जीवनात यशस्वी होण्यासाठी शिबिरे आणि कार्यशाळांचे महत्त्व (शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वांसाठी उपयुक्त…)

              मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे शिकत असतो. अनेक खाजगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही कार्यशाळा, चर्चासत्रे, गट संमेलने, सभा, परिषदा या अनिवार्य केलेल्या असतात. अनिवार्य असल्यामुळे नाईलाजाने आपण त्या करून घेत असतो. आयोजकही कामकाजाचा भाग म्हणून सोपस्कार पार पाडत असतात. वैयक्तिक व्यवसाय, उद्योगधंदे करणाऱ्यांना तर आपल्या इथे अशा कार्यशाळा व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतेच असे नाही. आपणही पुढे-पुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो. जे रूटीन आहे ते चालू ठेवतो.

           शिक्षण घेत असतानाही अनेक विद्यार्थी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांच्या आयोजनामध्ये

हातभार लावत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना या गोष्टी कधीच शिकता येत नाहीत. (मात्र ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आयोजनात सहकार्य केले व जे या प्रक्रियेतून गेले, त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप यशस्वी झालेले मी पहिले आहे.) 

          मित्रांनो, विविध शिबिरे, कार्यशाळा यामधून मला स्वतःला खूप काही शिकायला मिळाले आहे व नवीन लोकं जोडता आलेली आहेत. नवनवीन लोकं, त्यांचे स्वभावविशेष, त्यांचे आपल्या क्षेत्रातील कार्य यांचा परिचय या निमित्ताने मला झालेला आहे.

              मी NSS मध्ये सात वर्ष काम केले. या काळात मला विविध शिबिरे व कार्यशाळांची आवड निर्माण झाली. या सात वर्षाच्या काळात मी NSS ची महाविद्यालय पातळीवरील ६ शिबिरे, १ जिल्हास्तरीय शिबिर, १ राज्यस्तरीय शिबिर अशी सात दिवसांची एकूण ८ शिबिरे तसेच २ दिवसांच्या २ कार्यशाळा माझ्या त्या-त्या वेळच्या सहकाऱ्यांसह आयोजित केल्या. तसेच अनेक शिबिरांना भेटी देऊन व्याख्याने दिली. 

               अशा शिबिरांचे व कार्यशाळांचे आयोजन करत असताना त्या-त्या गावातील लोकं, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, एस.टी. महामंडळातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, दुकानदार, औषध विक्रेते, डॉक्टर, फळे व भाजीपाला विक्रेते, विविध महाविद्यालयातील व क्षेत्रातील विषयतज्ज्ञ, विद्यार्थी, त्यांचे पालक अशा अक्षरशः असंख्य लोकांशी तुमचा संपर्क येत असतो. विविध पातळ्यांवरून या लोकांशी वेळोवेळी भेटून चर्चा करावी लागते. महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्याशी वाटाघाटी कराव्या लागतात. अर्थात यात आपला खूप सारा वेळ खर्ची पडत असतो. पण या सर्व प्रक्रियेतून आपल्यातील असंख्य सुप्त क्षमतांचा, कौशल्यांचा कस लागत असतो. त्या वापरल्या जात असतात व म्हणून त्यांचा विकासही घडून येत असतो.

             त्याव्यतिरिक्त मी धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे मुंबई विद्यापीठाच्या १० विद्यार्थ्यांचा संघ (५ मुलं, ५ मुली) Adventure Camp साठी घेऊन गेलो होतो. हे दहा दिवसांचे शिबिर होते. यात मी दोराच्या साह्याने नदी ओलांडणे, कडा चढणे, उतरणे, ट्रेकिंग अशा खूप गोष्टी शिकलो. (याविषयी सविस्तर वाचण्यासाठी या  लिंकवर क्लिक करा.  https://drrahulrajani.com/adventure-camp-report/) तसेच मी बाबा आमटे यांनी सुरू केलेले (सोमनाथ छावणी २०१६) ८ दिवसांचे एक शिबिर केले. त्याचप्रमाणे अक्षर मानव संघटनेने २०१८ मध्ये आयोजित केलेल्या ७ दिवसांच्या चित्रपट कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. या कार्यशाळेत चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेक दिग्गजांची व्याख्याने ऐकली. त्यामुळे मला चित्रपट या माध्यमाबद्दल खूप माहिती मिळाली. (याविषयी सविस्तर वाचण्यासाठी या  लिंकवर क्लिक करा. https://drrahulrajani.com/%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be/). तसेच अहमदनगर महाविद्यालयातर्फे आयोजित NSS च्या सातदिवसीय उद्बोधन वर्गातही मी सहभागी झालो होतो. (म्हणजे माझ्या आयुष्यातील ८५ दिवस मी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये घालवली आहेत. त्यांच्या नियोजनासाठी खर्चिलेले दिवस वेगळे!)

            अशी विविध शिबिरे व कार्यशाळांमध्ये सहभागी झाल्यामुळे मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात खालीलप्रमाणे खूप फायदा झालेला आहे.     

१) अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील लोकं व विद्यार्थ्यांसोबत काम केल्याने त्यांच्याकडून खूप सारे शिकायला मिळाले.

२) अनेक तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने ऐकल्यामुळे ज्ञानात, माहितीत भर पडली. जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण प्राप्त झाला. 

३) स्वतःमध्ये event management, human resources management, संवाद कौशल्ये, वक्तृत्व, सभाधीटपणा, माणसं जोडणे, व्यवहार, नेतृत्व गुण, अहवाललेखन, सादरीकरण, ट्रेकिंग व इतर अशी अनेक कौशल्ये विकसित करता आली.

४) समाजात, खेड्यापाड्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम केल्यामुळे तेथील समस्या लक्षात आल्या. त्यावर चर्चा, चिंतन, पुस्तकं- इंटरनेटवर शोध इ. ने काही मार्ग शोधून त्या पद्धतीने उपाययोजना करता आल्या, काम करता आले. 

५) ग्रामीण भागात व विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, राष्ट्रीय, आरोग्य, शिक्षण, समाजसेवा, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष समानता इ. विषयांबद्दल जाणीवजागृती निर्माण करता आली. स्वतःलाही हे विषय चांगले समजले.

६) अनेक माणसे जोडता आली.

७) अनुभवाने संपन्न होता आले, व्यक्तिमत्व विकासात खूप मदत झाली.

८) प्रत्यक्ष कामातून सकारात्मक, विधायक ऊर्जा मिळाली.

९) आयुष्यातील तेवढा वेळ अतिशय आनंदात घालवता आला.

१०) स्वतःची एक ओळख निर्माण करता आली.

 

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, कळत-नकळत अजून बरेच फायदे झाले. 

 

सांगायचे तात्पर्य,

आपण शिक्षण घेत असताना किंवा ते संपल्यावरही जर अशा कार्यशाळा, शिबिरे यांच्यात सहभाग घेतला तर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप फायदा होतो. त्यामुळे आपल्या मुलांना, भावंडांना, मित्रांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा व त्यांच्या व्यक्तिमत्वाला, जीवनाला आकार देण्यासाठी हातभार लावा.

 

(आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या संपर्कातील इतरांना नक्की शेअर करा. कारण त्यांना त्याचा नक्की लाभ होईल. 

धन्यवाद!)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *