एक हिरवे पान
(SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला या वर्गाच्या मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील कथा)
‘एक हिरवे पान’ ही कथा प्रत्येक माणसाला जगताना कुणाच्यातरी आधाराची गरज असते, या विषयावर आधारलेली आहे. या कथेमध्ये दुल्लू मियाँ, बिसमिल्ला, वैदा या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या तिघांचेही वैवाहिक जीवन या ना त्या कारणाने उद्ध्वस्त झालेले असल्याने ते कुणाचा ना कुणाचा आधार शोधत राहतात.
दुल्लू हा साधारणतः पन्नाशीच्या पुढचा व्यक्ती आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे. त्याला वैदा नावाची एक मुलगी आहे. ती लग्नाच्या वयाची आहे. त्याची आई लालबी ही खूप म्हातारी असते. मुलीचे लग्न व आईचे निधन झाल्यावर आपल्यासोबत कोण राहणार?, आपल्याला कुणाचा आधार उरणार? याची चिंता त्याला सतावत राहते. आपल्याला म्हातारपणात कुणाची तरी साथ राहावी, म्हणून तो बिसमिल्ला नावाच्या मुलीशी लग्न करून घेतो. ती त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असते. तिला आई-वडील नव्हते. तिचे लग्न झालेले असते. पण नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिचे सासू-सासरे तिला घरातून बाहेर काढतात. तेव्हा दुल्लू तिच्याशी पाट लावून घेतो व तिला आश्रय देतो. त्यांच्या लग्नाला सहा महिने होत नाहीत, तेवढ्यात ती एका मुलीला जन्म देते. दुल्लूला हे माहित असते की, ती मुलगी आपल्यापासून झालेली नाहीये. तरीही तो बिसमिल्लाला एक शब्दही बोलत नाही. उलट बाळंतपणात तिची खूप काळजी घेतो. तिचे सर्व आवरतो. तिच्यासाठी मेव्याचे लाडू बांधतो व दररोज स्वतः तिला एक-एक लाडू खाऊ घालतो. दोन महिने तिला पाण्यात हातही घालू देत नाही.
चार महिन्यातच बिस्मिल्लाचे पोट वर आल्याचे दिसू लागते. तेव्हा त्याची आई त्याला तू तिला घरातून बाहेर का हाकलून देत नाही, असे म्हणते. तेव्हा तो तिला “आम्मा, उसकू हकेल दू तो कहाँ? उसका अपने सिवा कौन है?” असे उत्तर देतो. मुलीचा जन्म झाल्यावर काही महिन्यांनी जेव्हा तो त्या मुलीला बाहेर फिरायला नेऊ लागतो. तेव्हा बायका त्याला ही तुझीच मुलगी आहे का? असे विचारतात. तेव्हा तो बावळटासारखा हसून “बायकोची पोरगी आणि नवऱ्याची पोरगी का वाटल्या जाते का वो बाई?” असा प्रतिप्रश्न विचारतो.
अशा प्रकारे दुसऱ्यापासून झालेल्या मुलीला तो आपले समजून सांभाळतो. बिसमिल्लाला हे बाळ कुणापासून झाले आहे, हे तो तिला कधी विचारतही नाही. तरीसुद्धा मुलगी एका वर्षाची व्हायच्या आधीच दुल्लूशी दीड वर्षाचा संसार करून बिसमिल्ला एके दिवशी त्याला सोडून पळून जाते. दुल्लूला यामुळे खूप दुःख होते. तो तिला बायकोपेक्षा मुलगी जास्त समजायचा. तिला म्हातारपणाची काठी समजायचा. तिच्या अशा जाण्यानंतर त्याची जणू जगण्याची उमेदच संपून जाते. तो पुरेसे जेवण करत नाही. बकऱ्यांना चारायला नेत नाही. घर खर्च चालवण्यासाठी त्याला पाच-सहा बकऱ्या विकाव्या लागतात. त्याची मुलगी वैदा हीच बकऱ्यांना चारायला नेते किंवा मग दोन-दोन दिवस बकर्या बांधलेल्यात राहतात. ती थोडाफार पाला आणून त्यांना टाकते. वैदाचे लग्नाचे वय जात राहते, पण तो तिच्यासाठी मुलगा शोधायलाही जात नाही. दिवसभर घरात पडून राहतो. त्याचे कशातच चित्त लागत नाही. दुल्लूला एकाच गोष्टीचे दुःख जास्त होते की, आपण तिचे इतके केले. तिने जाताना फक्त सांगून जायला हवे होते. मी तिला नाही म्हणालो नसतो.
एके दिवशी त्याला कुणाकडून तरी कळते की, बिसमिल्ला ही नागपूरमधील मोमिनपुर्यातल्या एका पानठेलेवाल्याच्या घरी आहे. हे ऐकल्यावर त्याला बरे वाटते. तो तिला भेटायला नागपूरला जातो. खूप शोधल्यावर त्याला ती ज्याच्या घरी राहत होती, त्या रमजानमियाँचे घर सापडते. तो व्यक्तीही त्याला घरात घेतो. चांगली वागणूक देतो. बिसमिल्लाची भेट घालून देतो. तिची तब्येत इथे राहून सुधारलेली असते. ती सुखात आहे, हे पाहून तो सुखावतो. रमजान जेव्हा त्याला विचारतो की, तू आता बिस्मिल्लाला घेऊन जाणार का? तेव्हा तो “ऐसा नै साब. वो तैयार होंगी तो ले जायेंगे, नै तो यहाँच रहेंगी” असे उत्तर देतो. ती पुन्हा गरोदर असते. तिच्या खर्चासाठी रमजानला शंभर रुपये देतो. पण रमजानची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने तो ते घेत नाही. उलट त्याला जेवू-खाऊ घालून परत पाठवतो.
यानंतर दुल्लू वैदाचे लग्न करून देतो. ती बिसमिल्लाच्या मुलीला घेऊन सासरी निघून जाते. तिचा नवरा तेलघाण्यावर काम करायचा.
दरम्यानच्या काळात दुल्लू जास्त म्हातारा दिसायला लागतो. त्याच्या कमरेत वाक येतो. त्याचे केसही अधिक पांढरे होतात. त्याच्या चेहर्यावरच्या सुरकुत्याही वाढतात. त्याची आई जास्त म्हातारी झाली होती. खरसोलीमधील लोकं बिस्मिल्लाला विसरून जातात. अशातच एके दिवशी बिस्मिल्ला खरसोलीमध्ये दुल्लूकडे परत येते. तिला बघायला सर्व गावातील बाया-माणसाची गर्दी लोटते. दुल्लूची आई लालबी तिला “सतरा यार करके अब और यहाँ आयी क्या? ऐसी कायकू आयी? यहाँ आनेसे कही मर जाती तो वो छूट जाता. अब और कायकू उसकू सतानेकू आयी? कोई और देखना यार होगा तो” अशा शिव्या तिला घालते. ती मुकाट्याने सर्व ऐकून घेते.
सर्व गेल्यावर दुल्लूला तिची कहाणी सांगते. रमजान तिच्या शरीराचा विक्रय करून पैसे कमावणार होता. तिने नकार दिल्यावर तो तिला मारतो. तिला दारू पाजण्याचा प्रयत्न करतो. रात्री परपुरुषाला घरात आणून तिच्यावर जबरदस्ती करू लागतो. हे सर्व असह्य होऊन ती त्याच्या घरातून पळून जाते व दुल्लूशिवाय तिलाही दुसर्या कुणाचा आश्रय नसल्याने त्याच्याकडे परत येते. यानंतर ती बकर्या चारायला जाऊ लागते. दुल्लूचे घर सांभाळते. गावातील लोकांची निंदा शांततेने सहन करते. त्यानंतर काही दिवसात ती पुन्हा गरोदर राहते. लालबी व सर्व गाव तिच्यावर टीका करते. पण या वेळीही दुल्लू तिला एक शब्दही बोलत नाही. त्यानंतर काही दिवसांनी सात महिन्यातच बिसमिल्ला बाळंत होते. अपूर्ण दिवसात बाळंतपण झाल्याने, ते मुल दोन तासातच मरते. यावेळीही दुल्लू तिची रात्रंदिवस देखभाल करतो.
पण याच दरम्यान दुल्लूच्या मनावर जबरदस्त घाव घालणारी घटना घडते. दुल्लूच्या मुलीचा – म्हणजे वैदाचा नवरा मरण पावतो. वर्षभराच्या आत वैदा विधवा होते. दुल्लूला मोठा धक्का बसतो. तो तिच्या सासरी जाऊन तिला माहेरपणासाठी घरी आणतो. बिसमिल्ला व वैदाची तीन वर्षानंतर भेट होते. वैदा बिसमिल्लाला खूप सुनावते. बिस्मिल्लाची मुलगीही थोडी मोठी झालेली असते. बोलायला लागलेली असते, पण ती आईच्या जवळ येत नाही. सासरी जातानाही वैदा बिसमिल्लाला चांगले खडसावून जाते. “अब और किसके साथ भागेंगी? मेरा आबा अब बुढा हो गया. उसकू अब तकलीब मत दे. तू तो माँ बोलने के लायक नही. और सुन, वो पेटमें का मैला निकालके फेंक दे. नही खुदकी तो दुनियाकी तो शरम रख” असे म्हणते. तिचे हे बोलणे बिसमिल्लाला चटका लावून जाते.
अशातच एके दिवशी वैदा आपल्या छोट्या सावत्र बहिणीसोबत माहेरी निघून येते व दुल्लूच्या गळ्यात पडून रडू लागते. कारण तिच्या नवर्याच्या मृत्यूनंतर तिचा सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवतो. तिच्याशी संबंध ठेवू पाहतो. तिने नकार दिल्यावर वैदाला पाठ व मांड्यांवर वळ उमटतील इतके मारतो. म्हणून ती माहेरी पळून येते. हे सर्व ती सांगत असताना बिसमिल्ला चुलीजवळ जाऊन चूल पेटवते व त्याच्यावर एक कापड गरम करून ती वैदाजवळ येऊन तिच्या पाठीवर ठेवून तिची पाठ शेकू लागते. वैदाला बिसमिल्लाच्या डोळ्यात पहिल्यांदाच मातृत्व दिसते. ती बिसमिल्लाचे दोन्ही हात पकडून रडू लागते व तिच्या नकळत तिच्या तोंडातून ‘माँ’ ही हाक बाहेर पडते. इथेच ही कथा संपते.
थोडक्यात, प्रत्येक माणसाला जगताना कुणाच्या तरी आधाराची गरज भासत असते. दुल्लूला पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आधार हवा असतो. तो बिसमिल्लाशी लग्न करतो. दुल्लू म्हातारा असतो. बिसमिल्लाला त्याच्यात तिचे भविष्य दिसत नसावे. म्हणून ती रमजान मियाँसोबत पळून जाते. तो चुकीचं वागल्यावर पुन्हा दुल्लूकडे परत येते. वैदासुद्धा खूप कमी वयात आईचे निधन झाल्यामुळे आईच्या मायेला पारखी होते. लग्नानंतर तिचे आयुष्य सुधारू शकले असते, पण नियतीमुळे तिला वर्षभरातच वैधव्य येते. तेव्हा तिला मूलबाळ पण नसते. ती सावत्र बहीण व सासर्याच्या आश्रयाने राहते. तर सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवतो. तेव्हा ती आधारासाठी वडिलांकडे निघून येते. ती बिसमिल्लाचा खूप तिरस्कार करायची. पण यावेळी तिला बिस्मिल्लामध्येच मातृत्वाचे दर्शन घडते. तेव्हा ती तिला ‘माँ’ म्हणून हाक मारते.
तिघांपैकी प्रत्येकाचे तसे वैवाहिक जीवन हे अपयशी ठरलेले आहे. दुल्लूची पहिली पत्नी वारलेली आहे. बिसमिल्ला त्याच्या दृष्टीने पत्नीपेक्षा त्याच्या मुलीसारखी आहे. बिसमिल्लाच्या पण पहिल्या पतीचे निधन झालेले आहे. दुल्लूसोबत ती पाट लावून राहते. रमजान मियाँसोबत पळून जाते. पण त्याच्याकडून वाईट अनुभव आल्यामुळे दुल्लूकडे परत येते. दुल्लूपासून तिचे शारीरिक समाधान होऊ शकत नसल्याने तिचे काहींशी शारीरिक संबंध येत राहतात. दुल्लूची मुलगी वैदा ही देखील वर्षभरातच विधवा होते. अशाप्रकारे आता या तिघांना एकमेकांचा आसरा उरतो.
या कथेत खरसोली या गावातील दुल्लू या मुस्लीम व्यक्तीचे कुटुंब केंद्रस्थानी आहे. दुल्लू, लालबी, बिस्मिल्ला, वैदा, रमजान ही या कथेतील मुख्य पात्र असून सर्वच पात्रे मुस्लिम असल्याने त्यांच्या आपापपासतील संवादाची भाषा हिंदी आहे. मात्र ही हिंदी भाषाही प्रमाण हिंदी नसून गावगाड्यातील हिंदी बोली आहे. त्यांचा गावातील इतर व्यक्तींची जो संवाद होतो, ती संवादाची भाषा मात्र वैदर्भीय बोली आहे. तसेच निवेदनाची भाषा ही प्रमाण मराठी आहे.
संदर्भग्रंथ-
दाही दिशा (कथासंग्रह), रवींद्र शोभणे, विजय प्रकाशन, नागपूर, दुसरी आवृत्ती २००७.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113