ह्या सूचना मी नेट/ सेटच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या आहेत. त्यांचे संकलन इथे केलेले आहे. ज्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशाच आहेत. म्हणून काळजीपूर्वक वाचा. त्यावर चिंतन, मनन करा व अंमलात आणा.
१) फार वेळ सोशल मीडियावर राहिल्यानेही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यात अडचणी येतात.
२) परीक्षेतील यशाचे पहिले सूत्र- त्या-त्या परीक्षेचा
अभ्यासक्रम कायमस्वरूपी आपल्या डोळ्यासमोर हवा. अभ्यासाला दिशा प्राप्त होते. आपण भरटकत नाहीत.
३) बऱ्याचदा तपशीलात्मक गोष्टी वाचून लक्षात राहतात. पण संकल्पना, साहित्यकृतीचे रसग्रहण, एखाद्या लेखकाचे, साहित्यकृतीचे, प्रवाहाचे स्थान इ. गोष्टी समजून घ्याव्या लागतात.
४) अभ्यासात सातत्य ठेवा.
५) मी जो ग्रुप तयार केलेला आहे त्यामध्ये नेट, सेट व इतर स्पर्धा परीक्षांसोबत मराठी भाषा, साहित्य, संशोधन, व्यवसाय इ.शी संबंधित काही आवश्यक कौशल्येसुद्धा सांगितली व शिकवली जातील. कारण NET/ SETच्या परीक्षेत आपल्या विषयाशी संबंधित जवळपास सर्व विचारले जाते. तसेच फक्त पास होऊन उपयोगाचे नसते, तर मुलाखतीची तयारी, अध्यापनकौशल्य इ. इ. गोष्टी आवश्यक असतात.
६) व्हिडिओ बघताना नोट्स काढत चला व महत्त्वाचे म्हणजे विषय, संकल्पना समजून घेत चला. कारण तुम्हाला पुढे जाऊन शिकवायचे देखील आहे.
७) अभ्यासाच्या काही युक्त्या (tricks), अभ्यासाच्या स्वतःच्या पद्धती विकसित करा. नवनवीन युक्त्या शोधून काढा.
८) अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून एकदा मूळ संदर्भग्रंथ वाचाच. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपण २-३ तास सलग आपल्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलू शकायला हवे.
९) परीक्षा कमी वेळेत पास व्हायची असेल किंवा विषयाचा पाया मजबूत करायचा असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. पुस्तकातून किंवा व्हिडिओ बघून एक-एक मुद्दा, घटक पूर्णपणे समजून घ्या व नोट्स काढा. तेच तुम्हाला कामात येईल.
१०) सराव परीक्षा जेवढ्या जास्त देता येतील, तेवढ्या द्यायला हव्यात. यालाच सातत्यपूर्ण मूल्यमापन (स्वतःचेही) असे म्हणतात व या परीक्षांमध्ये तुमच्यावर कोणताही दबाव नाहीये.
११) तसेच online परीक्षा देताना कोणत्या अडचणी येतात, तेही कळते. मागच्या वेळेस ४-५ जणांचे फॉर्मच ओपन झाले नाहीत. काहींचे वेळेत सबमिट झाले नाहीत. ह्या अडचणी वेळेत कळल्या तर आपण जेव्हा अंतिम परीक्षा देतो, तेव्हा आपला गोंधळ होत नाही.
१२) दररोजच्या अभ्यासाची वेळ व गती जरा वाढवा.
१३) व्हाट्सअप, फेसबुक, फालतू गप्पा, विनाकारण फिरणे, अतिरिक्त मनोरंजन या गोष्टींना जरा लगाम लावा.
१४) जे बी. ए., एम. ए. ला असतील. त्यांनीही सुट्ट्या समजून हे दिवस वाया घालवू नका. मी गेल्या १६-१७ वर्षांपासून अशा भरपूर सुट्ट्या उपभोगलेल्या नाहीत.
१५) रोजंदारी, काम, घरकाम, नोकरी करत असणार तरी वाचन, अभ्यास, टिपणे (नोट्स) काढण्यासाठी वेळ काढा.
खरं तर आयष्यभर काम व वाचन, अभ्यास यांचे व्यवस्थित नियोजन करून आपल्या स्वतःच्या तसेच आपल्या भावंडांच्या, भावी पिढ्यांच्या जीवनाला, व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायला हवा. काळानुसार विकसित होत जाणे, हेच माणूसपणाचे लक्षण आहे.
१६) भाषाविज्ञान हा विषय चांगल्या पद्धतीने समजून घ्या. समजायला कठीण वाटणारा पण एकदा समजला की कायमस्वरूपी लक्षात राहणारा हा विषय आहे. गणितासारखा आहे. रट्टा मारायचा नाही, तर टप्प्याटप्प्याने (step by step) समजून घेण्याचा आहे.
१७) स्वन, स्वनिम व स्वनांतर तसेच रूपिका, रूपिम, रूपिकांतर या संकल्पना एकमेकांच्या प्रकाशात समजून घ्या. एक समजली की दुसरी समजते. असे प्रत्येक विषयात असते. एक मुद्दा, घटक, विषय व्यवस्थित समजला की दुसरा समजायला मदत होते.
१८) मित्रांनो, मराठी भाषेत लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरत जा. जसे मी टाईप करतो. ही सवयच लावून घ्या. तुम्हाला आयुष्यभर कामात येईल. इंग्रजीत लिहिण्यासाठी रोमन लिपी व मराठीत लिहिण्यासाठी देवनागरी लिपी.
१९) बोलून कोणत्याही भाषेत व लिपीत टाईप करत जा.
२०) मित्रांनो, काही गोष्टी, काही बदल छोटे वाटतात, पण त्यांना सुरुवात करावी लागते व आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात त्यांचा नियमित वापर करावा लागतो. तेव्हा ते आपल्या अंगवळणी पडते. अशी एक एक कौशल्ये आत्मसात करावी लागतात.
२१) आधीपासूनच प्रमाणलेखनाकडे बारकाईने लक्ष द्या. ती सवय लागेल. हे कौशल्यही हळूहळू आत्मसात करत जा.
२२) सर्व प्रश्न व त्यांचे पर्याय काळजीपूर्वक वाचा. मगच योग्य पर्याय निवडा. पेपर विचारपूर्वक सोडवा. तशी स्वतःला सवय लावा. पेपर सोडवताना पुस्तक, नोट्स काहीही जवळ ठेवू नका. स्वतःचा अभ्यास किती झालेला आहे, आपल्याला किती समजले आहे, पेपर घेतला तर आपल्याला किती मार्क्स मिळू शकतील, हे तुम्हाला स्वतःला कळावे व तुमचे स्वतःचे सातत्यपूर्ण मूल्यमापन व्हावे, यासाठी परीक्षा घेत आहे.
२३) परीक्षार्थी विद्यार्थी हे वेगवेगळ्या वर्गातील व वेगवेगळ्या वयोगटाचे असल्यामुळे मी मेरिट लिस्ट घोषित करत नाही. प्रत्येकाने स्वतःचे मूल्यमापन, आत्मपरीक्षण स्वत: करायचे आहे. आपण या घटकाच्या अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा व आता आपल्या या विषयाच्या, घटकाच्या आकलनामध्ये, ज्ञानामध्ये भर पडलेली आहे का हे स्वतः ठरवायचे आहे.
२४) आपली स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे, हे लक्षात ठेवा.
© राहुल पाटील,
मराठी विभाग प्रमुख,
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
जव्हार, जि.पालघर
खूप छान मार्गदर्शन करता सर.