भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की,
‘तुमचे मत वाया गेले की सत्कारणी लागले’. म्हणजे तुम्ही ज्यांना मत दिले तो निवडून आला की नाही. यावरून त्यांना कळते की समोरच्याने कुणाला मतदान केले. आपल्याकडे निवडणुकांच्या आधीपासून एक्जिट पोल, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून असे वातावरण तयार केले जाते की, अमुक पक्ष, उमेदवार बहुमताने निवडून येणार व सत्तेत बसणार व अमुक हरणार. असे वातावरण मतदारांवर चुकीचा प्रभाव टाकत असते. लोकं मग त्यांच्याही नकळत आपले मत वाया जाता कामा नये, असा विचार करू लागतात व काठावर किंवा जेमतेम निवडून येऊ शकणार्या पक्षाच्या पारड्यात भरघोस मते टाकून त्यांना फार मोठ्या बहुमताने निवडून आणतात. या मानसिकतेमुळे लोकशाहीला कुठे तरी धोका पोहचतो. समजा एखाद्या मतदारसंघात 3 लाख मतदान झाले. वरील मानसिकतेने लोकांनी मतदान केल्यामुळे जिंकलेल्या उमेदवाराला समजा २५०००० व पराभूत उमेदवाराला फक्त ५०००० च मते मिळाली. तर जिंकून आलेला उमेदवार पुढील ५ वर्ष मला कुणाचीही भीती नाही, पुढच्या निवडणुकीत पाच-पन्नास हजार मते एकडे-तिकडे झाली तरी मला काहीही फरक पडत नाही, अशा पद्धतीने विचार करून काम करू शकतो. पण समजा तो पाच-दहा हजार मताधिक्याने निवडून आला असेल तर तो जबाबदारीने कामकाज करू शकतो. तेव्हा कोण निवडून येणार आहे व कोण नाही, असा पुढचा विचार न करता आपल्याला जो योग्य व लायक वाटतो, अशाच उमेदवाराला मत द्या. अशाने खर्या अर्थाने कुणामागे किती जनमत आहे, हे कळते. उगीच कुणामध्ये न्यूनगंड, नैराश्य तर कुणामध्ये अहंगंड, मुजोरीपणा, अतिआत्मविश्वास निर्माण होत नाही.
सारांश, तुम्ही ज्याला मतदान केले तो निवडून आला काय आणि पराभूत झाला काय, तुमचे मत कधीच वाया जात नसते. उलट त्यामुळे लोकशाहीत सत्ताधारी व विरोधात असलेल्या पक्षांमध्ये असलेला समतोल टिकून राहतो व लोकशाही समृद्ध होते. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचे सत्ताधारी पक्षांइतकेच महत्व आहे.
© Copyright
डॉ. राहुल रजनी