चित्रपट कार्यशाळा

         दि. १२ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या दरम्यान मुर्टी,  ता. बारामती येथे चित्रपट निर्मिती कार्यशाळेत (निवासी) सहभागी झालो होतो. अक्षर मानव या संघटनेनेnही कार्यशाळा आयोजित केली होती. ७ दिवसांच्या कार्यशाळेसाठी सहभागी व्यक्तींकडून १०,०००/- रु. शुल्क घेण्यात आले होते. तर अक्षर मानव संघटनेच्या आजीव सदस्यांना ३०००/- सूट देण्यात आली होती. 

          चित्रपट या माध्यमाविषयी समज निर्माण व्हावी, पटकथा, चित्रिकरण, संपादन, दिग्दर्शन, गीतरचना इ. इ. गोष्टींची, विविध तंत्रांची माहिती व्हावी व माझ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काही संधी मिळू शकते का? याचा शोध घ्यावा, या उद्देशाने मी या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. या कार्यशाळेत

                     १) मेघराज राजेभोसले-मराठी चित्रपट महामंडळ

                     २) संजय दावरा-कार्यकारी निर्माता

                     ३) प्रसाद मिरासदार-चित्रपट रसग्रहण

                     ४) हृषिकेश जोशी-अभिनय, दिग्दर्शन

                     ५) अमर देवकर – चित्रपट निर्माण 

                     ६) सिद्धार्थ तातोस्कर – कलादिग्दर्शन

                     ७) नरेंद्र भिडे – संगीत ,पार्श्वसंगीत

                     ८) मिलिंद जोग – छायाचित्रण

                     ९) सुचित्रा साठे – संकलन

                     १०) राज काझी – कथा,पटकथा,संवाद

यांचे मार्गदर्शक लाभले. वरील सर्व मार्गदर्शक हे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज व अनुभवी असल्याने त्यांनी चित्रपट या माध्यमाविषयीचे अतिशय सखोल मार्गदर्शन आम्हाला केले. अगदी बारीक बारीक गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या. चित्रपटाची संकल्पना, पटकथेपासून तर प्रदर्शनापर्यंतच्या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती करून दिली.


          या सात दिवसांमध्ये राजन खान यांचा खूप सहवास लाभला. दिवसा मार्गदर्शकांची व्याख्याने आणि रात्री जेवणानंतर मध्यरात्रीपर्यंत किंवा कधीकधी अगदी पहाटेपर्यंत राजन खान सरांसोबत विविध विषयांवर मनसोक्त गप्पा झाल्या. थंडीचे दिवस असल्याने शेकोटीच्या बाजूला बसून मारलेल्या या गप्पा आयुष्यभर लक्षात राहतील. या गप्पा, चर्चांमधूनच जगण्याची, जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी व नवीन दृष्टी प्राप्त झाली.


        या कार्यशाळेमध्ये १६ वर्षांपासून  ते ६५-७० वर्षांपर्यंतची लोकं सहभागी झालेले होते. त्यापैकी काही विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, शिक्षक, अभियंते अशा विविध क्षेत्रांमधील लोकं होते. काहींना चित्रपट, मालिका,  शॉर्ट फिल्म इत्यादींचा अनुभव होता. तर काहींना  याबद्दल काहीच माहीत नव्हते, असे खूप नवीन मित्र या कार्यशाळेमध्ये भेटले. सर्वांकडून खूप शिकायला मिळाले.


        कार्यशाळेच्या दरम्यान आम्ही ‘आगंतुक’ या नावाची एक शॉर्ट फिल्म तयार केली. या शॉर्ट फिल्मवर काम करत असताना प्रत्यक्ष चित्रीकरण, एडिटिंग, संवाद, पटकथा, अभिनय व इतर गोष्टींचे प्रात्यक्षिक आमच्याकडून झाले. या फिल्ममध्ये मलाही अभिनयाची संधी मिळाली. अतिशय चांगला अनुभव होता. ‘आगंतुक’ची लिंक https://youtu.be/4Tvw2b1LV3o


          या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मित्रांचा एक व्हाट्सअप ग्रुप आम्ही तयार केला. आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. बरेच जण चित्रपट या माध्यमाचा अधिक अभ्यास करू लागले. चित्रपटावर परीक्षणे लिहू लागले. आता या ग्रुपमधील काही जण एकत्र येऊन त्यांनी चित्रपट निर्माण संस्था स्थापन केलेली असून ते प्रत्यक्ष चित्रपट निर्मितीमध्ये उतरत आहेत. मला प्रत्येक वेळेस जाणे शक्य नसल्याने मी त्यांच्या संपर्कात आहे. परंतु चित्रपटांविषयी समज वाढल्याने, चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया काही प्रमाणात का असेना कळल्याने चित्रपट पाहताना एक वेगळाच आनंद मी घेऊ शकत आहे, हे माझ्या बाबतीत या कार्यशाळेचे फलित म्हणता येईल, पुढचे पुढे पाहता येईल.

One thought to “चित्रपट कार्यशाळा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *