अंत:करणाचे बोल!
बहुजन समाजात जन्माला आलो. बहुजन समाजात लहानाचा मोठा झालो. प्रचंड कष्ट करून जिद्दीने चांगले उच्च शिक्षण घेतले. पीएचडी पदवीसाठी संशोधन करतानाही मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्यांचा अभ्यास करून काहीएक प्रमाणात ग्रामीणांच्या म्हणजेच बहुजनांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला. (जो आजही चालू आहे व पुढेही चालू राहणार.) बहुजन समाजाच्या जगण्यात विधायक व सकारात्मक बदल घडवून आणणार्या विचारधारा व संत, महापुरुषांच्या विचारांशी संवादी राहून आतापर्यंत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत राहिलो. बहुजन समाजाच्या सर्व क्षेत्रातील मागासलेपणाची कारणे वेगळी शोधण्याची आवश्यकता भासली नाही. कारण आपले
समाजसुधारक, महापुरुष कित्येक शतकांपासून ती सांगत आली आहेत. ती म्हणजे अज्ञान, निरक्षरता, अंधश्रद्धा, सावकारांकडून, धनाढ्यांकडून पिळवणूक, धर्माच्या नावाने शोषण, सत्तेत-नोकर्यांमध्ये, मोक्याच्या जागी, निर्णयप्रक्रियेत पुरेसे प्रतिनिधित्व नसणे, इत्यादी.
आतापर्यंत स्वाध्याय, सद्गुरू, निरंकारी महाराज, ओम शांती, वारकरी, महानुभाव व नवीनांमध्ये साईभक्ती, समर्थबैठका इत्यादी धार्मिक चळवळींशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे.
या सर्व मंथनातून काहीएक भूमिका निश्चित होत गेली. (जिच्यात लवचिकता आहे, कट्टरता नाही) तीच भूमिका व्हाट्सअप, फेसबुक व ब्लॉग या समाज माध्यमांमधून व व्याख्यानांमधून मांडत राहिलो. जिचा सार साधारणत: पुढीलप्रमाणे सांगता येईल-
- बहुजनांची मुले शिकावीत. त्यांनी उच्चशिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व विवेकी व्हावे आणि आपापल्या क्षेत्रातील उच्च पदे प्राप्त करून आपल्या समाजाचा, पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणावा.
- बहुजन समाजाचे धर्माच्या नावाने चालणारे सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण थांबावे. किंबहुना त्यांनी ते ओळखून होऊ देऊ नये.
- बहुजन समाजाने आपली बुद्धी, संपत्ती, श्रम हे व्यर्थ निरर्थक कर्मकांडांमध्ये किंचितही वाया न घालवता या त्रयींचा समाजाच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी सदुपयोग करून घ्यावा.
- बहुजन समाजात जागतिक दर्जाचे संशोधक, विचारवंत, खेळाडू, अभ्यासक, उद्योजक निर्माण व्हावेत. यासाठी गावोगावी-खेडोपाडी वाचनालये, क्रीडांगणे, प्रयोगशाळा, प्रशिक्षण संस्था उभ्या राहाव्यात. आपली बुद्धी, श्रम, संपत्ती बहुजन समाजाने यासाठी खर्ची घालावी.
- शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, स्त्रिया यांना सन्मानाने जगता येईल, अशी समाजव्यवस्था-अर्थव्यवस्था उभी राहावी.
इत्यादी इत्यादी सूत्रे माझ्या आतापर्यंतच्या पोस्टमध्ये व व्याख्यानांमध्ये होती. पण हे सर्व मांडत असताना मी माझ्याच समाजबांधवांमध्ये शहाणा, अतिशहाणा, दीडशहाणा ठरलो. असो!
असे असले तरी बहुजन समाजाच्या हिताचा विचार यापुढेही करत राहणार व ‘सत्यशोधकां’चा वारसा चालवत सत्य मांडत राहणार. कारण या व्यतिरिक्त माझ्या आयुष्याचे दुसरे ध्येय तरी काय आहे!
(उच्चवर्गीय व उच्चवर्णियांना हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. कारण ते या बाबतील सदैव जागृत असतात.)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113