स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न

           स्त्रियांचे शोषण करणार्‍या, त्यांना दुय्यम लेखणार्‍या, त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य प्रथा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. मात्र एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये काही प्रमाणात जागृती निर्माण होऊ लागली. पाश्चात्य शिक्षण, प्रबोधन यामुळे भारतातील

सुशिक्षित वर्गाचे आपल्याकडील अनिष्ट प्रथा, परंपरा, स्त्रियांचे प्रश्न याकडे लक्ष गेले. 

       एकोणीसाव्या शतकात राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंदी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाह, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, केशवपन प्रथा बंद व्हावी, महादेव गोविंद रानडे यांनी स्त्री-पुरुष समानता, जरठ-कुमारी विवाह बंदी, विवाहासाठी किमान वयोमर्यादा, गोपाळ गणेश आगरकर यांनी बालविवाह बंदी, स्त्री पुरुष समानता, समान संधी इत्यादी मागण्यांसाठी या विविध समाजसुधारकांनी संघर्ष केला.

आपली लेखणी व प्रत्यक्ष कार्य या माध्यमातून या बदलांसाठी समाजमन अनुकूल करण्याचे व सरकारला त्यासाठी कायदे करायला लावण्याचे काम केले. महात्मा फुले यांचे या संदर्भातील व्यापक कार्य व विचार उल्लेखनीय आहेत.

           नंतरच्या काळात महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांना सामावून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूधर्मातील स्त्रियांना पुरुषांबरोबर मालमत्तेत समान अधिकार व इतर हक्क मिळावेत म्हणून ‘हिंदू कोड बिल’ तयार केले. राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच मतदानाचा अधिकार दिला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले. त्यांचे स्त्री शिक्षणासाठीचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. 

             थोडक्यात, भारतात स्त्रियांच्या मानवी हक्कांसाठी अनेक पुरुषांनी संघर्ष केल्याचे दिसून येते. यातूनच स्त्रीमुक्तीची कल्पना आकारास येत गेली. भारतातील वरील समाजसुधारकांचे कार्य व जागतिक पातळीवर स्त्रियांच्या हक्कांसाठी सुरू असलेली आंदोलने यातून स्त्रीवादी साहित्य लेखनाला सुरुवात झाली. 

© Copyright

डॉ. राहुल रजनी

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा.  https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *