झूल
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
‘झूल’ ही कथा भाऊराव मास्तरसारखी काही स्वार्थी व बेरकी लोकं ग्रामीण भागातील अडाणी, धार्मिक, देवभोळ्या लोकांच्या मानसिकतेचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेतात, यावर आधारलेली आहे.
या कथेत गौतमबुवा म्हणून एक व्यक्तिरेखा आहे. गौतमबुवाला लग्नाच्या आधीपासून देवधर्माचे वेड होते. तो फक्त जेवायला घरी यायचा. दिवस उगवला की गावाच्या बाजूला असलेल्या नागझिरीच्या टेकडीवर जाऊन मारुतीच्या देवळासमोर जाऊन दिवसभर बसून राहायचा. लग्नाआधी तो आठ-आठ दिवस घरी यायचा नाही. शेवटी त्याला संसारात/ ऐहिक जीवनात रमविण्यासाठी त्याचे आई-वडील त्याचे लग्न लावून देतात. पण तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही. लग्नाला तीन वर्षे होतात तरीही तो बायकोला कोणतेही सुख देत नाही. दिवसभर मंदिरासमोर बसून राहतो. रात्री घरी आल्यावर जेवून शांतपणे झोपून जातो. ती कधी त्याच्या जवळ आली व त्याला झोपेतून जागे केले तर थंडपणे स्वतः ला तिच्यापासून सोडवून घेतो. पुढे तो दाढी-मिशा वाढवतो. भगवे कपडे घालू लागतो. पायात वाहना न वापरता अनवाणी पायांनी हिंडू लागतो. लोक त्याला गौतमबुवा म्हणू लागतात. तो देखील निस्वार्थीपणाने लोकांचे पडेल ते काम करू लागतो. दरवर्षी पायी पंढरपूरला जात राहतो. त्याला संसारात रस नसतोच. कुठल्याही बंधनात त्याला अडकायचे नसते.
त्याच्या या संराराविषयीच्या उदासीन स्वभावाचा, अवलियापणाचा फायदा त्याच्याच खरसोली या गावातील भाऊराव मास्तर घेतो. तो त्याला साधू बनवतो. तो गावात अशी आवई उठवतो की गौतमबुवाला चमत्कार झाला. तो देवरूपी आहे. गावातील लोकं त्याच्या अफवेवर विश्वास ठेवतात. मास्तर त्याला राहण्यासाठी स्वतःच्या शेतामध्ये झोपडी बांधतो. सर्व गावातील लोकं त्याचे दर्शन घ्यायला तिथेच येऊ लागतात. लोकं आपल्या विविध समस्या घेऊन त्याच्याकडे येतात. त्याने कौल दिल्यावर अनेकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. गौतमबुवाचे नाव अशा प्रकारे कानोकानी सार्या पंचक्रोशीत पोहोचते. आता बाहेर गावाहून, तालुक्याहून सुद्धा लोकं त्याच्या दर्शनाला व स्वतःच्या मनोकामना पूर्ण करायला येऊ लागतात. योगायोगाने अनेकांच्या इच्छा पूर्णही होतात. लोकं मोठ्या भक्तिभावाने येत राहतात.
इकडे गौतमबुवाच्या पत्नीचे मात्र आयुष्य उद्ध्वस्त होते. तिचे लग्न होऊनही तिला नवर्याचा सहवास, त्याचा संसारातला सहभाग, आधार, सुख काही मिळत नाही. ती त्याच्यासाठी तळमळत राहते. पण तो तिचा तिरस्कार करतो. सासू-सासर्यांसह ती नवर्याला भेटायला जाते. इतरांसारखी ती त्याच्या पाया पडायला जाते. तर तो तिला “कैदासीन, रांड पायाले हात नोको लावू. चालली जा इथून बाहेर”, असे म्हणतो. तिला तो त्याच्या अध्यात्ममार्गातील अडथळा समजतो. असेही भारतीय धर्म व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अध्यात्मातील धोंड, अडथळाच मानले गेलेले आहे.
त्याच रात्री तिच्याकडून राहवले जात नाही. म्हणून मध्यरात्रीनंतर ती नवर्याला भेटायला व शक्य झाले तर त्याला घ्यायला मध्यरात्रीनंतर एकटी चालत त्या झोपडीमध्ये येते. भाऊराव मास्तरासह दोघं-तिघ त्या झोपडीमध्येच झोपलेले असतात. भाऊराव मास्तरला तिची चाहूल लागून जाग येते. तो तिला रोखण्याचा प्रयत्न करतो. पण ती गौतमबुवाच्या दिशेने जात राहते. गौतमबुवालाही जाग येते. तिला बघून त्याचे मस्तक रागाने तडकते. ते उठून सुबीजवळ येतात. तिचे केस ओढत तिला जमिनीवर पालथं पाडतात व लाथांनी तुडवत राहतात आणि शेवटी तिथून निघून जायला सांगतात. सुबीची त्याच्याकडूनची आशा मावळते. ती चरफडत पदराने कपाळावरचा कुंकू पुसून टाकते. गळ्यातील काळ्या मण्यांची पोत त्याच्या अंगावर फेकून देते व हाताची बोटे मोडत त्याला शिव्याशाप देते. त्यानंतर रात्रभर ती नागझिरीच्या टेकडीवरील मारुतीच्या देवळासमोरील कट्ट्यावर बसून राहते. बायकांची सावली मारुतीवर पडू द्यायची नसते हे माहित असूनही ती मुद्दामहून तिची सावली मारुतीवर पडेल अशी बसून राहते. ‘देवाच्या नावाने काय मिळालं आपल्याला’, असा प्रश्न तिला पडतो. उलट देवाच्या नावामुळेच आपला संसार उद्ध्वस्त झाला, असा विचार करते.
या घटनेनंतर तिच्या नवर्याकडूनच्या सर्व आशा मावळतात. तिचा नवर्यावर व भाऊराव मास्तर या दोघांवर राग असतो. त्यांच्यावर तिला सूड उगवायचा असतो. त्यासाठी ती भाऊराव मास्तरच्या सतरा वर्षाच्या मुलाला स्वतः च्या जाळ्यात अडकवते व त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू पाहते. परंतु सुरूवातीला तो घाबरून जातो व तिच्या तावडीतून सुटतो. मधल्या काळात सुबीचा सासरा वारतो. पण त्याला माती व केस द्यायलाही गौतमबुवा येत नाही. म्हातारी नवर्याच्या मृत्यूनंतर अंथरुणाला खिळते. सुबीला तसा कुणाचाही आधार राहत नाही. एके दिवशी भाऊराव मास्तरांचा मुलगा वसंता तिला नदीवर पुन्हा भेटतो. पण यावेळेस सुबीऐवजी तोच पुढाकार घेतो व तिला तिच्या घरी भेटायला येणार, असे सांगून निघून जातो. सुबी घरी पोहोचायच्या आधी तो तिच्या घरात पोहोचून तिची वाट बघत राहतो. ती घरात येताच दरवाजा लावून घेतो व तिची इच्छा नसताना तिचा उपभोग घेतो. ती जिवाच्या आकांताने टाहो फोडण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या तोंडातून आवाजच बाहेर पडत नाही. त्यानंतर वसंता तिच्या घरी दररोज येत राहतो. तिची इच्छा नसतानाही तिच्याशी संग करतो. ती कुणालाही सांगू शकत नाही. एवढ्या मोठ्या देवरूपी माणसाची बायको असून चारित्र्यहीन निघाली असे म्हणून बदनामी तिचीच झाली असती, म्हणून ती गप्प राहून सहन करते.
इकडे गौतम बुवाच्या बाजूला रात्रंदिवस भक्तमंडळी, भाऊराव मास्तर व त्याच्या गड्यांची गर्दी राहू लागते. या गर्दीत त्याला स्वतःचा, स्वतःच्या घराचा, बायको व आई-वडिलांचा विचार करायलाही वेळ उरत नाही. मुळात त्याला पैसाअडका किंवा संसारातील कोणत्याही सुखाची, त्यातल्या त्यात प्रसिद्धीची हौस नव्हती. परंतु भाऊराव पाटलांच्या जाळ्यात तो अडकलेला असतो. भाऊराव पाटील त्याचा भाविक लोकांना फसविण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी वापर करून घेत आहे, हे त्याच्या लक्षात येऊ लागते.
मध्यंतरी नरखेडच्या एका संत्रीच्या व्यापार्याला गौतमबुवाच्या आशीर्वादाचा फायदा होऊन त्याचा तोट्यात जाणारा व्यवसाय अचानक तेजीत येतो. म्हणून तो भाऊराव मास्तराच्या शेतात मठ (आश्रम) बांधण्यासाठी पाच हजार रुपये देतो. भाऊराव दोन हजारात मठाचा आराखडा तयार करून काम सुरु करतो व तीन हजार रुपये स्वत:च्या खिशात घालतो. झोपडी व नंतर आश्रमाच्या बाहेर जी दानपेटी ठेवलेली असते, त्यातून सुद्धा त्याला भरपूर पैसे मिळू लागतात.
इकडे ही सर्व गर्दी, दिवस-रात्र अगरबत्ती, धुपाचा वास यामुळे गौतमबुवा वैतागत जातो. त्याच्या अवलिया व स्वतंत्र स्वभावावर मर्यादा येऊ लागतात. दिवसभर त्याला एकाच ठिकाणी बसून रहावे लागते. त्याची आत्मशांती भंगते. आपण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना माती द्यायलाही जाऊ शकलो नाही. आपल्या वडिलांसाठी चुलत भावाने केस दिले, या घटनेने त्याला स्वतःची लाज वाटू लागते. हे सर्व फेकून देऊन येथून निघून जावे व रानोमाळ भटकत राहावे, असे त्याला वाटत राहते. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर सुबी व त्याचा चुलत भाऊ त्याला भेटायला येतात, तेव्हा तो भावनिक होतो. हे भाऊराव मास्तरांच्या लक्षात येते. तेव्हाच त्याने काही बोलू नये, म्हणून भाऊराव मास्तर “गौतमबुवाच्या आता मौनीबुवा झालं हाये”, अशी आवई उठवतो व त्याला बोलका असूनही मुका करून टाकतो.
एके दिवशी गौतमबुवा या सर्व गोष्टींपासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. रात्रीच्या वेळेस सर्वत्र सामसूम असताना गळ्यातले हार तोडून, कपाळावरील बुक्का पुसून तो झोपडीबाहेर येतो. तिथे आजूबाजूला कुणीही नाही, असे बघून तो अंगावरील भगवी कफनी काढून तिच्या चिंध्या-चिंध्या करून टाकतो व दबकत दबकत आपल्या घराकडे जाऊ लागतो. मात्र भाऊराव मास्तरला एखाद्या दिवशी गौतमबुवा असा पळून जाऊ शकतो हे कदाचित माहित असते. म्हणून तो सावध असतो. त्याच्या दोन-तीन माणसासोबत तो त्याला पकडतो व “भोसडीच्या, पळून जावाले साधू बनला काय? साधू बनून सगळ्या लोकाहिले फसोलं तुनं. आता कुठिसा चालला पळून? लेका तू जिथिसा जासीन तिथून लोकं तुले पकडून आनतीन. झक माराले साधू झाला काय बे? लोकं तुला जिंदा नाही ठिवनार. असा पाय लावत पळाला तं….तसं मराचा असाच मरनं भोसडीच्या. लोक तुह्य नाव तरी घेतीन. पुंजा करतीन तुही”, असे म्हणून आपल्या साथीदारांना सांगून त्याला उचलून आणून त्याच्या आसनावर बसवतो. गळ्यात जुने हार घालतो व कपाळ बुक्क्याने काळे करतो आणि दुसर्या दिवशी तो जाहीर करतो की, “मौनीबुवा गौतम महाराज जिवंत समाधी घेनार हाये”. ही बातमी सर्व गावात व पंचक्रोशीत दवंडी पिटून पसरविण्यात येते. जिल्ह्याच्या वर्तमानपत्रांमधून फोटोसह बातमी छापून येते.
नव्या आश्रमासमोर पुरुषभर खड्डा खोदून दोन पोते मीठ मागविण्यात येते. सात दिवसाच्या सप्ताहानंतर आठव्या दिवशी दहीलाहीचा कार्यक्रम होतो. दहीलाही आटोपली की गौतमबुवाची गावातून पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार होती आणि मग ती मिरवणूक परत आल्यावर गौतमबुवाला खड्ड्यात बसवणार होते. आजूबाजूला पाट्यांचे घर तयार करून त्याच्याभोवती दोन पोते मीठ टाकणार होते आणि पाट्याच्या घरावर झाकण ठेवून वरुन माती टाकण्यात येणार होती. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यावर गौतमबुवाची विटा-चुन्याची समाधी उभारणार होते. अशा तयारीला भाऊराव व त्याचे साथीदार लागलेले होते. एकदाचे गौतमबुवांना संपवले की मग त्यांचा हा धर्माचा धंदा गौतमबुवाच्या नावाने बिनबोभाटपणे चालणार होता.
ही बातमी ऐकून गौतमबुवाची बायको तिथे येते. त्या ठिकाणी भक्तांची आधीच प्रचंड गर्दी जमलेली असते. नवर्याविषयीच्या या बातमीने तिचे काळीज तळमळून आलेले असते. ती त्याला विचारते की, “तुमाले हे लोकं जितं गाडनार हाये जमिनीत. तुमी समाधी घिऊन र्हायले का थेच तुमाले जबरदस्तीनं समाधी दिऊन र्हायले मले सांगा. तुमाले माह्या गळ्याची आन हाये…आता मी पोलिसईच्या हवाली करतो समद्याईले. फक्त तुम्ही खरं खरं सांगा”, असे ती कळवळत, तळमळत बोलते. त्याच्या पायावर पडून आकांत करीत त्याला विनवते.
गौतम बुवांना काय करावे काहीच सुचत नाही. भाऊराव मास्तर पण त्याला सांगतो की, “मौनीबुवा, बोल बोल बोल”. गौतमबुवा मास्तरकडे बघतो. मास्तर गालातल्या गालात छद्मीपणे हसत असतो. या गोष्टीची गौतम बुवाला चीड येते. मास्तरविषयी त्याच्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण होतो आणि आपल्या सर्व शक्तीनिशी उभा राहून तो गळ्यातील माळा तोडून टाकतो. कपाळावरील बुक्का, गुलाल पुसून टाकतो आणि हारांना लाथांनी तुडवू लागतो. सर्व लोक अवाक होऊन हा प्रकार बघतात. गौतमबुवा त्वेषाने ओरडून लोकांना सांगतो की, “ह्या भोसडीच्याईनं मले जिवंत समाधी देवाचं ठरोलं होतं. ह्या भाऊराव मास्तर मले जिता गाडाले निघाला होता. मले साधू बनवून ह्या साल्यानं गल्ला कमोला माह्या फायदा घिवून. ह्या मास्तरड्यानं लोकाईले बनोलं”. हे ऐकून भाऊराव लोकांची दिशाभूल करून ही चिडलेली गर्दी गौतमबुवावर सोडण्याचा प्रयत्न करतो. पण लोकांच्या सत्य लक्षात येते. लोकांचा जमाव मास्तरला घेरतो. त्याला प्रचंड लाथाबुक्क्यांनी मारहाण करतो. शेवटी या मारहाणीत रक्तबंबाळ होऊन भाऊराव मास्तर मृत्यू पावतो. त्याची बायकोही मारहाणीत मरते. शेवटी लोकं गौतमबुवासाठी खोदलेल्या खड्ड्यात भाऊराव मास्तरला टाकतात आणि गौतम बुद्धाचा जयजयकार करीत झोपडीतल्या सगळ्या वस्तू त्याच्या अंगावर फेकतात.
कथेच्या शेवटी गौतमबुवा व त्याची बायको सुबी हे दोघेजण गावाकडे न जाता गावाच्या बाहेर कुठेतरी जाऊ लागतात. यावेळी गौतमबुवाच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. तर सुबीला तिचा नवरा सहीसलामत मिळाल्याने ती अत्यानंदाने रडत असते.
अशा प्रकारे या कथेतून भाऊराव मास्तरसारखी माणसं गावगाड्यातील गोरगरिबांच्या धाक भक्तिभावनेचा आपल्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी वापर करून घेतात. मात्र ते कायमस्वरूपी लोकांना मूर्ख बनवू शकत नाहीत. जेव्हा अति होते तेव्हा लोकांच्या ते लक्षात येते आणि लोकंच मग त्याला योग्य ती शिक्षा देतात.
‘झूल’ या कथेत शेवटपर्यंत सुबीचा संघर्ष दिसून येतो. आपल्या नवर्याची साधुपणाची झूल उतरवून त्याला माणसात आणण्यासाठी ती प्रयत्न करत राहते. या पुरुषी समाजव्यवस्थेत तिचे एका अल्पवयीन मुलाकडून लैंगिक शोषण पण होते. मात्र कुणाचाही आधार नसल्यामुळे ती मुकाट्याने ते सहन करत राहते व शेवटी नवर्याला भाऊराव मास्तराच्या कटकारस्थानातून मुक्त करते.
ही कथा तृतीयपुरुषी निवेदनतंत्राचा वापर करून लिहिली गेलेली आहे. संवादासाठी वैदर्भी बोली तर निवेदनासाठी प्रमाण भाषेचा वापर लेखकाने केला आहे.
संदर्भग्रंथ-
दाही दिशा (कथासंग्रह), रवींद्र शोभणे, विजय प्रकाशन, नागपूर, दुसरी आवृत्ती २००७.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
YouTube वरील माझे काही व्हिडिओ –
पदवीच्या विद्यार्थ्यांनी ३ वर्षांत काय करावे?
https://youtu.be/12qC-x_d950
कापसाची शेती कशी असते?
https://youtu.be/nY0AqxLTMc8
आदिवासी समाज, संस्कृती, तत्वज्ञान : परिचय (मुलाखत – श्री. रवी बुधर, मुलाखतकार – डॉ. राहुल पाटील)
https://youtu.be/1TNzfzva-mQ
महानुभाव संप्रदाय : साहित्य व तत्त्वज्ञान-
https://youtu.be/oEuj70qz534
संत साहित्य : प्रश्नोत्तर स्वरूपात (पदवी, पदव्युत्तर तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)
https://youtu.be/fg3XjvdP1UU
ग्रामीण साहित्य : संकल्पना, स्वरूप व मराठीतील परंपरा
https://youtu.be/mJgbqIN6BZ8
वागिंद्रियाची रचना व कार्य –
https://youtu.be/p9O2KeNDgT4
साहित्य आणि समाज : परस्परसंबंध –
https://youtu.be/70Tgmul9aTo
शिक्षणाची उद्धिष्टे-
https://youtu.be/4UbJ6Fh33v4
उच्चारण-स्थानावर आधारित स्वनांचे प्रकार-
https://youtu.be/HEkXOyDGjVM