कोरोना व मानवजातीचे अपराध

कोरोना व मानवजातीचे अपराध

मानवजातीसमोर आज कोरोना नामक विषाणूचे खूप मोठे संकट उभे ठाकलेले आहे. किंबहुना, हा मानवाचे अस्तित्वच नष्ट करतो की काय? अशी शंका, असा यक्षप्रश्न आज मानवजातीसमोर आ वासून उभा राहिलेला आहे. आतापर्यंत अशा अनेक आजारांना, विषाणूंना पुरून उरणारा मानव आजच्या प्रगत विज्ञानाच्या युगातही एका विषाणूसमोर अक्षरशः हतबल झालेला दिसून येत आहे.

सर्व जगात, आज मी हे लिहीत आहे त्या दिवसापर्यंत जवळपास ४०००० लोकांचा जीव या विषाणूने घेतलेला आहे. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, सिंगापूर, जपान अशा प्रगत-अतिप्रगत देशांनी या विषाणूसमोर, त्यापासून होणार्‍या आजारासमोर गुडघे टेकलेले दिसून येत आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्रतिबंध करू शकणारी लस अथवा त्याच्यापासून व्यक्ती बाधित झाल्यावर त्याला बरे करण्यासाठी नेमके, अचूक (Proper) औषध शोधून त्याला आवर घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ

अक्षरश: रात्रीचा दिवस करत आहेत आणि जगभरातील माणसं त्याकडे डोळे लावून बसलेली आहेत.

आज जवळपास सर्व जगाचा व्यवहार बंद पडलेला असून या विषाणूने रात्रंदिवस, श्वास फुटेपर्यंत धावणार्‍या जगाला चार भिंतींच्या आत स्वत:ला कोंडून घ्यायला भाग पाडलेले आहे. आपले अस्तित्व वाचवता यावे म्हणून मानव आपली सर्व क्षमता, सर्व कौशल्य, सर्व अनुभव, सर्व ज्ञान, सर्व धर्मांतील सर्व देवांवरची श्रद्धा पणास लावून स्वसंरक्षण करण्याचा व या विषाणूविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतोय. जीव वाचवण्यासाठी तो अक्षरशः कासावीस झालेला दिसून येत आहे.

अशा या पार्श्वभूमीवर (जसे हे आपल्या भारतात सुरू झाले व याच्या झळा आपल्यालाही बसू लागल्या, तेव्हापासून) राहून-राहून अनेक प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावत आहेत. आज मानवजातीवर, मानव वंशावर, त्याच्या अस्तित्वावरच हे संकट आलेले असल्यामुळे तो खडबडून जागा झालेला आहे व ऐनकेन प्रकारे स्वतःला वाचवण्यासाठी धडपडतोय. मात्र असेच संकट इतर प्राण्यांवर व सजीव सृष्टीवर आले असते, तर त्याने आजइतक्या जिवाच्या आकांताने प्रयत्न केला असता का? किंबहुना, याच मानवाने आजपर्यंतची स्वतःची प्रगती (!, ?) साधण्यासाठी या पृथ्वीवरील इतर कितीतरी प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा निर्वंश घडवून आणलेला आहे, अनेकांना त्या टप्प्यापर्यंत आणून सोडलेले आहे, याची साधी जाणीव, त्याबद्दल काही एक दुःख, पश्चातापाची भावना तरी आपल्या मनात निर्माण होते का?

आजपर्यंत आपण

  • रासायनिक खते, कीटकनाशके फवारून जमीन, पिके व झाडे यांवरील तसेच जलसाठे यांमधील किती सूक्ष्म कीटकांचा, सूक्ष्मजीवांचा नायनाट करून टाकलेला असेल?
  • विविध सणांच्या निमित्ताने आपण विविध रासायनिक घटकांनी बनविलेल्या कोट्यवधी मूर्त्यांचे विसर्जन करून पाण्यातील किती मासे, सूक्ष्मजीव यांचा जीव आपण आतापर्यंत घेतला असेल?
  • आपण अनेकदा स्वहाताने हजारो-लाखो चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील जंगलांना आगी लावून दिल्या, त्या वेळेस त्यात किती दुर्मिळ, नाजूक-नाजूक प्राणी, वनस्पती, पक्षी, सूक्ष्मजीव यांना तडफडत जीवानिशी संपवून टाकले असेल?
  • शहरीकरण, औद्योगिकीकरण यासाठी आतापर्यंत किती वनस्पतींच्या प्रजाती आपण समूळ नष्ट करून टाकलेल्या असतील?
  • हत्ती, सिंह, वाघ, लांडगे, कोल्हे, ससे, हरीण, अजगर, साप, कासव, विविध माशांच्या व प्राण्यांच्या प्रजातींची, समृद्ध प्राणीसृष्टीची आपण कशी वाट लावली, हा विचार या प्रसंगी मनात येईल की नाही? केवळ दात, कातडी, नखे यासाठी आपण यांच्या हत्या केलेल्या आहेत.

केवळ चंगळवाद, भोगलोलुपता यामुळे आपण हा विध्वंस घडवून आणलेला आहे. आज माणसाने सर्व गोष्टी आठवण्याची नितांत आवश्यकता आहे.

माणूस आजपर्यंत असा वागत आलेला आहे की, जणू तोच या पृथ्वीचा एकमेव अनभिषिक्त सम्राट आहे. या पृथ्वीवर तो एकटाच उरला व इतर सर्व प्राणी, सजीव सृष्टी संपली तरी आपल्याला काही फरक पडत नाही, या आविर्भावात, या धुंदीत तो आजपर्यंत वावरत होता. पण त्याच्या पायाखालची वाळू आता सरकू लागलेली आहे. त्याला कारण म्हणजे एक अदृश्य कोरोनानामक विषाणू (तोही निर्जीव आहे, असे म्हणतात) त्याच्या अस्तित्वावरच उठलेला दिसून येत आहे.

आज माणसाने विचार करायला हवा की, ही पृथ्वी काय फक्त मानवकेंद्री आहे का?, फक्त आपल्या एकट्याच्या बापाचीच आहे का? इतर सजीवसृष्टीला या पृथ्वीवर जगण्याचा काहीच अधिकार नाहीये का? ‘मानव इतर प्राण्यांपेक्षा बौद्धिकदृष्ट्या अधिक विकसित प्राणी आहे’, हो मान्य! पण इतर प्राण्यांना किमान जगण्यापुरतीसुद्धा बुद्धी नसते का? त्यांना वात्सल्य, प्रेम इ. भावना नाहीतच, असे त्याला वाटते का? त्यांनाही त्रास, इजा झाल्यावर, जवळचे कुणी मेल्यावर वेदना होतात ना? त्यांनाही जीव आहे की नाही? व तो जीव जेव्हा आपण विविध अस्त्र-शस्त्र-रसायने-आगी इ. चा वापर करून घेत होतो, तेव्हा त्यांना वेदना झाल्या नसतील का?

मी पाप-पुण्य या संकल्पना मानत नाही. पण संवेदनशीलतेने विचार केल्यावर माझ्या असे लक्षात आले की, माणसांनी आतापर्यंत प्रचंड मोठे अपराध करून ठेवलेले आहेत. म्हणून म्हणतो, ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. माणसाला स्मृतीचे वरदान निसर्गाने दिलेले आहे, पण आपल्या हातून किती असंख्य-असंख्य जीव घेतले गेलेत, ज्यांचा हिशेबसुद्धा आज आपण लावू शकत नाहीत. आज त्याने या सर्व गोष्टी आठवून बघायला हव्यात.

‘विचार करणारा प्राणी म्हणजे माणूस’, असे म्हटले जाते. तेव्हा आजपर्यंत स्वार्थीपणा, उपभोगवादी व चंगळवादी वृत्तीने वागून आपल्याला काय मिळाले? व पुढेही काय मिळणार आहे?, याचा शांतपणे विचार करायला हवा. आता कित्येक दिवसांपासून सक्तीच्या का असेना, पण मिळालेल्या उसंतीत, निवांतपणात आता तरी हा विचार माणूस करेल का?

ही पृथ्वी, हा निसर्ग यावर फक्त आपला हक्क नाही. सर्व प्राणिमात्र व वनस्पतीसृष्टीचा अधिकार आहे. त्यांना आपण तो द्यायला हवा. किमान मनातल्या मनात का होईना पण आजपर्यंत केलेल्या अपराधाबद्दल पश्चाताप व्यक्त करायला हवा व यापुढे सर्व प्रणिमात्रांना जगविण्याचा निर्धार आपण करायला हवा. तसेच आपणच सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान आहोत, हा विचार आधी मनातून काढून टाकायला हवा.

मला खात्री आहे की, हा विषाणू नक्कीच आपल्याला ती सद्बुद्धी देईल!

(०४/०४/२०२०)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

3 thoughts to “कोरोना व मानवजातीचे अपराध”

  1. अगदी वास्तव चित्रण केलेले आहे सर.👌

  2. खूप विचारपूर्वक लेखन केले आहे सर आपण आणि खरंच संपूर्ण मानव जातीने यातून खूप मोठा धडा घ्यायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *