एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?
तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित
झाला होता. याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९३० ते १९५० या कालखंडातील पार्श्वभूमी या चित्रपटामध्ये आहे.
एका विधवेच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला एवढी प्रसिद्धी मिळाली. मग १८९१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात शून्य ते चार या वयोगटातील १३८७८ मुली विधवा होत्या. ० ते ४ वयोगटातील बरं का! पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा. मग १४-१५, २०-२५ वयोगटातील किती मुली तेव्हा विधवा असतील, याची जरा कल्पना करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे (जरी १८५६ साली विधवाविवाहाचा कायदा संमत झालेला असला तरी) त्यांचे त्या काळात कधीही लग्न होणार नव्हते. त्यांच्या वाट्याला किती दुःख, वेदना आल्या असतील, त्यांची किती ‘उपासमार’ झाली असेल, त्यांच्या आयुष्यात ‘काय काय’ घडले असेल, याचा जरा संवेदनशील व्यक्ती म्हणून विचार करा आणि हाही विचार करा की, यांच्या वाट्याला असे आयुष्य कशामुळे आले? तर तुम्हाला उत्तर मिळेल की येथल्या रूढी परंपरा, धार्मिक चालीरीती, धर्मव्यवस्था याला जबाबदार आहे. गेल्या शेकडो वर्षांमध्ये अशा कित्येक मुलींचे आयुष्य इथल्या धर्मव्यवस्थेने उद्ध्वस्त केले, याचाही जरा विचार करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की, धर्म, रूढी, परंपरा, चालीरीती यांनी माणसाचे आयुष्य सुखी, समाधानी केलेले नाही तर हजारो-लाखो लोकांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त- उद्ध्वस्त केले आहे!
तेव्हा तेच दिवस किंवा तशाच प्रकारचे दिवस पुन्हा हवे असतील तरच देव-देव, धर्म-धर्म करा आणि जर सुखाने, समाधानाने जगायचे असेल, आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य सुधारायचे असेल तर लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करा. धर्मांध होऊ नका.
© डॉ. राहुल