या ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल
कृतज्ञता म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
बैल, गाय, म्हैस, रेडा, बकऱ्या, कोंबड्या व इतर प्राणी हे आपल्या शेतकऱ्यांच्या जगण्याचा एक भाग असतात. त्यातल्या त्यात बैल हा या सर्वांमधील कर्ताधर्ता व महत्त्वाचा प्राणी मानला जातो. आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात बैलांचे महत्त्व काही प्रमाणात कमी झालेले असले तरीदेखील बहुतांश शेतकरी आजही त्याच्याच सोबतीने शेती कसतात.
अलीकडच्या काळात शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असले तरीदेखील ग्रामीण भागात राहणाऱ्यांचे प्रमाण शहरांत राहणाऱ्यांच्या तुलनेने जास्तच आहे. तेव्हा या ग्रामीण भागातील लोकांसाठी बैलपोळा हा अतिशय आनंद व उत्साहाचा सण असतो. तसेच शहरातील लोकही ग्रामीण भागातून येऊनच शहरात स्थायिक झालेले असल्याने त्यांनादेखील या सणाबद्दल ओढ व आकर्षण असते. तेव्हा बैलपोळा हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा सण असूनही आपले सरकार एका दिवसाची सुट्टी जाहीर करत नाही व ज्या गणपतीशी आपल्या बहुजनांचा खरंतर प्रत्यक्ष काही संबंध नाही, जो प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही, त्याच्या उत्सवासाठी मात्र आठवडाभर सुट्टी जाहीर करते, हे अतिशय भेदभावजनक व उच्चवर्णीयांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सांस्कृतिक दबावाखाली आखले गेलेले धोरण वाटते.
वास्तविक पाहता दिवाळी, दसरा, आखाजी म्हणजे अक्षय तृतीया, पोळा, संक्रांत, रंगपंचमी, पाडवा हे सर्व महत्त्वाचे सण कृषिसंस्कृतीतून निर्माण झालेले आहेत. त्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या भावविश्वामध्ये यांना खोलवर असे स्थान आहे. पण याच सणांवर आज उच्चवर्णीयांचे सांस्कृतिक आक्रमण झालेले असून या सणांच्या संबंधात काल्पनिक देवदेवतांच्या पुराणकथा घुसळण्यात आलेल्या आहेत व त्यांच्यातील साधेपणा, स्वाभाविकता, बहुजनांच्या संस्कृतीचे दर्शन आता नाहीसे झालेले असून त्यांच्यात एक ब्राह्मणीपणा जाणून-बुजून आणला गेलेला आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव हा ब्राह्मणी सण, दहीहंडी, नवरात्र अशा परराज्यातून आलेल्या किंवा शहरी सणांचे महत्त्व, स्तोम वाढविले गेले आहे व पारंपारिक साध्या-भोळ्या, प्रत्यक्ष जगण्याशी, ऋतुचक्राशी संबंधित असलेल्या सणांचे महत्त्व कमी होत चालले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील बहुजनांनासुद्धा हळूहळू वरचेवर हे जे बदल होत आहेत ते कळत नाहीयेत. वयोवृद्ध व्यक्तींनी जरा त्यांचे बालपण आठवून बघावे. त्यावेळेस या सणांचे स्वरूप असे होते का? माझे फार वय नाही. पण मला चांगले आठवते की, दिवाळीला आम्ही उकिरड्यावर, शेतात, वेशीवर दिवा लावायला जायचो. आधी झाडू, सूप, उकिरडा, धान्याची रास, गावाची वेस, उंबरठा यांची पूजा केली जायची. आपल्या प्रत्यक्ष जगण्यातील वस्तुंशी आपले नाते होते. तेच आपल्या पूजेच्या- सणांच्या केंद्रस्थानी असायचे. हीच आपली संस्कृती होती. ही बहुजनांची बहुजनकेंद्री संस्कृती होती. आता या संस्कृतीचे विकृतीकरण घडून आणले गेलेले आहे व बहुजनांची एक ब्राह्मणी संस्कृती आकाराला येत आहे.
आदिवासी समूहसुद्धा गावोगावी श्रद्धेने गणपती बसवतात व दहा दिवसांपर्यंत सर्व विधी वगैरे करतात तेव्हा हसावे की रडावे, की डोक्यावर हात मारून घ्यावा, असा प्रश्न पडतो!
अलीकडे तर बहुजन समाजातील लोकं शिकून अधिक ब्राह्मणी, ब्राह्मण्यवादी, उच्चवर्णीय संस्कृतीच्या प्रतिमा व प्रतिकांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यांना आपल्या स्थानिक देवदेवतांना मानणे कमीपणाचे वाटायला लागून त्यांना हायफाय ब्राह्मणी देवदेवता जास्त महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. यांच्यातील अनेक जण बायले, झिपरे-झुपरे बाबा-बुवा यांच्या नादी लागून नको त्या गोष्टी करू लागले आहेत.
बहुजनांमधील अनेक तथाकथित शिकलेले नोकरदार, व्यावसायिक तर लग्नसुद्धा वैदिक व पौराणिक अशा दोन पद्धतीने लावायला लागले आहेत. वैदिक लग्नप्रसंगी काय ते धोतर! काय ती रेशमी टोपी! काय तो पेहराव! हे सर्व बघून डोक्याला हात मारून घ्यावासा वाटतो. स्वतःचे स्वत्व विसरलेला हा वर्ग आहे. मला तर हेच शिकून जास्त हुकल्यासारखे वाटू लागले आहेत.
तेव्हा बहुजनांनी अजूनही विचार करावा. वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांचे बालपण आठवावे. आपली खरीखुरी कृषिसंस्कृती, सर्वसामान्यांची बहुजनकेंद्री, निसर्ग-ऋतुचक्र यावर आधारलेली संस्कृती नवीन पिढीसमोर मांडावी व आपल्या संस्कृतीवरील कट्टर धार्मिक ब्राह्मणी आक्रमणाचा बुरखा फाडून ते परतवून लावावे. तरच आपले मूळ अस्तित्त्व टिकून राहील असे वाटते.
© डॉ. राहुल पाटील
मराठी विभाग प्रमुख
माझ्या ब्लॉग व युट्युबवर तुम्हाला अजून असे बरेच काही वैचारिक वाचायला, बघायला मिळेल.
लिंक खाली दिल्या आहेत.
ब्लॉगची लिंक – Drrahulrajani.com
युट्युबची लिंक – https://www.youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw