चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे
कधीकाळी भाकरीत चंद्र दिसायचा
चंद्रात भाकरी शोधायचो
ती मिळावी म्हणून
ऊन-वारा-पावसाशी झुंजायचो
नाही मिळाली तर
हळूच टीपं गाळायचो
चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे
कधी चंद्रात तिला पहिले
कधी तिच्यात चांद पहिला
तो मिळावा म्हणून
तीळतीळ तुटलो
सुनसान रस्त्यांवरून
रात्रीचा हिंडलो
चंद्राने अनेकदा
हुलकावणी दिली
मग मी आकाशातील
चंद्राशीच बातचीत केली
चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे
कधी तिच्यासोबत चंद्र पहिला
कधी तिच्याशिवाय पहिला
तिच्यासोबत चंद्रप्रकाशात
उजळून निघालो
ती नसता अंधाराला
बिलगून रडलो
चंद्र असा नेहमीच
माझ्या सोबतीला राहिला
कधी भाकरीत…
कधी तिच्यात…
कधी आकाशात…
कधी मनात…
कधी डोळ्यांत राहिला
चंद्र असा नेहमीच
माझ्या सोबतीला राहिला
म्हणून म्हणतो
चंद्राचे आणि माझे नाते
खूप जुने आहे…
चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे…
(दि. १०/०२/२०२० जव्हार ते नाशिक सहलीच्या वेळेत प्रवासात सकाळी ५.३० ते ६.१६ दरम्यान)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113
खूपच भावस्पर्शी कविता