धर्म (कथा)- रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट)

          ग्रामीण भागामध्ये राजकीय पक्ष, विविध देवदेवतांचे भक्त यामुळे गटतट निर्माण झालेले असतात. यांच्यात अनेकदा संघर्ष, मारामार्‍या, वादविवाद निर्माण होतात. त्याचा फटका गावातील इतर सामान्य लोकांनाही बसत असतो. ‘धर्म’ ही कथा एका गावातील दोन गटांमध्ये धार्मिक वादातून जो संघर्ष निर्माण होतो व त्यात तुकाराम लोहार नावाच्या व्यक्तीची लहान मुलगी बळी

जाते, यावर आधारलेली आहे.

          या कथेतील गावात दोन राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. त्याचप्रमाणे हनुमान मंडळ व महादेव मंडळ अशा दोन धार्मिक मंडळाचे भक्तही आहेत. अर्थात, या धार्मिक गोष्टींनाही राजकीय बाजू असतेच. हनुमान मंडळाच्या लोकांना एका  धक्क्यावर हनुमानाची मूर्ती बसण्यासाठी सिमेंटचा ओटा तयार केलेला होता. पण त्याच ओट्यावर महादेव मंडळाचे लोकं रातोरात शंकराच्या पिंडेची स्थापना करतात. यातून या वादाला, संघर्षाला तोंड फुटते.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

          हनुमान मंडळाचा मोरक्या बाळू भगत हा महादेव मंडळाच्या सीत्या कलाराला त्याबद्दल जाब विचारतो व ती पिंड हलवायला सांगतो. पण सीत्या पिंड हलवायला तयार होत नाही. दोघांमध्ये वादाला सुरुवात होते. पिंड बसवलेला तो ओटा सरकारी जागेत असल्यामुळे बाळू भगताला काहीच करता येत नाही. मात्र “पिंडचे न्हाई चिपोरे केले तं नावाचा भगत व्हनार न्हाई. तुमची महासिवरात कसी व्हते आनं तुमी गावातून वाजतगाजत कसी मिरवणूक काहाडता थेच मी पाह्यते”, अशी धमकी तो देतो. सीत्या सुद्धा मग त्याला “तू पिंडले हात तं लावून पाह्य रे. न्हाई तुह्या हातात हातकड्या पल्ल्या तं”, असे आव्हान त्याला देतो.  

          त्यानंतर हे प्रकरण पोलिस पाटलाकडे जाते. दोन्ही पक्षाचे लोकं पोलीस पाटलाकडे जमा होतात. पोलीस पाटील त्यांना “यकडाव कुठी यखादी मूर्ती बसोली तं तिले तिथून पुन्ना उठोता येत न्हाई. त्या मूर्तीचा अपमान व्हते. आनं कायद्यानं बी गुन्ना हाये. तरीबी आता तुम्ही म्हन्ताच हा तं मी तालुक्याच्या पोलीस ठान्यावर रपोट लिहून पाठोतो”, असे उत्तर देतो. पाटलाच्या या उत्तराने हनुमान मंडळाच्या लोकांचे समाधान होत नाही. बाळू भगत पाटील महादेव मंडळाच्या लोकांना सामील असल्याचा संशय घेतो.

          दुपारनंतर तालुक्याच्या गावातून दोन-तीन पोलीस येतात. ते सुद्धा ह्या मूर्तीला आता कुणीही हलवायचे नाही. तसे केले तर त्यांना हातकड्या पडतील, असे सांगून चालले जातात. यामुळे हनुमान मंडळाच्या लोकांचा नाइलाज होतो. ते गप्प होतात. तर महादेव मंडळाचे लोकं कॉन्स्टेबलने त्यांच्या बाजूने निकाल दिला म्हणून खूश होतात. शिट्ट्या वाजवून व नाचून तिथेच आनंद साजरा करतात. यामुळे हनुमान मंडळाच्या लोकांच्या मनात अधिकच संताप निर्माण होतो.

          मधल्या आठ दिवसात गावात शांतता राहते. हनुमान मंडळाचे लोकं तालुक्याला जाऊन वकिलाचा सल्ला घेतात. पण काहीच होत नाही. इकडे सीत्या कलार गावात मिशीला पीळ देत फिरत राहतो. याचा राग व संताप हनुमान मंडळाच्या लोकांना येत राहतो. शेवटी एके दिवशी सीत्या रात्रीच्या अंधारात नदीकडे टमरेल घेऊन जात असताना त्याच्या डोक्यात काठी टाकून ते त्याला जखमी करतात. त्याचे डोके फुटून तो रक्तबंबाळ होतो. त्याला तालुक्याच्या दवाखान्यात भरती करावे लागते. पोलीस केस होते. पोलीस येऊन पंचनामा करतात व पोलीस पाटलाच्या सांगण्यावरून गावात आठ दिवस ठाण मांडून बसतात.

          चार-पाच दिवसानंतर सीत्या गावात परत येतो. गावातील वातावरण अधिकच भयावह व असुरक्षित बनते. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पोलीस गावात पहारा देतच राहतात. हनुमान मंडळाचे लोकं काहीतरी उपाय शोधून त्या धक्क्यावर हनुमानाची मूर्ती बसवण्याचा तर महादेव मंडळाची लोकं आठ दिवसांवर आलेला महाशिवरात्रीचा उत्सव व्यवस्थित पार पाडण्याचा तर विरुद्ध पक्षातील लोकं तो उधळून लावण्यासाठी काय करता येईल, अशी खलबतं, कारस्थाने गावात रात्रंदिवस सुरू होतात.

          महाशिवरात्रीच्या आठ दिवस आधी गावात हरिनाम सप्ताह सुरू होतो. सात दिवस गावात कीर्तन, घंटानाद सुरू राहतो. आठव्या दिवशी तालुक्याच्या कीर्तनकार बुवांचे कीर्तन होते. दुपारनंतर दहीलाही वाटली जाते. महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर दरवर्षाप्रमाणे गावातून रात्रीच्या वेळेस मिरवणूक काढली जाते. शंकराच्या लिंगपिंडीची पालखी चार जण खांद्यावर घेतात. समोर दोन गॅसबत्त्या, नंतर दिंडी, दिंडीच्या मागे पालखी आणि पालखीच्या मागे भाविकांचा समुदाय अशी मिरवणूक निघते. मिरवणूक वाजतगाजत दिवाणाच्या पडक्या वाड्यापर्यंत येते. तेथेच त्या मिरवणुकीवर हनुमान मंडळाचे लोकं दगडगोट्यांचा मारा करायला सुरुवात करतात. गॅसबत्त्या फुटतात. त्याच वेळेस गावातील रस्त्यावरचे दिवेही बंद केले जातात. त्यामुळे सर्वदूर अंधार पसरतो. मिरवणूक उधळते. बाया-माणसं, लहान मुलं, वृद्ध असे सर्वजण अंधारात काहीही दिसत नसताना ठेचकाळत, पडत रस्ता

शोधत पळू लागतात. पोलीस पाटलाला ही बातमी कळताच ते पोलिसांसह बॅटर्‍या घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात. तिथे सगळीकडे दगडांचा सडा पडलेला असतो. शंकराची पिंड पालखीतून घरंगळून धुळीत पडलेली असते.

          त्याच वेळेस तेथे तुकाराम लोहार, त्याची बायको व दोन-तीन माणसे कंदील घेऊन येतात. तुकाराम लोहाराची पाच वर्षाची मुलगी तारा ही या पळापळीत हरवली होती. तिला शोधायला ते येतात. बॅटरीच्या प्रकाशात तिचा शोध घेतला असता ती मोडलेल्या पालखीखाली जखमी अवस्थेत सापडते. तिला तालुक्याच्या गावाला दवाखान्यात नेण्यासाठी पाटील त्याची बैलगाडी पाठवतो. पण तारीचा मृत्यू झालेला असतो. रात्रभर तुकाराम लोहार व त्याची बायको रडत राहतात. सकाळी तुकारामच्या घरासमोर गावकऱ्यांची गर्दी जमते.

          या घटनेनंतर गावातील वाद, चढाओढ थंडावते. काही अनुचित घडू नये म्हणून पोलिसांचा गावात रात्रंदिवस पहारा राहतो. मुलीच्या मृत्यूमुळे तुकारामची बायको खचते. ती अन्नपाणी सोडते. दिवसभर रडत राहते. घरातील हे वातावरण तुकारामाला अस्वस्थ करत राहते. मुलीच्या मृत्यूने तोही प्रचंड दुखी होतो. बायकोला तो धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही. याच मानसिक अवस्थेत, संतापात तो एक दिवस घण घेतो आणि धक्क्यावर जाऊन दात-ओठ खात, घणाचा घाव सरळ लिंगपिंडावरच घालतो आणि पिंडाचे दोन तुकडे करतो.  

          अशा रीतीने गावातील दोन पक्षांतील धार्मिक व राजकीय वादात एका लहानगीचा नाहक बळी जातो.

          या कथेला ‘धर्म’ हे जे शीर्षक दिलेले आहे, ते समर्पक आहे. वास्तविक धर्माचा जन्म माणसामाणसांत प्रेम, सौहाद्र निर्माण करण्यासाठी झालेला आहे. मात्र त्यामुळे माणसांमध्ये संघर्ष, मारामार्‍या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. या कथेमध्ये देखील देव-धर्म बाजूला राहतो. त्याच्या आडून त्या सरकारी जागेवर आपला मालकी हक्क असावा, समोरच्या पक्षाचा पराभव व्हावा यासाठी डावपेच, कोर्टकचेर्‍या, मारामार्‍या सुरू होतात. धर्माची चांगली शिकवण विसरून लोकं, बाया-माणसं, लहान मुलं, वृद्ध यांच्यावर दगडफेक करून त्यांना जखमी करतात. यात धर्माचा मूळ उद्देश बाजूला राहतो. ग्रामीण भागातही धार्मिक कट्टरता, राजकारण कसे शिगेला/ टोकाला पोहचलेले आहे, हे या कथेतून लक्षात येते.

          सीत्या कलार, बाळू भगत, पोलीस पाटील, तुकाराम लोहार, तुकारामची बायको हे या कथेतील पात्रे आहेत. यापैकी बाळू भगत हनुमान मंडळाचा म्होरक्या तर सीत्या कलार हा महादेव मंडळाचा म्होरक्या आहे. त्यांच्या महत्त्वकांक्षी वृत्तीमुळे गावात संघर्ष निर्माण झालेला आहे. तुकाराम लोहार हा गावातील गरीब बलुतेदार (बलुतेदारी संपलेली असली तरीही) आहे. त्याला देवाधर्माची जास्त आवड नाही. मात्र त्याची बायको धार्मिक वृत्तीची आहे. सप्ताहादरम्यान घंटी वाजवत पहारा देण्यासाठी गावातील इतर बायकांसोबत तीही जायची. तिच्या या धार्मिक स्वभावामुळे ती मुलीसह मिरवणुकीत सहभागी होते व चेंगराचेंगरीत तिची पाच वर्षाची मुलगी मृत्यू पावते. म्हणून मुलीच्या मृत्यूने वैतागून तुकाराम लोहार “थे दारी भोसडी पालखीसंग गेलीच नसती थ्या पोट्टीले घेऊन तं कायले हे नौबत आली असती आमच्यावर?, कायले आमची यकटी यक पोरगी मेली असती? पण देव म्हंजे थ्या रांडचा यार हाये नं. देवावाचून तं तिचा घास न्हाई जात…. हे होये भक्ती…. “ असे बोलून जातो. आपल्या मुलीच्या मृत्यूला बायकोची देवाची भक्ती कारणीभूत ठरली. असे तो संतापाने का असेना पण बोलून जातो.

          यातून मग त्याच्या डोक्यात त्या महादेवाच्या पिंडीबदल संताप निर्माण होतो. कारण तिच्या स्थापनेपासून गावात जो संघर्ष निर्माण झाला. त्यातूनच त्याच्या निष्पाप व निरागस मुलीचा बळी गेला. म्हणून तो त्याच्या घणाचा घाव घालून ती पिंड उध्वस्त करून टाकतो.

          त्याच्या वरील बोलण्यातून या कथेतील भाषाशैलीही आपल्या लक्षात येते. ग्रामीण जीवनात वावरत असताना व ग्रामीण बोलीतून व्यक्त होताना शिव्यांचा सहज, स्वाभाविक वापर केला जातो. या कथेची निवेदनाची भाषा ही प्रमाण मराठी असून संवाद मात्र बोलीभाषेतून आहेत. तृतीयपुरुषी निवेदनातून ही कथा लिहिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *