कोरोना व झोपडपट्ट्यांमधील लोकांचा प्रश्न

कोरोना व झोपडपट्ट्यांमधील लोकांचा प्रश्न

           (सदर लेख लिहितेवेळी एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ४४४७ इतकी आहे. तसेच हा लेख लिहिताना मी अनेकांशी फोनवर बोललोय व तज्ज्ञांची मते विचारात घेतलीत, कृपया याची नोंद घ्यावी.)

            माझे वडील ३५ वर्षे मुंबईत कांदिवली येथील लक्ष्मीनगर, हनुमाननगर या झोपडपट्टी परिसरात राहिलेले आहेत. माझे सख्खे काका, सख्खे मामा व सख्खी मावशी उधना (सुरत) येथे गेल्या ३०-३५ वर्षांपासून राहताहेत. मुंबई-उधनामधील झोपडपट्ट्या, तेथील राहणीमान, छोटी छोटी घरं, तेथील अज्ञान, निरक्षरता, १२-१२ तास काम करूनही कमी वेतनमान इत्यादी गोष्टी मी अगदी लहानपणापासून खूप जवळून बघितलेल्या, अनुभवलेल्या आहेत. हे सर्व आत्ताच सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल, हा विचार राहून राहून माझ्या मनात येत आहे.

              मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अक्षरशः १० बाय १० किंवा १२ बाय १० ची म्हणजे १०० ते १२० चौरस फूटच्या रूम असतात. त्या रूममध्येच आंघोळीसाठी तसेच भांडे, कपडे धुण्यासाठी छोटीशी मोरी असते. बाजूला गॅस सिलेंडर व शेगडी, स्वयंपाकाची भांडी ठेवण्यासाठी छोटीशी रॅक वगैरे असते. या रूममध्ये जेमतेम दोन किंवा तीन व्यक्ती कशाबशा राहू शकतात. येथे तर चार-पाच जणांपासून (तर अनेक ठिकाणी) दहा बारा जणांचे कुटुंब राहते. उधना-सुरत मध्येही अशीच परिस्थिती आहे. हीच अवस्था भारतातल्या कोणत्याही मोठ्या शहरांमधील निम्नवर्गीय वस्तींची आहे. या झोपडपट्ट्यांमधील व्यक्तींना शौचासाठी सार्वजनिक

शौचालयात जावे लागते. सार्वजनिक शौचालय एक, दोन किंवा तीन मजली असते. यात त्याच्या आजूबाजूच्या साधारणतः ५०० ते १००० मीटर परिसरातील शेकडो पुरुष व महिला दररोज पैसे देऊन शौचासाठी येतात. यासाठी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाहीये. या लोकांना पिण्याचे, वापरण्याचे पाणी घेण्यासाठी सार्वजनिक नळावर पुनः पुन्हा जावे लागते. कारण घरात पाणी साठविण्यासाठी पुरेशी जागा नसते. वरच्या मजल्यांवर चढण्यासाठी जो लोखंडी अथवा लाकडी जिना/ सिडी असते, तो एवढा अरुंद असतो की बादली किंवा हंडा घेऊन चढणे कठीण होते.

             या ठिकाणी दोन गल्ल्यांच्यामध्ये चार ते पाच फुटांचे अरुंद असे बोळ असतात आणि या बोळमधूनच गटारी गेलेल्या असतात. बऱ्याच गटारी उघड्याच असतात. या बोळमधून सायकल, मोटर सायकल इ. दुचाकी वाहनेही जाऊ शकत नाहीत. बऱ्याच झोपड्यांवर, दुमजली किंवा तीन मजली छोट्या-छोट्या घरांवर पत्रे असतात. यापैकी ९०% खोल्यांना खिडक्याही नसल्यामुळे किंवा असल्या तरी अतिशय लहान असल्यामुळे ऊन, वारा यायला वाव नसतो. म्हणजे व्हेंटिलेशन बिलकुलही नसते. अतिशय कोंदट वातावरणात ही लोकं राहतात. या भागात लोकसंख्येची घनता खूप जास्त असते. त्यामुळे अतिशय दाटीवाटीने झोपड्या, दुमजली-एकमजली अशी छोटी-छोटी घरे या ठिकाणी असतात.

             हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे, या लोकांना आपण कोरोनापासून कसे वाचवणार?, हा प्रशासनापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणजे  शौचासाठी सार्वजनिक शौचालयात दररोज काही शे-हजार लोक एकत्र येणार. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. इथे प्रत्येकाला किती घाई असते, हे आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नसावी. त्यात एखाद्याला कोरोना असेल तर त्याचा प्रसार अनेकांमध्ये होणार नाही का? पाणी भरण्यासाठी ते खाली उतरणार. त्या ठिकाणी अनेक जण दिवसभरात येणार, त्यातून कोरोना पसरणार नाही का? यापैकी १% लोकं जरी भाजीपाला, किराणा घ्यायला बाहेर पडली तर किती गर्दी होत असेल? (हे टीव्हीवर आपण बघतच आहोत).

          दुसरी गोष्ट, ही इतकी माणसे एवढ्याशा रूममध्ये कसे राहत असतील?, याची कल्पना करून बघा बरं! म्हणजे १००-१२० चौरस फूटच्या रूममधून मोरी व स्वयंपाकाची ३०-४० फूट जागा गेल्यावर उरलेल्या जागेत या व्यक्तींना फिरता, उभे राहता, झोपता तरी येत असेल का? इथे तालुका, जिल्ह्याची शहरे व खेडेगावातील मोकळ्याढाकळ्या वातावरणात, मोठ्या घरात लोकांना राहणे अशक्य होऊन गेलेले आहे. ही माणसं कशी जगत असतील गेल्या महिन्याभरापासून? अजून किमान ९-१० दिवस काढायचेत. यांच्या लहान मुलांची काय अवस्था झाली असेल? कसे सांभाळत असतील हे त्यांच्या मुलांना? आता उन्हाळा सुरू झाल्याने काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. उष्णता, दमट वातावरण, वर पत्रे, व्हेंटिलेशन नाही, त्यात घराबाहेर निघण्याची सोय नाही. बाहेर निघाले तर कोरोनाची भीती! अनेकांचे रोजगार गेलेले असल्याने उत्पन्नाची सोय नाही. गावापासून, आपल्या लोकांपासून लांब राहत असल्यामुळे व कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीमुळे यांच्या मनावर, शरीरावर काय परिणाम होत असेल? त्यामुळेच मागे लॉकडाऊनची मुदत वाढल्यानंतर व रेल्वे सुरू झाल्याची अफवा पसरवल्यानंतर यापैकी दोन-तीन हजार लोकं घराबाहेर पडली होती. यापुढे जर रुग्ण वाढल्यामुळे लॉकडाऊन वाढवावा लागला तर ही लोकं बाहेर पडणार नाहीत कशावरून?

             हे सर्व लिहिण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की, लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी एखाद्या आठवड्याची मुदत देऊन या लोकांना त्यांच्या मूळ गावी, घरी जाऊ द्यायला हवे होते. (अच्युत गोडबोले यांनीही त्यांच्या ‘कोरोनानंतरचे जग’ या ५२ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दोन आठवड्यांचा कालावधी द्यायला हवा होता, असे म्हटलेले आहे). कारण तेव्हा त्याचा प्रसार या महानगरांमध्ये तेवढा झालेला नव्हता. तसेच १७ मार्चपासून सर्व महाराष्ट्रातील, भारतातील शाळा, महाविद्यालये बंद केली, २५ तारखेनंतर लॉकडाऊन सुरू झाला. या दरम्यान या लोकांना गावी पाठवता आले असते व एकाच ठिकाणी लोकसंख्या केंद्रित झाल्यामुळे कोरोना व्हायरसचा या महानगरांमध्ये प्रसाराचा आज जो मोठा धोका निर्माण झालेला आहे, तो टाळता आला असता. आज त्यांची जी कोंडवाड्यात, खुराड्यात कोंडल्यासारखी दयनीय अवस्था झालेली आहे व प्रचंड भीतीच्या सावटाखाली ही लोकं जगत आहेत, हे झाले नसते. (ऑनलाइन बातम्या वाचताना अनेकदा त्यांच्यापैकी अनेकांच्या ‘आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या’, या आर्त प्रतिक्रिया मी वाचल्या आहेत). माझ्या मते, लॉकडाऊन जाहीर करण्याआधी भारतातील मोठ्या शहरांमधील या लोकांचा पुरेसा विचार केला गेलेला नाही.

             आजही वेळ पूर्ण हातातून गेलेली नाहीये. माझ्या मते, आजही यापैकी लाखो लोकांना गावी पाठविता येणे शक्य आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या या परिसरात घेतल्या जायला हव्यात. यात जी कुटुंब निगेटिव्ह आढळतील, त्यांना सरकारी, खासगी वाहनांमध्ये बसवून किमान ५००-६०० किलोमीटर परिसरातील लोकांना नियोजनबद्धरीत्या व पुरेशी काळजी घेऊन गावी पाठविता येणे शक्य आहे. गावात शाळा, समाज मंदिरे, प्रार्थनास्थळे या ठिकाणी किंवा तेही अपूर्ण पडले तर गावाबाहेर तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था सहज करता येऊ शकते. तिथे त्यांचे विलगीकरण अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे. (असाही मुंबईमध्ये मोठमोठी मैदाने, शाळा, महाविद्यालये यात सामूहिक विलगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेलाच आहे. पण ते लोकसंख्येच्या मानाने पुरेसे ठरणार नाही, असे दिसून येते. तसेच महाराष्ट्र सरकार परराज्यांमधील मजुरांसाठी रेल्वे सोडण्याची मागणी करत आहेच.) त्याशिवाय सततच्या भीती व असुरक्षिततेमुळे, गावापासून-जवळच्या माणसापासून लांब रहावे लागत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक मानसिकतेपासून त्यांची सुटका होणार नाही व त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन ते कोरोनाला सहज बळी पडतील व कोरोनाचा प्रसार वाढतच जाईल.

             ज्या पद्धतीने जंगलात किंवा कुठेही आग लागल्यावर जळाऊ पदार्थांना त्या आगीपासून लांब नेतात, त्यांचा संपर्क तोडतात. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांमधील कोरोनाच्या वणव्यापासून ही माणसंरुपी जळाऊ पदार्थ, कोरोनाचा प्रसार होऊ शकणारी जास्तीची माणसं कमी करायला हवीत, असे मला वाटते. असे न केल्यास पुणे, मुंबई व इतर महानगरांमधील कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असे मला वाटत नाही. यामुळे प्रशासनापुढे शांतता व सुव्यवस्थेचा, कोरोनाला आळा घालण्याचा गंभीर प्रश्न उभा होईल. पावसाळाही आता एक-दीड महिन्यावर आलेला आहे. त्याच्या आधी अटकाव घालणे मोठे आव्हानात्मक आहे.

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

4 thoughts to “कोरोना व झोपडपट्ट्यांमधील लोकांचा प्रश्न”

    1. कोरोना काळ आणि मानवी वर्तनव्यवहार असे पुस्तक येऊ दे सर

  1. वास्तव स्थिती लेखातून मांडली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *