शिक्षण क्षेत्रातील नारबा

                                        शिक्षण क्षेत्रातील नारबा

            आपल्याकडील शिक्षण क्षेत्राकडे सहज नजर टाकली तर आपल्याला जिल्हापरिषदेच्या शाळा सोडल्या तर जिकडेतिकडे माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये ही खाजगी संस्थांचालकांचीच दिसून येतात. याव्यतिरिक्त अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या केजी, नर्सरीपासूनच्या खाजगी शाळांचेही जणू पेव फुटलेले आहे.

           या संस्थांमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित, तासिका तत्त्वावर वर्षानुवर्षे काम करणारे असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या शिक्षकांना, प्राध्यापकांना २०००, ५०००, १०००० किंवा अपवादात्मक ठिकाणी या पेक्षा थोडे जास्त मासिक वेतन दिले जाते. त्यात परत मे महिन्यात ब्रेक दिला जातो. म्हणजे त्या महिन्याचे वेतन दिले जात नाही. काही ठिकाणी तर सहा महिन्यांमधून, वर्षातून एकदा थोडेफार ‘मानधन’ दिले जाते. त्यांच्याकडून त्या-त्या शैक्षणिक संस्थेत वाट्टेल ते काम करून घेतले जाते. अनेकदा त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर राजकीय कामांसाठीही वापर करून घेतला जातो. शाळा-महाविद्यालय अनुदानित असेल तर आपण एक ना एक दिवस पर्मनंट होऊ, या आशेने हे बिच्चारे कोणतेही काम टाळत नाहीत. आपल्यावर वरिष्ठांची, पदाधिकाऱ्यांची, संस्थाचालकांची खप्पा मर्जी होऊ नये, म्हणून ते अतिशय काळजी घेतात.

             आजूबाजूची परिस्थिती बघितल्यावर आपल्यासारख्याच कित्येक वर्ष काम करणार्‍यांना वगळून पर्मनंट जागेसाठी ऐनवेळेस दुसऱ्याला घेतले गेले हे ऐकल्यावर, प्रत्यक्ष पाहिल्यावर यांच्यात नैराश्य येत जाते. त्यांच्या मनातही भीती, असुरक्षितता निर्माण होत जाते. त्यापैकी अनेकांचे लग्न झालेले असते. अनेक जण गरिबीच्या परिस्थितीतून आलेले असतात. कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी असते. कर्जबाजारी असतात. आज ना उद्या आपल्या कष्टाचे, प्रामाणिकपणाचे, आपण संस्थेसाठी केलेल्या कामाचे चीज

होईल व आपले सिलेक्शन होईल, या चिवट व काहीशा भाबड्या आशेने ते खपत राहतात, राबत राहतात. त्यांच्या अगतिकतेचा, असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून संस्थेची नानातर्‍हेची कामे करून घेतली जातात. बऱ्याचदा संस्थाचालक आपल्या नात्यातील, कुटुंबातील व्यक्तीने या पदासाठी आवश्यक ती अर्हता प्राप्त केली की, मग ती जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करतात व कित्येक वर्षे इमानेइतबारे राबलेल्या व्यक्तीऐवजी जवळच्या अथवा अधिक डोनेशन देणाऱ्या व्यक्तीला भरून घेतात.

          अशा कित्येक वर्ष राबलेल्या व प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या व्यक्तींना मी ‘शिक्षण क्षेत्रातील नारबा’ असे म्हणतो.

         याव्यतिरिक्त विद्यापीठांमध्ये मी असे शिक्षण क्षेत्रातील नारबा Project Fellow व Research Fellow यांच्या रूपात पाहिलेले आहेत. विद्यापीठांमधील विविध विभागांमध्ये जे प्राध्यापक असतात. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अथवा त्या-त्या विद्यापीठांकडून किंवा मग राज्य सरकारच्या विविध संस्थांकडून प्रकल्प (Major Research Project) मिळालेले असतात. या प्रोजेक्टवर प्रोजेक्ट फेलो म्हणून त्यांना त्या-त्या विषयातील पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांना घेता येते. हा प्रोजेक्ट फेलो दोन वर्ष त्या प्रोजेक्टवर त्या मार्गदर्शकाचा सहाय्यक म्हणून त्याच्या हाताखाली काम करतो. त्याच्या मोबदल्यात त्याला त्या प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या अनुदानातून विद्यापीठ अनुदान आयगोच्या गाईडलाइननुसार विशिष्ट फेलोशिप अथवा मानधन दिले जाते. (माझ्या संपर्कातील महाविद्यालय स्तरावरील काही फेलोंना गाईडलाइनपेक्षा कमी फेलोशिप दिली जायची, हेही मला माहीत आहे.)

         या बदल्यात खरं तर त्याने फक्त त्याच प्रोजेक्टचे काम करणे अपेक्षित असते. परंतु संबंधित प्राध्यापक (सर्व नाही पण बरेच जण) बऱ्याचदा त्याला प्रोजेक्टव्यतिरिक्त स्वतःची बरीचशी कामे करायला सांगतात. उदा.- पत्र टाईप करणे, लेखनिक म्हणून काम करणे, त्या प्राध्यापकाचा एखादा विषय वर्गात जाऊन शिकविणे, त्या प्राध्यापकाच्या इतर पुस्तकांचे काम करणे, बँकेची-ऑफिसची कामे करणे, विविध कार्यक्रमांमध्ये रात्रंदिवस सर्व प्रकारची कामे करणे, ड्रायव्हिंग करणे, घरी भाजीपाला व इतर वस्तू आणून देणे, इ.   या फेलोला नोकरी नसल्यामुळे नाईलाजास्तव फेलोशिपसाठी ती कामे करावी लागतात. त्या फेलोशिपच्या रकमेवरच त्याचा घरखर्च चालत असतो. कारण प्रोजेक्ट फेलो म्हणून ठेवायचे की नाही ठेवायचे, हे सर्वस्वी त्या प्राध्यापकाच्या हातात असते. या फेलोंनी तो ज्याच्याकडे काम करतो त्या प्राध्यापकाचे ज्या प्राध्यापकांशी चांगले संबंध नसतात, त्यांच्याशी व त्यांच्या फेलोंशी बोललेले सुद्धा बऱ्याचदा त्याला चालत नसते. प्रोजेक्टचा कालावधी संपला की ही प्रोजेक्ट फेलो म्हणून काम करणारी व्यक्ती बेकार होते. त्याला त्याचा रस्ता मोकळा असतो. त्याला ते ठिकाण सोडून जायचे असते.

          या प्रोजेक्ट फेलोंपैकी अनेक जण नेट/ सेट झालेले असतात. त्यांना असे वाटत असते की, आपण ज्याच्याकडे काम करत आहोत, तीच व्यक्ती एखाद्या पदाकरिता होणाऱ्या मुलाखतीला विषयतज्ज्ञ किंवा कुलगुरूंचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहू शकते किंवा ती जरी नसली तरी मुलाखत घेणाऱ्या इतर प्राध्यापकांना ती व्यक्ती निवड करण्याच्या संदर्भात सांगू शकते. म्हणजे त्यांच्याही मनात भविष्यात नोकरीला लागण्याची आशा असते. म्हणून तेसुद्धा वरीलप्रमाणे विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या उमेदवारांसारखे या व्यवस्थेतील सर्वांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतात.

             या प्रोजेक्ट फेलोंनाही  मी ‘शिक्षण क्षेत्रातील नारबा’ म्हणतो.

            आता बऱ्याच जणांच्या मनात आले असेल की, नारबा म्हणजे काय?

           जे मराठीचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आहेत, त्यांना कदाचित नारबा म्हणजे काय किंवा कोण, हे माहिती असेल. इतरांना माहीत असण्याची शक्यता कमी अथवा शून्य आहे. तेव्हा त्यांच्यासाठी-

            नारबा हे आनंद यादवलिखित १९७१ साली प्रकाशित झालेल्या ‘गोतावळा’ कादंबरीतील एक पात्र आहे. ‘गोतावळा’ ही ग्रामीण कादंबरी आहे. या कादंबरीत रामू सोनावडे म्हणून एक शेतकरी असून त्याच्या शेतावर सालगडी म्हणून नारबा वीस वर्षे काम करतो. हा नारबा शेतातच राहतो. त्याच्या शेतातील गुराढोरांपासून शेतीची सर्व कामे तो २० वर्ष करतो. तो अनाथ असतो. त्याला भाऊ, बहीण, आई, वडील, काका-चुलते कुणीही नसतात. मालक त्याला वीस वर्षांपूर्वी त्याचे लग्न लावून देण्याचे आश्वासन देतो, पण त्याच्यातील कामाची रग कमी होऊ नये व त्याचा शेतातील कामाचा वेळ कुटुंबाच्या भरण-पोषणात जाऊ नये, या स्वार्थी हेतूने तो त्याचे मुद्दामहून लग्न लावून देत नाही. त्याला फक्त आश्वासन देत राहतो. नारबा मात्र त्याला आपल्या बापाप्रमाणे व त्याच्या बायकोला आईप्रमाणे मनात असतो. पुढे मालक ट्रॅक्टर विकत घेतो. त्यासाठी निरूपयोगी असे अनेक बैल, गाय, म्हशी विकून टाकतो. त्याच्या शेतातील सर्व कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने होऊ लागतात. नारबाला ट्रॅक्टर चालविता येत नाही. ते ट्रॅक्टर चालविण्यासाठी मालक शहरातून ड्रायव्हर आणतो. पुढे नारबाची उपयुक्तता, गरज संपल्यावर मालक त्याला काम सोडून जायला सांगतो.

               नारबा हा सालगडी व शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित, तासिका तत्वावर काम करणार्‍या ‘कष्टकर्‍यां’मध्ये मला साधारणत: ११-१२ वर्षांपूर्वी साम्य जाणवले.

               नारबा म्हणजे ‘Use and throw’, ‘वापरा व गरज संपल्यास फेकून द्या’ अशा संस्कृतीतील, अशा मानसिकतेच्या समाजातील शोषणग्रस्त व्यक्तींचे प्रतीक! अनेक वर्ष वापरून फेकल्या गेलेल्या व्यक्तींचे प्रतीक!

                असे या शिक्षण व्यवस्थेत राबविले गेलेले व व्यवस्थेतून बाहेर फेकले गेलेले (पुढे काही जिद्दीने स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहिले व यशस्वी झाले, तो मुद्दा वेगळा) अनेक नारबा मी गेल्या बारा-तेरा वर्षांत पाहिलेले आहेत. आजसुद्धा असे अनेक ‘नारबा’ माझ्या आजूबाजूला आहेत. माझ्या मनात असे अनेक ‘नारबा’ रुतून बसलेले आहेत.

              (साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी विद्यापीठात असताना हा विचार माझ्या मनात आला होता. आज कागदावर उतरला व मी तुमच्यासमोर मांडला.)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

 

   (याला काही प्राध्यापक व शिक्षणसंस्था अपवाद आहेत, याची नोंद घ्यावी.)

 

10 thoughts to “शिक्षण क्षेत्रातील नारबा”

      1. सध्याच वास्तव.. …अप्रतिम मांडणी…तुमच्या मुळे आज मला “नारबा” कळाला..असा नारबा आमचा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ …आणि भविष्यात चांगलं काही तरी करू..👍

  1. विद्यार्थ्यांना सत्य परिस्थिती कळावी, त्यांनी आधीच सावध व्हावे व त्यांचा नारबा होऊ नये, म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे. कटू परंतु वास्तव लेखन त्यासाठीच करायचे असते.

  2. भीषण वस्तुस्थिती मांडली आहे सर आपण…हे बदलण्यासाठी कृती गरजेची आहे सर आता…..!

  3. हे आपल्या व्यवस्थेने निर्माण केलेले भरघोस पीक आहे.
    सोसवत नाही पण परिस्थिती फारच भयानक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *