बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन (विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी…)

बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्फ भीमराव रामजी आंबेडकर हे जगातील सार्वकालीन थोर विद्वान, अभ्यासक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे ज्ञान त्यांनी त्यांच्या स्वतःच्या करिअर व विकासापुरतेच सीमित ठेवले नाही. तर भारतातील ५००० वर्षांची शोषणाची, गुलामीची परंपरा मोडून काढण्यासाठी, येथील सामान्य माणसाला सामाजिक गुलामीतून, शोषणातून मुक्त करण्यासाठी, त्याच्या जगण्याला पशुपातळीवरून मानवी पातळीवर आणून अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वापरले. अशा या महामानवाच्या विद्यार्थी जीवनाबद्दल खूप कमी जणांना अचूक माहित असते. तेव्हा ते माहीत व्हावे व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, त्यांनीही ते वाचून कार्यप्रवृत्त व्हावे, म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे एकूणच विद्यार्थीजीवन आपल्यासमोर मांडत आहे.

            बाबासाहेबांचे नाव भीमराव असले तरी लहानपणी त्यांना सर्वजण भिवा म्हणत. ती एकूण १४ भावंडे होती. बाबासाहेब सर्वात लहान होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. त्यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार होते. पण सुभेदार असूनही त्यांनी लष्करातील मुला-मुलींसाठी दिवसाच्या शाळा व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळांमध्ये १४ वर्षे हेडमास्तरकी केलेली असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगलेले होते. म्हणून त्यांनी भिवाच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे खूप लक्ष दिले. भिवा १-२ वर्षांचा असताना त्यांचे वडील निवृत्त झाले. त्यांना नोकरी करत असताना अल्पसे वेतन होते. निवृत्तींनंतर ते कोकणातील काप दापोली येथे स्थायिक होण्यासाठी आले. परंतु तेथे दापोली येथील नगर परिषदेच्या शाळेमध्ये अस्पृश्य मुलांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मुलांच्या शिक्षणासाठी ते १८९४-९५ च्या सुमारास मुंबई व नंतर सातारा येथे स्थलांतरित झाले.

            बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले. ०७ नोव्हेंबर १८९९ रोजी म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी साताऱ्याच्या हायस्कूलमध्ये त्यांना इंग्रजी पहिल्या वर्गात दाखल करण्यात आले. येथेच त्यांना आंबेडकर, पेंडसे हे उच्च जातीतील परंतु लहानग्या भीमावर प्रेम करणारे शिक्षक भेटले. त्यापैकी आंबेडकर नावाच्या ब्राह्मण शिक्षकाने त्यांना स्वतःचे आडनाव दिले.

            बाबासाहेब १९०४ साली इंग्रजी चौथीची परीक्षा पास झाले. त्यानंतर त्यांचे वडील कुटुंबासह मुंबईतील परळ येथे स्थायिक झाले. येथेच एलफिन्स्टन हायस्कूल या सरकारी शाळेमध्ये बाबासाहेबांना डायरेक्ट नववीच्या वर्गात टाकण्यात आले. (मधल्या वर्गांचा उल्लेख नसल्याने पाचवीनंतर डायरेक्ट नववीत असेच म्हणावे लागेल). या काळात बाबासाहेब हे इतर मुलांप्रमाणे व्रात्य होते. मात्र त्यानंतरच्या काळात त्यांना अभ्यासात आवड निर्माण झाली. ते शाळा सुटल्यावर चर्नीरोड येथे अवांतर पुस्तके वाचायला जाऊ लागले. येथे त्यांची कृ. अ. केळुस्कर गुरुजींशी भेट झाली. पुढे याच केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना खूप मदत केली. बाबासाहेब मॅट्रिक पास झाल्यावर त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. (बाबासाहेब हे मॅट्रिक परीक्षा पास होणारे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.) यात केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना भगवान बुद्धाचे मराठी चरित्र भेट दिले. हे चरित्र केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले होते. त्यांनीच बाबासाहेबांची महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भेट घडवून आणली व त्यांना दरमहा वीस रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मंजूर झाली. थोडक्यात, एखादा विद्यार्थी चांगला अभ्यासू असेल व त्याचे ध्येय निश्चित असेल तर त्याला अनेक जण मार्गदर्शन तर करतातच, परंतु आर्थिक मदतही करतात.

            बाबासाहेबांचे लग्न वयाच्या १७ व्या वर्षी झाले. त्यावेळेस ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यांची पत्नी रमाई ही ९-१० वर्षांची होती. मात्र विवाहित असूनही बाबासाहेबांनी आपली विवाहावस्था आपल्या शिक्षणाच्या, अभ्यासाच्या आड येऊ दिली नाही.

            बाबासाहेबांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण एलफिन्स्टन महाविद्यालयात पूर्ण केले. या महाविद्यालयात उच्चवर्णीय व श्रीमंत मुलेच शिक्षण घेत. बाबासाहेब मात्र या सर्वांच्या तुलनेने अक्षरश: निर्धन होते. याच ठिकाणी त्यांनी इंग्रजी व पर्शियन या भाषांवर प्रभुत्व मिळवले. येथील प्रा. के. बी॰ इराणी व प्रा. मुल्लर हे बाबासाहेबांशी अतिशय प्रेमाने वागत. या महाविद्यालयात त्यावेळी प्रा. ओसवाल्ड, प्रा. मुल्लर, प्रा. जॉर्ज अँडरसन, प्राचार्य कॉव्हर्नटर्न असे अभ्यासू व प्रसिद्ध प्राध्यापक होते.

            नोव्हेंबर १९१२ मध्ये बाबासाहेब बी. ए. उत्तीर्ण झाले. परंतु बी. ए. पर्यंतच्या परीक्षांमध्ये त्यांना खूप गुण होते, असे नव्हे. त्यांना बीएच्या परीक्षेत ७५० पैकी २८८ गुण म्हणजे ३८.४ टक्के मिळाले. १९०८ साली ‘गणितात कच्चा असल्यामुळे आपण परीक्षेला बसणार नाही’, असे त्यांनी स्वतः प्राचार्यांना कळविल्यामुळे त्यांचे एक वर्ष वाया गेले. आज बरेच जण गॅप घेतात तसाच हा प्रकार होता. १९०९ मध्ये प्रिव्हीयसला त्यांना ८८४ पैकी २८२ म्हणजे ३१.९० टक्के गुण मिळाले होते. (तेव्हा उत्तीर्ण होण्यासाठी ३० टक्क्यांची आवश्यकता असायची). तर १९१० मध्ये इंटर परीक्षेत त्यांना इंग्रजीत २०० पैकी ६९गुण, पर्शियनमध्ये १०० पैकी ५२ गुण, गणितात २०० पैकी ६० (उत्तीर्ण होण्यासाठी २०० पैकी ६० गुणांची आवश्यकता होती. म्हणजे या विषयात ते काठावर पास झाले होते), तर तर्कशास्त्र या विषयात १०० पैकी ४२ गुण मिळाले होते. असे त्यांना ६०० पैकी २२३ गुण म्हणजे ३७.१६ टक्के गुण मिळाले होते. या काळात त्यांची हुशार विद्यार्थ्यांमधे गणना होत नव्हती. परंतु फक्त महाविद्यालयीन शिक्षण व तेथील गुण हेच आपले भविष्य ठरवत नाहीत. त्यामुळे तेवढ्यावरून पालकांनी आपल्या मुलांचे शिक्षण थांबवू नये व विद्यार्थ्यांनीही खचून जाऊ नये. भविष्यातील विविध संधींचा शोध घ्यावा व मेहनत करून स्वतःला पुढे आणावे. कारण पदवीपर्यंतच्या परीक्षांमध्ये कमी गुण असले तरी अमेरिका व नंतर इंग्लंडमधील पुढील शिक्षण घेताना बाबासाहेबांनी दिवस-रात्र प्रचंड मेहनत करून असामान्य ज्ञान प्राप्त करून घेतले.

           बाबासाहेबांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण सुरळीतपणे चालावे, त्यांना वाचण्यासाठी भरपूर पुस्तके मिळावीत म्हणून खूप प्रयत्न केले. ते त्यांना दररोज रात्री दोन वाजता अभ्यासासाठी उठवीत व स्वतः जागे राहत. पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नसायचे. तेव्हा ते तडक आपल्या मुलीकडे जायचे व तिच्याकडून दागिने घेऊन ते गहाण ठेवून बाबासाहेबांसाठी पुस्तकं विकत आणायचे. या ठिकाणी भावाच्या पुस्तकांसाठी दागिने देणारी बहीणही विरळच म्हणावी लागेल! मात्र ०२ फेब्रुवारी १९१३ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. खरं तर हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. आपल्यापैकी अनेकांनी हे निमित्त पुढे करून शिक्षण सोडले असते व पदवीच्या शिक्षणावर एखादी नोकरी मिळवून सुखाने संसार केला असता. परंतु बाबासाहेबांना वेगळेच ध्येय खुणावत होते. म्हणून त्यांनी पुढील शिक्षणात खंड न पाडता चालूच ठेवले.

            यानंतरच्या अमेरिकेतील पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांना बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची मदत मिळाली. महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर बाबासाहेबांचे अमेरिकेतील शिक्षण झाले. परंतु, ही शिष्यवृत्ती खूप नव्हती. म्हणून बाबासाहेब हे अतिशय काटकसरीने राहत. इतर विद्यार्थी चित्रपट, दारू, सिगरेट, पर्यटन स्थळी फिरायला जाणे व इतर गोष्टींवर खर्च करीत. मात्र बाबासाहेबांच्या मनात चुकूनही या प्रकारचे विचार कधी आले नाहीत. त्यांनी पुस्तकांशिवाय अन्य कशावरही शिष्यवृत्तीचे पैसे खर्च केले नाहीत. याच पैशांतून थोडे पैसे ते बायकोला घरखर्चासाठी पाठवीत. ते खाण्यापिण्याच्या बाबतीतही पैशाची व वेळेची काटकसर करायचे. आपला जास्तीत जास्त वेळ ते फक्त आणि फक्त अभ्यासावरच खर्च करायचे.

            बाबासाहेबांना अमेरिकेतील कोलंबियासारख्या नामांकित विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळाली, याचे त्यांनी अक्षरश: सोने केले. त्यांनी एका पत्रामध्ये शेक्सपिअरच्या नाटकातील “माणसाच्या जीवनात संधीची लाट येते. त्या संधीचा उपयोग केला तर त्या मनुष्यास वैभव प्राप्त होते”, असे वाक्य उद्धृत केलेले आहे. आज आपल्यापैकी असंख्यांची आर्थिक परिस्थिती बर्‍यापैकी सुधारलेली असल्याने किंवा असंख्य विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्त्यांचा लाभ मिळत असल्याने आपल्या मुलांना शिक्षण घेण्याची सुसंधी प्राप्त झालेली आहे. परंतु, या संधीचा लाभ आपण घेतो का?, हा विचार आपण करायला हवा.

            १९१३ ते १९१६ अशी तीन वर्ष आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले. न्युयॉर्क शहरात राहिले. त्यांना जॉन ड्युई, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिग्मन, जेम्स हावे रोबिन्सन, फ्रँकलिन- गिडींग्ज, अलेक्झांडर गोल्डनवेअर अशा विद्वान प्राध्यापकांनी शिकविले. तिथे त्यांनी इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व अर्थशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला.

            बाबासाहेब आंबेडकर हे जरी अमेरिकेत शिकत होते, तरी त्यांनी एम.ए. व पीएच.डी. या पदव्या प्राप्त करण्यासाठी जे शोधप्रबंध लिहिले ते भारतीय प्रश्नांशी संबंधित होते. त्यांनी १९१५ साली एम.ए.साठी ‘Administration and Finance of the East India Company’ हा शोधप्रबंध, तर १९१६ मध्ये पीएचडी पदवीसाठी ‘National Dividend of India Historical and Analytical Study’ हे शोधनिबंध सादर केले. अमेरिकेच्या तीन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी एम.ए. व पीएच.डी. या दोन पदव्या मिळवल्या. विदेशात जाऊन एवढ्या कमी कालावधीत वरील पदव्या मिळवणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय असावेत. त्यांनी या काळात अखंड मेहनत घेऊन जे ज्ञान संपादन केले, त्याबद्दल त्या विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी त्यांचा सत्कार केला होता.

            ऑक्टोबर १९१६ मध्ये वरील पदव्या घेतल्या-घेतल्या त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इनमध्ये आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी ‘London School of Economics and Political Science’ या नामांकित संस्थेत नावही नोंदवले होते. त्यासाठी त्यांनी प्रबंधाची तयारीही सुरू केली होती. परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना हे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. मात्र हे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न त्यांनी तसेच सोडून न देता मध्ये चार वर्ष गॅप घेऊन १९२० नंतर परिस्थिती काही प्रमाणात अनुकूल झाल्यावर, जुळून आल्यावर पुढे पूर्ण केले.

            या चार वर्षांच्या काळात त्यांनी खूप लेखन केले. काही दिवस विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. शेअर मार्केटमधील दलालांना सल्ला देणारी कंपनी काढली. एका पारशी गृहस्थाच्या हिशेब तपासणीचे काम केले. चर्चगेट येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून वर्षभर काम केले. ‘मुकनायक’ सुरू केले. सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले. या दरम्यान त्यांचा गंगाधर नावाचा मुलगा मरण पावला. मात्र हे सर्व करत असताना त्यांना पुढील शिक्षण खुणावत होते. यासाठी त्यांनी मासिक वेतनातून बचत केली. नवल भथेना या स्नेह्याकडून ५०००/- रुपये कर्ज घेतले. (१०० वर्षापूर्वीचे ५००० तर आताचे किती?). कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांकडून आर्थिक साहाय्य घेतले व प्राध्यापकी सोडून जुलै १९२० मध्ये लंडनला पोहोचले.

            सप्टेंबर १९२० पासून त्यांचा अभ्यास सुरू झाला. या २ वर्षांच्या काळात त्यांनी लंडन येथे एम.एस्सी. (जून १९२१ मध्ये) व डी.एस्सी. या दोन पदव्या प्राप्त केल्या. एम.एस्सी.साठी त्यांनी ‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’ हा तर डी.एस्सी.साठी त्यांनी ‘The Problem of Rupee’ हे प्रबंध सादर केले होते. या काळात त्यांनी ब्रिटिश म्युझियम लायब्ररी, इंडिया ऑफिस लायब्ररी, लंडन युनिव्‍हर्सिटी लायब्ररी व इतर मुख्य ग्रंथालयांचा वापर केला. ते या काळात १८ ते २१ तास अभ्यास करत. अभ्यासाचा वेळ बिलकुल वाया जाऊ नये म्हणून ते दुपारचे जेवण व तिसर्‍या प्रहरीचा चहासुद्धा घेत नसत.

            लंडन मधील वास्तव्यात त्यांनी खूप पुस्तके विकत घेतली. बिकट आर्थिक परिस्थितीत त्यांनी हा अभ्यास करून पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांनी तत्कालीन बॉम्बे विद्यापीठात तीन महिने संस्कृतचादेखील अभ्यास केला. (बाबासाहेबांचे तीन महिन्यात म्हणजे आपले किती वर्ष?).

            बाबासाहेब खरं तर आजीवन विद्यार्थीच होते. परंतु, ज्याला आपण academic शिक्षण म्हणतो ते बाबासाहेबांनी वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत संपादित केले. आज आपण आपल्या मुलांना फार तर विसाव्या-बाविसाव्या वर्षापर्यंत शिकवतो व तो किती पैसे कमवेल, याचा हिशेब मांडत राहतो.

            बाबासाहेब लंडनमध्ये शिकायला जाण्याआधी प्राध्यापकी सोडून गेले होते. आज किती प्राध्यापक/ नोकरदार आपली नोकरी सोडून शिक्षणासाठी जातात. त्यात परत ते विवाहित होते. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारीदेखील होती. आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती.

            थोडक्यात, या महामानवाने आपले शिक्षण, अभ्यास यासाठी प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, कष्ट, कुटुंब, मुलांचा मृत्यू यासारख्या कोणत्याच गोष्टींची फिकिर केली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा आजीवन विद्यार्थी राहिलेला व ज्ञानासाठी वाटेल तो त्याग, वाटेल ती मेहनत घेण्याची तयारी असलेली व्यक्ती या पृथ्वीतलावर विरळच म्हणावी लागेल! अशा या महामानवाकडून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी, म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त हा लेखनप्रपंच केला.

            बाबासाहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संदर्भ ग्रंथ-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंत मून, १९९१, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया.

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

(आपणास माझे लेखन आवडत असेल तर कृपया सदर लेखाची लिंक आपल्या मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शेअर करा व लेखाखाली आपल्या प्रतिक्रिया – comment – द्या.)

8 thoughts to “बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन (विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी…)”

  1. छान सर ! मोजके आणि सुलभ ! !

  2. अतिशय प्रेरणा देणारा लेख सर तूम्ही वाचकांपर्यंत पोहचवला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *