‘बारोमास’ कादंबरी- १

             ‘बारोमास’ ही सदानंद देशमुख यांची ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. या कादंबरीला २००४ साली भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. या कादंबरीमधून ग्रामीण भागातील तीन पिढ्यांमधील बदलत्या ग्रामवास्तवाचे, कृषीजीवनाचे चित्रण आलेले आहे.

           बारोमास म्हणजे बारा महिने. बारा महिने शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना पेरणीपासून ते कापणीपर्यंत व शेतमाल मार्केटमध्ये नेऊन तो विकून पैसे मिळेपर्यंत; तर पुढील वर्षांच्या पेरणीपूर्वी मशागतीपर्यंत शेतकर्‍यांना ज्या काही हालअपेष्टाना सामोरे जावे लागते, त्याचे चित्रण या कादंबरीत सदानंद देशमुख यांनी अतिशय वास्तवदर्शी शैलीतून साकारलेले आहे.

            ही कादंबरी विदर्भातील मोहाडी तालुक्यातील सांजोळ गाव व त्या भोवतालच्या ग्रामीण परिवेश यावर आधारलेली आहे. या कादंबरीत तीन पिढ्यांचे चित्रण आलेले आहे. नानूआजा, वडील सुभानराव-आई शेवंता, त्यांची मुलं एकनाथ, मधू, सून अलका अशा

या तीन पिढ्या आहेत. नानूआजा पारंपरिक पद्धतीने शेती करायचे, सुभानराव पुढे काळासोबत हायब्रीड बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या सहाय्याने आधुनिक शेती करू लागतात. ते अशिक्षित असतात. तिसर्‍या पिढीतील एकनाथ हा प्रथम श्रेणीत एम. ए., बी. एड. झालेला असून मधूचे शेतकीचे शिक्षण झालेले आहे. एकनाथचे शिक्षक किंवा प्राध्यापक बनण्याचे तर मधूचे तलाठी किंवा ग्रामसेवक बनण्याचे स्वप्न होते. दोघेही शिक्षणात हुशार होते. एकनाथचे शिक्षण व उज्ज्वल भविष्याचा विचार करून मोहाडी तालुक्यातील श्रीमंत इंजिनियर आपल्या बी.एस्सी. झालेल्या मुलीचे लग्न एकनाथशी लावून देतो. परंतु एकनाथ व मधु यांच्याकडे डोनेशनसाठी पैसे नसल्याने त्यांना अखेरपर्यंत नोकरी मिळत नाही. शिक्षण घेऊनही नोकर्‍या न मिळाल्याने व शेतीत फार पिकत नसल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटत जाते. अशा या कुटुंबाच्या वाताहतीचे चित्रण या कादंबरीत आलेले आहे.

              कादंबरीची सुरुवात ही एकनाथच्या चिंतनाने, विचारचक्राने होते. तो त्याच्या कल्याणीच्या मळ्यात बसलेला असून एकूणच मागच्या दहा-पंधरा वर्षातील कृषिव्यवस्थेतील बदल, उत्पन्न याबद्दल विचार करतो आहे. याच वेळेस एकनाथला आपल्या नानूआजाची आठवण येते. साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी ते पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. नानूआजाचा संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याला प्रचंड विरोध होता. त्यांच्या मते हे रसायन असून ते जास्त दिवस चालणार नाही. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून ती नापिक होऊन जाईल. तसेच संकरित, रसायनयुक्त अन्न खाल्ल्याने आपणही निकस होऊन जाऊ. ते स्वतः संकरित व रसायनयुक्त खायला नकार देतात व सगळीकडे संकरित धान्याचे उत्पादन सुरू झाल्यावरही सुरुवातीचे दोन वर्ष मुलाला (सुभानराव) गावरान बियाणेच पेरायला सांगतात. लोक संकरित बियाणे वापरुन एकरी २०-२५ पोते धान्य पिकवू लागतात. मग सुभानराव बापाशी भांडून आधुनिक शेती करू लागतो. फक्त बापासाठी थोड्या जमिनीत गावरान धान्य पेरतो. परंतु हायब्रिड धान्य लवकर निघत असल्याने सगळ्या शिवारात फक्त हेच पीक असायचे. त्यामुळे शेतातील गावरान धान्याची कणसे पक्षी खाऊन टाकू लागले. तेवढ्या शेतजमिनीतून काहीच पिकेनासे झाले. पुढे नानूआजाला गावरान अन्न खायला मिळेनासे झाले. त्यांनी हायब्रीड अन्न खायला नकार दिला. सुभानरावाला आजूबाजूच्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये गावरान गहू, ज्वारी मिळेनाशी झाली. त्यामुळे नानूआजाची उपासमार होऊ लागली. त्यांनी खाणे सोडले. त्यातच त्यांचे काही दिवसांनातर निधन झाले.
             आधुनिक शेती करूनही पुढे परवडेनासे होते. कारण उत्पन्न वाढले तसा उत्पादनखर्चही प्रचंड वाढला. आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या नावाखाली अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक खते आली, संकरित बियाणे आली. संकरित बियाण्यांपासून आलेले पीक नाजूक असल्याने त्याच्या संगोपनासाठी, त्याच्यावर कीड पडू नये व पडलेली कीड नष्ट व्हावी यासाठी कीटकनाशके आली. शेतीतील उत्पन्न वाढले. मात्र त्यासोबत उत्पादन खर्चही वाढला. पेरणीच्या काळात संकरित बियाणे खरेदी व नंतर रासायनिक खते विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी घायकुतीला येऊ लागले. त्यानंतर कीटकनाशके खरेदी, शेतीतील मशागत, सुगीच्या दिवसातील कामे, घरखर्च, आरोग्य, शिक्षण हे सर्व कर्ज काढून करू लागले. त्यामुळे घरात पीक आले की, त्यांना ते लगेच मार्केटला न्यावे लागू लागले. आधी ते घरात दोन-तीन वर्षांचे धान्य वगैरे साठवून ठेवायचे. आता कर्जाची फेड करण्यासाठी तसेच व्याजाची गती थांबविण्यासाठी त्याला ते विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
             नानूआजा याबद्दल म्हणायचा, “आरे, आशी कशी ही आधुनिक शेती? तुमच्या घरात काईच माल नाई. हे त घर खंदून आंगण भरणं चाललं. तुमच्या खड्ड्यातली माती खड्ड्यातच राह्यली.” (पृ. १), “आरे पीक व्हते म्हणता बदबद. पण त्यो नुस्ता भपका. दिसायले देखावा. सम्दं उत्पन्न खर्चातच आटून जाते ना तुमचं… हे बर्कतीचं आस्त त पैसा जाते कुठी तुमचा? हायल्या कावून नाई बांधून राह्यले शेतकरी” (पृ. २).
          नानूआजा मृत्यूआधीच स्वतःच्या सरणासाठी लाकडे फोडून ठेवतो व कल्याणीच्या मळ्यात स्वतःच्या अस्थी ठेवण्यासाठी समाधी बांधून ठेवतो. एकनाथला हे सर्व त्याच समाधीकडे बघून आठवते. अशा पद्धतीने कादंबरीची सुरुवात होते व भूतकाळाशी वर्तमानाचा सांधा जोडला जातो. नानूआजाच्या आठवणीच्या प्रकरणानंतर कादंबरीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. (क्रमश:)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *