माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक संबंधांचा इतिहास काहीएक प्रमाणात समजून घेण्यासाठी खूप फायदा झाला.
गेल्या १५ वर्षांपासून मराठी विषय शिकवत असल्याने आज मला कलमे पाठ नाहीत. पण राजकीय व्यवस्था, संकेत, लोकशाही मूल्ये, त्यावर आधारलेला समाज कसा असावा, हे चांगले कळते. म्हणून आम्ही एका चांगल्या समाजाची अपेक्षा करतो व समकालीन नेत्यांची विविध काळातील नेत्यांशी, राजकीय व्यक्तींशी तुलना करतो. त्यातून कोण काय करतंय, त्याची उद्दिष्टे इ. गोष्टी बऱ्यापैकी कळतात. किमान वेळ निघून जायच्या आधी शहाणे तरी होतो.
म्हणून मला नेहमी असे वाटत आले आहे की, काही प्रमाणात का असेना पण इतिहास, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र हे विषय टप्प्याटप्प्याने आपल्या मुलांना शिकवले गेले पाहिजेत. त्याशिवाय लोकशाही समजून घेणारे व ती टिकवण्यासाठी, विकसित करण्यासाठी कार्यरत असलेले नागरिक तयार होणार नाहीत.
तसेच एकाच विषयाचा अभ्यास केला तर फक्त सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळेल. पण वैचारिक बैठक तयार होणार नाही. त्यासाठी विविध विषयांचा साक्षेपी अभ्यास करावा लागतो. व्हॉट्सअप व फेसबुक विद्यापीठात असा सखोल अभ्यास होत नाही. त्यासाठी अभ्यासू, वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक पद्धती वापरून चांगल्या हेतूने लिहिलेल्या लेखक, अभ्यासक संशोधक व विचारवंतांची पुस्तके मुळातून वाचावी लागतात. अभ्यासू लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी चर्चा करावी लागते. तरच वैचारिक जडणघडण घडून येते.
हा अभ्यास कधीही पूर्ण होत नाही. ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. सतत वाचत राहिले तर अनेक संदर्भ मिळत जातात, न जुळलेल्या कड्या जुळत जातात, खाचाखोचा कळत जातात.
डॉ. राहुल पाटील