गोपाळ गणेश आगरकर यांची त्यांच्या हयातीत प्रेतयात्रा काढली होती, म. फुलेंना मारण्यासाठी रामोशी धाडले होते, तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती, नंतर त्यांना सदेह वैकुंठीही पाठवले, म. गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्याच झाल्यात. आंबेडकरांचा कित्येक वेळेस अपमान झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. (अशी असंख्य उदाहरणे देता येतील). किती मन दुखवले असेल या महापुरुषांनी त्या काळातील लोकांचे! त्याशिवाय बिच्चाऱ्या लोकांनी असे केले असेल का?
त्याचे असे आहे, समाजाच्या भल्यासाठी काम करताना, पुरोगामी विचार मांडताना त्यांचे कार्य व विचार यांचे महत्व व मोल न कळल्यामुळे (त्यांची इच्छा नसताना) असंख्य लोकं दुखावले जातात. ‘खरं तर ‘बुडति हे जन, देखवे न डोळा, म्हणूनि कळवळा वाटतसे’, ही भावना त्यांच्या कार्यामागे असते. परंतु, असे असले तरी असे काम करणाऱ्यांना शिव्या, अपमान, अवहेलना, एकटं पाडणे, मारहाण, त्रास, मृत्यू अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. जो या गोष्टींना पुरून उरतो व काम करत राहतो, त्याच्या मागे मग काही माणसं, समूह उभे राहू लागतात. त्याचे विचार व कार्य यातून समाजाचे काही एक भले होते. समाज विकासाचा पुढील टप्पा गाठतो. काही एक परिवर्तन घडून येते. समाजाला काही एक दिशा मिळते. अनेकांचे वर्तमान व भविष्य बदलते.
त्यानंतर मात्र त्याला त्रास देणाऱ्यांच्या पुढील पिढ्या (त्याच्या कार्याचा लाभ मिळाल्यामुळे) उद्धार करतात. त्यांचा संत, जगद्गुरू, समाजसुधारक, महात्मा, प्रखर विचारवंत असा उल्लेख करतात. त्यांच्या जयंत्या, मयंत्या साजऱ्या करतात, पुतळे उभारतात. त्यांची नावे विद्यापीठे, संस्था, बाजारपेठा, रस्ते, योजना यांना दिली जातात. त्यांच्या विचारांच्या विरुद्ध कार्य करणाऱ्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागते. त्यांची इच्छा नसतानाही त्यांचे नाव घ्यावे लागते. कारण हे महापुरुष मृत्यूनंतर समाजमनावर राज्य करतात. त्यांचे नाव घेतले तरी पुरेसे असते. (त्यांचेच नाव घेऊन त्यांचे विचारही संपवता येतात, हा भाग अलाहिदा!)
(बरंच लिहायचे होते, पण आवरतं घेतो.)
तात्पर्य,
१) परिवर्तनाचा विचार मांडणारे, त्यासाठी कार्य करणारे यांच्याकडून ते ज्यांच्यासाठी खपतात, त्यांच्यापैकीच काहींचे त्यांची इच्छा नसताना मन दुखवले जातेच.
२) असे मन दुखावल्या गेल्यामुळे त्यांना समाजाकडून विविध प्रकारचा त्रास सहन करावाच लागतो. काहींना प्राणालाही मुकावे लागते.
३) भविष्यात अशा लोकांचाच आदर्श (किमान नाव तरी) बहुतांश समाज घेतो.
© copyright
डॉ. राहूल पाटील