‘घोर’- (दाही दिशा) रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कथा)

               ‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्‍याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.

          आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे

पैसे उभे करणार होता. आता त्याची मुलगी लग्नाच्या वयाची झालेली असते. योगायोगाने तेव्हाच त्याच्या गावातून पक्क्या डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असते व त्या गावातील ज्या शेतजमिनीमधून हा रस्ता जाणार असतो, त्यात आबाची संपूर्ण शेतजमीन जाणार असते. कारण आबांचे हे शेत म्हणजे लांबच लांब पट्टीसारखे असते. आपले सर्वच शेत रस्त्यात जाणार, हे ऐकल्यावर आबाला धक्का बसतो. त्याला चालणं जड होऊन जातं. त्या दिवशी त्याला जेवणही जात नाही. ही गोष्ट तो बायको व गावकर्‍यांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या सर्वांना ही गोष्ट माहीत झालेली असते. बायकोकडून आबाला कळते की, रस्त्यात पाटलाची शेती जाणार होती, परंतु त्याने तहसीलात जाऊन संबंधित अधिकार्‍याला पैसे देऊन रस्त्याचा मार्ग बदलवायला लावला. म्हणून पाटलाऐवजी आबा व इतर शेतकर्‍यांची जमीन रस्त्यासाठी संपादित केली जात आहे.  

          वास्तविक शेतीचे संपादन झाल्यावर आबाला त्याचा सरकारकडून काहीएक मोबदला मिळणार होता. परंतु तो दोन वर्षात मिळेल की दहा वर्षात, हे कुणीही सांगू शकत नव्हते व इकडे मुलगी लग्नाच्या वयाची झालेली होती. तिला काही स्थळही सांगून आलेली होती. ही शेती विकून आबा तिचे लग्न लावून देण्याच्या बेतात होता. पण आता ते शेत कुणीही विकत घेऊ शकणार नव्हते.

          असेच दिवस जात राहतात. आबांची ज्या मुलासोबत इंदूच्या लग्नाची इच्छा होती, ते दुसरीकडे चांगला हुंडा मिळाल्यावर लग्न करून मोकळे होतात. इकडे आबा व त्यांच्या बायकोच्या चिंतेत वाढ होत जाते. पैशांची व्यवस्था लावल्याशिवाय मुलीच्या लग्नाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, हे आबांच्या लक्षात येते. एके दिवशी ज्या मुलावर आबांचा भरवसा होता, त्याही मुलाचे लग्न होते.  ही बातमी आबांच्या कानी येते. तेव्हा ते वैतागतात आणि चिडून “असी बोहारी पोट्टी कायले पैदा झाली असनं तं कांजन…मुळावर जलमल्यावानी. असं फुटकं नसीब घिऊन येवाचं व्हतं तं त्यापक्शा जल्माचच नोह्यतं . सगळ्यांच्या जिवाले घोर लावून ठिवला तं….” असे बोलून जातात.

          आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना त्रास होत आहे, आपण आपल्या वडिलांच्या गळ्यातील धोंडा आहोत, आपण त्यांच्यावर जन्माचं कर्ज घेऊन आलो आहोत, असा विचार करून इंदू रडत राहते. अशातच ती आजारी पडते. तिला ताप भरतो. सुरुवातीला साधा ताप समजून घरचे त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तिसर्‍या दिवशी ती अंथरुण पकडते. तेव्हा मात्र तिची आई बयाबाई हादरते. मुलगी आजारातून बाहेर पडणार की नाही, अशी शंका तिच्या मनात येऊन जाते. आबा शेतातून घरी आल्यावर त्यांना ती इंदूच्या तब्ब्येतीविषयी सांगते. आबा तिला हात लावून बघतात, तिला खूप जास्त ताप भरलेला असतो. ती रडत असते. तेव्हा आबा तिला समजावत म्हणतात की, “तू कायले रडतं बाई. रडू नोको. अवो तुह्या एवडा वाघासारखा बाप हाये. तू कायले फिकीर करतं वो?”, असे म्हणून आबा मनाशी काहीतरी निश्चय करून बाहेर पडतात आणि बैलांचे दावे सोडून त्यांना विकण्यासाठी नरखेडच्या बाजारात न्यायला निघतात. ते बैलांचे कासरे पुढे ओढतात. बैल पाय उचलत नाहीत. हंबरायला लागतात. इकडे बैलांच्या हंबरण्याचा आवाज ऐकून इंदू गोधडीत मान खुपसून हुंदके देऊन रडू लागते. इथे ही कथा संपते.

          ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलीच्या बापाला आपल्या मुलीच्या लग्नासाठी शेती किंवा चांगली बैलजोडीसुद्धा विकावी लागते व हुंड्याची तजवीज करावी लागते. मुलगी १८ वर्षाची होते ना होते तेवढ्यात खेड्यातील आईबापांना मुलीच्या लग्नाची काळजी सतावत राहते. इंदू जेमतेम १८ वर्षाची झालेली असेल. पण तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न होऊन दोन-तीन वर्ष झालेली असतात. म्हणजे त्यांचा बालविवाह झालेला असतो. इंदुच्या शिक्षणाचाही कुठेही उल्लेख या कथेत आलेला नाही. या कथेतील आबा, त्यांची पत्नी यांना तर मुलीच्या लग्नाची चिंता आहेच, परंतु स्वतः इंदूला आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना काळजीत राहावे लागत आहे, याचे दुःख आहे. तिलाही त्याचा घोर लागलेला दिसून येतो.

          त्याचप्रमाणे सरकार धरण, रस्ते किंवा इतर प्रकल्पांसाठी जेव्हा शेतकर्‍यांची जमीन संपादन करते तेव्हा त्याचे मत विचारात घेतले जात नाही. त्याचा मोबदला वेळेवर व पुरेसा दिला जात नाही. तसेच सरकारी अधिकारी लाच घेऊन गावातील श्रीमंत लोकांचे आर्थिक हित साधतात. त्यामुळे गरीब शेतकरी कुटुंब कसे उद्ध्वस्त होते, हे देखील या कथेतून बघावयास मिळते.

          ग्रामीण भागात गरिबीमुळे आपल्या मुला-मुलींचे लग्न कसे करावे ही एक बिकट समस्या शेतकरी कुटुंबापुढे उभी राहिलेली आहे. अलीकडे तर एक वेळेस मुलीचे लग्न होऊन जाते. परंतु मुलांच्या लग्नाचा त्याच्याहीपेक्षा मोठा प्रश्न ग्रामीण भागात आ वासून उभा राहिलेला आहे. मात्र ही कथा १९९१ साली लिहिली गेली असल्याने त्या काळात गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला खूप त्रास व्हायचा. मग त्यासाठी शेती, बैलजोडी, घरदार यापैकी काही तरी विकून मुलींची लग्ने करावी लागायची किंवा मग नाईलाजास्तव अतिशय गरिबाच्या घरीही मुलींची लग्ने लावून दिली जायची, या वास्तवावर ही कथा प्रकाश टाकते.  

          हुंडा ही अतिशय क्रूर पद्धत आजही ग्रामीण भागासह एकूणच भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आहे. या प्रथेमुळे अनेक कुटुंबियांच्या दारिद्र्यात, चिंतेत भर पडलेली आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. या कथेत देखील आबांना आपली शेती विकायची होती. परंतु आता शेती विकू शकत नसल्याने ते बैलजोडी विकण्याचा निर्णय घेतात. बैलजोडी असो की शेती या दोन्ही गोष्टीच शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे खरे साधन आहेत.  शेती रस्त्यात जाणार आहे व मुलीच्या लग्नासाठी बैलजोडी विकल्याने आबांच्या कुटुंबाला आता उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीशिवाय दुसरे कोणतेही साधन उरणार नाही आहे, असे दिसून येते. अशा पद्धतीने या कथेतून लेखकाने ग्रामीण भागातील लग्नाच्या वयाच्या मुलींचे व तिच्या पालकांचे दुःख, त्यांची व्यथा, काळजी यांचे अतिशय समर्थपणे चित्रण केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *