मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबरीतील स्त्रियांचे चित्रण : एक अभ्यास

(१९६० ते ७५ या कालखंडातील)

             भारतीय समाजात पुरुषप्रधान व्यवस्था आहे. स्त्रियांचे स्थान हे दुय्यम दर्जाचे आहे. स्त्री ही उच्च जातीतील असो की कनिष्ठ, सुशिक्षित असो की अशिक्षित तिची अवस्था अतिशय वाईट असलेली दिसून येते. समाजामध्ये त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होताना दिसून येते. त्यांना उपभोग्य वस्तू समजले जाते. त्यांच्याकडे वासनेने, कामभावनेने पाहिले जाते. त्यांना निर्णयस्वातंत्र्य नसते. आर्थिक स्वातंत्र्य नसते. कुटुंब व्यवस्था, सामाजिक रूढी-परंपरा, प्रथा, चालीरिती, पुरुषांचा दृष्टिकोन, सामाजिक संघर्ष यामुळे त्यांच्या दु:खात अधिक भर पडलेली दिसून येते. मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये स्त्रियांचे जे चित्रण आलेले आहे, त्यात आपणास हे पहावयास मिळते.

  • नवर्‍यावर प्रचंड प्रेम, भक्तिभाव, जोडीदाराशी एकनिष्ठ स्त्रिया-

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, नेट, सेट, पेट, MPSC- UPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करून Bell Icon बटनावर क्लिक करा. जेणेकरून माझे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

               भारतीय स्त्री ही नवर्‍याला परमेश्वर मानते. आपल्या परंपरेत त्यांच्यावर हे बिंबवले गेलेले असते. नवर्‍यामध्ये ती आपले संपूर्ण अस्तित्त्व विलीन करून टाकते. तसेच काही स्त्रिया लग्न न करता एखाद्या पुरुषाला जोडीदार मानतात, त्या सुद्धा आपल्या जोडीदारावर असेच मनापासून प्रेम करतात, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी एकनिष्ठ राहतात. कारण एकनिष्ठता आणि समर्पणशीलता ही भारतीय स्त्रीची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

            ‘धग’ कादंबरीतील कौतिक ही पतीला आपले सर्वस्व मानणारी आहे. वास्तविक तिचा पती महादेव हा दैववादी, आळशी, कामचोर04/18/2021, दरिद्री, निरुत्साही असूनही तो आयुष्यभर आपल्यासोबत असावा, असे तिला वाटते. तिचे पतीविषयीचे नितांत प्रेम तिच्या “माहा का नाई त सगया जीव थ्या बुवात आये” (धग, पृ. १७८) या वाक्यातून पूरेपूर व्यक्त होते. शेवटी तो महारोग झाल्याने मिशनर्‍यांसोबत कायमस्वरूपी निघून जातो. त्यानंतर तिचे वागणे हे अनाकलनीय, काहीसे विक्षिप्त होत जाते आणि ती पूर्ण वेडी होते. एके ठिकाणी ती म्हणते की, “ज्याच्या माथं वाजागाजा, त्याच्या जिवाच्या अशा तुटक्या बाजा झाल्यावर कोनाच्या जिवासाठी कराव् मान्सानं हाय हाय!” (धग, पृ. २१५) आयुष्यात अनेक कष्ट उपसून आलेल्या संकटांवर मात करत जगणारी कौतिक नवर्‍याच्या जाण्याने आयुष्यातून उठते.

         ‘पाचोळा’ कादंबरीतील पारबती, ‘इंधन’मधील नायकाची वहिनी, ‘गांधारी’मधील गंगा, ‘टारफुला’मधील आबा कुलकर्ण्यांची पत्नी या स्त्रियाही आपल्या नवर्‍यावर असेच नितांत प्रेम करतात. ‘गांधारी’मधील हौसा ही महाराजांशी, तमाशात नर्तिका असलेली गुलाबीबाई लालजीशी लग्न करून त्याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक व एकनिष्ठ राहते.

           हिंदीतील ‘जल टूटता हुआ’ या कादंबरीतील सतीशची पत्नी, बंसीची पत्नी सलोना, सुग्गन मास्तरांची पत्नी जमुना या स्त्रिया अतिशय दारिद्र्यातही पतीचा साथ देतात. त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. ‘अलग अलग ‘वैतरणी’मधील सुशिला नवर्‍याच्या मृत्युनंतर पुनर्विवाह करत नाही. तर तिच्या दीरासोबतच राहू लागते. नंतर हळूहळू सहवासातून त्यांच्यात प्रेम निर्माण होते. आयुष्यभर ते लग्न न करता एकमेकांशी प्रामाणिक राहतात. बदमी, बिंदिया, गुलाबी, पुष्पा, (पानी के प्राचीर) मधील संध्या या इतर स्त्रियाही आपल्या जोडीदाराप्रती-पतीप्रती अशाच एकनिष्ठ आहेत.

  • कष्टाळू स्त्रिया-

                ‘धग’ कादंबरीतील कौतिक, सकीना, सकीनाची मुलगी बानू आणि ‘पाचोळा’मधील पारबती, ‘गांधारी’मधील जयवंता या कष्टाळू स्त्रिया आहेत. कौतिक आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट उपसते. दुसर्‍यांच्या शेतात निंदणी, खुरपणी, कापूस वेचणे, धसकटे गोळा करणे इ. अनेक कामे ती करते. शेवटी वेडेपणातही ती दिवसभर लोकांकडे काम मागत फिरते. सकीनाचा नवरा लोहारकाम करतो तर सकीना त्याला कामातही मदत करते व मजुरीसाठी शेतातही जाते. त्यांची मुलगी बानू वडिलांना लोहारकामात मदत करते. पार्वती ही सुद्धा कष्टाळू स्त्री आहे. गगांरामचा संसार तिने मोठया कष्टाने सावरलेला आहे. पोटासाठी ती दररोज दुसर्‍याच्या शेतात रोजंदारीवर जाते.

           हिंदीतील दुलरिया, पुष्पाची आई, धनेसरी (अलग अलग वैतरणी), बदमी (जल टूटता हुआ), चेनइया (सूखता हुआ तालाब) या व इतर अस्पृश्य जातीतील स्त्रिया या कष्टकरी आहेत. संसार चालविण्यासाठी, उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्यांना मोलमजुरी व शेतांमध्ये काम करावे लागते. इतर स्त्रियांनाही घरातील सर्व कामे करावी लागतात.

  • स्वाभिमानी, विद्रोही व कणखर स्त्रिया-

           ‘धग’मधील कौतिक अतिशय स्वभिमानी आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच महादेव “देव दाख्वन तिकडे’ निघून जायचे ठरवून कौतिकला ‘जाय आपल्या भावापासी’ असे सांगतो. तेव्हा ती “बाप्पा, भावापासी राहाले लगन केलं काय?” (धग, पृ. ६) असे स्वाभिमानी बाण्याने उत्तर देते.

            ‘गांधारी’मधील हौसा ही त्या गावातील आध्यात्मिक क्षेत्रातील एका महाराजांच्या वासना चाळवल्याने त्यांच्या सहवासात येते. त्यानंतर मात्र त्यांच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहते. त्यांचे नाव जगासमोर येऊन त्यांची बदनामी होऊ नये म्हणून कडोबा नावाच्या तिच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या तरुणाशी संबंध ठेवते. प्रसंग आल्यावर त्याला संपवते. स्वत:वर खुनाचा आरोप घेते. पोलिसांचा मार खाते. परंतु महाराजांशी प्रामाणिक राहते. शेवटी त्यांच्यासोबत कायमची गावातून निघून जाते.

            हिंदीच्या ‘सूखता हुआ तालाब’ या कादंबरीतील चेनइया, ‘जल टूटता हुआ’मधील बदमी, ‘पानी के प्राचीर’मधील बिंदिया, ‘अलग अलग वैतरणी’तील धनेसरी म्हातारी, दुलरिया ही चांभार जातीतील तरुणी, सुगनीची आई इ. चांभार जातीतील मुली, स्त्रिया या स्वाभिमानी, कणखर व विद्रोही स्वभावाच्या आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये त्या स्वत:चे आयुष्य सुसह्य करण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी प्रसंगी समाजाचा विरोधही सहन करीत आहेत. चेनइया ही तिच्या आईमुळे गावातील उच्च जातीतील काही लोकांशी तिची इच्छा नसताना संबंध ठेवते. त्यातून ती गरोदर राहते. तिची आई व संबंधित लोकं तिला हा गर्भ नष्ट करायला सांगतात. त्यासाठी तिच्यावर दबाव आणतात. मारून टाकण्याची धमकी देतात. मात्र ती या गोष्टींना न घाबरता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेते व एकटी गावातून पलायन करते.

             चांभार जातीतीलच बदमी ब्राह्मण जातीतील कुंजूवर प्रेम करते. त्यासाठी गावातील, जातीतील लोकांकडून होणारी टीका सहन करते. शेवटी ते सोबत गावाबाहेर चालले जातात. बिंदिया बैजनाथ या ब्राह्मण तरुणासोबत संबंध ठेवते. लग्न न करता त्याच्यासोबत राहते. सर्व गावाचा विरोध सहन करते व शेवटी प्लेगच्या आजारात बैजनाथची शुश्रुषा करता-करता त्याच आजाराने मरण पावते. त्यानंतर त्याच गावातील ब्राह्मण जातीतील विधवा गुलाबीदेखील लग्न न करता बैजनाथसोबत राहू लागते. कारण गावातील लोक तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. बैजू तिला आधार देतो. त्याच्यापासून तिला मुलगा होतो. सर्व गावात यामुळे हाहाकार निर्माण होतो. सर्व बाजूंनी त्यांच्यावर ठीका होते. गावपंचायत भरविली जाते. गुलाबी मोठ्या हिमतीने या सर्व परिस्थितीला सामोरे जाते. याच कादंबरीतील मुखिया नीरूला घरात येऊन मारायची धमकी देतो. तेव्हा नीरूची आई त्याला हिंमत असेल घरात येऊन मारून जायचे आव्हान देते. गावाच्या मुखियाला (गावाच्या प्रमुख व्यक्तीला) सुनावते.

            धनेसरी ही कित्येक वर्षांपासून एकटी विधवावस्थेत जीवन कंठत आहे. ती स्वतंत्र व स्वावलंबी जीवन जगते. कधीच कुणा उच्च व स्ववर्णातील लोकांपुढे हात पसरवत नाही. घुरबिनवा व त्याचे वडील झिनकू चांभार यासारख्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. दुलरिया एकदा ठाकूर सिरी सिंहच्या शेतात काम करत असताना तो गवताचे ओझे उचलण्याच्या निमित्ताने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती पूर्ण ओझे त्याच्या अंगावर टाकून त्याला खाली पाडते. सुगनीची आई बारा गावाच्या प्रमुख चौधरींसमोर आपल्या मुलीच्या व सुरजू सिंहच्या प्रकरणात न्याय मागते.

  • स्त्रिया- उपभोग्य वस्तू/ लैंगिक शोषण-

           भारतीय समाजामध्ये स्त्रीकडे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर अबला व त्यामुळे उपभोग्य वस्तू म्हणूनच बघितले गेलेले आहे. कुटुंबामध्ये, समाजामध्ये अनेकदा तिचे शारीरिक व मानसिक तसेच लैंगिक शोषण होत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे वासनेने, कामभावनेने बघितले जाते.

          ‘धग’मधील कौतिकला कासम व सकीना या दाम्पत्याने आश्रय दिलेला असूनही त्यांच्या मुलीवर-बानोवर कौतिकचा मुलगा भीमा अतिप्रसंग करतो. त्याआधी अनेक दिवसांपासून त्याची बानोवर नजर होती. तो तिचे संपूर्ण शरीर न्याहाळायचा. गावातील समवयस्क मुलांना गोळा करून तिच्यावर शेरेबाजी करायचा.

          ‘टारफुला’ कादंबरीत गावातील अस्थिरतेच्या काळात धुरपा म्हारणीच्या वयात आलेल्या (पदुर आल्याली) मुलीला गुंडं पळवून नेतात.

          हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ या कादंबरीत स्त्रियांच्या लैंगिक शोषणाकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. या कादंबरीतील सुदाम न्हाव्याची सून तारुण्यात विधवा होते. त्यानंतर जवळपास पंधरा वर्षे तिच्यावर खुद्द तिचा सासरा बलात्कार करत राहतो. शेवटी ती विहिरीत जीव देऊन आत्महत्या करते. याच कादंबरीतील नायकाचा भाऊ इसाक त्याची विद्यार्थिनी असलेल्या सुमतीला ती पंधरा-सोळा वर्षाची असतानाच नादी लावतो. त्यानंतर तो तिच्याशी अनेक वर्षे सातत्याने शारीरिक सबंध ठेवतो. तिला त्याची सवय लागते. त्यापुढे ती दीन बनते. तो तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत राहतो व तिचे लौंगिक शोषण करत राहतो.

         ‘गांधारी’ कादंबरीमध्ये गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनासाठी एक परिचारिका आलेली असते. गावातली काही तरुण चांडाळ चौकडी तिच्या मागे लागते. रात्री-बेरात्री मुद्दाम तिच्याकडे जाऊन गर्भनिरोधकाच्या गोळ्या मागतात. ती तालुक्याला किंवा ऑफिसला गेल्यास तिच्या मागे जातात. गर्दी करतात. शेवटी ती या सर्व गोष्टींना कंटाळून गाव सोडून चालली जाते. गावात तिची बदनामी केली जाते. ती गरोदर राहिली होती, अशी अफवा उठवली जाते.

            हिंदीतील ‘जल टूटता हुआ’ या कादंबरीतील तिवारीपूर या गावात बदमीसारखी सुंदर, तरुण आणि नवर्‍याविना राहणारी स्त्री बघितल्यावर गावातील लोक तिच्या मागे लागतात. तिचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात.

           ‘अलग अलग वैतरणी’ या कादंबरीतील गावातील काही टुक्कार तरुण स्त्रियांना उपभोगाची वस्तू समजतात. त्यांच्याशी छेडछानी करतात. करैताच्या यात्रेत शेजारच्या गावातील काही बायका यात्रा बघायला आलेल्या असतात. करैता गावातील सिरिया-हरिया, छबिलवा हे तरुण त्यांच्या मागे लागतात. त्यांना ‘माल’ म्हणतात. शेवटी हरिया परगावातील इंदल सिंहच्या सुनेचा हात पकडतो. पुष्पा या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीला बुझारथ हा जमीनदार सुगनी नावाच्या मुलीमार्फत संध्याकाळच्या वेळेस शेतातून भाजी नेण्यासाठी बोलावून घेतो आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. कल्पूची बायको पटनहियाचा नवरा कल्पू हा नपुंसक असल्याने तिला शरीरसुख मिळालेले नसते. तेव्हा विपिन आणि देवनाथ हे सुशिक्षित व सुसंस्कृत तरुणही तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र यशस्वी होत नाहीत. तेव्हा विपिनच्या मनात ते शल्य राहून जाते.

  • स्त्रियांना गौण/ दुय्यम स्थान-

            भारतात पुरुषप्रधान समाजव्यवस्था असल्यामुळे कुटुंबात तसेच समाजामध्ये स्त्रियांना गौण, दुय्यम स्थान आहे. नवरा जरी चुकत असला तरी स्त्रीला काहीच करता येत नाही. मुलापुढे सुद्धा तिचे काहीच चालत नसते. ‘पाचोळा’मध्ये गगांराम व भाना या नवरा व मुलगा यांच्या मध्ये पारबतीची अवस्था पाचोळ्यासारखीच झालेली आहे. एका भारतीय स्त्रीचा सोशिकपणा व तिचे दुय्यम स्थान या कादंबरीतून पहावयास मिळते.

          ‘इंधन’ कादंबरीतील नायकाच्या वहिनीला आपल्या पतीचे आणि सुमतीचे अनेक वर्षांपासून अनैतिक सबंध असल्याचे माहीत असूनही ती काहीच करू शकत नाही. तो तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही. तिचा मानसिक छळ होत असूनही ती सोशिकतेने निमूटपणे आयुष्य जगत राहते.

             हिंदीमधील ‘आधा गाँव’ या कादंबरीत मुस्लिमांमध्ये स्त्रियांना लग्नानंतर नावाने हाक मारले जात नाही. तर त्यांना बो, बहू किंवा श्रीमंत घराण्यातील सून असेल तर तिला ‘अजीज दुल्हन’, ‘नफीस दुलहन’ असे किताब दिले जातात किंवा भाभी, चाची, मामानी, दादी, नानी इ. नातेसंबंधदर्शक नावांनी संबोधले जाते. यामुळे तिची स्वत:ची ओळख मात्र पुसली जाते. निवेदक या प्रथेविषयी म्हणतो की, “बेनाम रहना शायद जमींदारों और उनकी हवालियों-मवालियों की बेटियों की तकदीर है।” (आधा गाँव, पृ. २३)

  • सामाजिक, धार्मिक संघर्षामध्ये स्त्रिया लक्ष्य-

          कौटुंबिक पातळीवर जसे स्त्रियांचे शोषण चालू असते. तसेच सामाजिक पातळीवरही होत असते. दोन वर्ग, जाती किंवा धर्मातील लोकांच्या संघर्षामध्ये स्त्रियांनाच लक्ष्य केले जात असते. “लहानमोठ्या कारणावरून धार्मिक दंगे होतात आणि त्यात पहिला घाला स्त्रियांच्या अब्रूवर घातला जातो”(पृ. १३८), हे रवींद्र ठाकूर यांचे विधान या ठिकाणी महत्त्वाचे आहे. ‘इंधन’ कादंबरीत नवबौद्ध, कुणबी आणि पूर्वीचे खोत असलेले मुसलमान यांच्यातील संघर्षाचे चित्रण आलेले आहे. मुसलमानांचा इसाक हा बौद्ध स्त्री लक्ष्मीला आपल्या घरात ठेवून घेतो. बौद्धांचे तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. तेव्हा बौद्ध मुसलमानांना “आम्हीही तेच करू. तुमच्या मुली आमच्या घरी आणून ठेवू!” (इंधन, पृ. ८४) असा इशारा देतात. बौद्ध व मुस्लिमांतील हा संघर्ष तीव्र होतो आणि त्याचे पर्यावसान बौद्ध, कुळवाडी, मराठे विरूद्ध मुस्लीम अशा दंग्यात होते. तेव्हा मुस्लीम लोकं हिंदू व बौद्धांच्या अनेक स्त्रियांची त्यांच्या पुरुषांसमोर अब्रू लुटतात. दंग्यात चुकून नायकाच्या वहिनीची ती मुस्लीम असूनही मुसलमानांकडूनच अब्रू लुटली जाते.

         ‘गांधारी’मध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मराठवाड्यावर निजामाची सत्ता असताना अनेक हिंदू स्त्रियांची अब्रू लुटली गेली आहे. परभणीजवळच्या तीन खेड्यांवर हल्ला करून “हिंदूंच्या तरण्याबांड बायांना पळवून नेलं… त्यांना नागडं करून बाटवलं… अजिंठ्याच्या अहमद घाउसन नवा आखाडा टाकला …. गावोगावची पैशांची लूट, बायकांची लूट त्यात डांबून ठेवू लागला.” (गांधारी, पृ. २, ३) अशा बातम्या गांधारीतल्या लोकांच्या कानावर येतात. तसेच जयसिंह पहेलवानला रझाकांनी ठार केल्यानंतर एक जण दुसर्‍याला, “इस हिजडेका घर ढूँढ निकालो. इसकी रंडी जरूर घरमें है. उसे पकडकर अजंठा ले जाव, और अहमद घाऊससाहब के जनानखानेमे पेश कर दो” (गांधारी, पृ. ५) असा आदेश देतो. यातून स्त्रिया या पुरुषांच्या पाशवी वासनेला, त्यांच्या प्रतिस्पर्धी समुहावर वर्चस्व गाजविण्याच्या महत्वाकांक्षेला बळी पडतात, हेच दिसून येते. याच कादंबरीत पुढे लोकशाही आल्यावरही भागवतवर मात करण्यासाठी जगदेव व त्याची माणसे भागवत व जयवंताची गावात बदनामी करतात व जयवंताचा खून करतात.

           हिंदीतील ‘अलग अलग वैतरणी’ या कादंबरीतील करैता या गावातील चांभार व उच्च जातीतील संघर्षामध्ये उच्च जातीतील पुरुष चांभारांसोबत त्यांच्या बायकांनाही मारहाण करतात. तलावात आंघोळ करणार्‍या विवस्त्र स्त्रियांना डोक्याचे केस पकडून बाहेर ओढून आणतात. शेतात गवत, सरपण घ्यायला गेलेल्या चांभार स्त्रियांवर ते बलात्कार करतात.

            ‘राग दरबारी’ या कादंबरीतील गयादीनच्या घरात चोरी झालेली असते. त्या आरोपाखाली पोलीस गावातीलच जोगनाथ नावाच्या व्यक्तीला पकडतात. न्यायालयात खटला चालतो. तेव्हा छोटेलाल न्यायालयात अशी साक्ष देतो की, “वह (गयादीनची मुलगी बेला) जोगनाथ के साथ बदचलनी कर रही थी। गयादीन ने इसीलिये जोगनाथ को इस मुकदमे में फँसाया है।“ (राग दरबारी, पृ.१२६) वास्तविक जोगनाथ हा दारुड्या, गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असतो आणि त्याचा व बेलाचा काही एक सबंध नसतो. परंतु जोगनाथला निर्दोष ठरविण्यासाठी छोटेलाल वरील साक्ष देतो. त्यात मात्र बेलाची बदनामी होते. थोडक्यात, अशा प्रकरणांमध्ये स्त्रीचा वापर केला जातो.

           भारत-पाक फाळणीच्या आधी हिंदू आणि मुसलमान यांच्यात दंगे घडून आले. ‘आधा गाँव’मध्येही या दंग्यांचे, बिघडलेल्या हिंदू-मुस्लीम संबंधांचे आणि या वेळेस स्त्रियांना लक्ष्य केल्याचे उल्लेख आलेले आहेत. मातादिन पंडित हिंदूंच्या सभेत ज्या-ज्या मुस्लिमांच्या घरात चांभारीन, ललाइन, भरिन-ओरिन रखेल म्हणून आहेत. दंग्यादरम्यान त्यांच्या घरातील मुलींना काढून आणण्याविषयी सांगतो. दंग्याच्या वेळेस हिंदू आणि मुस्लीम स्त्रियांवर बलात्कार झाल्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे.

  • कौटुंबिक छळ, मारहाण-

            ‘गांधारी’कादंबरीतील संभुच्या एकुलत्या मुलीचे लग्न झाल्यानंतर वर्षभरातच तिचा छळ सुरू होतो. तिचा नवरा छंदी-फंदी असतो. कमवत काहीच नाही. उलट तिला मारठोक करतो. उपाशी ठेवू लागतो. शेवटी तिला मारता मारता मारून टाकतो. याच कादंबरीतील जयवंताचाही सासरी तिच्या नवर्‍याकडून छळ होतो. तिचा नवरा नपुंसक असतो. आपल्याला मूल व्हावे व आपण नपुंसक आहोत हे गावातील लोकांच्या लक्षात येऊ नये, यासाठी तो एके रात्री घरात परक्या पुरुषाला आणतो आणि जयवंताला त्याच्याशी शारीरिक सबंध करायला सांगतो. ती ऐकत नाही तेव्हा तिला बळजबरीने विवस्त्र करतो. ती आरोळ्या मारू लागते. त्यामुळे तो पुरुष तसाच निघून जातो. बायकोने आपले म्हणणे ऐकले नाही हे पाहून त्याला प्रचंड चीड, संताप येतो. तो दरवाजा बंद करून जळजळीत चटके तिच्या मांड्यावर, जाघांवर देतो. त्याचप्रमाणे भागवतच्या बायकोचा-गंगाचा सासूकडून प्रचंड छळ होत राहतो. मात्र भागवतही काही करू शकत नाही. तो उलट बायकोची समजूत काढतो व सहन करायला सांगतो. ‘पाचोळा’मधील गंगाराम हादेखील पारबतीचा असाच छळ करतो.

         हिंदीतील ‘पानी के प्राचीर’ या कादंबरीतील नीरूची मोठी बहीण उमा लग्न होऊन सासरी जाते. तेव्हा पहिल्या दोन महिन्यातच तिचा प्रचंड छळ केला जातो. शेवटी तिचा मृत्यू झालेला आहे. नीरूसारखा संयमी व संवेदनशील व्यक्तीसुद्धा त्याची बायको जेव्हा त्याच्या भावाला आई-वडिलांना पैसे देण्याविषयी तक्रार करते. तेव्हा तिला व्यवस्थित समजावून न सांगता संतापात तिच्या कानाखाली देतो.

            ‘जल टूटता हुआ’ या कादंबरीतील गीता, बदमी, बदमीची आई या स्त्रियांनाही सासरी नवर्‍याकडून, सासू-सासर्‍यांकडून किवा सासरच्या इतर व्यक्तींकडून शारीरिक व मानसिक त्रस सहन करावा लागतो.

         ‘अलग अलग वैतरणी’ या कादंबरीतील हरिया, जगेसर हे त्यांच्या बायकांना लहान-सहान गोष्टींवरून मारठोक करतात. हरिया तर बहीणीला सुद्धा डोक्यावरचे केस पकडून मारतो. सुरजू सिंहसारखा गावातील श्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्तीही बायकोला मारठोक करतो. त्याची बायको त्याला पाहून भीतीने थरथर कापते.

         ‘आधा गाँव’ या कादंबरीतील रहीम, वाजिद मियाँ, हम्माद मियाँ हे आपल्या पत्नीला, जोडीदाराला, मुलीला मारठोक करतात.

  • निष्कर्ष-

          वरील विवेचनावरून ग्रामीण भागात स्त्रियांची स्थिती कशी आहे ते दिसून येते. यावरून काही निरीक्षणे नोंदवता येतात. ती पुढीलप्रमाणे-

  • प्रस्तुत कालखंडातील कादंबर्‍यांमध्ये चित्रित बहुतांश स्त्रिया या आपल्या पतींवर नितांत प्रेम, भक्तिभाव असणार्‍या, दारिद्र्यातही त्यांची सोबत करणार्‍या आहेत.

  • या कादंबर्‍यांमध्ये चित्रित अनेक स्त्रिया या कष्टाळू आहेत. नवर्‍याच्या कामात, त्याच्या व्यवसायात त्या आपला वाटा उचलताना दिसतात. उदा- ‘धग’मधील कौतिक, ‘पाचोळा”मधील पारबती, ‘गांधारी’मधील जयवंता, ‘जल टूटता हुआ’ मधील सतीशची पत्नी व बदमी.

  • समाजात स्त्रियांना उपभोग्य वस्तू समजले जाते. कौटुंबिक व सामाजिक पातळीवर स्त्रियांचे लैंगिक शोषण होताना दिसून येते.

  • धर्मग्रंथांमधील स्त्रीविरोधी वर्णन व भारतीय लोकांवरील त्यांचा प्रभाव, यामुळे भारतीय समाजात स्त्रियांना हीन, शूद्र आणि दुय्यम मानले जाते. यामुळेच मुलाच्या जन्माचे स्वागत तर मुलीच्या जन्माविषयी शोक व्यक्त केला जातो. हिंदीत हे चित्रण आलेले आहे. मराठी कादंबर्‍यांमध्ये आलेले दिसून येत नाही.

  • स्त्रियांसाठी त्यांची इज्जत, अब्रू फार महत्त्वाची असते आणि सामाजिक किंवा धार्मिक स्वरूपाच्या संघर्षात विरूद्ध पक्षाला पूर्ण बेजार करण्यासाठी बरोबर त्यावरच आघात केला जातो.

  • स्त्रियांना शिव्या देणे, मार देणे, उपाशी ठेवणे अशा प्रकारचा अमानवीय छळ उच्चवर्णिय कुटुंबातील स्त्रियांचाही होताना दिसून येतो. तिचे मन, भावना, इच्छा-आकांक्षा, तिच्या गरजा, एक व्यक्ती म्हणून असलेले तिचे अस्तित्त्व यांचा विचार केला जात नाही.

  • मराठी आणि हिंदीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांचा सूक्ष्म अभ्यास करून वरील जी निरीक्षणे नोंदविलेली आहेत. ते दोन्ही भाषांमधील कादंबर्‍यांमध्ये बर्‍याच प्रमाणात सारखीच दिसून येतात. त्यातल्या त्यात हिंदी कादंबर्‍यांमध्ये त्यांची तीव्रता अधिक असलेली दिसून येते.

  • संदर्भ ग्रंथ-

           १) शेळके, उद्धव ज., धग, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, सातवे पु. र्मु. २०००.

           २) पाटील, शंकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पु. र्मु. डिसे. २००९.

           ३) बोराडे, रा. रं., पाचोळा, मौज प्रकाशन गृह, मुबई, आठवी आवृत्ती, २००७.

           ४) महानोर, ना. धों., गांधारी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पु. र्मु. २००७.

           ५) ठाकूर, रवींद्र, मराठी ग्रामीण कादंबरी, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, द्वि. आ. २००१.

           ६) मिश्र, रामदरश, जल टूटता हुआ, वाणी प्रकाशध्न, नवी दिल्ली, संस्करण २००४.

           ७) शुक्ल, श्रीलाल, राग दरबारी, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, बारावे संस्करण-पहिली आ. २०१०.

           ८) मिश्र, रामदरश, सूखता हुआ तालाब, वाणी प्रकाशध्न, नवी दिल्ली, प्रथम संस्करण २००५.

           ९) मिश्र, रामदरश, पानी के प्राचीर, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, तृतीय संस्करण २००८.

          १०) रजा, राही मासूम, आधा गाँव, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, सहावी आ. २००९.

           ११) सिंह, शिवप्रसाद, अलग अलग वैतरणी, लोकभारती प्रकाशन, इलाहाबाद, सातवे संस्करण २००८.

© डॉ. राहुल पाटील,

सहाय्यक प्राध्यापक,

मराठी विभाग,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *