ याप्रमाणेच ‘कुणासाठी लिहायचे’, याची जाणीव त्यांनी ग्रामीण लेखकांना करून दिली. या विचारांच्या प्रकाशात ग्रामीण लेखक आपल्या भोवतालच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक वातावरणाकडे डोळसपणे पाहू लागले. वास्तवामागील खर्याखुर्या वास्तवाचा शोध ते घेऊ लागले.
१९७२ चा भीषण दुष्काळ, गावातील राजकारण, सहकारातील भ्रष्टाचार, धरणासारख्या प्रकल्पांतून आलेले विस्थापन, शिक्षित वर्गाचे नैराश्य, पाण्याचा बिकट होत जाणारा प्रश्न, शेतकर्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठीचे लढे, शेतीतील यांत्रिकीकरणामुळे आलेली बेरोजगारी व इतर समस्या, जागतिकीकरणानंतरची भीषण परिस्थिती इत्यादी अनेक कारणांमुळे ग्रामीण भाग तापू लागला. याचे चित्रण कथा, कविता, कादंबरी इत्यादी वाड्मय प्रकारांतून अतिशय प्रभावीपणे ग्रामीण लेखकांनी केलेले दिसून येते. १९७५ नंतर चंद्रकुमार नलगे, नागनाथ कोत्तापल्ले, उत्तम बंडू तुपे, भास्कर चंदनशिव (जांभळं ढव्हं), वासुदेव मुलाटे (विषवृक्षाच्या मुळ्या), बाबाराव मुसळे (हाल्या हाल्या दुधू दे) असे कितीतरी लेखक ग्रामीण साहित्यात मोलाची भर घालताना तसेच ग्रामीण जीवनातील विविध प्रश्नांना वाचा फोडताना दिसून येतात.
- १९९० नंतरचे ग्रामीण साहित्य-
१९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण साहित्यात ग्रामीण वास्तवाचे चित्रण आलेले आहे. १९७५ ते १९९० पर्यंतच्या ग्रामीण साहित्यात या वास्तवाच्या मागील कारणांचा, वास्तवामागील वास्तवाचा शोध घेताना ग्रामीण लेखक दिसून येतात. तर १९९० नंतरच्या ग्रामीण साहित्यात आपल्याला विद्रोह दिसून येतो.
१९९० नंतर भारताने जागतिकीकरण, खाजगीकरण व उदारीकरणाचा स्वीकार केला. यांचा खूप मोठा परिणाम ग्रामीण भागावर झाला. दुसरीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा वाढला. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होऊ लागले. ग्रामीण भागातील दारिद्र्य, निरक्षरता, धर्मांधता, राजकारण, महागाई, निसर्गाची अनियमितता इत्यादी समस्यांमध्ये शिक्षण घेऊनही नोकरी न मिळणे, सुरक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, त्यामुळे ग्रामीण भागात वाढलेले नैराश्य, स्वप्नभंग इ. वास्तवाची, समस्यांची भर पडली. खेडे, तेथील माणसे अनेक प्रश्नांनी, समस्यांनी अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्यात चीड, संताप, विद्रोह निर्माण होऊ लागला. याचे चित्रण अनेक ग्रामीण लेखकांनी आपल्या कविता, कथा, कादंबर्यांमधून केलेले दिसून येते.
१९९० नंतरच्या ग्रामीण कवींमध्ये नारायण कुलकर्णी कवठेकर, उत्तम कोळगावकर, विठ्ठल वाघ, राजन गवस, जगदीश कदम, इंद्रजित भालेराव, जयराम खेडेकर, प्रकाश होळकर, नारायण सुमंत, सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, अजय कांडर, प्रवीण बांदेकर, कैलास दौंड, ऐश्वर्य पाटेकर, पी. विठ्ठल, रमेश इंगळे-उत्रादकर, भगवान देशमुख, संजय कृष्णाजी पाटील, ज्ञानेश्वर मुळे, संतोष पद्माकर, प्रतिमा इंगोले, पुरुषोत्तम पाटील, अशोक कौतिक कोळी, अशोक नीळकंठ सोनवणे, कल्पना दुधाळ, संदीप जगताप, प्रकाश किनगावकर, कैलास सार्वेंकर, नामदेव कोळी इत्यादी कवींनी आपल्या कवितासंग्रहामधून किंवा त्यांच्या विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या कवितांमधून ग्रामीण भागातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. या काळातील कवितेबद्दल डॉ. रेखा जगनाळे म्हणतात की, “ग्रामीण जीवनातील दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, शोषण व्यक्त करूनच नव्वदनंतरची ग्रामीण कविता थांबली नाही, तर त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर ‘पर्याय’ प्राप्त करण्याचा विचार या काळातील कवितेतून प्रकटला. त्यामुळेच ‘विद्रोह’ पुकारणारा नवा नायक या काळातील ग्रामीण कवितांमधून येत आहे. प्रणयरम्य, सौंदर्यप्रधान, रोमँटिक ग्रामीण कविता या टप्प्यावर पूर्णपणे गेलेली दिसते व एकूणच ग्रामीण कविता ग्रामीण जीवनाकडे चिंतनशील व गंभीर भूमिकेतूनच बघते. त्याचमुळे बेकारी, खेड्यांचे उद्ध्वस्तपण, शिक्षणाचे मूल्यहीन रूप अनेक ग्रामीण कवितांमधून आले. नव्वदोत्तर ग्रामीण कवींची तरुण पिढी आत्मविश्वासाने लेखनप्रवृत्त होऊन ग्रामीण माणसाचे विविधांगी दु:ख वास्तवपणे अभिव्यक्त करते.” या संदर्भातून या कालखंडातील कवितेची वैशिष्ट्ये व स्वरूप लक्षात येते.
कथा या वाड्मय प्रकारात १९९० च्या आधीचे रा. रं बोराडे, आनंद यादव, भास्कर चंदनशिव, नागनाथ कोतापल्ले, सखा कलाल, प्रतिमा इंगोले, द. ता. भोसले, वासुदेव मुलाटे, महादेव मोरे, चारुता सागर यासारखे लेखक १९९० नंतरही बदललेल्या नव्या वास्तवाला सामोरे जात कथा लिहित राहिले. त्यांच्यासोबत सतीश तराळ, उत्तम बावस्कर, सदानंद देशमुख, बाबाराव मुसळे, आनंद पाटील, योगीराज वाघमारे, सोपान हाळमकर, बाबा पाटील, श्रीराम गुंदेकर, शंकर सखाराम सारख्या काही नव्या दमाच्या लेखकांनी कथा वाङ्मयात मोलाची भर घातलेली आहे.
कादंबरी हा दीर्घ असा वाड्मय प्रकार असतो. कादंबरीत लेखकाला आपला कथाविषय सविस्तरपणे जीवनातील विविध अंगांना, वास्तवाला सामावून घेत, एक व्यापक असा जीवनपट उभा करता येतो. हे कादंबरी वाड्मयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. १९९० नंतरचे वास्तवही अतिशय गुंतागुंतीचे बनलेले असून त्याचे आकलन सर्वसामान्यांना होऊ शकत नसल्याने त्यांच्यासमोर असंख्य समस्या आ वासून उभ्या आहेत व त्यातून कसा मार्ग काढावा हे सुचत नाहीये. मराठीतील ग्रामीण लेखकांनी या वास्तवाला समजून घेत अतिशय समर्थपणे वास्तवावर आधारित गंभीर अशा कादंबर्यांचे लेखन या १९९० नंतरच्या काळात केलेले दिसून येते. यात विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती’ (१९९०) ही कादंबरी धरणग्रस्तांच्या समस्येवर आधारलेली आहे. ‘ताम्रपट’ (१९९४) – रंगनाथ पठारे, ‘कळप’ (१९९१), ‘धिंगाणा’ (१९९२) , ‘तणकट’ (१९९८) -राजन गवस, अशोक कौतिक कोळी यांची ‘पाडा’, ‘तहान’ (१९९४), ‘बारोमास’ (२००२) – सदानंद देशमुख, कैलास दौंड- ‘कापूसकाळ’ ‘तुडवण’, ‘पाणधुई’, कृष्णात खोत-‘गावठाण’, बाबाराव मुसळे यांच्या ‘पखाल’ (१९९५), ‘वारूळ’ (२००४), ‘पाटीलकी’ (२००५), गणेश आपटे यांच्या ‘गणगोत’, ‘चुकार’, ‘भिरूड’ इत्यादी या कालखंडातील महत्त्वाच्या कादंबर्या आहेत. या कालखंडात काही स्त्री कादंबरीकारांनीही कादंबरीलेखन केलेले आहे. त्यात प्रतिमा इंगोले (‘बुढाई’, ‘लळिताचे रंग’, ‘राहूकेतू’, ‘जिमखाना’), वैशाली कोल्हे (‘अधांतरी’), शुभदा मुंजे (‘पारूल’), मधु सावंत, अनुराधा गुरव या स्त्रीलेखिका ग्रामीण वास्तव आपल्या कादंबर्यांमधून रेखाटताना दिसून येतात.
- संदर्भ ग्रंथ-
१) ग्रामीण, दलित व स्त्रीवादी साहित्य, नागनाथ कोतापल्ले व इतर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, प्रथम प्रकाशन सप्टेंबर २००१.
२) ग्रामीण साहित्य आणि वास्तव (डॉ. द. ता. भोसले गौरवग्रंथ), संपा. डॉ कृष्णा इंगोले, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती जानेवारी २०११.
३) नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण साहित्य, (प्रा. डॉ. कैलास सार्वेकर स्मृती-गौरवग्रंथ) संपा. डॉ. लीलावती देवरे, डॉ. शारदा मोरे, डॉ. राहुल पाटील, प्रशांत पब्लि., जळगाव, डिसेंबर २०१७.
४) ग्रामीण साहित्य चळवळ : प्रेरणा व स्वरूप, डॉ. राजीव यशवंते, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, २०१०.
५) ग्रामीण साहित्य : एक चिंतन डॉ. द. ता. भोसले, मनोविकास प्रकाशन, पुणे, २००९
६) साठोत्तरी मराठी वाङˎमयातील प्रवाह, संपा. डॉ. शरणकुमार लिंबाळे, दिलीपराज प्रकाशन, पुणे, २००७.
© copyright
डॉ. राहूल रजनी
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw
सर मस्त लेख आहे
अभ्यास करण्यासाठी खूप महत्त्वाचा लेख आहे..
सर्वंकष आढावा घेणारा हा लेख उत्तम आहे. इतरही संशोधकांना हा लेख मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
या लेखात अनावधानाने गावठाण या कादंबरीची माझ्या नावासमोर नोंद झालेली आहे. वास्तवात कृष्णात खोत यांची गावठाण ही कादंबरी आहे. व माझ्या म्हणजे कैलास दौंड यांच्या ‘कापूसकाळ’ , ‘ तुडवण’ व ‘ पाणधुई’ या कादंबर्या आहेत.
लेख आवडला.
धन्यवाद सर. लक्षात आणून दिल्याबद्दल!