शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे व त्यांच्या नावाच्या आधी कित्येक उपाध्या लावणारे व इतरांनाही
लावण्याचा आग्रह धरणारे यात मूलभूत फरक आहे. दुसरे एकेरी बोलणारे नेहमी एकेरी बोलत नाहीत. तर विशिष्ट विचार परिणामकारकरित्या सांगण्यासाठी व जवळच्या व्यक्तीबद्दल बोलावं, त्याप्रकारचे बोलावेसे वाटते तेव्हाच तसे बोलतात. त्यांच्या डोक्यात एक गोष्ट पक्की असते की शिवाजी महाराज हे देव नव्हते. तर आपल्यासारखे हाडामांसाचे माणूस होते. त्यांचे विचार व कार्यामुळे ते महापुरुष ठरले.
आंबेडकरांबद्दल सुद्धा विशिष्ट प्रसंगी ‘उद्धरली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे’ असे म्हटले जाते. यात ‘भीमराव’ऐवजी भीमा व ‘तुझ्या’ हे एकेरी सर्वनाम आहे. पण भावना या आदर व्यक्त करणाऱ्या व त्यांच्या कार्याची महती सांगणाऱ्यांच आहेत.
आपण बोलताना जेव्हा ‘वडील’ हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यासोबत ‘तुम्ही’, ‘ते’ हेच सर्वनाम येतात. ‘बाप’ शब्द वापरला तर मात्र ‘तो’ हे सर्वनाम येते.
बोलणाऱ्याचा भाव लक्षात घ्यायला हवा.
संतांनी विठ्ठलाला अक्षरश: शिव्या घातल्या आहेत, धमक्या दिल्या आहेत.
कोणत्याही गोष्टीचे अवडंबर माजवू नये.
आणि पुरोगाम्यांनीही यांना आयते भांडवल देऊ नये.
मराठ्यांच्या इतिहासाची किती पुस्तके आपण वाचली आहेत? वाचून बघा. ऐतिहासिक व्यक्तींचा आधी असाच उल्लेख केला जायचा. नरहर कुरुंदकर यांनी १९६९मध्ये शिवाजी महाराजांवर दिलेली तीन व्याख्याने रेकॉर्ड करून ठेवली गेलेली होती. ती युट्युबवर टाकलेली आहेत. मी ऐकली. त्यातही एकेरीच उल्लेख केला गेलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी तर ‘दगलबाज शिवाजी’ या शीर्षकाने एक व्याख्यान दिले होते. लोकांनी आग्रह करून त्याची पुस्तिका छापायला लावली. कारण त्यात महाराजांचे कर्तृत्व लक्षात आणून दिलेले होते. त्यांचे ते लिखित भाषण मी वाचलेले आहे.
आता लोकांच्या अस्मिता टोकदार झाल्याने अभ्यासक एकेरी उल्लेख करणे टाळायला लागले आहेत.
मी स्वतः ९ फेब्रुवारी रोजी महाराजांवर व्याख्यान दिले. उद्याही एके ठिकाणी देणार आहे. मी मात्र ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा पूर्ण उल्लेख करतो. आपण आधी पुस्तक वाचायला हवीत. त्यातील आशय समजून घ्यायला हवा. मगच त्यात महाराजांचा सन्मान केलेला आहे की अपमान ते आपल्या लक्षात येईल.