गुंता (कविता)
कितीही टाळा
विचार येतातच डोक्यात
सतत एक रंधा फिरत असतो
डोकं दुखू लागतं
एक विचार काढण्यासाठी
दुसरा विचार करा
दुसरा काढण्यासाठी तिसरा
तिसरा काढण्यासाठी
पुस्तक हातात घ्यावं
तर जे वाचलं त्यावर विचार…
ते काढण्यासाठी मोबाइल हातात घ्या
त्यावर जे पाहिलं, ऐकलं, वाचलं
त्यावर विचार…
ते टाळण्यासाठी कुणाला भेटा, गप्पा करा
तर तो जे बोलला त्यावर विचार…
विचार… विचार… विचार…
आयुष्य म्हणजे दुसरं राहिलंय तरी काय?
फक्त विचार… विचार नि विचार…
विचारांचा हा चरखा
सरणावर तरी थांबेल ना?
(१४/१०/२०२१)
© डॉ. राहुल पाटील