‘चुंभळ’ कथेचा परिचय

चुंभळ

(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)

‘चुंभळ’ ही कथा भिकी नावाच्या एका मांग जातीच्या विधवा स्त्रीची आपल्या मुलांची काळजी व त्यांच्याकडूनची अपेक्षा व शेवटी तिचा होणारा अपेक्षाभंग यावर आधारलेली आहे.

भिकी ही मांगवाड्यात राहणारी एक विधवा स्त्री आहे. तिला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव वच्छी व मुलाचे नाव कोसा असे आहे. वच्छी ही लग्नाच्या वयाची असून कोसा हा साधारणतः १५-१६ वर्षांचा असावा. तिच्या नवर्‍याचे नाव बिसन असे होते. तो लग्नसराईत वाजंत्री वाजवायला जायचा. त्याला सैनी हे वाद्य खूप सुंदर वाजता यायचे, हे भिकीच्या बिसनविषयीच्या आठवणींमधून आपल्या लक्षात येते. याव्यतिरिक्त तो म्हशी भादरायचे काम करायचा. हेच काम करताना पाटलाच्या म्हशीने पोटात शिंग खूपसल्यामुळे त्याचा मृत्यू घडून आलेला होता. एकदा तो पाटलाच्या म्हशी भादरायला गेलेला होता. म्हशी भादरत असताना एका म्हशीच्या मानेजवळ वस्तरा लागून ती जखमी होते. जखमेतून रक्त येऊ लागते. त्यामुळे म्हैस बिथरते व दावं तोडून शिंग उगारून बिसनवर धावून जाते. म्हशीला बिथरलेलं बघून पाटलाची माणसं पळून जातात. बिसनही पळून जाण्याच्या बेतात असतो. पण तो भिंतीवर आढळतो. म्हैस त्याला शिंगावर उचलून पुन्हा एकदा भिंतीवर फेकते. म्हशीचे एक शिंग त्याच्या पोटात घुसते आणि तिने त्याच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या छातीच्या बरगड्या मोडतात. त्याच्या पोटातला कोथळा बाहेर निघतो. त्यातच तो मरण पावतो.

बिसनच्या प्रेताचा पंचनामा करण्यासाठी शहरातून पोलीस येतात. भिकीने पाटलाच्या विरुद्ध जबानी देऊ नये म्हणून पाटील तिच्याकडे शंभर रुपये पाठवून देतात. ‘रोजगारी’ या कथेतही गुजीचा नवरा पाटलाच्या शेतात कडबा भरताना टाकं लागून मरतो. पण तीही कुणाकडे दाद, नुकसान भरपाई मागत नाही व पाटलाविरुद्ध जबानी देत नाही. भिकी ही आर्थिकदृष्ट्या गरीब स्त्री आहे. त्यातल्या त्यात पारंपारिक समाजव्यवस्थेतील मांग या अस्पृश्य व अतिशूद्र जातीची स्त्री आहे. नवर्‍याच्या मृत्यूने तिला प्रचंड दुःख होते. तिचे आयुष्यच उद्ध्वस्त झालेले असते आणि ते पाटलामुळे झालेले असते. तरी ती पाटलाविरुद्ध साक्ष देऊ शकत नाही. एकतर त्याने तिचा नवरा पुन्हा जिवंत होणार नव्हता व दुसरे म्हणजे पाटलाविरुद्ध साक्ष देऊन त्याच्याशी शत्रुत्त्व घेणे तिला परवडणारे नव्हते. कारण अडीअडचणीला व कामाला तिला पाटलाकडे जावे लागणार होते. तसेच पाटलाशी शत्रुत्त्व घेऊन तिला गावात राहणेही शक्य झाले नसते. त्यात तिच्या पोटी दोन लहान मुले होती. त्यांच्याही आयुष्याचा प्रश्न होता. या अशा कारणांमुळे नवर्‍याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पाटलाविरुद्ध ती साक्ष देत नाही व जास्तीची नुकसान भरपाईही मागत नाही.

तिचा मुलगा कोसा हा बापासोबत राहून म्हशी भादरायचे काम शिकलेला असतो. परंतु आपल्या मुलाने हमाली करावी, संडास साफ करावेत, शेतात किंवा इतरत्र कुठेही काम करावे पण हे काम करू नये, असे भिकीला वाटत असते. त्यासाठी ती कोसावर अनेकदा चिडायची, संतापायची किंवा त्याला विश्वासात घेऊन प्रेमाने, मायेने समजवायची.

तिची आर्थिक स्थिती अतिशय गरिबीची आहे. तिला लोकांच्या शेतांमध्ये कामाला जावे लागते. ते नसेल तर सिंदीच्या झाडाच्या पानांचे फडे तयार करून ते विकून ती घरखर्च चालवते. शिवारातील सर्व पिकं आवरली गेल्यावर उन्हाळ्यात काड्या-कुड्या, शेण्या असे पावसाळ्यासाठीचे इंधन गोळा करायला जाते. कधी ती स्वतः किंवा वच्छीला गावात भाकरी, सणासुदीला पुरणपोळ्या, भज्या-कुरडया इत्यादी खायचे पदार्थ घ्यायला पाठवायची. गावातील लोक उष्ट-शिळं अन्न त्यांना द्यायचे. या सर्व गोष्टीतून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायची. मुलगी व स्वतःसाठी साडी किंवा इतर कपडेही ते गावातून एखाद्याकडून जुनेपाने कपडे मिळवूनच वापरायचे. फाटलेली साडी, लैंगा सुईदोर्‍याने शिवून वापरायचे. त्यांच्यासारखीच मांगवाड्यातील इतरांची अवस्था होती.

तिची मुलगी वच्छी ही वयात आलेली व अतिशय सुंदर मुलगी होती. ती गावात भाकरी मागायला गेली की, मांगपुर्‍यातील तरूण मुलं तिच्या वाटेवर असायचे किंवा ती घरी असली की तिच्या घराच्या आजूबाजूला फिरायचे. विहिरीवर कपडे धुवायला किंवा पाणी घ्यायला गेली तर एखादा तिला थोडे पैसे देऊन तिच्या शरीराला स्पर्श करायचा. तीही ते पैसे ठेवून घ्यायची व त्या पैशातून आठवडी बाजारातून पावडर, रिबिना, टिकल्या, बांगड्या इत्यादी वस्तू विकत आणायची. ती छान अशी वेणी घालायची. शृंगार करायची. ती सुंदर दिसत असल्यामुळे सर्व बायका तिच्या सौंदर्याचे कौतुक करायच्या किंवा टोमणा मारायच्या.

एकदा अशीच मारवाड्याच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी लग्न आटोपल्यावर मांगपुर्‍यातल्या सर्व मुली व बायका संध्याकाळी उरलेलं गोडधोड किंवा इतर अन्न घ्यायला जातात. तेव्हा मारवाड्याचा अवारी तिच्या सौंदर्याने मोहित होतो. तो सर्व बायकांना खायचे पदार्थ देऊन आधी पाठवून देतो आणि वच्छीला लाडू देण्याचे निमित्त करून आतल्या घरात नेतो व तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. त्याबद्दल तिला लाडू देतो. सुरुवातीला ‘नाही-नाही’ म्हणणारी वच्छीही नंतर त्याला विरोध करत नाही. असे घडल्यावरही ती घरी काहीही सांगणार नसते. परंतु तिच्या साडीला रक्ताचा डाग लागलेला असल्याचे तिच्या आईच्या लक्षात येते. ती वच्छीला विचारते. पण ती लपवालपवी करते. तिची आई तिला लाथाबुक्क्यांनी तुडवून काढते. तेव्हा कुठे ती झालेला प्रकार आईला सांगते. भिकीची आर्थिक परिस्थिती गरिबीची असली व ती विधवा असली तरी ती चारित्र्य जपणारी स्त्री असते. तिला या घटनेमुळे खूप संताप येतो. ती वच्छीला “आपली भाड इकून हे लाडू आन्ले काय? गोड खावाले मोठी हपापली होती. अवो रांड, असे गावातले दाल्ले उरावर बसवाले लागली तं कोन तुह्यासंग लगंन करनं?” असे म्हणून शिव्या घालते. त्यानंतर ती लाडवाची पुरचुंडी गटारात फेकून देते. मारवाड्याच्या घरी जाऊन अवार्‍याला शिव्या घालते. पण तिची दखलही कुणी घेत नाही व ती याबद्दल कुणाकडे दादही मागू शकत नाही.

संपूर्ण मांगवाड्यात वच्छीला मारवाड्याच्या अवार्‍याने नासवलं ही बातमी पसरते. त्यानंतर भिकी वच्छी व कोसा यांच्यावर या ना त्या कारणावरून तोंड करत राहते. यानंतर येथे एक वाक्य खूप अर्थपूर्ण आलेले आहे. ते असे की, “मांगपुर्‍यात घरोघरी हा तमाशा असल्यामुळे कुणी फारसं लक्ष देत नव्हतं एवढचं.” या घटनेवरून असे लक्षात येते की, गरिबी व जातिव्यवस्थेमुळे मांगपुर्‍यातील प्रत्येकाच्या बाबतीत अशी घटना केव्हा ना केव्हा घडलेली असते व भारतीय समाजव्यवस्थेतील त्यांच्या कनिष्ठ स्थानामुळे त्यांना कुठेही दाद मागता येत नाही. अशा प्रकरणांची कुणी दखलही घेत नाही. तिचा मांगपुराही तिच्यामागे उभा राहत नाही. हमीद दलवाई यांची ‘इंधन’, हिंदीतील रामदरश मिश्र यांच्या ‘जल टुटता हुआ’, ‘पानी के प्राचीर’, शिवप्रसाद सिंह यांच्या ‘अलग अलग वैतरणी’ अशा कादंबर्‍यांमधून तसेच अलीकडे आलेल्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटांमध्येही हेच वास्तव अधिक समर्थपणे चित्रित झालेले आहे.

पुढे ही वच्छी यशवंता नावाच्या मांगाच्या मुलासोबत नागपूरला पळून जाते. हा यशवंता एका मुलीला फूस लावून पळविण्याच्या आरोपाखाली दोन वर्षाची शिक्षा भोगून गावात परत आलेला होता. तो रंगीबेरंगी कपडे, कोंबडा पाडून काढलेला भांग, पायात चकचकीत जोडा, गळ्यात रुमाल, हाताला घड्याळ आणि तोंडात पानाचा विडा व सिगारेट अशा रुबाबात राहायचा. गावात आल्याबरोबर त्याला वच्छीबद्दल कळते. तेव्हापासून तो तिच्या मागे लागतो. तिच्या भावाशी मैत्री करतो. त्याची सर्व हौसमजा पूर्ण करतो. त्याच्यामार्फत भिकीकडे वच्छीचा हात मागतो. पण ती नकार देते. तेव्हा तो सरळ वच्छीला भेटून तिला “माही विच्छा तुह्यासंग लगंन करायची हाये. तू मले एकदम पसंत हाये. आपला जोड म्हन्जे राजाराणीचा जोड दिसंन. माह्या येकट्याची कमाई. आपला दोघांचा खर्च. आपून ॲटो चालोतो नाकपुरात. तुले ॲटोत बसून घुमवंन, म्हाराज बाग, सेमिनेरी हिल, अंबाझरी”, अशी स्वप्ने तो तिला दाखवतो. तीही त्याने दाखवलेल्या स्वप्नांना भुलते व दोघे एके दिवशी गावातून पळून जातात. पळून गेल्यावर ते लग्न करतात की आणखी काही, याचा उल्लेख कथेत आलेला नाही.

मुलीच्या या कृत्याचा भिकीला मोठा धक्का बसतो. ती वच्छी, यशवंता, कोसा, मांगपुरा अशा सगळ्यांना शिव्या देते आणि अखेर थकल्यागत गप्प राहते. त्यानंतर ती एकटी-एकटी राहू लागते. मुलाकडून तिला थोड्याफार अपेक्षा असतात. तिची एकच इच्छा असते की, मुलाने म्हशी भादरायचे काम सोडून बाकी कोणतेही काम करावे. कारण आपल्या नवर्‍यासारखाच आपल्या मुलाचा मृत्यू हे काम करताना होऊ शकतो, अशी भीती तिच्या मनामध्ये होती. नवर्‍याचे रक्तबंबाळ प्रेत तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते. मुलाच्या बाबतीत असे घडू नये, असे तिला वाटायचे. पण एके दिवशी तिचा मुलगा कोसा तिला पाटलाची म्हैस भादरताना दिसतो. ती त्याला त्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकत नाही. आपल्या मुलानेही आपला विश्वासघात केला, ही भावना तिच्या मनात घर करून जाते. या गोष्टीने आतडी चिरडल्यागत तिची अवस्था होते.

या कथेचे शीर्षक ‘चुंभळ’ असे आहे. डोक्यावर वजन उचलताना आपण आधी कापडाची गोल घडी करून डोक्यावर ठेवतो. त्याला ‘चुंभळ’ असे म्हणतात. चुंभळीमुळे वजन पेलणे थोडे का असेना सुसह्य होते. डोक्याला ते रूतत नाही. नवरा मेल्यावर भिकीलाही आयुष्याचे हे ओझे पेलणे तसे अवघड असते. त्यासाठी तिला मुलांचा चुंभळीसारखा आधार असतो. परंतु दोन्ही मुलं तिच्या मनासारखे वागत नाहीत. त्यामुळे आयुष्याचे न पेलवणारे ओझे तिला एकट्यालाच पेलावे लागते.

ही कथा भिकीच्या भावविश्वाभोवती साकारलेली आहे. मुलांविषयी तीय प्रचंड तळमळ असते. त्यांच्यासाठी तिचा जीव तिळतिळ तुटत राहतो. त्यांनी चांगले राहावे, स्वत:ची अब्रू सांभाळून जीव धोक्यात न घालता जगावे. आपल्या संसाराचे ओझे हलके करावे, अशी तिची त्यांच्याकडून माफक अपेक्षा असते. गरिबीतून वाटचाल करताना चारित्र्याला जपत ती आपला उदरनिर्वाह भागवते. तिची मुलं मात्र तिच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे ती आयुष्यात एकटी पडते.

या कथेत लेखकाने निवेदनासाठी प्रमाण मराठीचा तर संवादासाठी बोलीभाषेचा वापर केलेला आहे. तृतीयपुरुषी निवेदनतंत्रातून ही कथा लिहिली गेलेली आहे.

संदर्भग्रंथ-
दाही दिशा (कथासंग्रह), रवींद्र शोभणे, विजय प्रकाशन, नागपूर, दुसरी आवृत्ती २००७.

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

(आपल्याला जर माझे लेखन वाचायला आवडत असेल, तर ब्लॉग उघडल्यावर जो चौकोन येतो त्यात तुमचे नाव व मेल आयडी लिहून माझ्या ब्लॉगला subscribe करा. जेणेकरून माझे नंतरचे लेखन तुम्हाला वाचायला मिळेल. धन्यवाद! )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *