बहुजनांनी मोक्याच्या जागा का मिळवाव्यात? भविष्यात काय करावे?

गोविंदराव पानसरे यांच्या ‘जात, धर्म…’ नावाच्या एका पुस्तकात त्यांनी शेतमजूर कुटुंबातून आलेला न्यायाधीश व जमीनदाराच्या कुटुंबातून आलेला न्यायाधीश यांनी एकाच गुन्ह्यातल्या आरोपींना

वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये वेगवेगळा निकाल कसा दिला होता, याचे उदाहरण दिलेले आहे. यावरून महत्त्वाची पदे बहुजन समाजातील पुरोगामी लोकांनी मिळवणे किती गरजेचे आहे, हे लक्षात येते.

त्याचप्रमाणे आपल्या समाजाचे, देशाचे हित कशात आहे, हे समजून न्याय देणे, निर्णय घेणे, आपले कर्तव्य पार पाडणेदेखील गरजेचे आहे. कारण बहुजनांमधील पण अनेक शिकले, नोकऱ्यांना लागले. पण ‘नको त्या विचारांच्या संघटनांच्या’ आहारी जाऊन ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ असे वागू लागले. यांनी समाजाचे प्रचंड नुकसान केलेले दिसून येते.

अनेक जण तर फक्त पोटभरू नोकरदार आहेत. त्यांचे डोकेच काम करत नाही. आपण काय करतोय, कुणामुळे शिकलो, नोकऱ्यांना लागलो, त्यांना काहीच कळत नाही.

अनेक जण वैयक्तिक स्वार्थ, पदोन्नती, पैसा, सत्ता यांच्या मागे लागून समाजाचे हित करायला, प्रसंगी संघर्ष करायलाच विसरले.

असे असले तरी

बहुजनांच्या पुढच्या एक-दोन पिढ्यांना ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र ध्यानात ठेवून अहोरात्र झटावे लागेल, तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगले भविष्य आहे. अन्यथा … कठीण आहे.

१०००-११०० वर्षे टिकलेला, या मातीत रुजलेला बौद्ध धम्म व विचार जवळपास समूळ उपटून टाकलेल्या, हजारो वर्षे वाचन-लेखनाचा, कट कारस्थानांचा वारसा असलेल्या बहुजन समाजाचा बुद्धिभेद करण्यात पटाईत असलेल्या मनुवादी ताकदीशी आपल्याला लढायचे आहे व ही प्रवृत्ती नष्ट करायची आहे, हे लक्षात घ्या.

आपल्याला संविधान, संविधान व महापुरुषांनी शिकविलेली मूल्ये समजून घेऊन ती समाजात खोलवर रुजवावी लागतील.

संविधानामुळे शेकडो वर्षांनंतर आता कुठे चांगले दिवस येऊ लागले होते. आपल्या करंटेपणामुळे, बौद्धिक आळसामुळे सगळेच हळूहळू हातातून निसटत चालले आहे.

सावध व्हा.
जरा शहाणे व्हा.
सुधरा.

© – डॉ. राहुल पाटील

(पुढे या सर्व छोट्या मोठ्या लेखांचे पुस्तक काढणार आहे म्हणून कॉपीराईट करून ठेवतो व मूळ लेखकाचे नाव कट करून स्वतःच्या नावाने खपवणे अनैतिक असते, हे लक्षात घ्या. बाकी माझे नाव तसेच ठेवून कितीही शेअर केले तरी माझी हरकत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *