डोह
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
काम ही मानवी जीवनातील अतिशय प्रबळ अशी प्रेरणा आहे. तिच्यावर मानवी मनाचे नियंत्रण राहिले तर ठीक. अन्यथा तिने मानवी मन, मेंदू व शरीराचा ताबा घेतला तर ती माणसाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. ‘डोह’ ही कथा याच आशयसूत्रावर आधारलेली आहे.
‘डोह’ या कथेत मदारी हे एकमेव महत्त्वाचे पात्र आहे. त्याची आई, अम्मा, पुढे जिचे निधन झालेले आहे अशी एक सुंदर स्त्री या दोन्ही स्त्री व्यक्तिरेखा असून त्या गौण आहेत. या कथेतील मदारी हा नाग व नागिणीचा खेळ दाखवून त्याचा व त्याच्या अम्माचा उदरनिर्वाह भागवतो. तो अतिशय आडदांड व राकट शरीराचा तरुण आहे. त्याचे लग्न झालेले नाही. तो गर्दीच्या ठिकाणी जाऊन हा खेळ दाखवायचा. पुंगी वाजवून तो नाग व नागिनीचे मैथुन घडवून आणायचा. लोकं व तो स्वतः ते मैथुन बघायचे. ते मैथुन बघून त्याची वासनेची अतृप्त व सूप्त भूक उफाळून यायची. परंतु तिचा निचरा करणे शक्य नसल्याने तो ती दडपून टाकायचा. नुकत्याच मैथुन क्रीडा संपवलेल्या नागाचा वास त्याच्या देहातील सुप्त वासनेवर जाऊन आदळला की, त्याच्या संवेदना सळसळू लागायच्या. नागाच्या डोळ्यात त्याला पौरुषत्व जाणवायचे.