प्रस्तावना :
साहित्याला समाजजीवनाचा आरसा असे म्हणतात. त्या-त्या कालखंडातील श्रेष्ठ अशा साहित्यकृतींमधून समकालीन घडामोडी, विचारप्रणाली, त्याचा जनमानसावर होणारा परिणाम याचे काल्पनिक पात्रे व घटनाप्रसंगांच्या माध्यमातून वास्तव असे चित्रण केलेले असते. म्हणूनच आपल्याला तत्कालीन समाजाचे दर्शन घडत असते. म्हणून साहित्य हे समाजजीवन अभ्यासण्याचे एक महत्वाचे साधन मानले जाते.
पाकिस्तान निर्मितीची घटना ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची राजकीय घटना आहे. भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर या घटनेचे तात्कालिक व दूरगामी असे अनेक परिणाम घडून आलेले आहेत. १९४५ च्या आसपास पाकिस्तान निर्मितीचा विचार जोर पकडू लागला होता. इंग्रजांनी या विचारांना खतपाणी घालण्याचे काम केले. मुस्लीम लीग हा मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता. या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा जोरदार पुरस्कार करायला सुरुवात केली. मोहम्मद अली जिनांचे नेतृत्त्व याच मुद्द्यावरून पुढे आले. मुस्लिमबहुल गाव व शहरांमध्ये या विचारांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीमागची कारणे, त्यामागची विचारधारा, त्यासाठी निवडलेले मार्ग, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आणि या घटनेचे परिणाम यांचे चित्रण १९६० ते १९७५ या कालखंडातील या कादंबर्यांमधून पुढीलप्रमाणे आलेले आहे.
मराठी ग्रामीण कादंबर्यांमधील चित्रण :
मराठीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्यांपैकी हमीद दलवाई लिखित ‘इंधन’ (१९६८) ही अतिशय वास्तववादी स्वरूपाची कादंबरी आहे. या कादंबरीत पाकिस्तान निर्मिती, त्या दरम्यान झालेले दंगे, मोहम्मद अली जीना इ. गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. या कादंबरीत कोकणातील एका मुस्लीमबहुल खेड्याचे जीवनचित्रण आलेले आहे. या गावातील मुसलमानांचा पाकिस्तान निर्मितीसाठी जीनांना पाठिंबा होता. ते मुस्लीम लीग या पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी तिथल्या मापारी मशिदीजवळ दंगाही घडवून आणलेला होता. नायकाच्या वडिलांना आणि इतर मुसलमानांना असे वाटायचे की, “पाकिस्तान मिळालं की, सब कुछ ठीक होईल. इकडे मुसलमान, तिकडे हिंदू राहिले की कुणी कुणाच्या केसाला धक्का लावणार नाही.” १ परंतु, स्वातंत्र्य मिळून पंधरा वर्षे झालीत तरी हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लीम संबंधांत आणि भारत-पाकिस्तानात प्रचंड तणाव राहिला. हे बघून नायकाच्या वडिलांना असे वाटते की, पाकिस्तान निर्मिती ही जीना साहेबांकडून झालेली मोठी चूक आहे. एकदम स्वतंत्र पाकिस्तान मागण्याऐवजी भारताशी कुठे तरी बांधून घ्यायला हवे होते. म्हणजे अशी वाईट अवस्था झाली नसती. जीनासाहेब एवढे हुशार होते. परंतु, ही चूक त्यांच्या हातून झाली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. परंतु, आम्ही अडाणी, अशिक्षित प्रजा होतो. ते पुढारी होते. त्यांनी आम्हाला सुधारायचे काम होते.
यावरून, भारत-पाक फाळणीला पंधरा वर्षे उलटल्यावर पाकिस्तान निर्मिती ही जीनांकडून झालेली एक मोठी चूक आहे, असे या कादंबरीतील मुसलमानांना वाटत असल्याचे दिसून येते. कारण ज्या हेतूसाठी पाकिस्तानची मागणी केली होती. तो पूर्ण होऊ शकला नाही. हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाक यांच्यातील संबंध नंतरच्या काळातही तणावग्रस्त राहिले.
या कालखंडातील इतर मराठी कादंबर्यांमध्ये या संदर्भातील चित्रण आढळले नाही.
हिंदी ग्रामीण कादंबर्यांमधील चित्रण :
Read More