परीक्षांना सामोरे जाताना… (विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी उपयुक्त)

दरवर्षी असंख्य विद्यार्थी विविध परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अपयश येत असते. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले यश मिळत नाही. याचा अर्थ त्यांना परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा फॉर्म्युला माहित नसतो, असे म्हणावे लागेल. तेव्हा या यशाचा फॉर्म्युला मी आज आपणासमोर मांडणार आहे.

जगातील कोणत्याही परीक्षेला सामोरे जायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या पुढीलप्रमाणे-


१) अभ्यासक्रम
२) संदर्भग्रंथ
३) परीक्षेचे/ प्रश्नपत्रिकांचे स्वरूप
४) ग्रंथालय/ अभ्यासिका
५) मार्गदर्शक
६) तुमची मेहनत/ तुम्ही देत असलेला वेळ
७) तुमची इच्छाशक्ती/ ध्येयावरील अढळ निष्ठा

यापैकी प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. कशी ते आपण पाहुयात.

१) अभ्यासक्रम-

प्रत्येक परीक्षेचा एक अभ्यासक्रम असतो. तो आधीच ठरलेला व जाहीर झालेला असतो. तो आपल्याला अगदी व्यवस्थित माहित असायला हवा. किंबहुना तो पाठच असायला हवा. तो नेहमी आपल्या नजरेसमोर असायला पाहिजे. त्यामुळे आपल्या अभ्यासाला एक दिशा प्राप्त होते. आपण भटकत नाही. अशाने आपण कमी वेळेत परीक्षेची तयारी पूर्ण करू शकतो.

२) संदर्भग्रंथ-

त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातील घटक, मुद्दे, विषय ज्या पुस्तकांमध्ये अतिशय उत्तमरीत्या मांडलेले असतील अशी पुस्तके, संदर्भग्रंथ मिळवायला हवीत व त्यांच्यातून अभ्यास करायला हवा. यामुळे तुमचे त्या त्या विषयांचे ज्ञान पक्के होईल. संकल्पना स्पष्ट होतील. तुमच्या माहितीत भर पडेल. मग तुम्ही तोंडी, लेखी अशा कोणत्याही परीक्षेला सामोरे जाऊ शकणार.

३) परीक्षेचे/ प्रश्नपत्रिकांचे स्वरूप-

अभ्यासक्रम माहित आहे, संदर्भग्रंथ आहेत. मात्र परीक्षेचे व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप नेमके माहित नसेल तर तुमचा परीक्षेच्या ऐनवेळेस गोंधळ उडू शकतो. त्यासाठी किती पेपर आहेत, ते किती गुणांचे आहेत, किती प्रश्न विचारले जातील, त्यांचे स्वरूप कसे असेल, ते किती गुणांचे असतील, कोणत्या घटकाला किती महत्व आहे, हे अभ्यासाला सुरुवात करताना किंवा त्यानंतरच्या काही दिवसांतच माहित करून घ्यायला हवे. जेणेकरून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील, त्यांची उत्तरे कशी लिहावीत, किती ओळीत किंवा शब्दांत ते असावे, त्याची मांडणी कशी करावी, आकृत्या कोणत्या काढाव्यात याची पूर्वतयारी व सराव आधीच झालेला असल्याने परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल व पेपरही अधिक परिणामकारक व प्रभावीपणे लिहिता येतील.

४) ग्रंथालय/ अभ्यासिका/ अभ्यासासाठीची जागा-

ग्रंथालयात पुस्तके मिळतात व तिथेच अभ्यासिका असेल तर तुमची अभ्यासाची सोयही होते. नसेल तर तेथून पुस्तके घेऊन तुम्ही दुसऱ्या अभ्यासिकेत बसू शकतात. अभ्यासिकांमध्ये अभ्यासाचे वातावरण असते. तिथे तुम्हाला तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत असाल त्या किंवा इतर परीक्षांचा आधीपासून अभ्यास करणारे मित्र भेटतील. त्यांच्याकडून तुम्हाला अभ्यासाची प्रेरणा व मार्गदर्शन मिळू शकेल. तुमच्यात गटचर्चा होऊ शकतील. तुम्हाला काही शंका आल्यास किंवा एखादा मुद्दा समजत नसेल तर त्यांची मदत होईल. अशा अभ्यासिकांमध्ये बऱ्याचदा तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानेही आयोजित केली जातात. त्यांचा लाभ तुम्हाला होईल. तात्पर्य, अभ्यासिका व ग्रंथालयाचे खूप फायदे आहेत.

५) मार्गदर्शक –

कोणत्याही परीक्षेत लवकर यशस्वी होण्यासाठी योग्य, अभ्यासू व अनुभवी अशा मार्गदर्शकाची नितांत आवश्यकता असते. त्याला यशाचा मार्ग नीट माहित असतो. तो तुम्हाला भटकू न देता अगदी कमी वेळेत यशापर्यंत, ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. तो तुमच्याकडून त्या त्या वेळी जो आवश्यक आहे तो अभ्यास तो करून घेतो. तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येत असतील तर तो त्यांचे निराकरण करतो. तुम्ही निराश झालात तर तो प्रेरित करतो. तुमच्यात अतिआत्मविश्वास निर्माण झाल्यास तो तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव करून देतो. मार्गदर्शक एक किंवा विषयपरत्वे अनेक असू शकतात. थोडक्यात तो तुमचा वाटाळ्या असतो. तो तुम्हाला योग्य वाट दाखवतो. त्याचे महत्व वर्णावे तेवढे कमीच आहे.

६) तुमची मेहनत/ तुम्ही देत असलेला वेळ-

हे सर्व उपलब्ध असेल पण तुमची मेहनत घ्यायची व त्यासाठी पुरेसा वेळ द्यायची तयारी नसेल तर सर्व व्यर्थ आहे. एक शेर आहे- “लोग नाखुनों से बनाते हैं जमीं पे कुवाँ/ और उम्मीद ये करते है कि पानी निकले।” अर्थात लोकं पुरेशी मेहनत न घेता, योग्य साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करता यशाची अपेक्षा करतात.
तेव्हा पुरेसा वेळ देणे, आवश्यक तेवढी मेहनत घेणे, योग्य साधनांचा योग्य पद्धतीने वापर करून घेणे लवकर यश मिळविण्यासाठी गरजेचे असते.

७) तुमची इच्छाशक्ती/ ध्येयावरील अढळ निष्ठा-

धरसोड वृत्ती, सातत्याचा अभाव, गांभीर्य नसणे, ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ करणे इ. दुर्गुण तुमच्या यशातील खूप मोठे अडथळे ठरू शकतात. शेवटी तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणे व निश्चित ध्येय व त्या ध्येयावरील अढळ निष्ठा यशासाठी खूप महत्त्वाची आहे.

काही महत्वाच्या गोष्टी-

१) ‘जसा प्रश्न तसे उत्तर’-

हे सूत्र लक्षात ठेवा. म्हणजे आधी प्रश्न समजून घ्या. मग त्याचे उत्तर लिहा. अनावश्यक फाफटपसारा, नको असलेले मुद्दे, खूप कमी किंवा खूप जास्त लिहिणे, चुकीचे लिहिणे किंवा थापा मारणे, इ. गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. नेमके, काटेकोर व सूत्रबद्ध असे उत्तर लिहावे.
२) सुवाच्च हस्ताक्षरात पेपर लिहावेत. हस्ताक्षर किमान तुम्हाला व तपासणाऱ्याला समजणारे असावे.
३) सर्व प्रश्नांची उत्तरे लिहावीत.
४) सर्व प्रश्नांची जेवढी अपेक्षित आहेत, तेवढी उत्तरे लिहावीत. उत्तरात सर्व मुद्द्यांचा समावेश करावा.
५) शक्य तिथे योग्य व समर्पक आकृत्या काढाव्यात. तपासणाऱ्याच्या त्या लगेच नजरेत भरतात व चांगले गुण मिळतात.
६) शांत व प्रसन्न चित्ताने, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.
७) मुख्य परीक्षेच्या आधी सराव प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात.

या सर्व गोष्टी व्यवस्थित पाळल्या तर यश तुमचेच असते.

© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *