अभ्यास कसा करावा (भाग-१)
मित्रांनो, एखाद्या विषयावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे असेल तर आपल्याला त्या विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक विषयात असंख्य मूर्त, अमूर्त अशा वस्तू, गोष्टी असतात. त्यांचे काहीएक स्वरूप, व्याप्ती व विस्तार असतो. त्याचे काटेकोरपणे आकलन करून घेतले, दोन वस्तू, गोष्टी यातील साम्य-भेद, सीमारेषा व्यवस्थित समजून घेतल्या तर आपली त्या विषयावर पकड निर्माण होते.
या असंख्य संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी, त्यांचे नियमित वाचन होणे, त्या नियमितपणे नजरेखालून जाणे, त्यावर विचार, चर्चा, चिंतन, मनन होणे गरजेचे असते. त्यासाठी त्या जर एकाच संदर्भ पुस्तकात मिळत असतील, तर अशी पुस्तके संग्रही ठेवून त्यांचे अध्ययन करायला हवे. मात्र एखाद्या विषयात असे संदर्भग्रंथ उपलब्ध नसतील तर आपण स्वतः एक मोठी २०० पेजेस वही घेऊन त्या वहीत सुवाच्च अक्षरांत त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करून त्यात जिथे-जिथे संज्ञा, संकल्पना स्पष्ट केलेल्या आढळतील. त्या या वहीवर लिहून घ्यायला हव्यात.
फायदे-
१) आपण एखाद्या विषयाचा सविस्तर अभ्यास करून जर आपल्या भाषेत संज्ञा, संकल्पना, व्याख्या लिहून ठेवत असू तर आपली त्या विषयाची समज, आकलनक्षमता वाढत जाते.
२) आपण ह्या संकल्पना जेव्हा आपण वहीवर उतरवून घेतो तेव्हा स्वतः एका प्रक्रियेतून जात असतो. ग्रंथवाचन, आकलन, संकल्पना निवड, आपल्या हस्ताक्षरात अचूक, समर्पक भाषेत, शब्दांत लेखन, पुन्हा एकदा दोन्हीकडे (ग्रंथ व वहीत) तपासून घेणे व नंतर अनेकदा वहीतून उजळणी करत राहणे, या प्रक्रिया घडून येतात. या प्रक्रियेतून जर आपण गेलो तर अक्षरशः केव्हाही, कुठेही, कोणत्याही अवस्थेत आपल्याला एखादी व्याख्या, संज्ञा, संकल्पना विचारली तरी आपण तिचे उत्तर तोंडी वा लिखित स्वरूपात देऊ शकतो.
३) संकल्पना चांगल्या स्पष्ट झाल्याने व त्या तोंडी वा लिखित स्वरुपात स्पष्ट करून सांगता येत असल्याने आपला आत्मविश्वास वाढत जातो.
४) नंतर भविष्यात आपण मुलाखतींना, त्या विषयातील पदवी,पदव्युत्तर, नेट/सेट, स्पर्धा परीक्षा देताना, संशोधन किंवा एखाद्या प्रकल्पावर काम करताना, कुठे व्याख्यानांना जाताना ही वही तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल.
यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायला हवे?
१) एक २०० पेजेस चांगली वही घ्यायला हवी. जी पुढील २०-२५ वर्ष सुस्थितीत राहू शकेल.
२) त्या वहीत अगदी सुटसुटीतपणे एक एक संकल्पना, व्याख्या लिहीत राहावी.
३) मूळ संदर्भ ग्रंथाचे वाचन सुरू ठेवावे. तिथे आढळणाऱ्या व्याख्या या वहीत सुवाच्च अक्षरात लिहून घ्याव्यात.
एका दिवसात, महिन्यात, वर्षात हे काम पूर्ण होणारे नसते. कारण प्रत्येक विषय हा असंख्य संकल्पनांचा, तपशीलांचा मिळून बनलेला असतो. म्हणून या वहीत नेहमीच भर पडत जाणारी असते, हे लक्षात ठेवायला हवे. यासाठी सातत्याने संकलन सुरू ठेवावे व त्याचे नियमित वाचन करीत राहावे.
४) दोन व्याख्यांमध्ये एका ओळीचे अंतर ठेवावे. संकल्पनेचे नाव व व्याख्या यासाठी शक्यतो वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरावेत. संकल्पनेच्या नावासाठी गडद रंगाचा पेन वापरल्यास उत्तम! जेणेकरून ती सहज नजरेत भरेल.
५) ज्या दिवशी तुम्ही संकल्पना लिहिणार त्या दिवसाचा दिनांक सुरुवातीला समासात लिहावा. पुढच्या दिवशी पुढचा दिनांक. ज्यामुळे भविष्यात तुम्हाला कळेल की, तुम्ही केव्हा, कोणत्या विषयाचा अभ्यास करत होतात.
६) व्याख्या, संज्ञा, संकल्पना ही काटेकोर, नेमक्या व मोजक्या शब्दांमध्ये लिहिली गेलेली असावी. ती त्या वस्तूचे पूर्ण स्वरूप सांगणारी व अचूक असावी. ती अतिव्याप्त किंवा अव्याप्त, अपूर्ण, चुकीची तसेच संदिग्ध स्वरूपाची नसावी.
महत्वपूर्ण:- ही वही तुम्हाला आयुष्यभर कामात येणारी असते.
(मी स्वत: गेल्या १४ वर्षापासून लाभ घेत आहे)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
(तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर खाली शेअरचे जे विविध पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका किंवा अनेक पर्यायांचा वापर करून आपले मित्र, नातेवाईक, विद्यार्थी यांना पाठवा. त्यांना तेवढाच लाभ होईल. धन्यवाद!🙏🙏)
माझ्या YouTube channel ला नक्की भेट द्या व subscribe करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व कार्य- व्याख्यान https://youtu.be/PldPjPZJg10