लहान मुलांचा भाषिक विकास कसा साधाल?

         भाषा हे ज्ञान मिळविण्याचे, आत्मसात करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. त्यामुळे लहान मुलांच्या भाषाविकासाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.

एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे, म्हणजे ती भाषा तिच्या सर्व अंगभूत सामर्थ्यासह बोलता, लिहिता व वाचता येणे होय.

           भाषिक कौशल्ये म्हणजे संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, श्रावण कौशल्य होय. विद्यार्थ्यांना आपले विचार, भावना, मते त्या-त्या भाषेतून मौखिक किंवा लिखित स्वरूपात अस्खलितपणे व्यक्त करता यायला हवीत. तरच त्याच्या भाषेचा विकास झालेला आहे असे म्हणता येईल.

            अनेक पालकांना असे वाटते की, आपल्या मुलांना एक इंग्रजी भाषा आली म्हणजे जगातील दुसरी कोणतीही भाषा नाही आली तरी चालेल. हा खूप मोठा गैरसमज आहे. मुलांना इंग्रजी शिकविण्याच्या नादात मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नका.

              माझे निरीक्षण आहे की, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची मातृभाषा अतिशय कमकुवत राहते. अनेक पालक मुलांना इंग्रजी शिकवण्याच्या नावाखाली धेडगुजरी भाषा शिकवतात. म्हणजे त्यांना इंग्रजी काही येत नाही. मग ते मराठी वाक्यांमध्ये काही इंग्रजी शब्द मिसळून अशा भाषेतून आपल्या मुलांशी बोलतात. हे भाषाशिक्षणाच्या दृष्टीने फार बरोबर नाही. मुलांशी एका वेळेस एकाच भाषेतून अस्खलितपणे बोलायला हवे.

           मी माझ्या मुलांना शाळेत जाईपर्यंत इंग्रजी भाषा शिकवली नाही. शरीराचे अवयव व इतर गोष्टी मराठी भाषेतूनच शिकवल्या व शाळेत जाऊ लागल्यावर मात्र मग त्यांना इंग्रजी सुरू झाली.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील २५० पेक्षा जास्त दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. – डॉ. राहुल पाटील  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

            लहानपणी अनेक भाषा सहज शिकता येतात. नंतर जास्त कष्ट पडतात. भाषा ही बोलून लवकर शिकता येते. त्यामुळे २-३ भाषा बोलणारे लोकं कुटुंबात किंवा संपर्कात असले की, मुलं त्यांच्याकडून त्या भाषा सहज आत्मसात करतात.

        माझ्या मोठ्या मुलाला मराठी चांगली यावी, यासाठी मी त्याला मराठीतील दुनियादारी, पोस्टर बॉईज, बाबा आमटे, टाईमपास, टपाल यासारखे चित्रपट दाखवायचो. त्यालाही ते खूप आवडायचे. त्याने लहानपणीच म्हणजे वयाच्या ४ वर्षाच्या आधीच अक्षरशः अनेकदा ते चित्रपट पाहिले. त्यामुळे त्याची मराठी खूप सुधारली. माझ्या लहान मुलाला हिंदी खूप छान येते. ती मोगली, शिवा इ. हिंदी कार्टून बघून सुधारली. म्हणून मराठी, हिंदी व इंग्रजीतील चांगले कार्टून मुलांना बघू दिले तर त्याचा त्यांना फायदाच होतो, असा माझा अनुभव आहे.

             सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांशी सतत बोलत राहिले पाहिजे. आजूबाजूच्या वस्तू, व्यक्ती, इतर काही गोष्टी यावर त्यांची मते त्यांना व्यक्त करू द्यायला हवीत. कोणतीही भाषा त्यांच्या जेवढी सरावाची होईल, तेवढे त्यांचे त्या भाषेवर प्रभुत्व वाढत जाईल.

              भाषेच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एखादा शब्द, एखादे वाक्य जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने उच्चारले तर तिथंच त्यांच्या ती चूक हळुवारपणे लक्षात आणून द्यायला हवी. जी मुलं किंवा व्यक्ती कोणतीही भाषा खूप सुंदररीत्या बोलतात, त्यांच्या संपर्कात त्यांनी राहायला हवे, अशांशी त्यांनी मैत्री करायला हवी.

               मी गावाकडे काही असे शिक्षक पाहिले आहेत की, ते आपल्या विद्यार्थ्यांशी स्थानिक किंवा गावठी भाषेतून मुद्दामहून बोलतात. असे करता कामा नये. शिक्षकांनी नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांशी प्रमाण भाषेतूनच संभाषण करायला हवे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर खूप जास्त प्रभाव पडत असतो, म्हणून त्यांनी ही काळजी घेणे खूप अत्यावश्यक आहे. भाषेच्या बाबतीत त्यांनी विविध प्रयोग केले तर त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असतो.

            थोडक्यात काय तर, कुटुंब, संपर्कातील व्यक्ती, समाज व शाळा-महाविद्यालये या सर्व पातळ्यांवर मुलांना योग्य भाषिक, शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले तर त्यांच्या भाषेचा विकास हा नक्की होत असतो. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते व त्यांना आयुष्यभर त्याचा फायदा होत राहतो. 

 

© Copyright

डॉ. राहुल पाटील,

मराठी विभागप्रमुख,

गोखले एज्युकेशन सोसायटीचे 

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,

जव्हार, जि. पालघर. 

 

One thought to “लहान मुलांचा भाषिक विकास कसा साधाल?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *