वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०१८-१९
सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम!
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या समारंभात गेल्या वर्षभरात
महाविद्यालयात व महाविद्यालयाच्या बाहेर आंतर्महाविद्यालयीन, विद्यापीठ पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा विभागातून ज्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आज या ठिकाणी समारंभाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे.
या समारंभप्रसंगी अध्यक्ष म्हणून आपल्याला गोखले एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्री. बा. पंडित सर हे लाभलेले आहेत. तर
प्रमुख अतिथी म्हणून ,
रोटरी क्लब, बोईसर शाखेचे संचालक, मा. श्री. नारायणजी मोहिते,
तसेच
मा. डॉ. धनेश कलाल, शाखा सचिव, जव्हार युनिट
हे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत.
(आपण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांची नावे टाकायची आहेत.)
तसेच महाविद्यालयाच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य श्री दिनेशजी भट, श्री दिलीपजी तेंडुलकर हे देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त विचारमंचावर आसनस्थ झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम, उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील तसेच माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी डॉ. राहुल पाटील आणि मी प्रा. चेतन पवार आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.
स्वागत गीत
मित्रहो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागतगीताने करणार आहोत. महाविद्यालयाचे विद्यार्थी आता आपल्यासमोर छानसे स्वागत गीत सादर करतील.
दीपप्रज्वलन
मित्रांनो, भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनiने केली जाते. मी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की, त्यांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करावे.
प्रास्ताविक
यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांना निमंत्रित करतो.
प्रमुख अतिथींचा परिचय व सत्कार
मित्रांनो, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचे यथोचित स्वागत व सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. यानंतर आपण माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून घेऊयात.
1) आदरणीय प्राचार्य श्री. बा. पंडित सर. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संस्था गेल्या पन्नास वर्षांपासून मार्गक्रमण करीत असताना भरभराटीला आलेली आहे. त्यांना महात्मा गांधी व युगपुरुष विनोबा भावे यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला असून आयुष्यभर या दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते करीत आलेले आहेत. त्यांनी विविध विषयांवरच्या अनेक पुस्तकांचे लेखनही केलेले आहे. असे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री. पंडित सर यांचा सत्कार मा. श्री. राजेंद्रजी गावित यांनी करावा, अशी मी त्यांना विनंती करतो.
2) मा. श्री. राजेंद्रजी गावित हे पालघर मतदार संघाचे लोकनियुक्त खासदार असून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव असे योगदान असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीशी तसेच आपल्या महाविद्यालयाशी त्यांचे नेहमीच स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पंडित सर यांना विनंती करतो की, त्यांनी गावित साहेबांचा सत्कार करावा.
3) मा. श्री. नारायण मोहिते. संचालक, रोटरी क्लब, बोईसर. मोहिते सर यांना शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणाच्या क्षेत्रात विशेष रस असून महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने 27 जुलै 2018 रोजी आयोजित केलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोहिते सरांच्या प्रेरणेने व पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला होता. आपल्या महाविद्यालयाशी त्यांचे खूपच जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याकडून नेहमीच आपल्याला सहकार्य मिळत आहे. मी डॉ. धनेश कलाल यांना विनंती करतो की, त्यांनी श्री. नारायण मोहिते यांचा सत्कार करावा.
४) यानंतर मा. श्री. अर्जुन सुरूम हे देखील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विक्रमगड येथील गीतांजली गॅस सर्विसचे ते संचालक आहेत. उद्या महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित केल्या जात असलेल्या उडान महोत्सवाच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. तसेच एनएसएसच्या शिबीर प्रसंगी त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. मी —————————————— यांना विनंती करतो की त्यांनी श्री सुरूम यांचा सत्कार करावा.
वर्षभरात विशेष कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान
त्यानंतर वर्षभरात विशेष कार्य करणाऱ्या व विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
- महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अनिल पाटील.
या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रतिष्ठित अशा नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी ………………… रुपयांचे आर्थिक साहाय्य केले आहे. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी ……………………………………… यांचा सत्कार करावा.
- डॉ. प्रज्ञा कुलकर्णी
नाशिकच्या इनर विल क्लबकडून सहयोगीनी 2018 हा पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झाला. तसेच महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे संयोजक म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी …………………………………………….. यांना विनंती करतो की, त्यांनी ……………………………………… यांचा सत्कार करावा.
- डॉ. राहुल पाटील
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून पीएचडी पदवी संपादित केली
मुंबई विद्यापीठाकडून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून पुरस्कार प्रदान
एनएसएसच्या पालघर जिल्ह्याचे एरिया कॉर्डिनेटर म्हणून नेमणूक
एन एस एस अंतर्गत दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
नाशिक येथील व्ही एन नाईक महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून तर पालघर जिल्ह्यातील आठ महाविद्यालयांच्या शिबिरांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून निमंत्रित. तसेच
या वर्षी त्यांचा एक शोधनिबंध प्रकाशित झालेला आहे.
मी कलाल सर यांना विनंती करतो की त्यांनी राहुल पाटील सरांना सन्मानित करावे.
आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार
विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी महाविद्यालयातील प्राध्यापकांना त्यांनी त्या त्या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान केला जातो. 2018-19 या शैक्षणिक वर्षातील आदर्श प्राध्यापक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आता या ठिकाणी माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
या वर्षाच्या आदर्श प्राध्यापक पुरस्काराचे मानकरी आहेत डॉ. विजय शंकर शिंदे.
- नोव्हेंबर 2011 मध्ये अर्थशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती झाली. 2012 पासून ते महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक म्हणून सक्षमरीत्या जबाबदारी सांभाळत असून पालघर विभागाचे एरिया कॉर्डिनेटर म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच 2012 पासूनच परीक्षा विभागामध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत असून विभागाच्या कामकाजामध्ये त्यांनी नाविन्यता आणलेली आहे. त्यांनी 2 पुस्तकांचे लेखन केलेले असून अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे. मनमिळावू व सहृदय प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थीप्रिय आहेत.
मी …………………………………..यांना विनंती करतो की त्यांनी डॉ विजय शिंदे यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करावा.
तसेच आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराचे मानकरी आहेत श्री. गणेश शिंदे.
ते 2006 पासून महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. एन एस एस, परीक्षा विभाग या विभागांमध्ये त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. त्यांच्यावर सोपविलेले कोणतेही काम ते अतिशय जबाबदारीने व उत्कृष्ट रित्या पार पाडीत असतात. अतिशय मनमिळावू व कामसू स्वभाव, विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात. मी …………………………………..यांना विनंती करतो की त्यांनी शिंदे यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रदान करावा.
पुस्तक प्रकाशन सोहळा
मित्रांनो, आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक अध्यापन व ज्ञानदानासोबत संशोधन व लेखनकार्यही करीत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा माननीय अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते आता या ठिकाणी संपन्न होणार आहे.
- सर्वप्रथम महाविद्यालयाचे वार्षिकांक उत्कर्षचे प्रकाशन माननीय खासदार श्री राजेंद्र गावित यांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. महाविद्यालयाच्या वर्षभराच्या घडामोडी, विद्यार्थ्यांचे लेखन, प्राध्यापकांची विविधांगी कामगिरी या सर्वांचा आलेख उत्कर्षमध्ये आलेला असतो. उत्कर्ष म्हणजे महाविद्यालयाचे लिखित स्वरूपातील प्रतिबिंबच.
- यानंतर डॉ. हेमंत मुकणे लिखित जव्हार संस्थान ची शोधयात्रा व चरित्र कुंचल्यातील रंग-रेषा या दोन पुस्तकांचे प्रकाशन माननीय पंडित सरांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. या पुस्तकांमधून जव्हार संस्थानचा इतिहास तसेच जव्हार तालुक्यात जी लोकोत्तर व्यक्तिमत्वे होऊन गेलेली आहेत, त्यांच्या कार्याची ओळख मुकणे सरांनी करून दिली आहे.
- डॉ. पवन कुमार मुडबे यांनी प्राणिशास्त्र या विषयाच्या प्रथम वर्ष विज्ञान या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले पापुलेशन अँड नेचर स्टडिज हे पुस्तक मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन माननीय दिलीप पाटील सरांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो.
4. यानंतर आमच्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री सुनील वाघ यांच्या हस्तलिखित पुस्तिकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकांचे प्रकाशन माननीय मोहिते सरांनी करावे, अशी मी त्यांना विनंती करतो. श्री. वाघ यांना सुविचारांचे संकलन करण्याचा छंद आहे. त्यांनी हजारो सुविचारांचे संकलन हस्तलिखित स्वरूपात केले असून याअगोदर त्यांच्या तेरा हस्तलिखित सुविचारांच्या पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तिका त्यांनी शाळा-महाविद्यालये वाचनालय सामाजिक संस्थांना विनामूल्य दिलेल्या आहेत. या पुस्तिकांचा उपयोग फलक लेखन, शुभेच्छापत्रे, ललित लेखन व व्यक्तिमत्त्व विकासासाठी होत असतो. आज त्यांच्या हस्तलिखित संकलित सुविचारांची चौदावी पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत असतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
अहवाल वाचन
यानंतर गेल्या वर्षभरात महाविद्यालयात आयोजित केल्या गेलेल्या विविध उपक्रमांचा आढावा आपल्या अहवालातून आपणासमोर मांडण्यासाठी मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एम. भागडे यांना निमंत्रित करतो.
मान्यवरांचे मनोगत
मित्रहो, आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथीचा परिचय झालेला आहे. यावरून त्यांच्या कार्यकर्तुत्वाची आपल्याला माहितीच झालेलीच आहे. अशा कर्तुत्ववान व्यक्तींकडून आपल्याला बरेच काही शिकायला मिळत असते. त्यांचे विचार हे यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरत असतात.
तेव्हा आजच्या या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी मी मा. श्री. कृष्णा गौरप्रभू यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
अध्यक्षीय भाषण
आजच्या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय …………………………………………… .. यांना अध्यक्ष भाषण करण्याची मी विनंती करतो.
पारितोषिक वितरण समारंभ यादी वाचन
यानंतर कार्यक्रमाच्या ज्या भागाची तुम्ही फार उत्सुकतेने वाट पाहत आहात, त्या भागाकडे आपण वळत आहोत. वेगवेगळ्या स्पर्धा व परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आता या ठिकाणी होणार आहे. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या नावाची यादी वाचण्यासाठी मी माझे सहकारी डॉ. विजय शिंदे व डॉ. बी. व्ही. पवार यांना निमंत्रित करतो.
आभार
आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत. या समारंभप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आपला अमूल्य असा वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. त्यांनी आपल्याला अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी मी डॉ. अनिल पाटील यांना निमंत्रित करतो.
राष्ट्रगीत
कार्यक्रमाची सांगता