‘मोर्चा’ ही कथा शिवराम व त्याची आठ वर्षाची मुलगी सुशी यांच्यातील प्रेमळ नाते व सुशी मोर्च्यात हरवल्यामुळे कथेच्या शेवटी त्यांची झालेली ताटातूट, त्यामुळे शिवरामची झालेली सैरभैर अवस्था यावर आधारलेली आहे.
शिवरामची बायको त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष नांदते. त्या दरम्यान त्यांना एक मुलगी होते. ती म्हणजे सुशी. सुशी एक वर्षाची असताना शिवरामची बायको एका ठेकेदारासोबत पळून जाते, त्याच्यापासून तिला पुढे तीन अपत्ये होतात, असे
शिवरामच्या कानावर आलेले असते. बायको पळून गेल्यानंतर शिवराम खचून जातो. ती पळून गेल्याचे त्याला फार दुःख होत नाही. पण ती एका वर्षाची मुलगी मागे टाकून गेली. त्यामुळे तो जास्त दुखी व कष्टी होतो. पण त्यातून हळूहळू स्वतःला सावरतो. तो घराची संपूर्ण जबाबदारी स्वतः सांभाळतो. बाईसारखे घरातील स्वयंपाक, स्वच्छता, मुलीची काळजी इत्यादी सर्व कामे करून तो शेतमजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात निंदणी-खुरपणी इत्यादी कामे करायला जातो. तो पुरुष असून त्याला औताचं कोणतेही काम जमत नाही. म्हणून तो बायकांसोबत निंदणी-खुरपणीची कामे करून स्वतःचा व सुशीचा उदरनिर्वाह भागवत राहतो.
वास्तविक शिवरामच्या लग्नाच्या दोन वर्षाच्या आतच त्याची बायको पळून गेलेली असते. तो तरुण असतो. त्याने ठरवले असते तर तो दुसरे लग्नही करू शकला असता, परंतु आपल्या मुलीची हेळसांड नको म्हणून तो दुसरे लग्न करत नाही. आता त्याला फक्त आपल्या मुलीचाच आधार असतो. तिला लहानाचं मोठं करून तिचे लग्न झाल्यावर तिच्याचकडे राहण्याची स्वप्ने तो पाहत राहतो. त्याच्या लग्नाबद्दल जेव्हा काही बायका त्याला “काय सिवराम भौ, दुसरा घरठाव न्हाई करत का? पाट लावून घे नं. यका पोरीवर का उभी जवानी काढाया राह्यला?” असे विचारतात. तेव्हा तो त्यांना “माह्यी सोन्यावानी पोरगीच मले प्यारी हाये. लगंन करून बी काय भेट्टे व बिचारे दुस्त्रीबी तसीच निघाली तं का मी आखीन तीस्त्री करनं? त्यापरीस माह्या पोरीचाच सौंसार सजोन आनं तिच्या दाठ्ठ्यावर कुत्र्यावानी उगामुगा बसून राह्यत जाईन…” असे उत्तर देतो.
त्याचे त्याच्या मुलीवर खूप प्रेम असते. तो तिच्या सर्व गरजा, तिने मागितलेल्या वस्तू तिला आणून देत असतो. ती शाळेत जात असते, पण तिच्याकडे पाटी नसते. तेव्हा तो तिला येत्या रविवारी पाटी, वही, पेन्सिल, झग्गा, रेबिन आणून देणार असतो. ती सॅंडल आणायला सांगते. तो तिला पुढच्या महिन्यात आणणार, असे आश्वासन देतो. मात्र त्याची ही सोबत, सहवास कायमस्वरूपी टिकत नाही.
नागपूरला सरकारविरुद्ध विधानसभेवर मोर्चा असतो. गावातील पाटील गावातील लोकांना स्वखर्चाने वरून दिवसभराची शेतातील कामाची मजुरी (एका दिवसाचा मोबदला) देऊन नागपूरला मोर्च्यात सहभागी होण्यासाठी घेऊन जातो. मजुरीही मिळणार, जायचे यायचे भाडे नाही, वरून नागपूर बघायला मिळणार, म्हणून शिवराम मुलीला घेऊन गावातील लोकांसह रेल्वेत बसून नागपूरला जातो. त्या मोर्च्यामध्ये अनेक गावातील लोकं सहभागी झालेली असतात. गर्दी हळूहळू वाढत जाते. खरंतर असेंबली म्हणजे काय?, मोर्चा कशासाठी, कोणत्या मागण्यांसाठी काढलेला आहे, हे देखील शिवरामला व गावातील लोकांना माहीत नसते. पण फुकटात सर्व होत आहे. वरून मजुरी मिळत आहे, म्हणून ते मोर्च्यात सामील झालेले असतात.
गर्दी वाढू लागल्यावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका गाडीत १५-२० पोलीस येतात व ते मोर्च्याच्या बाजूने चालू लागतात. तेवढ्यात मोर्च्यातील कोणीतरी एक दगड उचलून पोलिसांच्या गाडीवर मारतो. पोलीस त्याला पकडून मारायला सुरूवात करतात. गर्दीतील माणसे चिडून पोलिसांना मारायला सुटतात. पोलीस स्वंरक्षणासाठी व गर्दीला पांगवण्यासाठी आधी लाठीहल्ला व नंतर अश्रूधुरांच्या कांड्या फोडतात. मोर्चा बिथरतो. लोक सैरावैरा पळू लागतात. चेंगराचेंगरी, आरडाओरडा सुरू होतो. या पळापळीत, चेंगराचेंगरीत शिवरामकडून सुशीचा हात सुटतो. ती हरवते. हे सर्व आटोपल्यावर तो तिला जिथे ही चेंगराचेंगरी झाली, तिथे व नंतर रस्तोरस्ती व शहरामध्ये शोधतो. तिच्या विरहात तो अक्षरशः व्याकूळ होतो. आपली मुलगी चेंगराचेंगरीत सापडून मेली तर नाही ना?, पोलिसांनी तिला पकडून नेले असेल ना?, ती कुठे गेली असेल?, तिचे काय झाले असेल? तिला आता कसे शोधावे, असे अनेक प्रश्न त्याला पडतात. तो तिला दिवसभर रात्री उशिरापर्यंत शोधत राहतो. पण सुशी काही त्याला सापडत नाही. तो अक्षरशः पोलीसांना, रस्त्यावरील इतर माणसांना विचारत राहतो.
कथेच्या शेवटी एक कुत्र्याचे पिल्लू त्याच्यासोबत चालू लागते. त्याच्या पायात घुसू लागते. शिवराम त्याला जवळ घेतो. त्या कुत्र्याच्या पिल्लालाच विचारतो “माही सुशी कुठी गेली बाप्पा, तू तरी सांग राजा माही पोरगी कुठी हारोली?” शेवटी तो हमसून-हमसून हुंदके देत रडत राहतो व कथा संपते.
एका बाप व लेकीच्या हृदय नात्यावर ही कथा आधारलेली आहे. सुशी ही आठ वर्षाची असते. शिवरामने वयाच्या पहिल्या वर्षापासून तिचे पालनपोषण केलेले असते. तिच्या आईची उणीवही तोच भरून काढत असतो. तो तिची आंघोळ घालून देतो. स्वयंपाक करतो. भांडीकुंडी-कपडेलत्ते धुतो. सुशी आठ वर्षाची होते तिला काही प्रमाणात तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीवही व्हायला लागते. मात्र बालपणही पूर्ण संपलेले नसते. एके ठिकाणी ती शिवरामला असे म्हणते की, “उद्यापासून माह्य आंग मीच धुत जाईन. तू माह्य आंग धुत तं मले लाज वाट्टे”. तो स्वयंपाक करतो. एकदा ती त्याला म्हणते की, “दाजी तू कायले सैपाकपानी करतं गा? ….तुले बायका रांडोन्या म्हन्ते नं. तुले असं महन्लं का मले राग येते.” अशा पद्धतीने बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, काळजी, त्या नात्यातील बारकावे लेखकाने सूक्ष्मपणे टिपलेले दिसून येतात. सुशी हरवल्यानंतर शिवरामच्या झालेल्या सैरभैर मानसिक अवस्थेचे चित्रण लेखकाने अतिशय सहानुभूतीने केलेले आहे.
या कथेत मोर्च्यातील पळापळ, चेंगराचेंगरी व या धावपळीत शिवराम व सुशी याची झालेली ताटातूट हीच महत्त्वाची घटना असून या घटनेने मात्र दोघा बाप-लेकीचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले दाखविले आहे. शिवराम व सुशी हीच दोन महत्त्वाची पात्रे या कथेत आहेत. ही कथा तृतीयपुरुषी निवेदन तंत्रातून लिहिलेली असून निवेदनासाठी प्रमाण मराठी भाषेचा तर संवादासाठी वैदर्भी बोलीभाषेचा वापर लेखकाने केलेला आहे.