जे माझं नव्हतंच कधी
ते मी माझं म्हणायला लागलो
माझ्या मनात ते
खोल खोल रुतत गेलं
माझ्या रक्तात
वाहायला लागलं
माझ्या डोळ्यांतून
आग बनून सांडू लागलं
माझ्या नसानसांमधून
सळसळू लागलं
माझ्या आत खोलवर
काहीतरी धुमसू लागलं
मग मीच बनत गेलो
एक स्फोटक द्रव्य…
आणि जे माझं होतं
माझ्या सतराशे साठ
पिढ्यांमधून वाहत आलं होतं
संथपणे नदीसारखं…
जंगलांत हिरवळ पेरीत
पशू-पक्ष्यांची तहान भागवित
त्यांच्या कंठांमध्ये
सुस्वर जागवित
‘जो जे वांछिल तो ते’ पूर्ण करीत
ते कुठं हरवलं, लुप्त झालं
ते मला, माझ्या बापालाही नाही कळालं
आणि जो नव्हतोच मी कधी
माझे पूर्वजही नव्हते जसे कधी,
तसा मी बनत गेलो हायब्रिड
माझ्याही नकळत…
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113