ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे

ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे

(१)

ग्रामीण आणि दलित साहित्यलेखनाला सुरुवात होऊन आता बराच काळ लोटला आहे. या साहित्यप्रकारांवर आतापर्यंत खूप चर्चा व लेखनही झालेले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात साहित्याच्या प्रवाहाबाहेरील, दुर्लक्षित, उपेक्षित अशा जीवनाविषयीचे दलित व ग्रामीण साहित्य आज मराठी साहित्याचा मध्यवर्ती प्रवाह बनलेलेले आहे, ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे.

दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्याने भारतीय साहित्याला दिलेली मोठी देणगी आहे. खास मराठी मातीतून उगवलेलं, अस्सल देशीवादी साहित्य म्हणून या साहित्याचा उल्लेख करता येईल. प्रस्थापित मराठी साहित्य हे मध्यमवर्गीय जीवनाभोवती रुंजी घालत असताना, रंजनवादी, कलावादी विचारांचा मराठी साहित्यावर जबरदस्त प्रभाव असताना ग्रामीण व दलित साहित्याने मराठी साहित्याला वास्तवाभिमुख, समाजाभिमुख करण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे.

ग्रामीण आणि दलित साहित्यात पुष्कळ साम्य आहे. त्यातील एक म्हणजे या दोन्ही प्रकारच्या साहित्यात गावातील व गावकुसाबाहेरील लोकांच्या जीवनाचे चित्रण आलेले आहे. मात्र ग्रामीण साहित्यात गावकुसाच्या आतील लोक केंद्रभागी असतात; तर दलित साहित्यात गावकुसाबाहेरील. उपेक्षित विश्वाचे, खऱ्या-खुऱ्या दुःखांचे, मानवी भावभावनांचे, ग्रामीण भागात, गावकुसाबाहेर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दुर्लक्षित, अज्ञान, दारिद्र्य, भूक, शोषण, वेदना यांनी पिचलेल्या समाजाचे, इथल्या मूळ मातीचे, लोकपरंपरांचे, लोकसंस्कृतीचे, शिक्षणाने, महापुरुषांच्या विचारांनी, कार्याने जागृत झालेल्या, परिवर्तनाच्या टप्प्यावर, उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या, आत्मभान प्राप्त झालेल्या, आपल्या हक्कांसाठी, साध्या माणूसपणाच्या अधिकारासाठी विद्रोहास सज्ज असलेल्या मानव समुहांचे, त्यांच्या बदलत चाललेल्या जीवनाचे, येथल्या कृषिसंस्कृतीचे, आदिम जीवनाचे अशा या मध्यमवर्गीयांना अपरिचित असलेल्या विश्वाचे दर्शन ग्रामीण व दलित साहित्याने मराठी वाचकाला घडविले.

(२)

मराठीत ग्रामीण कादंबरी खूप मोठ्या प्रमाणात लिहिली गेलेली आहे. डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या ‘मराठी ग्रामीण कादंबरी’ या ग्रंथाच्या शेवटी त्यांनी जोडलेल्या परिशिष्टात ‘बळीबा पाटील’ (१८८८) ते ‘घोंगरवाडी’- दास मोरे (२०००) अशा २४१ ग्रामीण कादंबऱ्यांची यादी दिलेली आहे. त्यानंतरही ‘बारोमास’, ‘पाडा’ या व इतर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. दलित साहित्यात कथा, कविता, आत्मचरित्रे, आत्मकथने या वाङ्मय प्रकारांपेक्षा दलित कादंबऱ्या ह्या संख्येने कमी आहेत. त्यातही मूळ दलित नसलेल्या लेखकांनी दलित जीवनावर लिहिलेल्याही अनेक कादंबऱ्या आहेत. त्याही दलित प्रश्नांचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या आहेत. दलित आणि ग्रामीण कादंबऱ्या विषय व आशयाच्या दृष्टीने इतर मराठी कादंबऱ्यांहून भिन्न स्वरुपाच्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीला फडकेप्रणित कलावादाकडून वास्तववादाकडे आणले आहे. किंबहुना वास्तववादाचे भक्कम अधिष्ठान प्राप्त करून दिलेले आहे. यासंदर्भात ‘बळी’ (१९५०) – विभावरी शिरुरकर, ‘बनगरवाडी’ (१९५५) – व्यंकटेश माडगूळकर तसेच गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, उद्धव शेळके यांच्या कादंबऱ्यांचा उल्लेख करता येईल.

(३)

ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये जो आशय आलेला आहे, त्यात खेडे, गावगाडा, बलुतेदारी, निसर्गकेंद्रितता, कृषिआधारित जीवनपद्धती, एकत्र कुटुंब, आदिमता, अज्ञान, अंधश्रद्धा, शेती, बदलते ऋतू, शेतीतील वेगवेगळी कामे, दुष्काळ, महापूर, शेतकऱ्यांचे शोषण, हलाखी, कर्जबाजारीपणा, प्राणीजीवनाचे चित्रण, लोकजीवन, रूढी-परंपरा, सण-उत्सव, यात्रा, समूहभावना, नातेसंबंध, एकप्रकारचा रांगडेपणा यासारख्या गोष्टी केंद्रस्थानी वा पार्श्वभागी आहेत. हा ग्रामीण साहित्याचा गाभा आहे. या पार्श्वभूमीवर मग वेगेवेगळ्या घडामोडी, घटना, व्यक्ती, पात्रे यांची निर्मिती करून कादंबरीपरत्वे वेगवेगळा आशय आलेला आहे.

१९२० पूर्वीच्या ‘बळीबा पाटील’ (१८८८) व ‘पिराजी पाटील’ (१९०२) या पहिल्या कालखंडातील कादंबऱ्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, वरिष्ठ वर्गाकडून शेतकऱ्याचे होत असलेले शोषण, त्यांची हलाखी या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. या कादंबऱ्यांवर विशेषतः ‘बळीबा पाटील’वर म. फुले यांच्या विचारांचा स्पष्ट प्रभाव आहे. १९२० नंतर ना. वि कुलकर्णी, वि. वा. हडप व इतर लेखकांनी ग्रामीण कादंबरीलेखन केलेले असले तरी र. वा दिघे यांच्या कादंबऱ्यांनी मराठी वाचकाचे लक्ष वेधून घेतले. तत्कालीन मध्यमवर्गीय कादंबऱ्यांहून नव्या व वेगळ्या अनुभवविश्वामुळे ‘एका नव्या सोन्याच्या खाणींचा शोध’ असेच त्यांच्या कादंबऱ्यांचे वर्णन ल. ग. जोग यांनी केलेले आहे. त्यांच्या ‘पाणकळा’, ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘आई आहे शेतात’ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. या कादंबऱ्यांमध्ये शेतकऱ्याचे निसर्गावलंबी जीवन, त्याचे दारिद्र्य सावकारी पाश, भूमिहीनांच्या समस्या, दुष्काळामुळे होणारी वाताहत, घराण्यांची पूर्वापार वैमनस्ये, त्यातून उद्भवणारे संघर्ष, प्रणयचित्रण, कुळकायद्यामुळे जमीनदार व कुळ यांच्यात निर्माण झालेला संघर्ष, विघटित होत चाललेली कुटुंबसंस्था, ग्रामव्यवस्था यासारख्या गोष्टींचे चित्रण आलेले आहे.

त्यानंतर आलेल्या ‘बळी’, ‘बनगरवाडी’ व ‘धग’ या कादंबऱ्यांनी त्यांच्यातील वास्तव जीवनचित्रणामुळे एकूणच मराठी कादंबरीला वास्तवाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचविले. ‘बळी’ या कादंबरीत जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित केल्या गेलेल्या मांगगारूडी समाजाच्या जीवनाची शोकांतिका आलेली आहे. ढोरमेहनत घेऊन, प्रसंगी चोऱ्या करून, शरीरविक्रय करूनही पोटभर खायला मिळत नाही. स्वातंत्र्यानंतरही या समाजात परिवर्तन घडून आलेले नाही, याचे जिवंत चित्रण ही कादंबरी करते. ‘बनगरवाडी’ या कादंबरीतून धनगर मेंढपाळ समाजाचे, त्यांच्या जीवनशैलीचे, ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेला येत असलेल्या अपयशाचे, दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्ल्या खेड्याचे, निसर्ग आणि ग्रामीण जनमाणस यांच्या एकरूपतेचे दर्शन घडते. ही कादंबरी ग्रामीण कादंबरी विश्वाच्या बलस्थानांची ओळख करून देते. १९६० साली आलेली ‘धग’ ही उद्धव शेळके यांची कादंबरी शिंपी कुटुंबाचे जीवन रेखाटते. किमान जगण्याच्या धगीत एक सामान्य कुटुंब कसे होरपळून निघते, याचे चित्रण करणारी ‘धग’ ही ‘संपूर्ण भारतीय ग्रामीण जीवनाचा आकांत साक्षात करणारी शोकांतिका आहे’, असे स. त्र्यं कुल्ली यांनी म्हटले आहे.

यानंतर आलेल्या ‘फकिरा’ (१९५९), ‘माझा गाव’, ‘पाचोळा’, ‘गोतावळा’, ‘टारफुला’, ‘इंधन’, ‘गांधारी’, ‘झोंबी’, ‘नटरंग’ या व इतर १९८० पर्यंतच्या कादंबऱ्या ग्रामीण वास्तवाचे यथार्थ चित्रण करताना आढळतात. मात्र १९७५ नंतर सुरू झालेली ग्रामीण साहित्याची चळवळ, शेतकरी आंदोलन, राजकारणाचे बदललेले स्वरूप, शिक्षणाच्या प्रसारामुळे खेड्यातून, कामगार व शेतकरी वर्गातून उदयास आलेला लेखकवर्ग यासारख्या गोष्टींमुळे ग्रामीण साहित्याचा आशय व विषय बदललेला दिसतो. ग्रामीण साहित्यिक आता कादंबरीलेखन करताना फक्त वास्तवाचे चित्रण करीत नाहीत; तर त्या वास्तवाचे विश्लेषण करून त्या मागचे खरेखुरे वास्तव ओळखून शेतकऱ्यांच्या शोषणाला कोण जबाबदार आहे?, विकास योजना यांचे नेमके स्वरूप कसे आहे? यासारखे प्रश्न उपस्थित करताना दिसतात. यासंदर्भात ‘पांगिरा’, ‘झाडाझडती’, ‘कागूद आणि सावली’, ‘विषवृक्षाच्या मुळ्या’, ‘झेलझपाट’, ‘लिंगाड आणि खांदेपालट’, हाल्या हाल्या दूधू दे’, ‘झुलवा’, ‘तहान’, ‘बारोमास’ यासारख्या कादंबऱ्यांचा उल्लेख करता येईल. स्वातंत्र्यानंतर कालखंडात ग्रामीण भागात राजकारणाचा झालेला शिरकाव, उदयास आलेला गावठी पुढाऱ्यांचा वर्ग, त्यांनी ग्रामीण भागात मांडलेला हैदोस, सरकारी नोकरांची कार्यपद्धती, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे होत असलेले शोषण, गावांचा विकास, विकासामागील स्वार्थी दृष्टिकोन, सत्तासंघर्ष, निवडणुकांमुळे गावात सुरू झालेली गटबाजी, ढवळून निघालेले ग्रामीण जीवन, शिक्षणामुळे निर्माण झालेली जागरूकता, उदयास आलेला सुशिक्षित बेरोजगारांचा नवीन अस्वस्थ वर्ग, कापूस, ऊस, केळी उत्पादक शेतकरी, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांनी उभारलेली आंदोलने, कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला, सावकारशाही व श्रीमंत वर्ग, राजकारणी यांच्या दंडेलशाहीमुळे उद्ध्वस्त झालेला व आत्महत्येस प्रवृत्त झालेला शेतकरी, उदयास आलेला नवीन सुखासीन व भाडोत्री कामगार वर्ग, ग्रामीण भागात पोहोचलेल्या दळणवळणाच्या सुविधा, उदयास आलेली टपरीसंस्कृती, व्यसनाधीन होत चाललेला तरुणवर्ग, टी. व्ही, सिनेमागृह यांचे गावातील आगमन, त्यामुळे पसरत चाललेली चंगळवादी संस्कृती, जुन्या मूल्यांचा होत असलेला ऱ्हास यासारखे अनेक विषय उपरोक्त कादंबऱ्यांतून आलेले आहेत. अशी ही ग्रामीण कादंबरी सर्वदूर पसरलेल्या ग्रामीण भागाचे व्यापक दर्शन घडविते.

(४)

दलित कादंबरी अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरातांपासून लिहिली जात आहे. या कादंबऱ्यांमध्ये महार, मांग, ढोर, चांभार, गारुडी, भटक्या आदिवासी जमाती यासारख्या समाजातील कनिष्ठ, शूद्र मानला गेलेला वर्ग, त्यांचे पशुपातळीवरचं जीवन, भूक, दारिद्र्य, गुलामगिरी, अज्ञान, शोषण यांचे चित्रण आलेले आहे. या समाजाचे गावकुसाबाहेरचे विश्व, त्यांच्यावर लादलेली अन्याय्य बंधने, जाचक अटी, गावकी, बलुतेदारीची कामे, त्यांना सर्वांकडून मिळणारी हीन वागणूक, नाकारलेले साधे माणुसकीचे हक्क, या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांचे विचार, कार्य, शिक्षणाचा प्रसार, यामुळे आत्मभान प्राप्त झालेला दलित वर्ग, त्याने सवर्णाविरुद्ध, हिंदूधर्माविरुद्ध, संस्कृतीविरुद्ध, देवधर्मविरुद्ध, धर्मग्रंथाविरुद्ध उभारलेला संघर्ष, विद्रोह, नकार इत्यादी अनेक विषय दलित कादंबर्‍यांमध्ये येतात. त्याच बरोबर बदलत असलेल्या दलित समाजाचे, बलुतेदारी नाकारल्यानंतर नवशिक्षित दलित वर्ग वेगवेगळ्या व्यवसायात, नोकऱ्यांत उतरल्यानंतर बदललेल्या सवर्ण-दलित संबंधाचे, दलित समाजात पुन्हा निर्माण झालेल्या विभाजनाचे, गटबाजीचे, सुखासीनतेकडे झुकू लागलेल्या उच्चभ्रू दलित वर्गाचे, आपापसातील अंतर्गत संघर्षांचे, वैचारिक संबंधाचे विश्लेषण दलित कादंबरी करते. यासंदर्भात अशोक लोखंडे यांची ‘निष्ठा’, सुधाकर गायकवाड यांची ‘शूद्र’, मेश्राम यांची ‘हकीकत आणि जटायु’, अशोक व्हटकर यांची ‘मेलेलं पाणी’, मुरलीधर जाधव यांची ‘कार्यकर्ता’, एकनाथ साळवे यांची ‘एन्काऊंटर’, माधव सरकुंडेंची ‘वाडा’, बाबाराव मडावी यांची ‘टाहो’, बाबुराव गायकवाडांची ‘आग’, नामदेव कांबळे यांची ‘राघववेळ’ इ. कादंबऱ्यांचा उल्लेख करता येईल.

दलितांचे आयुष्य, इतिहास बदलवू पाहणाऱ्या, बदलवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई यासारख्या युगपुरुषांवर- क्रांतिनायकांवर, त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांवरही अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने ‘युगप्रवर्तक’ (हिं. गो बनसोडे), ‘समुद्ध’ (सुशीला मूल), ‘रमाई’ (बंधू माधव), ‘प्रभंजन’ (अनिरुद्ध पुनर्वसू), ‘प्रबुद्ध’ (भा. द खेर), ‘अश्रू आणि अंगार’ (अनंत घोडे), ‘रमाई’ (यशवंत मनोहर) यांचा उल्लेख करता येईल. एकूण दलित कादंबरीने दलितांच्या जीवनातील अनेक विषय, प्रश्न समोर ठेवून त्यांचा मूलगामी शोध घेतला आहे.

निष्कर्ष आणि समारोप-

१) ग्रामीण आणि दलित साहित्य हे आशयदृष्ट्या प्रस्थापित मध्यमवर्गीय मराठी साहित्यापेक्षा वेगळे आहे.

२) ग्रामीण व दलित कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला वास्तवाभिमुख, समाजाभिमुख करण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे.

३) ग्रामीण आणि दलित कादंबर्‍यांमध्ये ग्रामीण भागातीलच जीवनाचे चित्रण येते. मात्र त्यामागील प्रेरणा व जाणिवा भिन्न आहेत.

४) खास मराठी मातीतून उगवलेलं अस्सल, देशीवादी साहित्य म्हणून या कादंबर्‍यांकडे पाहता येते.

५) ग्रामीण आणि दलित कादंबर्‍यांमधून ग्रामीण भागातील, दलित जीवनातील अनेक प्रश्नांचा, समस्यांचा मूलगामी शोध घेतला गेला आहे.

६) दारिद्र्य, भूक, शोषण, मूकरुदन या सारख्या गोष्टी या कादंबऱ्यांमध्ये समान आहेत.

७) गावगाडा, बलुतेदारी, एकत्र कुटुंबपद्धती, आदिमता, यासोबत शिक्षणामुळे आलेली जागरूकता आदी समान घटक उपरोक्त कादंबऱ्यांत आहे.

कादंबरी हा व्यापक अशा जीवनाशयाला सामावून घेणारा त्याचप्रमाणे गंभीर व मानवी अनुभवविश्वाला समृद्ध करणारा असा साहित्यप्रकार आहे. असा विचार केला असता भारताची संस्कृती, भारताचा आत्मा जो खऱ्या अर्थाने ग्राम व ग्रामीण जीवन आहे, तो ग्रामीण व दलित कादंबरीचा विषय बनला. येथील ग्रामीण भागातील लोकांचे जीवन कादंबरीच्या माध्यमातून मराठी वाचकांसमोर आले. सुरुवातीला उपेक्षा सहन करून का होईना, ते आज साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहासोबत आहे. ग्रामीण व दलित कादंबरीने मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा रुंदावल्या आहेत, मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केले आहे. तसेच तिला अखिल भारतीय स्तरावर नेले आहे.

संदर्भ ग्रंथ सूची:-

१) मराठी ग्रामीण कादंबरी – डाॅ. रवींद्र ठाकूर

२) आंबेडकरवादी मराठी साहित्य – डाॅ. यशवंत मनोहर

३) दलित साहित्य: उद्गम आणि विकास- योगेंद्र मेश्राम

४) ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि समस्या – डाॅ. आनंद यादव

५) साहित्य: ग्रामीण आणि दलित- डाॅ. ईश्वर नंदपुरे

६) साहित्य: ग्रामीण आणि दलित- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक

७) माती आणि मंथन – भास्कर चंदनशीव

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

2 thoughts to “ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे”

  1. सर, तुम्ही अत्यंत मोजक्या शब्दात ग्रामीण आणि दलित साहित्य या विषयाची जी तुलना केलेली आहे. ती अत्यंत महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय अशी माहिती आहे.

  2. उत्तम शोध निबंध. मोजक्या शब्दात जास्तीत जास्त माहिती मुद्देसूदपणे दिली आहे. भाषा ओघवती आहे. ग्रामीण आणि दलित साहित्यात योगदान देणाऱ्या तमाम साहित्यिकांचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केला आहे.
    हार्दिक अभिनंदन!,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *