आज माझे आजोबा (आईचे वडील) आम्हाला सोडून गेले. अनंतात विलीन झाले. ९० वर्षांचे होते. त्यांना सर्वजण ‘जिभाऊ’ म्हणायचे. ते महानुभाव संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांच्यासोबत गोष्टींचा खूप मोठा खजिना गेला. एकच गोष्टीचा मी व्हिडीओ बनवून ठेवू शकलो होतो.
१५-१६ वर्षांपूर्वी एकदा मी व माझे आजोबा सुरतहून अमळनेरला रात्रीच्या रेल्वेने येत होतो. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती. आम्ही दरवाज्याच्या बाजूला उठबस करत रात्रभर प्रवास केला. झोपणे शक्य नव्हते. माझ्या आजोबांनी रात्रभर गोष्टी सांगून लोकांचे
मनोरंजन केले. अनेक गोष्टी या बोधपर, जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या होत्या.
माझ्या बालपणीची ५-७ वर्षे माझ्या आजोबांकडे गेले. ते किती शिकलेले होते ते माहीत नाही. पण त्यांना वाचता-लिहिता यायचे. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट केले. खूप दुःख सहन केले. त्यांना ४ मुली व २ मुले होते. २ मुली लग्नानंतर वारल्या. त्यांचे सर्व विधी माहेरी आजोबांनीच केले. माझ्या लहान मामांचे लग्न झाले. लग्नानंतर मोजून ८ दिवसांनी ते विहिरीत पडले. त्यानंतर त्यांच्यावर २ वर्ष उपचार चालले. उपचारासाठी सर्व गुरे विकली. आधीच गरिबी. त्यात पुन्हा खूप कर्ज काढावे लागले. माझे मामा जेमतेम बरे झाले. पण आयुष्यभराचे अपंगत्व आले.
त्यांचे संपूर्ण आयुष्य दारिद्र्य व कष्टात गेले. आता कुठे चांगले दिवस यायला लागले होते. त्यांच्या गरिबीचा अनेक शिकलेल्या व्यक्तींनी गैरफायदा घेतला. त्यांना कमी लेखले. शेती, प्लॉटच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेऊन त्यांना फसवले. काल रात्री मृत्यूच्या एक दिवस आधी ते ही आठवण काढत होते. याचा त्यांना खूप धक्का बसलेला होता.
संपूर्ण आयुष्य गरिबीत गेले. पण आता दिवस पालटू लागले होते. त्यांनी अनेक नातू, पणतू पाहिले. एक नातू प्राध्यापक (मी), एक शिक्षक (महेंद्र), दोन नातू डॉक्टर (गणू व कोमल – मामेभाऊ-आतेभाऊ), एक multinational कंपनीत नोकरीला, इतरही यशासाठी धडपडणारे.
माझ्या वडिलांना १९९९ साली पॅरालिसीस झाला. तेव्हा एक-दोन वर्षे माझ्या आजोबांनीच स्वतः येऊन आमची शेती कसली. आम्ही १९९५ साली घर बांधले. आमच्या घरासाठी स्वतःच्या शेतातील झाडं कापून त्यांच्या वखारीतून पाट्या करून त्या माझे आजोबा आम्हाला पोहचवून गेले होते.
आजूबाजूच्या कित्येक खेड्यांवर त्यांचा असंख्य लोकांशी संपर्क होता. त्यांनी अनेक माणसं जोडून ठेवलेली होती.
आमच्यावर आमच्या आजोबांनी निरतिशय प्रेम केले. मागच्या रविवारी मी माझ्या मावसभावासह त्यांची शेवटची भेट घेऊन आलो होतो. तेव्हा खूप रडलो. आता आमचे आजोबा आम्हाला कधी भेटणार नाहीत. फक्त आठवणीत राहतील.
आमच्या अनेकांचा आधारवड कोसळला!