ग्रामीण साहित्याचे स्वरूप
माझ्या ब्लॉगवरील या आधीच्या ‘ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा’ या लेखामध्ये ग्रामीण साहित्याच्या विविध प्रेरणांचे विवेचन केलेले आहे, त्या प्रेरणांमधून ग्रामीण साहित्य निर्माण झालेले आहे. ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाचा विचार करता, कालखंडानुसार ग्रामीण साहित्याच्या स्वरूपात फरक दिसून येतो.
१९२० च्या आधीच्या ग्रामीण साहित्यावर आपल्याला महात्मा फुले व त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ हे नाटक, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे वैचारिक ग्रंथ व ‘अखंडा’मधून (कविता) ग्रामीण भागातील शेतकरी व इतर शूद्र वर्गाच्या शोषणाची मीमांसा केली. खेड्यापाड्यातील काबाडकष्ट करणाऱ्या
शेतकरी-कामकरी वर्गाचे धर्माच्या आधारे कसे शोषण केले जाते ज्ञानापासून त्यांना वंचित ठेवल्यामुळे ते कसे मागासलेले राहिले, हे त्यांनी आपल्या एकूणच साहित्यातून मांडले. या शेतकरी-कामकरी वर्गाचे राज्य यावे, त्यांची पिळवणुकीतून मुक्तता व्हावी, त्यांच्या शेतीला पाणी मिळावे, त्यांच्या शिक्षणाची तरतूद सरकारने करून त्यांच्या विकासाला संधी द्यावी, या प्रकारचे विचार त्यांनी त्यांच्या ग्रंथातून व्यक्त केले. फक्त विचार व्यक्त करून ते थांबले नाहीत, तर त्याला पूरक कार्य केले. शाळा स्थापन केल्या. ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना करून कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली.
त्यांचे विचार व कार्य यातून प्रेरणा घेऊन कृष्णराव भालेकर, रा. वि. टिकेकर, ‘जागृती’कार पाळेकर, जवळकर, मुकुंदराव पाटील असे अनेक लेखक लिहिते झाले. त्यांनी कादंबऱ्या, कविता, पोवाडे, निबंध, वैचारिक वाड्मय इत्यादी प्रकारांमध्ये विपूल लेखन केले. भटशाही व सावकारशाही यांच्या जाचातून शेतकरी, कामकरी, स्त्रिया यांची सुटका करणे, त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी या लेखकांनी साहित्यलेखन केले. हे १९२० च्या आधीच्या कालखंडातील ग्रामीण साहित्याचे स्वरूप होते.
१९२० ते १९४५ पर्यंत ‘जानपद कविता’, वि. स. सुखठणकर व लक्ष्मणराव सरदेसाई यासारखे कथाकार, रविकिरण मंडळातील कवींच्या कविता, ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, म. भा. भोसले इत्यादी कादंबरीकार यांच्या साहित्याचे स्वरूप जर व्यवस्थित अभ्यासले तर स्वप्नरंजन, वास्तवापासून दूर जाणारे काल्पनिक चित्रण आपल्याला आढळते. र. वा. दिघेंसारख्या काही लेखकांच्या साहित्यात वास्तव जाणवत असले तरी ते वास्तव नसून वास्तवाचा आभास त्यात दिसून येतो. या कालखंडातील साहित्यात आपल्याला ग्रामीण जीवनातील खरेखुरे प्रश्न, समस्या, ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता, शेतीव्यवस्था, शेतीला पूरक व्यावसायिक यांच्यापुढील आव्हाने यांचे वास्तव चित्रण आढळत नाही. त्यांनी ग्रामीण आशयाचे साहित्य हे शहरी वाचकांची रुचीपालट व्हावी यासाठी लिहिले. त्यामुळे त्यात रंजनपरता, योगायोग, घटनाप्रधानता इत्यादी प्रमुख वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
१९४५ नंतरच्या ग्रामीण साहित्याचा विचार केला असता हे साहित्य त्याच्या आधीच्या ग्रामीण साहित्यापेक्षा बऱ्याच अंशी वास्तवाकडे वाटचाल करताना दिसून येते. त्याला नवसाहित्याची सुरूवात हे देखील एक कारण ठरले आहे. नवसाहित्यातील एक महत्त्वाचे कथाकार व्यंकटेश माडगूळकर हे स्वतः ग्रामीण जीवनानुभव मांडणारे लेखक होते. प्रयोगशीलता हे नवसाहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्यच. तेव्हा माडगूळकर, रणजित देसाई, द. मा. मिरासदार, शंकर पाटील इत्यादी लेखकांनी ग्रामीण भागातील लोकांच्या मनाचे चित्रण कधी गंभीर तर कधी विनोदी पद्धतीने केलेले दिसून येते. प्रयोगशीलता व मनोविश्लेषण इत्यादी वैशिष्ट्ये या कालखंडातील ग्रामीण साहित्याची असलेली दिसून येतात. आधीच्या ग्रामीण जीवनावरील वास्तवाभास निर्माण करणाऱ्या स्वप्नरंजनपर साहित्यापेक्षा १९४५ ते १९६० पर्यंतचे ग्रामीण साहित्य हे वास्तवाच्या काही प्रमाणात जवळ गेल्याचे दिसून येते.
१९६० नंतरचे ग्रामीण साहित्य हे अधिक वास्तववादी आहे. या काळात अण्णाभाऊ साठे (फकीरा), उद्धव शेळके (धग), हमीद दलवाई (इंधन), शंकर पाटील (टारफुला), ना. धो. महानोर (गांधारी), रा. रं. बोराडे (पाचोळा), आनंद यादव (गोतावळा) अशी लेखकांची एक समर्थ पिढी निर्माण झाली. त्यांनी खेडे प्रत्यक्षात अनुभवलेले होते. त्यांचे बालपण खेड्यात गेलेले होते. त्यामुळे त्यांच्या साहित्यातून शेतकरी, बारा बलुतेदार, विविध जाती यांचे परस्परसंबंध, त्यांचे दारिद्र्य, कष्टमय जीवन, यंत्रयुग, लोकशाही यामुळे बदलत चाललेले ग्रामजीवन याचे वास्तव चित्रण अतिशय सकसपणे आलेले आहे.
१९७५ नंतर ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. या चळवळीने ग्रामीण साहित्याला/ लेखकांना एक दिशा दिली. १९६० ते १९७५ पर्यंतच्या साहित्यात वास्तवाचे चित्रण आलेले आहे, तर १९७५ नंतरच्या साहित्यात ‘या वास्तवाच्या मागचे वास्तव’ शोधण्याचा प्रयत्न या कालखंडातील लेखकांनी केलेला दिसून येतो. म्हणजे दारिद्र्याचे चित्रण आधीच्या साहित्यात येत असेल तर या दारिद्र्याचे, मागासलेपणाचे कारण या कालखंडातील लेखक आपल्या साहित्यात मांडताना दिसतात.
१९२० नंतर साधारणतः १९७५ पर्यंत महात्मा फुले यांच्या विचारांपासून ग्रामीण साहित्य दूर गेले. परंतु १९७५ च्या आसपास ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन आलेल्या पहिल्या पिढीतील डॉ. आनंद यादव, रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे यासारख्या लेखक व अभ्यासकांनी पुन्हा महात्मा फुले यांचे विचार व तत्त्वज्ञान याकडे अभ्यासकांचे, नवोदित लेखकांचे लक्ष वेधले. यानंतर भास्कर चंदनशिव, विश्वास पाटील, वासुदेव मुलाटे, सदानंद देशमुख, प्रतिमा इंगोले, राजन गवस, बाबा भांड, शंकर खंडू पाटील, उत्तम बंडू तुपे, मधुकर वाकोडे, नागनाथ कोतापल्ले यासारख्या लेखकांनी ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध आपल्या साहित्यातून घेण्याचा प्रयत्न केला. तर १९९० नंतरच्या साहित्यामध्ये आपल्याला वास्तव, वास्तवच्या कारणांचा शोध यासोबत विद्रोह दिसून येतो.
आधी ज्या प्रेरणाबद्दल प्रस्तुत लेखकाने विस्तृत विवेचन केले आहे. त्यात ग्रामीणतेचा शोध घेणे, कृषिनिष्ठ संस्कृतीचे दर्शन घडविणे, ग्रामीण माणसाच्या दुःखाचा, दारिद्र्याचा, त्यांच्या परिणामांचा अविष्कार करणे, ग्रामीण माणूस आणि निसर्ग यांच्या परस्पर संबंधाचा शोध घेणे, ग्रामीण भागातील बदलांचा वेध घेणे, लोकशाही, निवडणुका यांचा ग्रामीण भागावर झालेल्या परिणामांचा शोध घेणे, ग्रामीण भागातील विविध प्रश्न, समस्या यामुळे धगधगत असलेल्या ग्रामीण समाजाच्या मानसिकतेचे चित्रण करणे इत्यादी प्रेरणांमधून ग्रामीण साहित्य लिहिले गेलेले आहे. तेव्हा हे ग्रामीण साहित्याचे स्वरूप आहे.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113