बहुजन समाजाची सद्यस्थिती आणि ती सुधारण्याचे काही उपाय

         (१९/०२/२०१४ रोजी ‘शिवजयंती’निमित्त मी छत्रपती शिवाजी शासकीय व निमशासकीय कर्मचारी पतसंस्था, जव्हार, जि. पालघर आयोजित कार्यक्रमात दिलेल्या व्याख्यानाची पूर्वतयारी करताना खालीलप्रमाणे लिहून ठेवले होते.)

          भारतात कोणत्याही कालखंडात राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या तीनही सत्ता मूठभर लोकांच्या  हातात राहिल्या आहेत. हा विशिष्ट वर्ग वगळता इतर जे वर्ग किंवा जो समाज यापासून वंचित राहिला व बऱ्याच अंशी आजदेखील आहे तो बहुजन वर्ग, असे मला वाटते. या बहुजन वर्गात हिंदू, बौद्ध, मुस्लिम इ. या सर्व धर्मातील लोकं येतात. या बहुजन समाजाच्या सद्यस्थितीविषयी मला विचार मांडण्यास संयोजकांनी सांगितले होते. थोडे स्वातंत्र्य  घेऊन ती सुधारण्याचे काही उपायही मी सांगणार आहे किंवा विवेचनाच्या  ओघात ते आपोआपच येणार  आहेत.
          विवेचनाच्या सुरुवातीला एक गोष्ट मला आवर्जून सांगाविशी वाटते. अलीकडच्या काळात भारतीय समाजामध्ये तीन प्रकारच्या परंपरा असल्याचे मला दिसून येते. 

           (१) भारतीय स्वातंत्र्याची परंपरा,

           (२) समाज सुधारकांची परंपरा,

           (३) धार्मिक, आध्यात्मिक परंपरा.

           पहिल्या परंपरेतील लोकांनी भारत या देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. जे फार आवश्यक होते. या इतिहासाची उजळणी किंवा कौतुक आपण फार करत असतो. त्याबद्दल कुणालाही अडचण असता कामा नये. परंतु आपली बहुजन समाजाची गुलामगिरी ही फक्त दीडशे वर्षांची नव्हती. तर ती हजारो वर्षाची होती आणि त्या गुलामगिरीतून आपल्याला दुसऱ्या परंपरेतील लोकांनी म्हणजेच समाजसुधारकांनी मुक्ती मिळवून दिली. पशुपातळीवर जीवन जगत असलेल्या आपल्या बहुसंख्य समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण एकतर त्यांना विसरून गेलेलो आहोत किंवा त्यांना, त्यांच्या विचारांना जेवढे महत्त्व द्यायला हवे, जेवढे समजून घ्यायला हवे, तेवढे आपण घेत नाही किंवा आपण त्यांना विशिष्ट जातीपुरते मर्यादित करून टाकलेले आहे, फक्त आपल्या अस्मितेचा, अभिमानाचा विषय करून टाकलेले आहे आणि आपण पुन्हा जातीपातींना, धर्माला महत्त्व देऊ लागलेलो आहेत. त्या लोकांच्या एकसंघ समाजनिर्मितीच्या मूळ विचारांपासून बहुजन समाज लांब गेला आहे, हे फार खेदाने म्हणावे लागते आणि तिसरी धार्मिक, आध्यात्मिक परंपरा या परंपरेच्या आपण पूर्णपणे आहारी गेलेलो आहोत. ज्या धर्माच्या नावावर आपला समाज विभागला गेला, हजारो वर्ष गुलामगिरीत खितपत पडला, तेच धार्मिक विचार आज बहुजन समाजाच्या मनामनात प्रबळ होत चाललेले आहेत, ही अतिशय चिंतेची बाब आहे.

                     माझे वरील विचार स्पष्ट करून सांगण्यासाठी मी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या बहुजन समाजाची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये थोडी तुलना करून सांगतो. १९०१ साली भारतात पुरुषांमध्ये शिक्षणाचे प्रमाण हे ३ ते ४ टक्के आणि स्त्रियांमध्ये जवळपास नाहीच्या बरोबर इतकी साक्षरता होती. आज साक्षरता साधारणतः ७५ ते ८०% पेक्षा जास्त आहे. तेव्हा आज आपली जी थोडीफार प्रगती घडून आलेली आहे, ती साक्षरतेमुळे आणि बहुजन समाजाला शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षणसंस्था उभारणाऱ्या महापुरूषांमुळे. आपण आज हे सपसेल विसरून गेलेलो आहोत किंवा त्यांच्याविषयी कृतज्ञ राहण्याची आवश्यकता आपल्याला वाटत नाही आणि ज्या देवाधर्माच्या नावाखाली, धर्मग्रंथांच्या नावाखाली आपल्याला अज्ञानात ठेवले गेले. त्या घटकांचे महत्त्व वाढविणाऱ्या बुवा-बाबांच्या नादी आपला बहुजन समाज लागलेला आहे, याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही.
आता मी आपला बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थितीविषयी थोडक्यात माझी निरीक्षणे नोंदवतो.

                 १) सामाजिक-

                बहुजन समाज हा जात, धर्म वेगवेगळे पंथ, वेगवेगळे राजकीय पक्ष, आर्थिक स्तरांमध्ये विभागलेला आहे. जातीय व्यवस्था आणि धर्मव्यवस्था यामुळे आजतागायत संघटित होऊ शकलेला नाही. तसेच आजही याच गोष्टींना तो चिकटून आहे. जातविरहित, धर्मविरहित समाज जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने विकासाचा पुढचा टप्पा गाठू शकत नाहीत. आधी परजातीत व परधर्मात ‘रोटी आणि बेटी’ व्यवहाराला बंदी होती. आता रोटीव्यवहार म्हणजे सोबत जेवणे, उठणे, बसणे सर्रास सुरू झालेले आहे. आता जात व धर्मव्यवस्था नष्ट करण्यासाठी जातीजातीत व धर्माधर्मात परस्परसंबंध अधिक दृढ करण्यासाठी फक्त मैत्रीपूर्ण संबंध पुरेसे नाहीत तर नातेसंबंध निर्माण व्हायला हवेत. म. बसवेश्वर, म. फुले, डॉ आंबेडकर यांनी सुचविल्याप्रमाणे आंतरजातीय विवाह, तेही ठरवून व्हायला हवेत.  तेव्हा जाती व धर्मांमधील दरी भरून निघेल व बहुजन समाज संघटित होईल.

              बहुजन समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित, अशिक्षित, नोकरी-व्यवसाय करणारे अशा सर्वच स्तरातील लोकं आजही प्रचंड अंधश्रद्धाळू असलेले दिसून येतात.  नवस, ताईत, नशीब, मणी, गंडे, धागे-दोरे, वेगवेगळे धार्मिक विधी, भविष्य यावर त्यांचा विश्वास आहे.  देवाला तर इतके घाबरतात की, त्याच्या सेवेत किंवा पूजेत कमी पडलो तर तो आपल्याला खाऊन टाकेल, असे त्यांना वाटते. वेगवेगळे व्रत, विधी, देव केव्हा उदयास आले, याबद्दल तर आपल्याला काहीच माहित नाही. त्याचा शोधही आपल्याला घ्यावासा वाटत नाही. उदा. लग्नानंतर, नवीन घरात, दुकानात प्रवेश केल्यानंतर सत्यनारायणाचा विधी, मंगळग्रह मंदिर, नारायण नागबली, लग्न जमत नाही म्हणून केले जाणारे विधी. माझा एक मित्र M.Sc. Micro Biology झालेला होता. एवढा उच्चशिक्षित असूनही लग्न जमत नव्हते, म्हणून तो विविध विधी करत सुटला होता.

               याबाबत मी ब्राह्मणांना दोष देत नाही. कारण साधारणतः राजाराम मोहन राॅय, म. फुले यांच्या काळापासून म्हणजे २०० वर्षांपासून आपली बौद्धिक मशागत करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता तर आपण विज्ञानाच्या, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत, तरी आपण सुधारत नाहीत, हा आपला करंटेपणा आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या उद्धारासाठी झटणाऱ्या महापुरुषांचा पराभव केलेला आहे, असे मला फार खेदाने म्हणावेसे वाटते.

              जरा आपण जगाकडे पाहायला पाहिजे. इतर देशांतील मानवसमूहांशी आपण आपली तुलना करुन बघायला हवी. चीनचे उदाहरण:- आज तो देश आपल्यापेक्षा १० ते १५ वर्षांनी पुढे आहे. हा योगायोगाचा, नशीबाचा भाग निश्चितच नाही. ज्यू लोकं जगाच्या पाठीवर १% पेक्षा कमी असूनही त्यांनी २७% नोबेल पुरस्कार मिळवलेले आहेत. ज्या ब्राह्मणांचा आपण हेवा करतो, त्यापैकी सई परांजपेचे उदाहरण देतो. वयाच्या १०-१२ व्या वर्षापर्यंत मराठीतील हरि नारायण आपटे, लक्ष्मीबाई टिळक, अरेबियन नाईट्स, साने गुरुजी, वीरधवल, इंग्रजीतील जेन ऑस्टीन, मार्क ट्वेन, चार्लस डिकन्स, सर वॉल्टर स्काॅट, ब्रांन्टे भगिनी, टाॅमस हार्डी इ. लेखक त्यांचे वाचून झाले होते. संस्कृतमधील ‘सुभाषितरत्नभांडार’ या ग्रंथातील कित्येक श्लोक मुखोद्गत होते. आपल्या शिक्षकाच्याही घरात मोजून २५ चांगले ग्रंथ मिळत नाहीत. निवृत्त होईपर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीही पुस्तके त्यांनी वाचलेली नसतात.  आज बहुजन वर्गातील शिक्षकांची संख्या जास्त आहे आणि ते आपल्याच वर्गातील मुलांना शिकवत आहेत, या गोष्टींचाही विचार जरूर करायला हवा.

            थोडक्यात, बहुजन समाजाने आत्मपरीक्षण देखील करायला हवे व स्वतःची अज्ञान, अंधश्रद्धेतून जाणीवपूर्वक सुटका करून घ्यायला हवी. भूतकाळात आपल्याला संधी मिळाल्या नसतील. परंतु आता संधी असूनही आपण भूतकाळात रमत असू, आपला दृष्टिकोण बदलायला, वर्तमानातील आव्हानांना सामोरे जायला तयार नसू, तर आपण इतरांच्या मानाने मागे राहिल्यास आश्चर्य वाटता कामा नये. तसेच दुसऱ्याला दोषही देता कामा नये. तेव्हा आतातरी आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारायला हवा. विज्ञान आपल्याला मुक्त करेल.

              २) शैक्षणिक-

           प्रगती चांगली, पण समाधानकारक नाही. सप्ताहासाठी २-३ लाख रुपये जमा होतात.  शैक्षणिक कार्यासाठी, ग्रंथालय स्थापण्यासाठी, क्रीडांगणे तयार करण्यासाठी नाही.
(अपूर्ण…)

 

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *