प्राध्यापकांचे सर्वात जास्त व भयंकर असे शोषण हे संस्थाचालकांकडून होते. आजच्या घडीला सहाय्यक प्राध्यापक बनण्यासाठी ४० ते ६० लाख रुपये रेट
आहे. एखाद्याने पैसे द्यायचेच नाहीत असे ठरवले तर त्याची प्राध्यापक बनण्याची शक्यता १%पेक्षा कमी आहे. कारण महाराष्ट्रात नाशिकची गोखले एज्युकेशन सोसायटी व मुंबईतील काही मोजक्या शैक्षणिक संस्था सोडल्या तर सगळीकडे पैसे घेतलेच जातात. पर्यायी व्यवस्थाच नाहीये. जवळपास सर्व संस्था राजकारण्यांच्या आहेत. ते ही व्यवस्था बदलवायला तयार होत नाहीत व होणार नाहीत.
सरकार वर्षानुवर्षे जागा काढत नाही. काढल्या तरी प्रत्येक महाविद्यालयात एक-एक, दोन-दोन जागा निघतात. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाला त्या प्रत्येक ठिकाणी अर्ज करावा लागतो व असे हे महाराष्ट्रभर फिरत राहतात. ‘चुकला फकीर, मशिदीत सापडायचा’ त्याचप्रमाणे ‘चुकला नेट-सेटवाला, मुलाखतीला सापडायचा’ अशी भयानक परिस्थिती आहे. काही जण १०-१५-२० वर्षांपासून विनाअनुदानित तत्त्वावर अतिशय कमी मोबदल्यात अध्यापन करीत आहेत.
त्यात दरवर्षी दोनदा नेट व दोनदा सेट परीक्षा घेतली जाते. प्रत्येक परीक्षेत खूप जण उत्तीर्ण होतात. २०११ नंतर ह्या परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने घेतल्या जाऊ लागल्या. त्यामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अजून वाढले. यामुळे स्पर्धा भरमसाठ वाढलेली आहे. म्हणून रेट पण वाढलेले आहेत.
भारत हा कदाचित एकमेव देश असावा, ज्यात शिक्षक बनण्यासाठी पैसे द्यावे लागत असतील. समजा एकमेव जरी नसेल तरी ही काही चांगली व भूषणावह गोष्ट नाहीये.
एक कल्पना करा की, समजा एखाद्याने ५०लाख रुपये भरले. तर मुद्दल व त्यावरील व्याज वसूल करायला त्याला किती वर्षे लागत असतील? आपण एवढे पैसे भरलेले आहेत हा विचार जरी त्याच्या मनात आला तरी त्याची काय अवस्था होत असणार आहे? या परिस्थितीतून आज ९५%+ लोकं जात आहेत. तेव्हा हे भयंकाराहूनही भयंकर शोषण आहे. जरा हे समजून घ्या. आतमध्ये शिरू द्या.
मला हेच म्हणायचे आहे की, ही परिस्थिती बदलण्यासाठीसुद्धा लेखकांनी, सर्वांनीच प्रयत्न करायला हवा. अनेक जण प्राध्यापकांच्या चुकीच्या प्रवृत्तींवर लिहित आहेत. लिहा. जरूर लिहा. लिहायलाच हवे. पण प्रवृत्ती बदलणे, त्यातल्या त्यात सर्वांची बदलणे एवढे सोपे नसते. तसेच चांगल्या-वाईट प्रवृत्ती सर्व पेशांमध्ये/ क्षेत्रांमध्ये असतात. म्हणून व्यवस्थात्मक बदल घडवून आणण्यासाठी संघटित होऊन एकजुटीने प्रयत्न करायला हवा. जर ही व्यवस्था बदलली, पोलीस भरती, MPSC-UPSC सारख्या एकाच वेळेस हजारो जागांसाठी मुलाखती, परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या तर गोरगरिबांची मुलेही विनाडोनेशन आनंदाने या पेशात येऊ शकतील व आपल्या समाजाचा व देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही.
- डॉ. राहुल पाटील
(डोनेशन द्यावे न लागलेला पण इतर महाविद्यालयातील/ संस्थेतील प्राध्यापक मित्रांच्या, विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या भावी सहाय्यक प्राध्यापकांच्या दुःखाने व्यथित होणारा एक पर्मनंट सहाय्यक प्राध्यापक)