मराठी विषयातील करियरच्या विविध संधी –

          मित्रांनो, पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषय घेऊन भाषा, साहित्य यांचा अभ्यास करून लेखन, भाषण, श्रवण व इतर कौशल्ये आत्मसात करून खरे तर करियरच्या असंख्य संधी आहेत. त्यापैकी काहींची माहिती मी या ब्लॉगमधून आपल्याला देणार आहे. 

 

१) स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विषय –

         पीएसआय, एसटीआय या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेत एकूण २५ टक्के अभ्यासक्रम हा मराठी व्याकरणाचा असतो. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, क्लार्क, मंत्रालय सहाय्यक या व इतर अनेक पदांसाठी जी परीक्षा होते, त्या प्रत्येक परीक्षेत मराठी विषय असतो. एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांमध्ये मराठी विषय असतो. यूपीएससीला तुम्ही मराठी विषय निवडून त्याचे २ पेपर देऊ शकतात. त्याला बीए, एमए या स्तरावरचा अभ्यास असतो. म्हणून मराठी विषय हा अतिशय उपयुक्त आहे. 

 

२) भाषांतरकार म्हणून संधी –

            मंत्रालय, मराठी विभाग या ठिकाणी अनुवादकाच्या जागा असतात. तसेच खाजगी क्षेत्रामध्येही याला खूप वाव आहे. तुम्ही विविध भाषांमधील पुस्तके, लेख, इतर भाषांमधील मालिका, चित्रपट, लघुचित्रपट, कार्टून मालिका (त्या-त्या लेखकाची, प्रकाशक, दिग्दर्शकाची लेखी परवानगी घेऊन) मराठी भाषेत किंवा मराठीतील साहित्य, लेख व इतर गोष्टी दुसर्‍या भाषांमध्ये भाषांतरित, अनुवादित, रूपांतरित करू शकतात  वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे येथेही या कौशल्याला फार मोठी मागणी आहे.  फक्त तुमचे त्या दोन भाषांवर खूप चांगले प्रभुत्त्व असायला हवे. त्यासाठी विद्यार्थीदशेपासूनच तयारी करायला हवी. सरावातून ते जमते. यातून तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील करियर करायला संधी आहे. 

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, नेट, सेट, पेट, MPSC- UPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करून Bell Icon बटनावर क्लिक करा. जेणेकरून माझे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

 

३) शिक्षक, प्राध्यापक म्हणून प्रचंड संधी –

              महाराष्ट्रातील कला शाखेच्या जवळपास १००% कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मराठी विषय असतो. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये असतोच असतो. पदवी स्तरावरील इतर विषय १०-१२ वी पर्यंत नाही आहेत. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही काही ठिकाणी एक विषय असतो, तर दुसरा नसतो. पण मराठी असतोच. महाराष्ट्राबाहेर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, सेलवास, दीव दमन व इतर अनेक राज्यांमध्ये, अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी विषय अनिवार्य केलेला आहे. सर्वात जास्त जागा या मराठीच्या निघतात. म्हणून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, तसेच महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून करियरची प्रचंड संधी आहे. 

 

४) जाहिरातलेखक म्हणून संधी –

       वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन अशा सर्व ठिकाणी तसेच स्थानिक पातळीवर जाहिरातलेखक म्हणून खरे तर खूप मोठी संधी आहे. स्थानिक पातळीवर म्हणजे तालुका व जिल्हा पातळीवर तेथील कापड दुकाने, हॉटेल, किराणा शॉप, मॉल, वाहनविक्रेते यांच्यासाठी तुम्ही दृक-श्राव्य माध्यमासाठी जाहिरात लिहून देऊ शकतात. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांसाठीही तुम्ही हे काम करू शकतात. हे कौशल्य आत्मसात करा व ‘जाहिरात निर्माण कंपनी’ सुरू करा. यातून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकणार. चांगले उत्पन्न मिळू शकते. 


५) चित्रपट, मालिका, लघुचित्रपट क्षेत्रात पटकथा, संवाद, गीतलेखक इ.-

            मनोरंजन ही माणसाची खूप महत्त्वाची गरज आहे. आज मराठीमध्ये असंख्य चॅनेल्स आहेत. त्यावर अनेक मालिका या नेहमी सुरू असतात.  दरवर्षी काही शे चित्रपट, हजारो लघुचित्रपट, शेकडो कार्टून मालिका, चित्रपट मराठी भाषेतून तयार केले जात असतात. ते तयार करण्यासाठी आधी पटकथा लिहावी लागते. त्यासोबत संवाद लिहावे लागतात. गीतकार गीते लिहीत असतात. त्याशिवाय चित्रपट, मालिका, लघुचित्रपट तयारच होऊ शकत नाहीत. अलीकडे पौराणिक मालिका, कार्टून्स यांचे प्रमाण वाढू लागल्याने महाभारत, रामायणे, मराठीतील विविध पौराणिक, ऐतिहासिक साहित्य वाचण्यासाठी बरेच विद्यार्थी मराठी, हिंदी, संस्कृत विषय घेऊन एम. ए. करीत आहेत. पुढे जाऊन अभ्यास करीत आहेत. 

म्हणून या क्षेत्रामध्ये अक्षरश: प्रचंड-प्रचंड मागणी आहे. फक्त त्यासाठी भाषेवर प्रभुत्त्व हवे. अफाट वाचन असायला हवे. समाजाचे, आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचे चांगले निरीक्षण हवे. पटकथा लेखनाचे तंत्र जाणून घ्यायला हवे. त्यासाठी विविध कार्यशाळा होतात. अक्षर मानव ही संघटना अशा कार्यशाळा घेते. त्यात सहभागी व्हायला हवे. या क्षेत्रात प्रत्येकाला खूप चांगले भविष्य आहे. 

 

६) प्रसारमाध्यमांमधील संधी- 

             प्रसारमाध्यमांमध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन, विविध चॅनेल्स इ. गोष्टी येतात. येथे बातमी, अग्रलेख, संपादकीय, विविध सदरे, रविवार, शनिवार विशेष पुरवण्या या माध्यमांतून कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थ, संस्कृती अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील गोष्टींबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहचवली जात असते. विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित केले जात असतात. त्यासाठी आपल्याकडे लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, निवेदनाचे कौशल्य असायला हवे. भाषेवर प्रभुत्व असायला हवे. त्या-त्या माध्यमाला अपेक्षित तंत्राची सूक्ष्म जाण असायला हवी. भाषा, साहित्य यांच्या अभ्यासातून, वाचनातून ते साधत असते. 

 

७) प्रकाशन व्यवसाय

             मराठीत आजच्या घडीला प्रत्येक महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक प्रकाशन संस्था आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला या व्यवसायाशी निगडीत व्यवसायाच्या संधी आहेत. तसेच तुम्हीही हा व्यवसाय सुरू करू शकतात. व्हाट्सअप, फेसबुक, ऑनलाइनच्या या काळात मात्र या क्षेत्रासमोर आज अनेक समस्या आहेत. त्यांचा अभ्यास करूनच हे क्षेत्र निवडा.

 

८) मुद्रितशोधन व्यवसायातील संधी –

             आजच्या घडीला मराठी भाषेत शेकडो ऑनलाइन, ऑफलाइन वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू आहेत.  विविध विषयांवरची असंख्य पुस्तके दरवर्षी प्रकाशित केले जातात. प्रबंध, लेख, शोधनिबंध लिहिणार्‍यांची संख्याही खूप मोठी आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था, राजकीय पक्ष यांचे वार्षिकांक, दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. म्हणजे दरवर्षी अक्षरश: कोट्यवधी पानांचे लेखन मराठी भाषेतून केले जाते व त्या लिहिणार्‍या, प्रकाशित करणार्‍या सर्वांना त्या लिखित मजकुराचे मुद्रितशोधन करून घ्यावे लागते. यावरुन तुम्हाला या क्षेत्रातील संधींची कल्पना आली असेलच. 

 

९) DTP व्यवसायातील संधी – 

                 मुद्रितशोधनाप्रमाणे ह्या कोट्यवधी पानांचे मुद्रण म्हणजे टाईप करणार्‍या व्यक्तींचीही खूप मोठी मागणी आहे. मराठीव्यतिरिक्त इतर विषयांच्या विद्यार्थ्यांना प्रमाण लेखनाबद्दल (शुद्धलेखनाचे नियम), त्याच्या नियमांबद्दल फार काही माहिती असण्याची शक्यता नसते. म्हणून या क्षेत्रात मराठीच्या विद्यार्थ्याला व्यवसाय व करियरची संधी इतरांपेक्षा खूप जास्त आहे. आज एका पानाच्या टायपिंगचे जवळपास २५-३५ रुपये घेतले जातात. तुमचे टाईपिंग हे अचूक, प्रमाणलेखनाच्या नियमांना धरून असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त संधी मिळू शकेल.

 

१०) कन्टेन्ट रायटर-

              अलीकडे फेसबुक, व्हाट्सअप, यूट्यूब या समाजमाध्यमांचे महत्त्व वाढत आहे. आपली बाजू मांडण्यासाठी व आपल्या स्पर्धकांची बाजू, मुद्दे खोडून काढण्यासाठी विविध राजकीय पक्ष, उद्योजक, कंपन्या, विविध चळवळीतील लोकं आता आपापले आयटीसेल चालवत आहेत. भविष्यात त्यांची संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे विविध विषयांवरील तपशील (कंटेंट) लिहिणार्‍यांची मागणी अलीकडे वाढत आहे. हे लेखन करणार्‍यांना लगेच विशिष्ट मोबदलाही दिला जातो. त्यासाठी तुम्हाला चांगले अभ्यासपूर्ण व सहेतुक लिहिता यायला हवे व या व्यक्ती, संस्था यांच्याशी संपर्क साधून आपली उपयुक्तता पटवून द्यायला हवी. 

 

११) ब्लॉगलेखक म्हणून संधी

१२) लेखक, साहित्यिक

१३) प्रकल्प सहाय्यक

१४) बोलीभाषांचे संशोधक

१५) सूत्रसंचालक

१६) निवेदक

१७) वक्ता

१८) युट्यूबर (Youtuber)

          अजून खूप क्षेत्रे आहेत. मराठी विषयाचा अतिशय गांभीर्याने सातत्यपूर्ण अभ्यास करून मराठी साहित्य, भाषा, व्याकरण इ. विषयांवर चांगले प्रभुत्त्व मिळविले, त्या-त्या क्षेत्राशी संबंधित कौशल्ये आत्मसात केली तर प्रत्येक क्षेत्रात करिअरची प्रचंड मोठी संधी आहे. जेवढा तुमचा सराव (Practice) वाढेल. तेवढे तुमचे कौशल्य, त्यातील बारकावे, सफाईदारपणा, सहजता वाढत जाईल व तुमचा व्यवसाय वाढेल, तुमची मागणी वाढेल. नेट, सेट, पीएच. डी., स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी प्लॅन बी म्हणून हा व्यवसाय करू शकतात. काहीजण कायमस्वरूपीचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनही याकडे बघू शकतात. 

       या प्रत्येक विषयातील संधींवर मी माझ्या ब्लॉगवर लिहिणार आहे व व्हिडिओ बनवून माझ्या YouTube चॅनेलवर अपलोड करणार आहे. म्हणून संपर्कात रहा.

https://t.me/net_set_mpsc_upsc_marathi_onlyहा Telegram ग्रुप मराठी विषय घेऊन नेट/ सेट, PET, MPSC-UPSC व इतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा, मार्गदर्शन करणे, मराठी विषय, त्यातील विविध कौशल्ये आत्मसात करून व्यवसाय, करियरच्या संधी इ. माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

दर रविवारी एकेका घटकावर मी विद्यार्थ्यांची वस्तुनिष्ठ परीक्षाही घेत आहे. महाराष्ट्र, गोवा व मध्यप्रदेश या राज्यांमधील आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त विद्यार्थी व प्राध्यापक गेल्या १५ दिवसांत व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपवर जॉईन झाले आहेत.

कृपया आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या ग्रुपमध्ये सहभागी व्हायला सांगा. त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. प्राध्यापकांची इच्छा असेल तर तेही जॉईन होऊ शकतात. त्यासाठी https://t.me/net_set_mpsc_upsc_marathi_only या लिंकवर क्लिक करा. 

 

© डॉ. राहुल पाटील,
मराठी विभाग प्रमुख,
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
जव्हार, जि. पालघर

मोबाईल क्रमांक – 9623092113

6 thoughts to “मराठी विषयातील करियरच्या विविध संधी –”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *