प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,
स. न. वि. वि.
आनंदवनमध्ये डॉ. अब्राहम कावूरचे “चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात आणि त्याला विरोध न करणारे षंढ असतात”, हे विधान वाचण्यात आले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मूळ गावी म्हणजे अमळनेर तालुक्यात आलो. अमळनेरमध्ये मंगळग्रह मंदिर आहे. जे (दुकान)१५-२० वर्षापूर्वी केव्हातरी सुरू झाले. तरी त्याला अतिप्राचीन, अतिदुर्मीळ, अतिजागृत (हे जरा अति होतंय!) असे म्हटले जात आहे. असो. तर या ठिकाणी दररोज त्यातल्या त्यात दर मंगळवारी खूप मोठा चमत्कार बघायला मिळतो. या दिवशी ज्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे अशी हजारो लोकं इथे त्याला शांत करण्यासाठी येतात.
इथल्या पुरोहितांच्या घरी हा मंगळ पाणी भरत असतो. त्यामुळे हे १०८ लोकांना एकाच वेळेस बसवितात. (त्यांच्याकडून प्रत्येकी ३०१ रु. ची पावती फाडतात. आता १०८ × ३०१= ३२५०८/- only अशी बेरीज होत असते. पण कृपया इकडे लक्ष देऊ नका. आम्ही शेतकऱ्यांची मूले असल्यामुळे आमच्यावर आयुष्यभर कर्ज असते. म्हणून आम्हाला अशी आकडेमोड करायची सवय लागलेली असते.) आणि त्यांच्या मंत्रसामर्थ्याने हा मंगळ जिथे कुठे पाणी भरायला गेलेला असतो. त्याला ओढून आणतात. (किंवा मंगळवारी त्याला पाणी भरण्याच्या कामातून सुट्टीही देत असावेत. आम्हाला त्याच्या सुट्टीचा दिवस माहिती नसल्यामुळे अधिक बोलणे चुकीचे होईल.) अर्धा तासभर त्या १०८ लोकांच्यामध्ये त्याची आपल्या मंत्रसामर्थ्याने संस्कृतमधून अशी काही उलटतपासणी व कानउघाडणी करतात की, तो स्वत:हून येऊन यांच्या कानात सांगतो की, “महाराज चूक झाली. आता यापुढे या १०८ लोकांच्या वाट्याला मी कधीच जाणार नाही. क्षमा असावी महाराज.”
महाराजांच्या लक्षात येते की, आपण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ घेऊन मुर्खपणा केलेला आहे. मग लगेच ते नंतरच्या (शो ला सुरुवात करतात) १०८ जणांना बसवतात. परत तोच प्रकार अर्धा तासभर चालतो. दिवसातून असे किती शो होतात. हे सामान्य माणसाला ठाऊक नाही, कृपया याची नोंद घ्यावी. कारण (सामान्य माणसाला ते द्यावेच लागते म्हणून देतो) आपल्या पत्रिकेतील मंगळ शांत झाला, या आनंदात व कृतकृत्य झाल्याच्या अतीव समाधानात तो घरचा रस्ता धरतो. ज्याच्या पत्रिकेत तो नसतो. ते आमच्या वाट्याला येऊ नको, अशी विनंती करून तात्काळ पळ काढतात. तिथे काही प्रमाणात झाडं असल्याने अनेक तरुण-तरुणी दुष्काळी कामांसाठी येतात. त्यांना (दुष्काळाच्या वर्षात) एकमेकांच्या डोळ्यातील गाळ काढून तळ शोधायलाच वेळ नसल्याने त्यांचे इकडे (या शो कडे) लक्ष नसते.
तर असो. दुष्काळात काही कामं नसल्याने आम्हाला एवढा वेळ मिळाला, सुज्ञांनी व सुशिक्षितांनी जास्त विचार करू नये, ही कळकळीची विनंती.
आपला
राहूल
(२५ मे २०१६)
(सर्वप्रथम हे मंदिर १९२३ मध्ये स्थापन झाले. आताचे जे मंदिर आहे, त्याची व ट्रस्टची स्थापना १९९९ मध्ये झालेली आहे, हे स्वतः या ट्रस्टचे उपाध्यक्ष व सचिव मान्य करतात. पुढील लिंक ओपन करून व्हिडिओमध्ये पहा. – https://youtu.be/NpbNBsSxA5c तरीही त्याला अतिप्राचीन असे समजतात, काय करावे!)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरावर जाऊन पूजा करून घेणाऱ्यांना, त्याचे प्रस्थ वाढविणाऱ्यांना मी काय बोलावे, काहीच कळत नाही. म्हणजे काही बोललं की यांच्या भावना दुखावल्या जातात. तरीही बोलतोच. ● एक म्हणजे अंधश्रद्धाळू, प्रचंड घाबरलेले किंवा कुणीतरी घाबरवलेले, काही उच्चशिक्षित, श्रीमंत, नको तिथे बुद्धी पाजळणारे आणि अशा ठिकाणी “काय फरक पडतो एखादा विधी करून घ्यायला, काही होत नाही पण उगाच रिस्क कशाला घ्यायची” असा विचार करणारे. ● दुसरे म्हणजे बोके, कसाई. ज्यांना पक्कं माहीत आहे की असं काहीही नसतं; पण पहिल्या प्रकारातल्या लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणारे, या बकऱ्यांना कापणारे कसाई.
इथे दोन प्रकारचे लोकं आहेत.
हे मंदिर म्हणे ‘अतिप्राचीन, अतिदुर्मीळ, अतिजागृत’! कुणी ठरवलं? बोक्यांनी, कसायांनी. २५ वर्षापूर्वी इथं कुत्रसुद्धा फिरकत नव्हतं (असं म्हणायचं असतं, तेव्हा कुत्रेच फिरकायचे. कदाचित त्यांच्यासोबत डुकरंही फिरकत असतील) आणि म्हणे अतिप्राचीन. …