माज्या गावच्या बाहीर
हाय एक म्हारवाडा
तिथला हरेक पोरगा
शिकतोय आता थोडा-थोडा
काल त्या पोरांतली
काही कुजबूज मी ऐकली
एक पोरगं
दुसर्याला सांगत व्हतं
‘आरं शेणप्या,
तो नारायण म्हारना शश्या
फोफेसर झाया
नारायण म्हार तलाठी
नि तेना बा मास्तर व्हता
कारे, सवातंत्र भेटाले
साठ वरीस हुई ग्यात
तव्यसना मनाबी बा नि तुनाबी बा
नि तेसना बा भी
मरेल ढोरं-ढारं, कुत्रं-कात्रच
वढी ऱ्हायनात
मुत्र्या-मात्र्या, गटारीच
साफ करी ऱ्हायनात
सालं तेसनी जात
नि आपली जात
एकच शे ना?’
दुसरा शांतपणे
ऐकून घेत व्हता
नि कसल्या तरी ईचारात
गढून गेला व्हता.
(२२/१०/२००६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113
वास्तवता