शिवजयंतीनिमित्त

          प्रिय मित्रांनो, 
       येत्या १९ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील पहिले पराक्रमी व कर्तबगार महापुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करणार आहोत. या दिवशी आपण मोटरसायकलला झेंडा लावून रॅल्या काढतो,

मिरवणुका काढतो. सण म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. करायलाच हवे! कारण महाराष्ट्राच्या इतिहासातील हा खऱ्या अर्थाने एक सोनेरी दिवस आहे.
       मित्रांनो, महाराजांनी महाराष्ट्रातील जनतेच्या नसानसांमध्ये, मनामध्ये पराक्रम, शौर्य, कर्तबगारी निर्माण केली. इथल्या माणसाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगायला, त्यासाठी लढायला शिकवले. रयतेचे राज्य निर्माण केले. सामान्य शेतकऱ्यांना, स्त्रियांना सुरक्षितता प्रदान केली. येथूनच भारताला आणि जगाला महाराष्ट्राची एक नवीन ओळख झाली. म्हणून  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत.
           असे असले तरी ते अद्भुत व दैवी पुरुष नव्हते. त्यांनी माणूस म्हणून जन्म घेतला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना एक ध्येय दिले व त्या पद्धतीने त्यांना घडवले. महाराजांनी स्वतः सर्व जाती-धर्मातील लोकांचे संघटन निर्माण केले. एका उदात्त ध्येयासाठी त्यांना एकत्र केले व अन्यायी शक्तींशी (मग तो कोणीही असो) लढायला शिकवले, स्वतः लढले. प्रसंगी स्वतःचे प्राण पणास लावले व या महाराष्ट्र भूमीमध्ये न्यायाचे, सर्वसामान्यांचे राज्य निर्माण केले.    
       महाराजांची जयंती आपण उत्स्फूर्तपणे, उत्साहाने साजरी करणारच आहोत. घरासमोर रांगोळ्या काढून  दिवे लावणारच आहोत, मोटरसायकलवर, घरावर झेंडे लावणारच आहोत, मिरवणुका काढून देहभान विसरून आनंदाने नाचणारच आहोत. परंतु यासोबत जर या दिवशी आपण व्याख्यानांच्या, वाचनाच्या माध्यमातून महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या मुलांवर त्या पद्धतीचे संस्कार घडविण्याचा संकल्प केला, तरच या जयंतीचे औचित्य राहिल व आपल्या भावी पिढ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. नाहीतर इतर सणांप्रमाणे फक्त सण म्हणून हा दिवस आपण साजरा करत राहू व महाराजांच्या स्वप्नातील समाजनिर्मिती कधी प्रत्यक्षात अस्तित्वात येणार नाही. 
            महाराजांना अभिवादन करणे म्हणजे त्यांच्या स्वप्नातील समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करणे, त्यासाठी महाराजांना समजून घेणे, मुलांना घडविणे, असे मला वाटते. बाकी आपण विचार करा!
        आपणास पाच दिवस आधीच शिवजयंतीच्या कोटी-कोटी शुभेच्छा! 

           जय शिवराय!!!

आपला,

– डॉ. राहूल रजनी

(१३/०२/२०२०)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *