ती आणि मी

ती माझ्या मनात

घर करून गेली 

मनाचा कोपरान् कोपरा 

उजळून गेली …१…

 

तिचं भोवती असणं 

हवंहवंसं वाटायचं 

तिचं नसणं 

असह्य करून जायचं 

हळूहळू माझ्या मनात 

ती ‘मोठी’ होत गेली …२…

 

ती हसायची 

तिचे डोळेही हसायचे

ओठावरले हसू 

खूप सांगून जायचे 

तिला पाहूनच माझी 

शुद्ध हरपून गेली …३…

 

ती होती, तिचे 

एक अस्तित्व होते 

उंच उंच शिखरं

तिच्यापुढे झुकत होते 

जगायचे कसे, ती 

मला शिकवून गेली …४…

 

जीवनात माझ्या आली 

जीवनच बनून गेली 

दोन फुलं हातावर 

हळूच ठेवून गेली 

प्रेमाची भेट मला 

अशी देऊन गेली …५…

 

आता मी माझा 

राहिलोच नाही 

तीही अशीच स्वतःला 

विसरून जाई 

माझ्या सुखदु:खांची 

ती सावली बनून गेली …६…

 

आता नको काहीही 

तिजवाचून मला 

सहवास लाभो तिचा 

असाच क्षणाक्षणाला 

तिच्याशिवाय जगण्याची 

कल्पनाही करवत नाही …७…

 

कविता अशी माझी ही 

सुरू कोठून झाली 

कसे सुचले शब्द 

शब्दांना अर्थ येई 

एकेक शब्द माझा 

धन्यवाद तिला देई …८…

 

(१४/१०/२०१६)

© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

7 thoughts to “ती आणि मी”

  1. डॉक्टर राहुल सर खूप छान शब्दांकन, यमक जुळविण्यासाठी वापरलेले शब्द खूप अर्थपूर्ण आणि भारदस्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *