रुबाब भाबी : काही आठवणी व इतर अनुभव

माझे आईवडील मुंबईत कांदिवलीतील लक्ष्मीनगर नावाच्या एका झोपडपट्टीत राहायचे. (माझे वडील तिथे ३५ वर्षे राहिले.) निसार माझ्याहून १३ दिवसांनी मोठा. मी लहान असताना त्याची आई रुबाब भाभी आमच्या दोघांची आंघोळ घालून द्यायची. तेलाने मस्त मालिश करून द्यायची. रुबाब भाबीचे सासरे माझ्या आई वडिलांना मुलामुलीसारखे मानायचे. त्यांची तिथे खूप जमीन होती. त्यापैकी एखाद दोन प्लॉट ते माझ्या

आईवडिलांना द्यायला तयार होते. यांनी घेतले नाहीत. आज त्या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये राहिली असती. १९९३ च्या दंग्यांच्या वेळेस माझे वडील माझ्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने गावी आले व तिकडे दंगे सुरू झाले. माझ्या ५ वर्षाच्या भावासह आई तिकडे दंग्यांमध्ये सापडली. फोन नाही, काही नाही. आई तिकडे प्रचंड घाबरलेली. इकडे वडिलांच्या मनात भीती होतीच. पण लक्ष्मीनगरमधील मुस्लिम लोकं सांगून गेले की, “ताई, आम्ही तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. काळजी करू नका. तुम्हाला काही आणायचे असेल तर आम्हाला सांगून देत चला. आम्ही आणून देत जाऊ. तुम्ही बिनधास्त रहा.” खरंच आई सुरक्षित राहिली. अन्यथा आज एकट्या बाईची काय अवस्था झाली असती, याची कल्पनाच केलेली बरी.
यानंतर मात्र आईने मुंबई सोडली व ती गावी आली. पोटापाण्यासाठी वडिलांना त्यानंतर २० वर्षे म्हणजे २०१३ पर्यंत मुंबईतच राहावे लागले आणि आजूबाजूला रुबाब भाभी, त्यांचे दिर, जावा, पुतण्या, सुना, इतर अनेक मुस्लिम कुटुंब असताना माझे वडील एकटे तिथे आईने मुंबई सोडल्यावरही २० वर्ष राहिले. आजही आई वडिलांसोबत मुंबईत गेल्यावर लक्ष्मीनगरमध्ये जाऊन सर्वांना भेटते. आमच्या घराला लागूनच म्हणजे ५ फुटावरच एक छोटीशी मस्जिद होती. मी एक-दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना मुद्दामहून विचारले की, “तुम्ही इतके वर्ष मुस्लिमबहुल वस्तीत राहिले, तुम्हाला काही संशयास्पद आढळले/ जाणवले का?” ते “नाही” म्हणाले. यातच सर्व काही येऊन जाते.
मी लहानपणीच मुंबई सोडली. शिक्षणासाठी गावी मामांकडे राहिलो. सुट्ट्यांमध्ये मुंबईला जायचो. तेव्हा आमची रूम लहान असल्याने मला कधीकधी रात्री  तिथे राहणाऱ्या मुस्लिम बांधवांपैकी कुणाकडेही झोपायला पाठवायचे. मला थोडी भीती वाटायची. पण आज वाटते ती निरर्थक होती. गावाकडे राहू लागल्यामुळे कदाचित ती भीती मनात निर्माण झाली असावी. मी २३-२४ वर्षांचा असेन. मुंबईत मुलाखतीसाठी गेलो होतो. वडील सकाळी कामावर निघून गेले. दुपारी माझी परतीची रेल्वे होती. रुबाब भाभीचा निरोप घेताना मला व तिलाही अश्रू अनावर झाले. तिने मला जवळ घेतले. अशी माझ्यासाठी अश्रू ढाळणारी रुबाब भाबी अखेरपर्यंत माझ्या काळजात घर करून राहिल!

माझ्या लग्नानंतर मला दोन मुले असताना (म्हणजे आता तीन साडेतीन वर्षांपूर्वी) जव्हारमध्येही इमरान भाई व बब्बू भाई यांच्या शेजारी आम्ही दीड वर्ष राहिलो. माझी मुले त्यांच्याकडे, त्यांची मुले माझ्याकडे बिनधास्त राहिली, खेळली. माझ्या मुलांना त्यांनी, त्यांच्या मुलांना आम्ही हाताने जेवू घातले. आम्ही एकमेकांकडे जेवलो.
आजही माझ्या बाजूला शेख व इतर कुटुंबीय राहतात. नेहमी छान बोलतात, प्रसंगी मदत करतात.
आतापर्यंत इतरांनी माझा व मी इतरांचा धर्म बाटविण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. (चिकित्सेने, जुन्या व कालबाह्य प्रथा, कर्मकांडे सोडून दिल्याने एखादा धर्म बाटत असेल, धोक्यात येत असेल तर तो धर्म कमकुवत समजावा.)
मागे बरोबर एका वर्षापूर्वी माझ्या एका पोस्टवरून वाद निर्माण होऊ घातला होता. पण मला ओळखणाऱ्या लोकांनी तो परस्पर मिटवला. पण असे वाद मी आंबेडकरांबद्दल टाकलेल्या एक – दोन उपरोधात्मक पोस्ट काहींना न समजल्यामुळे व हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींबद्दल लिहिल्यामुळे अनेकदा उद्भवले आहेत.
तेव्हा मला असे वेगळे वाईट अनुभव बिलकूल नाहीत. जे आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या लोकांकडून मिळत नाहीत.
शेवटी मी एवढेच म्हणेन की जे लांब राहतात, तेच द्वेष करतात, जे जवळ राहतात त्यांना वाईट अनुभव कमी व चांगले अनुभव जास्त राहतात.


चेतना बुधे यांच्या फेसबुकवरील https://m.facebook.com/story.php?story_fbid=833086414087888&id=100021596104290 या लिंकवरच्या पोस्ट वरून मला हे अनुभव, आठवणी व व्यक्ती यांच्याबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
धन्यवाद चेतना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *