काय असतं एवढं पुस्तकात?

             

              वाचन करणाऱ्यांबद्दल बऱ्याचदा लोकं असं म्हणत असतात की, “तो ना, तो नेहमी पुस्तकातच डोकं घालून बसलेला असतो. काय असतं एवढं पुस्तकात, कुणास ठाऊक!”

                 खरंच, काय असतं पुस्तकात एवढं? काय असतं?

               मित्रांनो, पुस्तकात भूत, भविष्य, वर्तमान असतं. काळाचा एक विस्तीर्ण व व्यापक असा पट पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा राहतो. पुस्तकांमध्ये विविध स्वभावाची, विविध प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटतात. तशी ती आपल्या भोवती असतातच. पण पुस्तकांमधून अशी असंख्य माणसं त्यांच्या स्वभावधर्मासकट आतून-बाहेरून ती जशी आहेत, अगदी तशीच आपल्यासमोर प्रकट होतात. त्यापैकी काही वर्तमानातील असतात, तर काही भूतकाळातील. काही काल्पनिक असतात, तर काही

वास्तवातील. त्यांचं चिंतन, त्यांच्या जगण्याचे तत्त्वज्ञान, त्यांची संस्कृती, त्यांचा संघर्ष, त्यांचं यशापयश, त्यांच्या जीवनातील बऱ्या-वाईट घटना, त्यांच्याकडून झालेल्या चुका, त्यातून त्यांनी घेतलेले अनुभव हे सर्व पुस्तकात असतं. 

              आपल्या पूर्वजांनी हजारो-लाखो वर्षांच्या प्रवासात साठवून ठेवलेले ज्ञानाचे, अनुभवांचे संचित पुस्तकांमध्ये असतं. मानवजातीच्या भविष्यातील प्रवासाचा काही एक अंदाज पुस्तकांमुळे आपल्याला येतो.

            पुस्तकं आपल्याला जगायला शिकवतात. जगण्याकडे, वर्तमानाकडे, माणसांकडे, विविध घटना व घडामोडींकडे पाहण्याचा इतरांपेक्षा वेगळा, सकारात्मक, विधायक आणि समतोल असा दृष्टिकोन पुस्तकं आपल्याला देतात. जीवननाट्याकडे मग आपण तटस्थ व काहीशा अलिप्तपणे बघायला शिकतो. पुस्तकं खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतात. पुस्तकं माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आयुष्याला आनंदाने, मुक्तपणे सामोरे जायला पुस्तकच तर शिकवतात!

              पुस्तकं खळखळून हसवतात, पुस्तकं भावनांना वाट मोकळी करून देतात. पुस्तकं ही चांगल्या मित्रासारखी आणि हो मैत्रिणीसारखीही असतात! आयुष्यभर साथ देतात व आपलं आख्खं जगणं समृद्ध करून टाकतात !

              पुस्तकं माणसाचा मेंदू सशक्त व मन संवेदनशील, सृजनशील बनवतात. अनेक कल्पना, संकल्पना यांचे बीज पुस्तकांच्या सान्निध्यातच मानवी मेंदूत पडतं व या अशाच कल्पना-संकल्पनांनी आख्खं मानवी जग उजळून निघालेलं आहे. 

             पुस्तकं अंधार्‍या रात्रीतही प्रकाशाची पायवाट असतात !

             पुस्तकं घनघोर वादळातही मजबूत व सुरक्षित निवारा असतात !

             पुस्तकं महाप्रलयातही मानवाला तारून नेऊ शकतात !

             म्हणून मला असे म्हणावेसे वाटते की,

                                  पुस्तकांची महती वर्णावी तेवढी कमी आहे !

                                  पुस्तकांच्या सन्निध्यातच सुखी जीवनाची हमी आहे !

 

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

(जर आपणास माझे लेखन आवडत असेल तर खाली शेअर करण्यासाठी विविध पर्याय दिलेले आहेत, त्यावरून आपले मित्र, नातेवाईक, विद्यार्थी यांना जरूर पाठवा. धन्यवाद!)

5 thoughts to “काय असतं एवढं पुस्तकात?”

  1. खूप छान माझे मित्र ही पुस्तकं आहेत

  2. ग्रंथवाचनाचे महत्त्व अगदी ओघवत्या शैलीत मांडलेत. छानच..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *