मराठी आणि हिंदी ग्रामीण कादंबर्‍यांमध्ये चित्रित जातिव्यवस्था, अस्पृश्यता व धर्मांधता : एक अभ्यास

(प्रस्तुत शोधनिबंधामध्ये मराठी व हिंदीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्‍यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.)
  • प्रस्तावना :
          जात, जातीवरून श्रमविभागणी, अस्पृश्यता, विटाळ, शिवाशिव, विविध धर्मातील लोकांमध्ये परस्पर सहकार्य, प्रसंगी संघर्ष हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. भारतात काही जाती उच्च, तर काही कनिष्ठ किंवा खालच्या मानल्या जातात. त्यानुसार त्यांना कमी-जास्त प्रतिष्ठा मिळत असते. खालच्या जातींना तर प्रतिष्ठाच नसते. उच्च जातीतील लोकांकडून नियमितपणे त्यांचे शारीरिक, आर्थिक, लैंगिक शोषण चालू असते. यासंदर्भात डॉ. बन्सीधर यांचे
“कुछ पुरातन सामाजिक संदर्भ आज भी गांवो की जिंदगी के लिए नासूर बनकर वहां की यातनाओ में वृद्धि कर रहे हैं। इनमें सबसे पहले आती है वर्णभेद और जाति प्रथा कि समस्या। ब्राह्मण तथा अन्य उच्च वर्ग के लोग आज भी निचली जातियों के साथ वैसा ही क्रुरतापूर्ण – अमानुषिक व्यवहार कर रहे हैं जैसा कि वे शताब्दियों पहले किया करते थे। हमारी ग्रामव्यवस्था में आज भी जमींदार है, महाजन हैं तथा इसके साथ अन्य कई शोषक शक्तियां वहां सक्रिय हैं, जो हमेशा निचले वर्गो को दबाये रखने मे विश्वास करती हैं।”१,
हे मत महत्वपूर्ण आहे. याचे प्रत्यंतर आपल्याला मराठी व हिंदीतील जवळपास सर्वच ग्रामीण कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळते. 
मराठी ग्रामीण कादंबऱ्यांमधील जातिव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे, धर्मांधतेचे चित्रण :

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या YouYube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

         भारतीय जातिव्यवस्थेच्या उतरंडीत प्रत्येक जात ही स्वतःला खालच्या जातीपेक्षा श्रेष्ठ मानून घेण्यात समाधान मानते. प्रत्येक जातीचे विशिष्ट काम व व्यवसायही ठरलेला असल्याने हलक्या जातीचे काम करणे अपमानास्पद समजले जाते. ‘धग’ (उद्धव शेळके) कादंबरीत किसन माळी महादेवकडे भीमाला गुरे चारायचे काम सांगायला जातो. तेव्हा महादेवला राग येतो. तो म्हणतो,
“भलतच! काई आवईचारानं त बोलाव् मान्सानं ! आमच्या जातीपातीले त काई पायसीन? का आम्ही गरीब झालो मून पोटासाठी कोन्तई काम करू?”२
यातून महादेवाचा आपल्या शिंपी जातीविषयीचा अभिमान व गुरे चारणाऱ्यांविषयीची तुच्छतेची भावना व्यक्त होते. भीमाला जेव्हा गावातील बाखड्याचा जावई खेटराने मारतो. तेव्हा भीमा त्याला
“खेट्टानं नोको मारू, मले इटाय होते. मी नामदेव शिंपी आये”३ 
असे उत्तर देतो. भीमाने हजामती करणे महादेवला (भीमाच्या वडिलांना) आवडत नाही. कारण तो त्यांचा परंपरागत व्यवसाय नाही. तसेच दिवाळीच्या वेळेस भीमा सीताकाकीच्या देवापुढे आंब्यांचे तोरण बांधल्याचे बघून आपल्याही देवापाशी लावायला जातो. तेव्हा महादेव त्याला
“त्याईचा आन् आपला देव अल्लग आहे…”४
असे सांगतो. या संदर्भात भास्कर शेळके यांनीही “यावरून बलुतेदार आलुतेदारांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पनांना स्थान आहे असे दिसते”५, असा निष्कर्ष नोंदविला आहे.                 
            महादेव कौतिकचे कुटुंब तळेगावाहून मोझरीला जाते. तेथे नामाला तहान लागल्यावर कौतिक बानोकडे पाणी मागते. तेव्हा तिची आई सकीना
“आमी मुशलमान आओ, बेटा थ्या तिथिसा हिंदुच्यं घर आये, जाय”६
असे म्हणते. यातूनही हिंदूंमधील बलुतेदारही मुसलमानांना व मुसलमान त्यांच्या तुलनेने स्वतःला कनिष्ठ व अस्पृश्य समजायचे असे आढळते. मात्र, ही अस्पृश्यतेची, श्रेष्ठ-कनिष्ठतेची भावना काही प्रमाणात कमी होत गेलेलीही आढळते. महादेवने माळीला वरील उत्तर देऊनही कौतिक भीमाला गुरे चारायला व सकीनाने वरीलप्रमाणे सांगूनही नामासाठी बानोला पाणी घ्यायला पाठवते. नंतर कौतिक व सकीना यांच्या खाण्या-पिण्याची देवाण-घेवाण सहजपणे चालते. नंतरच्या त्यांच्या वागण्यातून श्रेष्ठ-कनिष्ठतेची भावना कुठेच दिसून येत नाही. अर्थात रोटीव्यवहार सुरू होतो.
          ‘वावटळ’ (व्यंकटेश माडगूळकर) या कादंबरीत ब्राह्मण वर्गाचे चित्रण मोठया प्रमाणावर आलेले आहे. ब्राह्मणांबरोबर हिंदू समाजातील आलुतेदार, बलुतेदार जातींचा उल्लेखही प्रसंगानुरोधाने या कादंबरीत अनेक ठिकाणी आलेला आहे. ब्राह्मण हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील सर्वात वरचा वर्ण. हिंदूंच्या सर्व जातीपैकी सर्वात श्रेष्ठ समजली जाणारी जात. गांधीहत्येनंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिकडे-तिकडे ब्राह्मणांविरोधी हिंसक वातावरण तयार होते. या कादंबरीतील यशवंत, नायक व गोपू हे अशा वातावरणात गावाकडे निघतात. वाटेत त्यांना भूक लागते. एक धनगर त्यांना मेंढ्या चारताना भेटतो. तो त्यांना भाकरी देऊ करतो. परंतु, आधी
“पर ती तुमाला चालतिया का?”७ असे विचारतो. या तिघांना भाकरी खाताना बघून तो म्हणतो की, “काय गंमत हाय बघा. चार दिसांमागं मी जरी तुमाला म्हनालो असतो, बाबांनो, दहा रुपयं देतो, माजी एवडी वाळली भाकरी खा, तरी बी ती तुमी खाल्ली असती का?”८
               नांदवडी या गावातील विष्णूपंतांनी एका कुळवाडी स्त्रीला रखेल ठेवले होते. त्या दोघांना मुलेदेखील होतात. ब्राह्मणांनी या कुटुंबाला वाळीत टाकलेले होते. नायक स्वतः एके ठिकाणी गांधीहत्येनंतर ब्राह्मणावरील हल्ल्याचे कारण सांगतो.

“सावसावकाऱ्या करायच्या, कुळं सारा घेऊन आली म्हणजे बाहेर वापरायच्या तपेलीनं त्यांना पाणी द्यायचं. शिवाशीव, सोवळं ओवळं पाळायचं. हे सगळं भोवलं आता.”९
        ब्राह्मणांशिवाय मराठेही शूद्र समजल्या जातींना ओंजळीने पाणी पाजतात, शिवी देऊन बोलतात. तर ब्राह्मण मराठा जातीतील लोकांना अस्पृश्य समजतात. ब्राह्मणांचे घर वाडे जाळून टाकल्यावर ब्राह्मणांना मिळेल तेथे आश्रय घ्यावा लागतो. नायकाचे कुटुंब पाटलाकडे आश्रयाला येते. तेथे अशा परिस्थितीतही नायकाची आई अस्पृश्यता पाळते. नायक वर्णन करतो.
“पाटलाच्या घरात राहिलो होतो तरी आईचे सोवळेओवळे चालूच होतें. इथे लागू नकोस, तिथे शिवू नकोस, असे ती पाटलांच्या मुलांना म्हणतच होती. आमचा स्वयंपाक वेगळया चुलीवर शिजत होता. मी म्हणालो, “आई वेगळी चूल कशाला? तीच चूल  नाही कां चालत? अजून शिवाशीव पाळायचीच का?” आई म्हणाली, “अरे आता तुम्ही सोडा सगळं. आमचं हे असंच चालायचं. घर जळली म्हणून बदलायचं नाही. आम्ही जळेपर्यंत असंच चालायचं बघ.” १० 
या संवादातून तत्कालीन ब्राह्मण जातीतील लोकांमध्ये वंशश्रेष्ठत्वाची भावना किती खोलवर रुजलेली होती, याची कल्पना येते.
              ब्राह्मणांनी कित्येक वर्षे बहुजन, शूद्र समाजातील लोकांना अशी हीन वागणूक दिलेली असल्यामुळेच अनेक लोकांनी ही संधी समजून ब्राह्मणांवर सूड उगवला. यामुळेच कोष्ट्याची मुले “बामनांची भली खोड मोडली”११, असे म्हणतात आणि इतर लोकं “इतके दिवस आमच्या बायकांनी ब्राह्मणांची उष्टी भांडी विसळली; आता आमच्या घरी ब्राह्मणांच्या बायकांनी अशी कामं केली पाहिजेत”१२, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.
            ‘टारफुला’ (शंकर पाटील) या कादंबरीतील दादा पाटलांचा एक दिवस अतिशय वाईट जात होता. त्यांचे कोणतेच काम व्यवस्थित होत नव्हते. ते निराश होऊन विचार करू लागतात. तेव्हा त्यांच्या मनात येते की, “आज उठल्या-उठल्या दिवसाचं तोंड बघायच्या आत महारानं दर्शन दिलं !”१३ थोडक्यात, ग्रामीण भागात सकाळी महाराचे तोंड बघणे अशुभ समजले जायचे. महारांनी पाटलाच्या वाड्यात तमाशाचा कार्यक्रम केल्याने वाडा विटाळला, ही भावना गावकऱ्यांमध्ये पसरते.
            ‘इंधन’ (हमीद दलवाई) या कादंबरीत तीन धर्मांचे लोक आहेत. एक म्हणजे मुस्लीम, दुसरे बौद्ध (नवबौद्ध) आणि तिसरे म्हणजे हिंदू. त्यात कुळवाडी, मराठे, ब्राह्मण, परीट, न्हावी, वाणी इत्यादी. जातीयता आणि धर्मांधता प्रत्येक जात व धर्मांतील लोकांमध्ये ठासून भरलेली दिसते. आधी ते एकमेकांकडे जात येत नव्हते. कारण त्यांना घरातील वडिलधाऱ्यांकडून तशी शिकवण मिळायची. ब्राह्मण व मुस्लीम एकमेकांकडे जाऊ-येऊ लागले असले. ब्राह्मण मांसाहार करू लागले असले तरी स्वतःच्या जातीचा, धर्माचा त्यांना अहंकार वा अभिमान आहे. ब्राह्मणकन्या सुमतीचे इसाकशी अनैतिक सबंध असल्यामुळे सुमतीच्या चुलत भावाने कुळवाड्यांना इसाकला मारायला सांगितले होते. म्हणजे एका मुस्लिमाने आपल्या जातीच्या मुलीशी संबंध ठेवणे त्याला आवडत नाही.
        बौद्ध समाजातील विवाहित तरुणी लक्ष्मी केपटाऊनवाल्या इसाककडे जेव्हा राहायला लागते. तेव्हा

“त्यांना आपले नाक गमावल्यासारखे वाटू लागते. खोतांपाशी आपल्या बायकांचे संधान असल्याचाच त्यांना आजवर सराव होता. पण कुणी बाई अशी घर सोडून खोताकडे जाऊन राहिली नव्हती. आणि त्यातच कुणबी त्यांची मानहानी करू लागले. रस्त्यात, मिळतील तिथे त्यांना लक्षुमी घर सोडून खोताकडे राहिल्याची खोचक आठवण देऊ लागले.”१४ 
यावरून बौद्धांचा जातीय अभिमान दुखावला आणि कुणबी पुन्हा त्यात जातीय अभिमानाला डिवचू लागले. आधीच बौद्धांमध्ये जागृती निर्माण झाल्याने ते मुस्लिमांच्या ताबुतांच्या मिरवणूकीत आता मिरवत नव्हते. यावरून त्यांच्यात जातीय वेगळेपणाची किनार निर्माण झालेली दिसते. तसेच “जातीतल्या स्त्रीशी विवाह करावा, मागासलेल्या जातीतील स्त्री ही केवळ ‘अंगवस्त्र’ म्हणून वापरावी असा तुच्छ दृष्टीकोन बौद्ध जातीबद्दल मुस्लिमांचा असलेला दिसतो.”१५ हे प्रा. भास्कर शेळके यांचे निरीक्षण याबाबतीत मुस्लिमांचा बौद्धांना तुच्छ व स्वतःच्या जातीला अथवा धर्माला श्रेष्ठ लेखण्याच्या प्रवृतीवर प्रकाश टाकणारे आहे.
               यानंतर बौद्ध तरुण “उद्या आम्हीही तेच करू. तुमच्या मुली आमच्या घरी आणून ठेवू!”१६ असे जेव्हा म्हणतात. तेव्हा ते आम्हीही तुमच्या लोकांचे-म्हणजे समुहाचे-धर्माचे-असेच नाक कापू असाच इशारा देताना दिसतात. या सर्व गोष्टी बौद्ध, हिंदू व मुस्लीम यांची जातीयता, आपापल्या जाती धर्माविषयी अहंकार, अतिरेकी अभिमान इ. च निर्देशित करताना दिसून येतात.
          ‘गोतावळा’ (आनंद यादव) कादंबरीत मेलेला बैल सात-आठ महार बैलगाडीत टाकून नेतात. मरायला आलेल्या म्हालिंग्या बैलाला मांग पन्नास रुपयात मागून घेतात आणि त्यांनी मेलेल्या गुरांचे मांस खाणे सोडून दिलेले असल्याने त्याला जिवंतपणे कापून त्याचे मांस घरी खायला घेऊन जातात. या कामावरुन तसेच खाण्याच्या सवयीवरुन दलितांच्या सामाजिक स्थानाची व आर्थिक स्थितीची कल्पना येते.
          ‘गांधारी’ (ना. धों. महानोर) कादंबरीतील तोत्या मांगच्या निमित्ताने मांग या जातीतील लोकांना गावातील लोकांकडून मिळणाऱ्या वागणूकीचे चित्रण आलेले आहे. मांगाला पायरीच्याही खाली उभे करणे, पायरीजवळ टमरेलात चहा देणे अशी वागणूक दिली जाते. तोत्या मांगसुद्धा स्वतः “लोकानं खेटरं मारली तरी आपल्याले राग येत न्हाई”१७, असे सांगतो. यातून या हीन वागणूकीची दलितांना सवय झालेली होती, असे दिसून येते. गावाच्या निवडणूकीत दलित वर्गातला एक उमेदवार हवा म्हणून त्याला निवडणूकीत उभे केले जाते व तो निवडून येतो. योगायोगाने दोन्ही पक्षांचे चार-चार सदस्य निवडून येतात. तोत्या मांगचे मत निर्णायक उरते. तेव्हा गावातील लोकांची प्रतिक्रिया “कोणाला गावचा सरपंच बनवायचा हे आता खेटरांजवळ बसणारा तोत्या मांग ठरवील असा जमाना आलाय म्हणत लोक कपाळाला हात मारून घेत”१८ अशी असते. यातून स्वातंत्र्य मिळून, लोकशाही लागू झाल्यावरही दलितांना अस्पृश्यच समजले जाते, हे दिसून येते.
       या कादंबरीतील लालजी त्याच्या जातीबाहेरच्या मुलीशी लग्न करतो. त्यावेळेस गावातील त्याच्या भाऊबंदकीतील व जातीतील लोकं “त्यानं समाजाची इज्जत घालवली”१९, असे म्हणतात. त्याच्यावर बहिष्कार टाकायचे ठरवतात. तसेच लालजी गावातील मुसलमानांच्या सावलीत कधीच उभे न राहणाऱ्या लोकांना चिडविण्यासाठी मुद्दाम आपण गुलाम अली खाँ याच्याकडे तबला शिकताना मुस्लीम मित्रांच्या उष्ट्या ताटात जेवलो असे सांगायचा. गावातील लोक जातीबाहेरच्या तसेच दलित व मुसलमान यांच्यासोबत रोटी-बेटी व्यवहार करत नाहीत, हे यावरून दिसते.
जातिव्यवस्थेत काळानुरुप काही बदल :
           ‘इंधन’ (हमीद दलवाई) ही कादंबरी कोकणातील एका गावावर आधारलेली आहे. या गावात मुस्लीम, ब्राह्मण, कुणबी आणि अस्पृश्य जाती राहतात. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षापर्यंत ह्या गावातील ब्राह्मण हे मुस्लिमांच्या आणि मुस्लीम हे ब्राह्मणांच्या घरी कधीच जात-येत नव्हते, सोबत खात-पीत नव्हते. नंतर ही परिस्थिती बदललेली दिसते. त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे सुरू होते. सुमती मांसाहार करू लागते. नायकाच्या घरी येऊन माशांचा वास लागलेल्या कपात चहा घेते. नायकाच्या भावाशी- इसाकशी म्हणजे एका मुस्लिमाशी शारीरिक सबंध ठेवून असते. नायकासोबत तिच्या घरात बसून रात्ररात्रभर बोलत राहते. ती म्हणते की, “आता लोकांची पूर्वीसारखी कर्मठ मतं राहिलेली नाहीत”२० तसेच “आता एकमेकांकडे जाणं आणि खाणं ही आश्र्चयाची बाब राहिलेली नाही.”२१ मात्र याच सुमतीने लहान असताना “मुसलमानांकडचं आम्ही काही खात नाही”२२, असे सांगून नायकाने देऊ केलेला खजूर नाकारलेला होता.
              ब्राह्मणांप्रमाणे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीतील लोकंही काळाच्या ओघात बदलल्याचे चित्रण ‘इंधन’ मध्ये आलेले आहे.
“म्हारांची पोरं आता केस कापू लागली होती; इंग्रजी शाळेतून शिकू लागली होती. त्या साऱ्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. मुसलमानांच्या ताबुताच्या मिरवणूकीत आता ती मिरवत नव्हती. मुसलमानांची अडली कामे करीत नव्हती”२३,
असे निवेदन या कादंबरीत येते. यावरून बाबासाहेबांच्या विचार व कार्याने आत्मभान प्राप्त झाल्याने महार जातीने स्वतःवरची बंधने, गुलामगिरी झुगारून, आपण माणूस आहोत हा विचार स्वीकारून प्रगती व स्वाभिमानाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली दिसून येते.
हिंदू-मुस्लीम समन्वय :
           हिंदू आणि मुस्लीम यांच्यात काही राजकीय व सामाजिक कारणांमुळे अनेकदा संघर्ष झालेला असला तरी शेकडो वर्षांच्या परस्पर सान्निध्यात सहवासाने त्यांच्यात काही प्रमाणात एकोपा, सहकार्य व समन्वय झालेला दिसून येतो.
          ‘धग’ (उद्धव शेळके) कादंबरीतील कौतिक व महादेव हे हिंदू शिंपी कुटुंब असून त्यांचे कुलदैवत मात्र मुस्लीम आहे. शादुलबुआ हे त्यांचे कुलदैवत आहे. विशेष म्हणजे कौतिक दरवर्षी मोहरमचा सण साजरा करते. नामाची (मुलाची) सकाळी व्यवस्थित आंघोळ करून नवीन कपडे घालून गळ्यात झोळी अडकवून, हातात वाटी देऊन ‘हासेन हुसेन धुल्ला’ असे म्हणायला सांगून पाच घरी भिक्षा मागायला पाठवते. कोणतेही संकट आल्यावर कौतिक शादुलबुवाचे नाव घेते. याशिवाय या कादंबरीतील कासम हा मुस्लीम असून तो लालबर्डी येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या महादेवाच्या यात्रेत लागोपाठ बारा-तेरा वर्षापासून जातो आहे व यानंतरही मरेपर्यंत जाणार असल्याचे सांगतो. त्याची महादेवावर प्रचंड श्रद्धा आहे. या व्यतिरिक्त इतर मुसलमानही या यात्रेत जात असल्याचा उल्लेख या कादंबरीत आलेला आहे. कासम एकदा या यात्रेत गेलेला असताना त्याला अमरावतीचा एक मुस्लीम त्या यात्रेत भेटतो. पुढे त्याच्याच मुलाशी बानोचे, कासमच्या मुलीचे लग्न होते. तसेच तो भजन कीतनातसुद्धा नियमितपणे जाताना दिसून येतो.
          यावरून ग्रामीण भागात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात बऱ्याच ठिकाणी सामाजिक पातळीवर एकत्त्व आणि धार्मिक बाबतीत सहिष्णूता असल्याचे दिसून येते. 
          ‘इंधन’ (हमीद दलवाई) कादंबरीतील न्हावी, परीट, महार, कुळवाडी हे मुस्लीम खोतांशी आर्थिकदृष्ट्या बांधले गेले आहेत. तसेच स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक लैंगिक आकर्षणामुळे आपापसात (अनैतिक का असेना) लैंगिक सबंध आहेतच. याशिवाय एकमेकांच्या सणांमध्ये सामील होणे, एकमेकांच्या देवी-देवतांवर श्रद्धा ठेवणे, यातूनही त्यांच्यात सहिष्णूता, एकत्त्व निर्माण झाल्याचे दिसून येते. या गावात शिमग्याच्या सणाच्या दिवशी देवीची पालखी मिरवणूकीसह गावातून फिरविली जायची. तेव्हा मिरवणूक मुस्लिमांच्या वस्तीजवळ थांबवली जायची. त्यावेळी मुस्लीम स्त्रिया तिथे उल्फा द्यायच्या. नायकाच्या वहिनीसारख्या जास्त श्रद्धाळू बायका मिरवणूकीत पुढे न्हावीवाडीपर्यंत जाऊन तिथे नारळ व तांदळाने पालखीची ओटी भरायच्या. पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे. या मिरवणूकीत ढोलासह इतर जी वाद्ये वाजवली जायची. त्यांचा ठेका मुस्लिमांनाही ताल धरायला लावायचा. नायक म्हणतो की,
“ती वाद्ये अनेक वर्षे, पिढ्यान्-पिढ्या, अनंतकाळ अशी वाजत आली होती. तो ठेका आमच्या पूर्वजांच्या मनातही असाच ताल धरत होता, हे मला ऐकून माहीत होते. आमचा कुणीएक पूर्वज स्वतःच्या मुसलमानत्वाची जाणीव विसरून एकदा त्या तालाने धुंद होऊन मिरवणूकीत सामील झाला व नाचू लागला होता”२४,
ही आठवण देखील लेखकाने सांगितलेली आहे.
हिंदी ग्रामीण कादंबऱ्यांमधील जातिव्यवस्थेचे, अस्पृश्यतेचे, धर्मांधतेचे चित्रण :
          ‘पानी के प्राचीर’ (रामदरश मिश्र) या कादंबरीतील बैजू हा जातीने ब्राह्मण असूनही जातीने चांभार असलेल्या बिंदियासोबत शारीरिक सबंध ठेवतो. हे पांडेपुरवा गावातील कुणालाच आवडत नाही. गावात अस्पृश्यता, शिवाशिव, विटाळ या गोष्टींना अतिमहत्त्व आहे. ते दोघे फौजदाराला सापडल्यावर तोसुद्धा
“कहाँ यह साला बाभन जाति में जनमा और कहाँ इस हरजाई चमाइन के दलदल में पडकर पतित हो रहा है। मैं क्षत्रिय हूँ, इस तरह धर्म का नाश नहीं देख शकता हूँ।”२५
अशी प्रतिक्रिया व्यक्त करतो. तर गावातील लोकं 
“चमाइन-बाप रे बाप, चमाइन घर में रखकर उसका छुआ खाता होगा-पीता होगा, ब्राह्मण के लिए चमाइन का छुआ खाना-पीना कितना बड़ा पाप है।”२६
अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. त्याच्या या कृत्यामुळे गावातील लोक बैजूवर बहिष्कार टाकतात. त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवत नाहीत.
          पांडेपूरवा गावातील गणपती नावाचा एक व्यक्ती गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन गावातील हरिजन ब्राह्मण व इतर सर्व जातीपातिच्या लोकांना सोबत घेऊन स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. गाधींजींच्या विचारानुसार जातिभेद मानत नाही. तेव्हा मुखिया
“गाँधी जी ने तो आँधी मचा रखी है। सारा धरम-करम मिटाने पर तुले हूए हैं। चमार-बामन कहीं एक हो सकते हैं।”२७
असे म्हणतो. एकदा हा गणपती नेता गावातील सर्व लोकांचा मोर्चा घेऊन मिलिंदकडे जातो. मिलिंद त्यांना मार्गदर्शन करतो. बिंदियाला मारठोक करणे व तिची झोपडी मोडणे हा अन्याय असल्याचे सांगतो. तेव्हा गावातील लोक एक चांभारीन ब्राह्मणाला भ्रष्ट करीत आहे आणि एक ब्राह्मण चांभारीनला काही कमी-जास्त बोलला तर कुठे संकट येऊन गेले, असे मनातल्या मनात म्हणतात. त्यांच्या देहबोलीवरून मिलिंदच्या लक्षात येते की,
“जाति-पाँति, छूत-अछूत, उँच-नीच का भेदभाव अभी कसकर जकडे हुए है लोगों को और उसके जाने में समय लगेगा।”२८
          ब्राह्मण जातीतील धिरेंदरच्या शेतात दिनई चांभाराची मुलगी पुनिया आजारी असल्याने कामाला जात नाही. मात्र त्याच दिवशी त्याला ती शेजारच्या धिमड पांडेच्या शेतात काम करताना दिसते. तेव्हा तो तिला लाथेने मारतो. घाण शिव्या देतो. यावर लेखक
“धिरेंदर बाभन का लडका है, यह तो उसका जन्मसिद्ध अधिकार है कि वह चमाइनों को गाली दे, मारे, उनका जैसा चाहे उपभोग करे”२९,
उपरोधिकपणे असे भाष्य करतात.
          या सर्व घटना व सदंर्भावरून पांडेपुरवा या गावात जातीयता, अस्पृश्यता, शिवाशिव असलेली, दलित समजल्या जाणाऱ्या जातींना सवर्णांकडून वाईट, क्रूर व अन्यायकारक वागणूक मिळत असलेली पाहावयास दिसून येते.  
          ‘जल टूटता हुआ’ (रामदरश मिश्र) या कादंबरीत भारतात जेव्हा पहिल्यांदाच पंचायत राज्यव्यवस्था निर्माण होऊन निवडणुका होणार होत्या. तेव्हाच्या परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींनाही मतदानाचा अधिकार मिळाल्याने तसेच निवडणूकीत उभे राहण्यास मिळणार असल्याने वरच्या जातीतील मऊगा दलसिंगारची प्रतिक्रिया याबाबतीत प्रतिनिधिक आहे, ती पुढीलप्रमाणे- 
“पंचायत राज में कई चमार, कई तेली और कई अहिर खडे हो रहे हैं। सतीश और कुमार दोनों छोटी जातियों को उकसा रहे हैं। कह रहे हैं, छोटी जातियों को पंचायत राज में समान अधिकार मिलना चाहिए। हाय मइया, लोप हो गया, जो चमार-सियार हमारा-आपका हल जोतते हैं वे पंच बनकर हमारा फैसला करेंगे।”३०
यावरून उच्च वर्णीयांचा खालच्या जातीतील लोकांकडे बघायचा तुच्छतावादी दृष्टिकोन दिसून येतो.
          या कांदबरीत ब्राह्मण समाजातील लोकांकडे शेती आहे आणि गावातील चांभार व इतर जातीतील लोक त्यांच्या शेतांमध्ये काम करून उदरनिर्वाह भागवणारे आहेत. ब्राह्मण समाजातील लोक शेतात नांगर चालवणे अधर्म समजतात. असे केल्याने धर्म भ्रष्ट होईल असे त्यांना वाटते. म्हणून जगपतिया जेव्हा गावातील शेतमजुरांना मजुरीचे पैसे वाढविण्यासाठी संप घडवून आणतो. तेव्हा गावातील ब्राह्मणांपुढे मोठा प्रश्न उभा राहतो.
कुंजू हा ब्राह्मण जातीतील असून जेव्हा संपूर्ण गावासमोर भोई (कहार) समाजातील बदमीचा स्वीकार करतो. तेव्हा गावातील ब्राह्मण समाजातील लोकं त्याच्यावर टीका करतात. “कहार हो गया, पापी ने नांव बोर दिया बाभनों के गांव का।”३१,
असे म्हणतात. 
          ‘सूखता हुआ तालाब’ (रामदरश मिश्र) या कादंबरीत उत्तर प्रदेशातील शिकारपूर या गावाचे चित्रण आलेले आहे. या गावातील मुरतिया हा चांभार या अस्पृश्य जातीतील एक तरुण एका विहिरीवर पाणी भरायला गेलेला असतो. त्यावेळेस तिथे ब्राह्मण जातीतील रामलालसुद्धा पाणी भरत असतो. रामलालचे पाणी भरेपर्यंत मुरतिया थांबत नाही. यावरून रामलाल मुरतियाला मारहाण करतो. मुरतियाचा मालक मोतीलाल हा गावातील नेता आहे. तो मार्क्सवादी पक्षाशी संबंधित आहे. त्या दिवशी नेमका दुसऱ्या गावातील हरिजनांच्या सभेला गेलेला असतो. परत आल्यावर जैराम त्याच्या कानावर सदर वार्ता टाकतो. तेव्हा मोतीलाल उत्तर देतो की,
“अरे जाने दीजिए, थप्पड खा गया तो कौन साला मर गया। अब चमार-सियार के लिए पट्टीदार से लडाई करने जाऊँ। जब गाँव के लोग छूत-छात मानते हैं तो थोडा ठहरकर ही पानी भरता मुरतिया, उसे इतनी जल्दी क्या थी ? बात यह है कि इन सालों का भी काम में मन लगता नहीं, जल्दी-जल्दी काम करके तारभाठ (बेगार भाठना) करना चाहते है।”३२
यावरून गावातील नेत्यांचासुद्धा अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोण दिसून येते. यावर जैराम उपरोधाने
“बिल्कुल ठीक कहा आपने भाई, एक कुएँ पर बाभन और हरिजन पानी नहीं भर सकते। यह तो एक चिरंतर ईश्वरी व्यवस्था है।”३३
जैराम हे वाक्य उपरोधाने म्हणत असला तरी यावरून ही सामाजिक व्यवस्था ईश्वरनिर्मित असल्याचे सामान्य माणसाचे मत असलेले दिसून येते.
          या कादंबरीतील ब्राह्मण जातीतील लोक एकीकडे अस्पृश्यता पाळतात. तर दुसरीकडे अस्पृश्य जातीतील स्त्रियांशी अनैतिक लैगिक संबंध ठेवताना दिसून येतात. शिवलाल, धर्मेंद्र, दयाल हे त्यापैकी काही. शिवलालच्या घरी हरिवंश पुराण सुरू असताना धर्मेद्र व दयाल चेनईया या चांभार जातीतील स्त्रीसोबत शेतात संबंध ठेवून परस्पर भजनात आलेले असतात. दोघे जण भजन आटोपल्यावर प्रसाद वाटतात. त्यावेळी काही हरिजन मुलेही प्रसाद घ्यायला आलेले असतात. हे दोघे त्यांचा स्पर्श टाळण्यासाठी वरूनच त्यांच्या हातात प्रसाद टाकत असतात. तेव्हा गर्दीत चेनईयाच्या भावाचाच धर्मेद्रच्या हाताला व प्रसादाला चुकून धक्का लागतो. धर्मेंद्र लगेच त्याच्या गालात एक थप्पड मारतो व त्याला मारायला लागतो. कारण त्याला एका अस्पृश्याचा धक्का लागल्याने विटाळ होतो व प्रसाद अपवित्र होतो. नंतर तो प्रसाद अपृश्यांमध्ये वाटला जातो व ब्राह्मणांसाठी दुसरा प्रसाद तयार केला जातो. यावरून उच्चवर्णियांच्या मनातील जातीय अभिमान व दांभिकता तसेच ते दलितांना अस्पृश्य म्हणून वागणूक देतात, असे दिसून येते.  
          ‘अलग-अलग वैतरणी’ (शिवप्रसाद सिंह) या कादंबरीतील करैता या गावात ब्राह्मण, ठाकूर हा सवर्ण वर्ग आणि चांभार हा शूद्र वर्ग आहे. गावाची रचनाच अशी आहे की, हे दोन्ही वर्ग कधीच एक होणार नाहीत. या गावाच्या मध्यभागी एक तळे आहे आणि त्याच्या दक्षिण दिशेला चांभारांची वस्ती आहे. हे तळे गावातील सवर्ण व शूद्र वर्गाला वेगळे करणारे आहे. निवेदक म्हणतो की,
‘ही सामाजिक व्यवस्था जेव्हा कधी कुणी निर्माण केली असेल तेव्हा हे तळे इथे नसणार. नंतर गावातील चांभार जातीचे लोक आपल्यात मिसळायला नकोत, त्यांची घरे आपल्या घरापर्यंत पोहचायला नकोत. म्हणून सवर्ण लोकांनी हे तळे माती काढून काढून निर्माण केले असणार’३४.
गावातील जातिव्यवस्थेचे स्वरूप यातून लक्षात येते.
          उच्च जातीतील सवर्ण लोक कनिष्ठ जातीतील लोकांना कमी लेखतात. चांभार जातीतील सरूप भगत, त्यांची मुलगी दुलरिया व इतर चांभार सुरजू काम करत असताना सिरिया ठाकूर दुलरियाची छेड काढण्याच्या प्रयत्न करतो. ती ओझे उचलत असताना तो मुद्दामहून तिच्या मदतीला जातो. ओझे उचलण्याच्या निमित्ताने तिचे चुंबन घायचा प्रयत्न करतो.
सरूप भगत त्याला “जैसी आपकी इज्जत वैसी हमारी इज्जत” (असे सांगतो. सिरिया त्याला) “आये बडे इज्जत वाले । चमार और ठाकूर की इज्जत एक हो जायेगी? “३५ असे उत्तर देतो.
यावरून सवर्ण लोकं शूद्र जातींना अब्रू, इज्जत नसते, असे समजताना दिसतात.
          सवर्ण हिंदू शूद्र जातींइतके बऱ्याचदा मुस्लीम धर्मीयांनासुद्धा आपल्यापेक्षा कमी लेखतात. ‘अलग-अलग वैतरणी’ मधील हिंदू लोकं मुस्लिमांना त्यांच्या भांड्यांमध्ये पाणी किंवा इतर वस्तू देत नाहीत. तर वेगळ्या ग्लास व बशीत ते त्यांना प्यायला देतात. या कादंबरीतील खलील मियाँ यांचे जमीनदार जैपाल सिंह यांच्याशी अगदी घरोब्याचे संबंध असतात. ते सोबत खातात, पितात. मात्र त्यांना खाण्या-पिण्याचे पदार्थ वेगळ्या ठराविक भांड्यांमध्ये मिळतात. एवढेच नाही तर स्वतः खलील मियाँनी त्यांना ती भांडी घेऊन दिलेली असतात. याबद्दल त्यांना काही वाटत नाही. ते स्वतः एके ठिकाणी असे मान्य करतात की,
“हिन्दुओं ने कभी भी मुसलमानों को अपने से बेहतर इन्सान नहीं माना।”३६ 
करैतातील चांभार हे शेतमजूर आहेत. एकदा ते मजुरीचा मोबदला वाढवण्यासाठी गावातील लोकांच्या कामावर बहिष्कार टाकतात. गावात तणावग्रस्त वातावरण निर्माण होते. चांभार लोकांचे इतर व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असतात. तेव्हा
“तालाब, सिवान, रास्ते, सभी तो ठाकूर के ही थे। इनका उपयोग करने का चमारोंको क्या हक भला।”३७,
असा विचार गावातील सवर्ण लोक करतात आणि वीस-पंचवीस लोक मिळून चांभार स्त्री-पुरुषांना मिळतील तिथे झोडपून काढतात. तलावात आंघोळ करत असलेल्या चांभार स्त्रियांना तशाच अवस्थेत केस पकडून ओढून बाहेर काढतात. शेतातून गवत-सरपण आणणाऱ्या मुली व स्त्रियांवर बलात्कार करतात. थोडक्यात, एका गावात राहूनही गाव, गावातील रस्ते, तलाव हे अस्पृश्य जातीच्या लोकांचे नसतात. येथे अस्पृश्यता, जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेली गुलामगिरी दिसून येते.
          या गावातील डोमन चांभाराची मुलगी सुगनी सुरजू सिंहसोबत तिच्याच घरात गावातील सर्व लोकांसमोर शरीरसंबंध करताना सापडते. तरी तिच्या बापाला त्यात स्वतःची बेअब्रू झाली असे वाटत नाही. कारण उच्च जातीतील लोकांनी दलित जातीतील स्त्रियांचा उपभोग घेणे, हे त्याच्यासाठी नवीन नसते. सरूप भगत बारा गावातील प्रमुखांसमोर स्वतःच्या जातीविषयीचे वास्तव फार योग्य शब्दांमध्ये सांगतो. तो म्हणतो,
“यदि इस कौम (जात, वर्ण) को उठाना चाहते हो तो गाँठ बाँध लो कि अब लडाई भीतर है, बाहर नही। सहते सहते यह कौम अब यहाँ पहुच गयी हैं, जहाँ उसे जहालत में ही आराम मिलने लगा है।”३८   
          थोडक्यात, चांभार व इतर शूद्र जातींवर उच्चवर्णियांकडून प्रचंड अत्याचार झालेले आहेत. आता या शूद्रांना त्यांच्यावर कितीही अन्याय-अत्याचार झाला, अपमान झाला तरी त्याचे काही वाटत नाही. त्यांना या गोष्टीची सवय झालेली आहे. त्यांच्या स्त्रियांच्या उच्चवर्णियांशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांना गैर वाटत नाही. म्हणून ‘यह लडाई भीतर है’ असे जेव्हा सरुप भगत म्हणतो, ते योग्य वाटते.
          ‘राग दरबारी’ (श्रीलाल शुक्ल) या कादंबरीतील लंगड हा अस्पृश्य, शूद्र समजल्या जाणाऱ्या जातींपैकी आहे. तो वैद्यजींकडे येतो. तेव्हा “शास्त्रों में शूद्रों के लिए जिस आचरण का विधान है, उसके अनुसार चौखट पर मुर्गी बनकर”३९ तो वैद्यजींना नमस्कार करतो. यावर लेखकाने केलेले भाष्य फार महत्वाचे आहे.
“इससे प्रकट हुआ कि हमारे यहाँ आज भी शास्त्र सर्वोपरि है और जातिप्रथा मिटाने की सारी कोशिशें अगर फरेब नहीं हैं तो रोमाण्टिक कार्रवाइयाँ है।”४०
यावरून जातिप्रथा नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न होऊनही ग्रामीण भागात ती अजून नष्ट झालेली नाही, धर्मग्रंथांचा प्रभाव सामान्य लोकांवर अजूनही पूर्वीसारखाच आहे, असे दिसते.
  • निष्कर्ष :
        वरील विवेचनावरून खालील निष्कर्ष काढलेले आहेत
        १) भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जातीयता फार खोलवर रुजलेली आहे. ग्रामीण भागात जातीवर आधारित समाजरचना होती. दुसऱ्या जातीचा व्यवसाय करणे कमीपणाचे, अपमानाचे तसेच अधर्म समजले जायचे.
       २) अस्पृश्यता पाळणे म्हणजे शूद्र, हीन, हलक्या मानल्या गेलेल्या जातींचा स्पर्श टाळणे, स्पर्श झाल्यास ती वस्तू किंवा व्यक्ती बाटली, विटाळली असे समजले जाते. हे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधील ग्रामीण कादंबऱ्यांवरून दिसून येते.
        ३) जातिव्यवस्था हिंदू धर्मामध्ये तर आहेच. शिवाय, हिंदू लोकं मुस्लिमांना स्वतःपेक्षा हलके समजतात किंवा मुस्लिमांमधील सामान्य लोकं स्वतःला हिंदूंमधील बलुतेदारांपेक्षाही हलके समजतात. उदा.- ‘धग’मधील सकीना. तर मुस्लीम जमीनदार हिंदूंमधील शूद्र जातींना अस्पृश्य समजतात. उदा.- मराठीतील ‘इंधन’ व हिंदीतील ‘आधा गाँव’ मधील चित्रण.
      ४) वेगवेगळ्या जाती आणि धर्मात परस्परांमध्ये ‘रोटी आणि बेटी व्यवहार’ केले जात नाहीत. यामुळे त्यांच्यात दुरावा वाढलेला होता. अलीकडे ग्रामीण भागात ही परिस्थिती बदलत चालल्याचेही या संदर्भात केलेल्या विवेचनातून दिसते. मात्र, ‘रोटीव्यवहार’ जेवढ्या मोठ्या प्रमाणात होतो, तेवढा ‘बेटीव्यवहार’ होताना दिसत नाही.
        ५) ग्रामीण भागात अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मेलेली गुरे ओढणे, त्यांचे मांस खाणे, सवर्णांच्या शेतात कष्टाची कामे करणे, गावात भाजी-भाकरी मागायला जाणे इ. कामे उदरनिर्वाहासाठी करावी लागत.
       ६) ग्रामीण भागात सवर्ण पुरुषांचे अस्पृश्य स्त्रियांशी अनैतिक लैंगिक संबंध असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. मात्र कायमस्वरूपी असे संबंध ठेवणाऱ्यांना पापी समजले जाते आणि जातिबहिष्कृत केले जाते. तसेच सवर्ण स्त्री आणि अस्पृश्य पुरुष असे संबंध प्रस्तुत कादंबऱ्यांतून दिसून येत नाहीत. 
संदर्भ ग्रंथ :
          १) डॉ. बन्सीधर, ‘हिंदी के आंचलिक उपन्यास : सिद्धांत और समीक्षा’, भाषा प्रकाशन, नई दिल्ली, प्रथम संस्करण, १९८३, पृ. १८५.
          २) उद्धव शेळके, ‘धग’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, सातवे पु. र्मु., २०००, पृ. ४०. 
          ३) तत्रैव, पृ. ४६.
          ४) तत्रैव, पृ. ३८.
          ५) भास्कर शेळके, ‘मराठी प्रादेशिक कादंबरी : स्वरुप आणि विश्लेषण’, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, पहिली आवृत्ती, २०१२, पृ. ४०६.
          ६) उद्धव शेळके, उनि., पृ. १३३.
          ७) व्यंकटेश माडगूळकर, ‘वावटळ’, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, पु. र्मु., २००८, पृ. ६४.
          ८) तत्रैव, पृ. ६५.
          ९) तत्रैव, पृ. ९९.
          १०) तत्रैव, पृ. १३१.
          ११) तत्रैव, पृ. ९३.
          १२) तत्रैव, पृ. १३२.
          १३) शंकर पाटील, ‘टारफुला’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,र्मु., डिसें. २००९, पृ. १७३.
          १४) हमीद दलवाई, ‘इंधन’, मौज प्रकाशन गृह, मुंबई, तिसरी आवृत्ती, १९९५, पृ. ८२.
          १५) भास्कर शेळके, उनि., पृ. ३१०.
          १६) हमीद दलवाई, उनि., पृ. ८४.
          १७) ना. धों. महानोर, ‘गांधारी’, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पु. र्मु., २००७, पृ. १४.
          १८) तत्रैव, पृ. १६, १७.
          १९) तत्रैव, पृ. ४९.
          २०) हमीद दलवाई, उनि., पृ. ३४.
          २१) तत्रैव, पृ. ३५.
          २२) तत्रैव, पृ. ३३.
          २३) तत्रैव, पृ. ७१.
          २४) तत्रैव, पृ. १२०.
          २५) रामदरश मिश्र, ‘पानी के प्राचीर’, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, तृतीय संस्करण, २००८, पृ. ४३.
          २६) तत्रैव, पृ. ५१.
          २७) तत्रैव, पृ. ७८.
          २८) तत्रैव, पृ. ८४.
          २९) तत्रैव, पृ. १३३.
          ३०) रामदरश मिश्र, ‘जल टूटता हुआ’, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, संस्करण, २००४, पृ. ८१.
          ३१) तत्रैव, पृ. १९१.
          ३२) रामदरश मिश्र, ‘सूखता हुआ तालाब’, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली, प्रथम संस्करण, २००५, पृ. १७.
          ३३) तत्रैव, पृ. १८.
          ३४) शिव प्रसाद सिंह, ‘अलग-अलग वैतरणी’, लोकभारती प्रकाशन, इलाहाबाद, सातवे संस्करण, २००८, पृ. १५७.
          ३५) तत्रैव, पृ. १८१.
          ३६) तत्रैव, पृ. १९३.
          ३७) तत्रैव, पृ. ४२१.
          ३८) तत्रैव, पृ. ४२९, ४३०.
          ३९) श्रीलाल शुक्ल, ‘राग दरबारी’, राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली, आवृत्ती, २०१०, पृ. ३५.
          ४०) तत्रैव, पृ. ३५.
© डॉ. राहुल पाटील,
सहाय्यक प्राध्यापक,
मराठी विभाग,
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,
जवहार, जि. पालघर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *