‘रोजगारी’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)

         ‘रोजगारी’ ही कथा गावगाड्यातील एका शेतमजूर कुटुंबातील एक १४ वर्षाचा मुलगा आपल्या आई व वडिलांप्रमाणे शेतमजुरी न करता व्यवसायाला सुरुवात करतो आणि आत्मविश्वास व स्वाभिमानाने जगायला लागतो, या विषयावर आधारलेली आहे.

          मारत्या ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तो १४ वर्षाचा आहे. त्याची आई पाटलाकडे शेतमजुरी करायला जाते व त्यावर तिचा व मारत्याचा उदरनिर्वाह भागवते. तिची अशी इच्छा असते की, मुलाने सुद्धा आता आपल्यासोबत पाटलाकडे

शेतकामासाठी यावे व दोन पैसे कमवावेत. परंतु मारत्याला शेतात काम करण्याची बिलकुलही इच्छा नसते. कारण त्याच्या मते शेतात दिवसभर कष्ट करून पुरेसा मोबदला मिळत नाही.  

          तो दररोज उशीरापर्यंत झोपून राहतो. त्याची आई गुजी त्याच्यावर वैतागत राहते. त्याचा पाटलावर राग असतो. कारण पाटलाच्या शेतात कडबा उपसताना टाकं लागून त्याचा बाप मेलेला असतो आणि पाटलाने त्याचा काहीही मोबदला या कुटुंबाला दिलेला नसतो. गावगाड्यात पाटील किंवा मोठ्या शेतकर्‍यांसमोर आधीच्या काळात शेतमजूर कुटुंब दबकून राहायचे. कारण त्यांच्या शेतात मोलमजुरी करूनच या कुटुंबांचा उदरनिर्वाह भागायचा. त्यांनी जर त्यांना कामावर येऊ दिले नाही तर त्यांची उपासमार झाली असती. त्यामुळे पाटलांच्या विरोधात जायची हिंमत गुजी किंवा इतर कुणामध्येही नव्हती. गुजी स्वतः पोलिसांसमोर पाटलाच्या बाजूने साक्ष देऊन पाटलाकडून नुकसान भरपाई घेत नाही किंवा त्याला अडचणीत येऊ देत नाही. ती मुलाला म्हणते की, “पाटलाकडून नुकसान भरपाई घिऊन का गावात र्‍हायचं न्हाई का तुले? आपून लहान मान्सं”.   मारत्या मात्र पाटील किंवा इतर कुणालाही जुमानत नाही. त्याच्या एकूणच वागण्या व बोलण्यातून त्याचा या शोषण व गुलामगिरीला विरोध असलेला दिसून येतो. तो म्हणतो की, “पाटलाच्या बापाचं गाव होये का? का  त्याच्या आज्यानं गाव इकत घेतलं होतं?”, असे प्रश्न तो आपल्या आईला विचारत राहतो. पाटलाने मारत्याच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस ५०० रुपये दिले होते, याचा उपकार गुजी मानत राहते. तर “फुकटात न्योह्यते देल्लं. पै पै चुक्ती केली”, असे उत्तर मारत्या देतो.

          गुजी मारत्याला पाटलाकडे जाऊन काही काम आहे की नाही ते विचारायला पाठवते. मारत्या शेतातले काम करणार नाही. काही आडकाम असेल तर करेन, असे सांगून पाटलाकडे जायला तयार होतो.

          मारत्या पाटलाकडे गेल्यावर पाटलीन त्याला शेतात काम करायला जायला सांगते. तो वावरातले काम आपल्याला जमत नाही. आपली तब्येत खराब होते, असे उत्तर देतो. मग पाटलीन पाटलाला सांगून त्याला त्यांचे दूध सकाळी नरखेडला दूध डेअरीवर पोहचवायचे काम करायला सांगते. मारत्या त्या कामाला तयार होतो. पण या कामाचा महिना म्हणजे मोबदला किती देणार असे विचारतो. पाटील कुटुंबाला त्याच्या अशा प्रश्नांची अपेक्षा नसते. ती म्हणते की, “तुम्ही माय अडीनडीले दाल-चना नेते. थे का कमी झालं का रे?” असे विचारते. तो “त्याच्या मोबदल्यात थे काम करते….पण माह्या कामाचे पैसे मले भेटले पायजे”, असे उत्तर देतो. यावर पाटलीन “काय माजोरी झाले बाप्पा आजकालचे लोकं”, असे पुटपुटते. यावरून त्या काळात या मोठ्या शेतकर्‍यांकडे शेतमजुरांनी फक्त राबायचं व ते जो व जेवढा मोबदला, रोजंदारी म्हणून देतील, तेवढा फक्त घ्यायचा. त्याबद्दल बिलकुल तक्रार करायची नाही, अशी पद्धत होती आणि कुणी स्वतःहून मजुरी मागितली तर त्याला मुजोर झाला, मातला असे म्हटले जायचे. नव्या पिढीत मात्र कष्टाचा मोबदला मागायचे धाडस आलेले या प्रसंगातून दिसून येते.

          पुढे मालक ३० रुपये महिना देऊ असे सांगतो. पण मारत्या ६० रुपये महिना मागतो. पाटील शेवटी ४० रुपये द्यायला कबूल होतो. एवढ्या मजुरीवर काम करायची मारत्याची इच्छा नसते. पण गुजी त्याला जायला भाग पाडते. म्हणून तो दुसर्‍या दिवसापासून पहाटे पहाटेच कामावर जाऊ लागतो. मजुरी ठरवताना तो कामाचे स्वरूप व वेळही ठरवून घेतो. दूध पोहचवण्याच्या व तिकडनं ढेप-सरकी आणण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम करणार नाही, हे तो आधीच सांगून ठेवतो.

          यानंतर महिनाभर मारत्या हे काम करतो. मात्र हे काम करताना तो विचार करत राहतो की, आपण कष्ट करायचे, गुरांचा चारापाणी, दूध काढणं हे आपल्यासारख्यांनी करायचे आणि शहरात जास्त भाव मिळतो म्हणून पाटील दूध शहरात डेअरीवर विकायला पाठवतो. पाटलीन बाई गावात पाणी मिसळून दूध विकतात. ताकाच्या पाण्याचेही पैसे घेतात. शहरात मात्र पाणी मिसळल्यावर कमी भाव मिळणार किंवा दूधच विकले जाणार नाही म्हणून पाणी न मिसळलेले शुद्ध दूध पाठवणार, असा विचार तो करतो.

          त्याचा स्वभाव जरी असा आग्गाऊ असला तरी तो स्वाभिमानी व प्रामाणिक आहे. त्या शुद्ध दुधाच्या वासाने त्याला ते दूध प्यावेसे वाटते. पण तो मनावर काबू ठेवतो. तो मनात विचार करतो की, “कामात आपून इमानदारी राखाले पायजे. कोन वाकडं बोट दाखू नै आपल्याकडं. आपल्या मेहनतीचं, कष्टाचं असन थे हाक्कानं घेवाचं. फुकटाचं काईबी नाय पाहिजे.” अशा पद्धतीने हक्काचे धाडसाने मागून घेणारा व आपल्या कामात प्रामाणिक असलेला हा मारूत्या आपल्यासमोर लेखकाने साकार केलेला आहे.

          या कामातून तो सकाळी दहा वाजताच मोकळा होतो. त्यानंतर खदानीवर जाऊन दगडं फोडायचेही काम करून पाहतो. त्याला ते झेपत नाही. मग तो कमी कष्टाचे पण बुद्धीने, कौशल्याने करायचे काम शोधू लागतो. त्यासाठी तो नरखेडला दूध द्यायला गेल्यावर डेअरीवाला, बेकरीवाला, ढेपसरकीवाला अशा व्यावसायिकांना त्यांना किती रुपये नफा मिळतो, भांडवल किती लागते, असे विचारत राहतो. बेकरीवाल्याकडून त्याला कळते की, एका डबलरोटी टोस्टच्या विक्रीमागे चार आणे म्हणजे पंचवीस पैसे नफा मिळतो. मग तो हिशोब करतो की, असे डबलरोटीचे दहा पुडे विकले तर आपल्याला अडीच रुपये नफा मिळेल. त्यासोबत गोळ्या-बिस्किट ठेवले तर आणखी एखादा रुपया नफा मिळू शकेल. म्हणजे साडे-तीन ते चार रुपये दिवसात नफा मिळेल आणि आता पाटलाकडे आपल्याला दिवसाला एक रुपया चाळीस पैशांच्या आसपास दिवसाला रोजदारी पडत आहे. असा मनाशी हिशोब पक्का केल्यावर तो पाटलाकडून त्या महिन्याचे चाळीस रुपये मागून घेतो व पुढच्या महिन्यापासून परवडत नसल्याने १०० रुपये महिना पाहिजे आणि एवढ्या पैशात ठेवा नाहीतर उद्यापासून बंद असे सांगतो. पाटील त्याला “नको यिऊ. तुह्यावाचून का अडून बसणार हाये काबे.” तू न्हाई तं तुहे बाप हज्जार” असे म्हणतो. मारत्या पण त्याला “तुह्येबी बाप हज्जार भेट्टे मले” असा शब्दाला शब्द भिडवून मोकळा होतो.

          दुसर्‍या दिवशी मारत्या नरखेडहून माल विकत आणतो. एक खोका मिळवून गावात डबलरोटी टोस्ट, गोळ्या-बिस्किट विकायला जातो. तासभर फिरून विकून तो घरी येतो व हिशोब करतो. तेव्हा त्याला असे लक्षात येते की, पहिल्याच दिवशी त्याला चार रुपये पंच्याहत्तर पैसे नफा झालेला आहे.

इकडे पाटलाला मारत्याने असा शब्द वापरल्यामुळे नाराज होऊन पाटील त्याच्या आईला गुजीला कामावरून काढून टाकतो. ती तणतणत घरी येते व मारत्यावर डाफरते. तेव्हा तो तिला म्हणतो की, “कायले दगडं खावा लागते वो? एका घंट्यात चार रुपे बारान्याचा मुनाफा भेटला. कायले त्या भोसडीच्या पाटलाची गुलामी करतं? मी पोसतो तुले, माह्यात तुले पोसाची हिम्मत हाये.” त्याच्या या बोलण्याचा गुजीला खूप आनंद होतो.

          अशा पद्धतीने पारंपरिक गावगाड्यामधील कमी श्रमात शेतमजुरांना राबवून घेऊन त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेण्याची जी पिढ्यानपिढ्यांची पद्धत होती. तिला हा  मारुती छेद देताना दिसून येतो. तो प्रामाणिक व स्वाभिमानी आहे. त्याच्यात धाडस आहे. पाटलाच्या नजरेला नजर भिडवून तो बोलू शकतो. त्याच्या मक्तेदारीला तो भित नाही. त्याच्यात आत्मविश्वास व एक प्रकारची व्यावहारिक हुशारी आहे. एका महिन्यातच चार ठिकाणी चौकशी करून, निरीक्षण व विचार करून तो धंद्याची लाईन निवडतो व आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतो.

          त्याची आई पारंपरिक गावगाड्यात वावरणारी, त्या व्यवस्थेनुसार जगणारी एक कष्टाळू स्त्री आहे. पाटलांनी आपल्याला कामावर घेतले नाही तर आपण कसे जगणार? हा तिच्यासमोर मूलभूत प्रश्न आहे. पाटलाच्या शेतात काम करताना तिच्या नवर्‍याचे निधन होऊन तिला वैधव्य येऊनही ती पाटलाच्या विरोधात जाऊ शकत नाही. कारण पाटलामागे दहा लोकं उभे राहतील, आपल्या गरिबामागे कोणीही उभे राहणार नाही, हे तिला वर्षानुवर्षाच्या अनुभवातून माहित झालेले आहे. मुलाच्या आत्मविश्वासामुळे मात्र तिच्यात एक नवा आशावाद निर्माण झालेला दिसून येते.

          या कथेतील पाटलीन व तिचा मुलगा पाटील हे पारंपारिक गावगाड्यातील वर्चस्ववादी व शोषक प्रवृत्तीचे प्रतिनिधी म्हणून समोर येतात. आपल्याकडे लोकांनी कमी पैशांमध्ये राबावे, आपण देऊ तेवढ्या मोबदल्यावर समाधान मानावे, आपल्याला कुणीही उलटून बोलू नये, असे त्यांना वाटते. मारत्याने असे केल्यावर त्यांना राग येतो.

अशा प्रकारे ‘रोजगारी’ या कथेतून पारंपरिक खेड्याचे, तेथील गावगाड्याचे व त्यातील परिवर्तनाचे चित्रण आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *