नमस्कार मित्रांनो,
सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या आभाळभर मन:पूर्वक शुभेच्छा!
आजचा हा दिवस संपूर्ण जगात खूपच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात नोकरी करतो. या ठिकाणी ९ ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये जव्हार शहरात जमतात व मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा, गौरी, ढोल व इतर नृत्य सादर करतात. अतिशय आनंदाचा व उत्साहाचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी आदिवासी बांधव धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित त्या त्या ठिकाणच्या देवदेवतांच्या पूजा-अर्चा करतात.
असे असले तरी,
हा दिवस नेमका केव्हापासून साजरा केला जातो?,
याच्या मागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे?,
हा दिवस फक्त महाराष्ट्रात, फक्त भारतात साजरा केला जातो? की जागतिक पातळीवर साजरा केला जातो?
हा दिवस नेमका का साजरा केला जातो?
म्हणजे हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश काय आहे?
आदिवासी समाजाची भविष्यातील वाटचाल कशी असावी?
आदिवासी समाजाचे वर्तमान नेमके कसे आहे?
इ. प्रश्नांची उत्तरे अनेकांना माहिती नसतात व या प्रश्नांचा विचार करण्याची त्यांना गरजही वाटत नाही. हा दिवस इतर दिवसांसारखा फक्त ‘साजरा’ (celebrate) केला जातो. या दिवशी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समजाच्या हिताच्या, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने जी चर्चा, चिंतन, विचारमंथन व्हायला पाहिजे, ते होत नाही.
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw
तेव्हा आपण या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकुयात.
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत. आदिवासी समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज असून निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा व निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करणारा समाज आहे. असे असूनही जगात सर्वात जास्त शोषण हे आदिवासींचे झालेले आहे व आजही होत आहे. त्यांना मागासलेले, रानटी असे संबोधून त्यांना हिणवले जाते. त्यांना त्यांच्या अधिकारांपासून, हक्कांपासून वंचित ठेवले जाते.
ही अशी परिस्थिति लक्षात घेऊन त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी १९६० च्या दशकात अमेरिकेत तसेच विविध देशांमध्ये चळवळी सुरू झाल्या. तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने १९८२ मध्ये ९ ऑगस्ट रोजी जिनिव्हामध्ये एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले. यानंतर पुढील काही वर्षे जागतिक पातळीवर बैठकांच्या माध्यमातून सतत चर्चा, विचारमंथन होत राहिले. पुढे संयुक्त राष्ट्राने १९९४ हे वर्ष आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तसेच १९९५ ते २००५ हे पहिले आदिवासी दशक तर २००५ ते २०१४ हे दुसरे आदिवासी दशक म्हणून घोषित केले. ९ ऑगस्ट १९८२ रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीची आठवण म्हणून
९ ऑगस्ट १९९५ रोजी जगात पहिल्यांदा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक स्तरावर आदिवासींना एकत्र आणणे, त्यांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडविणे, त्यांच्यावरील अन्याय, त्यांचे होणारे शोषण थांबविणे, हे उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहेत. म्हणजे साधारणत: गेल्या २५ वर्षांपासून हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जात आहे. आदिवासी समजाच्या हजारो वर्षांच्या एकूणच इतिहासाच्या मानाने हा कालावधी खूपच छोटा आहे.
आदिवासी समाज हा त्या-त्या देशांमध्ये विखुरलेल्या स्वरुपात राहतो. म्हणून त्यांच्यात आतापर्यंत व्यापक पातळीवर संघटन घडून आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर शोषण होत आलेले आहे. अमेरिका व इतर अनेक ठिकाणी तर त्यांचे अस्तित्त्वच संपवून टाकण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा जागतिक पातळीवर आदिवासींना एकत्र आणणारा दिवस आहे. त्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आदिवासी हा शब्द ‘आदि’ आणि ‘वासी’ या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ आधीपासून किंवा आदिम कालखंडापासून वास करणारा समाज असा होतो. भारतात कुठेही पाहिले तरी हा समाज बहुतांशी डोंगरदर्यांमध्ये राहतो. यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या (RSS) संघटना त्यांना ‘वनवासी’ असे म्हणतात. पण हा शब्दच्छल असून खोडसाळपणा आहे. ‘आदिवासी’ या शब्दाला सांस्कृतिक व ऐतिहासिक संदर्भ आहेत. आदिमत्त्व हे त्यांचे एक महत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तर ‘वनवासी’ या शब्दाला फक्त ‘भौगोलिक’ संदर्भ आहे. म्हणून त्यांच्यासाठी ‘आदिवासी’ हाच शब्द वापरणे योग्य आहे.
आदिवासी बांधव डोंगरदर्यांमध्ये राहतात. याला कारण काय?
असा प्रश्न आदिवासी बांधवांना व इतरांनाही पडायला हवा व त्याचा शोध घेतला जायला हवा, हे या दिवसाच्या निमित्ताने मी सुचवू इच्छितो!
भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून भारतात वास्तव्य करून आहे. भारतीय राज्यघटनेत त्यांचा अनुसूचित जमाती (Schedule Tribe –ST) असा उल्लेख करण्यात आलेला असून त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. आदिवासी समाजाने त्यांना त्याचे श्रेय द्यायला हवे.
भारतातील आदिवासी समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, असा अनेकांचा समज आहे. या संदर्भात माझ्या लक्षात आलेल्या काही बाबी मी आपल्यासमोर ठेवतो. भारतात विवाहाशी संबंधित अनेक अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी व चांगल्या प्रथा सुरू करण्यासाठी अनेक कायदे करावे लागले आहेत किंवा समाजसुधारकांना शे-दीडशे वर्षे आपली लेखणी व वाणीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागली आहे. (उदा. – विधवा विवाहाचा कायदा, हुंडाबंदी कायदा, जरठ-कुमारीविवाह बंदी, केशवपन-सतीप्रथा बंदी, घटस्फोटाला परवानगी, पुनर्विवाह इ.). भारतातील तथाकथित सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या समाजात अशा अनेक चुकीच्या प्रथा शेकडो वर्षे प्रचलित होत्या.
आदिवासींमध्ये मात्र इतर समुहांसारख्या अशा चुकीच्या गोष्टी नव्हत्या. विधवा विवाह, पुनर्विवाह आधीपासूनच व्हायचे. घटस्फोट ज्याला काडीमोड म्हणतात तो व्हायचा. जरठ-कुमारी विवाह सहसा होतच नव्हते. हुंडा घेणे अथवा देणे, सतीप्रथा, केशवपन अशा क्रूर व अमानवी प्रथा आदिवासींमध्ये कधीच नव्हत्या. मग आता तुम्हीच सांगा की, सामाजिकदृष्ट्या कोण पुढारलेले आहे?
धार्मिक बाबतीत विचार करू जाता आदिवासी भागात मंदिरे आढळत नाहीत किंवा जी आढळतात ती अगदी अलीकडची आहेत. आदिवासींच्या अनेक प्रथा परंपरा, देवी-देवता, सण-उत्सव, विवाह प्रथा, नृत्य, संगीत, लोकगीत, भाषा, वेशभूषा इ. हे हिंदू अथवा इतर धर्मांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे कागदोपत्री त्यांचा कोणत्याही धर्मात समावेश करण्यात येत असला तरी ते मूळतः निसर्गपूजक असून हा समाज निसर्ग, नद्या, डोंगर, वनस्पती, प्राणी, गावाची वेस इत्यादींची पूजा करणारा आहे. या संदर्भात
भारतात १८७१ साली पहिल्यांदा जनगणना झाली. त्यानंतर १९४१ पर्यंतच्या जनगणनेमध्ये आदिवासींचा समावेश हा हिंदू अथवा कोणत्याही धर्मात केला जात नव्हता. १९५१ च्या जनगणनेपासून मात्र त्यांचा हिंदू धर्मात समावेश करण्यात येऊ लागला. त्याआधी १८७१ मध्ये other religion, १८८१ मध्ये ऐबरिजनल, १८९१ मध्ये Forest Tribe, १९०१ व १९११ मध्ये एनिमिस्ट, १९२१ मध्ये प्रिमिटिव, १९३१ मध्ये Tribal Religion तर १९४१ मध्ये Tribe अशा नावांनी त्यांची गणना करण्यात आलेली होती. (विकिपीडिया)
हा संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे.
थोडक्यात, आदिवासी म्हणजेच आदिम काळापासून वास करणारे असून नैसर्गिक जीवन, निसर्ग, आदिवासी संस्कृती, साधेपणा हाच त्यांचा धर्म आहे. त्यांची अतिशय प्राचीन, समृद्ध व स्वतंत्र अशी संस्कृती आहे, हे ध्यानात घेऊन तिची दखल घेणे गरजेचे आहे.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजासमोर शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, माहिती-तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खाजगीकरणामुळे सरकारी नोकर्यांची घटती संख्या, इतर धर्मियांचा प्रभाव, आक्रमण व अनुकरणामुळे वाढत चाललेली कट्टरता इ. प्रश्न आ वासून उभे आहेत. यावर जाणकारांनी, विद्वानांनी, समाजातील पुढार्यांनी अभ्यास करून मार्ग काढणे गरजेचे आहे.
तेव्हा आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या बाबतीत असलेले समज-गैरसमज दूर करून त्यांना माणूस म्हणून स्वीकारणे व आदिवासी समाजानेही अनेक बाबतीत आत्मचिंतन करणे व स्वत:वर होणार्या अन्याय-अत्याचार-शोषण या संदर्भात जागृत होऊन आपली परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत, आपली पारंपरिक मूल्ये जपून कालानुरूप बदल स्वीकारत विचारपूर्वक भविष्यातील वाटचाल करणे गरजेचे आहे.
सर्वांना पुनश्च एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या आभाळभर शुभेच्छा!
धन्यवाद!
आपला,
© डॉ. राहूल पाटील
मराठी विभागप्रमुख,
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय
जव्हार, जि. पालघर
© copyright
(प्रस्तुत अभ्यासक २०११पासून पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यात सहाय्यक प्राध्यापक (मराठी) या पदावर कार्यरत असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भाषा विभागात फेलोशिपवर (JRF व SRF) असताना आदिवासी विद्यार्थ्यांना अनेकदा अध्यापन केलेले आहे. प्रस्तुत अभ्यासकाचे पीएच.डी.चे मार्गदर्शक दिवंगत डॉ. कैलास सार्वेकर हे नवापूर (जि. नंदुरबार) येथे आदिवासी भागात २५ वर्षे अध्यापन करीत होते.)
सविस्तर माहिती दिली आहे आपण.
खूप छान अभ्यासपूर्ण मांडणी
संशोधन पर लेख माहिती देणारा ज्ञानात भर पडली
आदिवासी बदल ज्ञानामध्ये भर पडली
खूपच छान सर
डॉक्टर राहुल पाटील सर, आपली लेखणीतून बरेचसे मुद्दे विविध विषयांवरचे येत असतात, परंतु जागतिक आदिवासी दिनी आज आपण जी माहिती लेख रुपी मांडली ,त्यातून ज्ञानात आणखीन भर पडली आहे .धन्यवाद
खूप सविस्तर पने तुम्ही लेखन केले आहे. खूपच आज हा लेख सर्वांनी वाचणे गरजेचे आहे.
सर, खूप अभ्यासपूर्ण लेख असून अचूक आदिवासी समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपण छान मार्गदर्शन केलेले आहे. समाजआपण आदिवासी भागात अतिशय चांगलं कार्य करत आहात. आदिवासी समाजाकरिता केलेल्या कामाबद्दल समाज आपला कायम ऋणी राहील. धन्यवाद सर.
राहुल सर, आपण आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर खूपच सहज, सोप्या पद्धतीने मुद्देसूद मांडणी केली आहे. वाचनीय ब्लॉग आहे आपला.
आदिवासी समाजाच्या प्रगतीमध्ये नेमका अडथळा कोणता ?त्यांच्यासमोर असणाऱ्या समस्या कोणत्या? याचे विवेचन आपण या लेखांमध्ये केलेले आहे. हा लेख खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातील तरुणांच्या बुद्धीला एक वेगळी चालना देईल असा आहे.
नेमका संदर्भ कळल्याशिवाय माणूस त्याच्यावरती उपाय योजना करू शकत नसतो. त्यासाठी हा लेख मार्गदर्शक ठरतो.